उत्तर भारतात हाताला काम नसल्यामुळे मोठय़ा संख्येने उत्तर भारतीय महाराष्ट्रात आले आहेत. महाराष्ट्रातील जनतेचा त्यांच्याबद्दल आक्षेप नाही. परंतु काही नेते दोन्ही समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्ही परत जाण्यासाठी नव्हे तर इथेच कायमचे राहण्यासाठी आलो आहोत, असा टोला मुंबई विभागीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता हाणला.
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कालिना मतदारसंघातील संथगतीने सुरू असलेल्या नागरी कामांचा पाढा पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्या पुढे वाचण्यासाठी कृपाशंकर सिंह पालिका मुख्यालयात आले होते. या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रात आलेले उत्तर भारतीय मराठी संस्कृतीशी एकरुप होऊ लागले आहेत. काही उत्तर भारतीय अस्खलित मराठीही बोलू लागले आहेत. महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांचे वास्तव्य मराठी जनतेला खटकलेले नाही. परंतु काही नेते समाजात विष पेरण्याचे काम करीत आहेत. तुम्ही घालाल ती अट आम्ही पाळू, पण इथून परत जाणार नाही, असा निर्धार कृपाशंकर सिंह यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीतील पराभव नेमका कशामुळे झाला हे उमजल्यामुळे आता काँग्रेस नव्या जोमाने विधानसभा निवडणुकीला सामोरी जाईल. त्यासाठी समविचारी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न काँग्रेस करणार आहे. तसेच यापुढे आपल्या कामांचा व शासन निर्णयांचा लोकांपर्यंत योग्य पद्धतीने प्रसारही करण्यात यईल असे संकेत त्यांनी दिले. दरम्यान लवकरच कृपाशंकर सिंह यांनी आपल्या पुत्राला राजकारणात आणण्याचे संकेत दिले. मात्र काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यास बंड करणार का, असा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर देण्यास त्यांनी टाळाटाळ केली.
आगामी विधानसभा निवडणुकींच्या पाश्र्वभूमीवर कृपाशंकर यांनी केलेल्या विधानांवर आता मनसेचे काय प्रत्युत्तर मिळते हे पाहाणे औत्युक्याचे ठरेल.

देशामध्ये नरेंद्र मोदी नावाचा भूकंप झाला आणि त्यात काँग्रेसमधील मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले. उत्तर भारतीयांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि काहींनी मोदी यांच्या पारडय़ात मते टाकली. मोठय़ा नेत्यांना पराभव पत्करावा लागला असला तरी त्यांची लोकप्रियता आटलेली नाही. अन्न सुरक्षा कायदा, माहितीचा अधिकार, राजीव गांधी जीवनदायी योजना अशा अनेक योजना आणि कायदे काँग्रेसने केले. परंतु जनतेपर्यंत ते पोहोचविण्यात आम्ही अपयशी ठरलो.     – कृपाशंकर सिंह