पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समारंभाला अनुपस्थित राहण्याच्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निर्णयावर भाजपने टीका केली असली तरी गुरुवारीच रांचीमध्ये झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या भाषणाच्या वेळी झालेला गोंधळ लक्षात घेता चव्हाण यांचा निर्णय योग्यच होता, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने व्यक्त केली आहे.
सोलापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या शासकीय समारंभात मुख्यमंत्री चव्हाण यांच्या भाषणात अडथळे आणण्यात आले. घोषणाबाजी झाली. हाच प्रकार हरयाणाचे मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांच्याबाबतही झाला. विधानसभा निवडणुका होणार असलेल्या राज्यांमध्ये शासकीय कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदी हे भाजपचा अप्रत्यक्षपणे प्रचार करीत असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. यातूनच लवकरच निवडणुका अपेक्षित असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या समारंभात सहभागी होऊ नये, असा आदेशच काँग्रेस पक्षाने आपल्या मुख्यमंत्र्यांना बुधवारी दिला होता. यानुसारच पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी यांच्या नागपूरच्या समारंभाला उपस्थित राहण्याचे टाळले.
झारखंडमध्ये गुरुवारी सकाळी  मोदी यांच्या उपस्थितीत शासकीय कार्यक्रम पार पडला. या समारंभात  हेमंत सोरेन बोलत असताना गोंधळ घालण्यात आला. ही पाश्र्वभूमी लक्षात घेता नागपूरच्या समारंभाला अनुपस्थित राहण्याचा मुख्यमंत्री चव्हाण यांचा निर्णय योग्यच असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केली. सोलापूरमध्ये मुख्यमंत्री चव्हाण यांच्या भाषणाच्या वेळी मोदी समर्थकांनी घातलेला गोंधळ महाराष्ट्रासाठी अपमानास्पद आहे. महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता हे प्रकार कदापिही खपवून घेणार नाही, असा इशारा ठाकरे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री चव्हाण यांनी मोदी यांच्या समारंभावर बहिष्कार घालण्याच्या निर्णयाचे राष्ट्रवादीनेही समर्थन केले आहे. राज्याशी संबंधित प्रश्नात केंद्रातील  सरकार हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.  नागपूरमधील पंतप्रधानांच्या समारंभावर बहिष्कार घालून मुख्यमंत्र्यांनी विदर्भातील जनतेचा अवमान केला, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केला असला तरी या समारंभात गोंधळ घालण्याचा मोदी समर्थकांना उद्देश होता, असे प्रत्युत्तर काँग्रेसने दिले.