देशात मतदानाचा वाढता टक्का लक्षात घेता यावेळीची लोकसभा निवडणूकीला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर आता बहुचर्चित वाराणसी मतदार संघात निवडणूकीचा नवा विक्रम होणार आहे. वाराणसी मतदार संघात यावेळी तब्बल ७८ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे  देशात सर्वाधिक उमेदवार  उभे राहण्याचा विक्रम यावेळी वाराणसी मतदार संघाने केला आहे.
विशेष म्हणजे, वाराणसीतून भारतीय जनता पक्षाचे(भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीही निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे मोदींना एकाचवेळी ७७ जणांचे आव्हान असणार आहे. परंतु, मोदींसारख्या तगड्या उमेदवाराला या ७७ जणांचे आव्हान कितपत घातक ठरेल याबाबतही शंका आहेच.
यापार्श्वभूमीवर वाराणसीला यावेळी वेगळेच ‘राजकीय’ महत्व प्राप्त झाले आहे आणि त्यात तब्बल ७८ उमेदवार रिंगणात असल्यामुळे निवडणूक आयोगाला इतके मोठे निवडणूक यंत्र उपलब्ध करून देणे शक्य नाही. त्यामुळे वाराणसीत मतपत्रिकांव्दारे मतदान घेण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मोदींसोबत गुरूवारी इतर ३८ जणांनी लोकसभा निवडणूकीसाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मतदार संघातील एकूण उमेदवारांचा आकाडा आता ७८ झाला आहे. परंतु, उमेदवारांची छाननी झाल्यानंतर तसेच २८ एप्रिलपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांचा आकडा कमी होण्याचीही शक्यता आहे. मतदान यंत्रावर १६ उमेदवारांची मर्यादा आहे. त्यामुळे त्यापेक्षा अधिक उमेदवार राहिल्यास मतपत्रिकांद्वारे मतदान घेणे भाग पडणार आहे.
मतपत्रिकांद्वारे मतदान झाले, तर मतमोजणीत प्रत्यक्षरित्या सहभाग घेऊन काम करावे लागते. त्यामुळे वाराणसी सारखा मतदार संघ लक्षात घेता, येथे मतपत्रिकांद्वारे मतदान झाले, तर मतमोजणीसाठी एकूण ३६ तासांचा कालावधी लागेल. असे निवडणूक आयोगाचे अधिकारी उमेश सिन्हा यांनी सांगितले.  वाराणसीत एकूण १६.०९ लाख मतदार आहेत. तसेच १,६१३ मतदान केंद्रांवर हे मतदान होणार आहे.
येत्या १२ मे रोजी वाराणसीत मतदान होणार आहे.