सामना पराभवाच्या छायेत असताना आणि महत्वाचे फलंदाज गारद झाले असताना अनपेक्षितपणे एखादा नवखा खेळाडू शतक मारतो आणि संघाला विजयी करतो. तसेच काहीसे या मतदारसंघात चित्र आहे. प्रिया दत्त यांच्यासारख्या मातब्बर उमेदवारापुढे पराभवच होणार, या खात्रीमुळे कोणाला उमेदवारी द्यायची, याबाबत भाजपमध्ये बराच खल झाला. पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणात पराभवाची शक्यता गृहीत धरूनच पूनम महाजन यांना येथे उमेदवारी देण्यात आली. कन्या म्हणून प्रमोद महाजन यांचा राजकीय वारसा चालविण्याच्या जिद्दीनेच या नवीन मतदारसंघात हाराकिरी करीतच पूनम लढण्यासाठी उतरल्या आहेत. महिनाभरात नवीन मतदारसंघात मुसंडी मारून पक्षाने गृहीत धरलेली पराभवाची गणितेच त्यांनी पुसून टाकली आहेत. आता अटीतटीची लढत होईल, असे काँग्रेस नेतेही म्हणत आहेत.
वडील सुनील दत्त यांनी या मतदारसंघाची मजबूत बांधणी केल्याचा लाभ प्रिया दत्त यांना आजवर झाला. गेल्या निवडणुकीत सुमारे पावणेदोन लाखांचे मताधिक्य त्यांना मिळाले. अर्थात मनसेच्या उमेदवार शिल्पा सरपोतदार यांच्या उमेदवारीमुळे त्यांचा विजय सुकर झाला होता. भाजपचे तेव्हाचे उमेदवार महेश जेठमलानी यांनाही राजकीय पाश्र्वभूमी नव्हती. आज मात्र चित्र पालटले आहे. यावेळी मनसेचा उमेदवार नसल्याने गेल्या निवडणुकीत मनसेला मिळालेली मते महाजन यांच्या पारडय़ात पडतील. तरीही प्रिया दत्त यांच्या पावणेदोन लाखाच्या मताधिक्याचा विचार करता मनसे उमेदवाराची मते वजा केली, तर आणखी सुमारे ४० हजार मतांची बेगमी पूनम यांना करावी लागेल.
या मतदारसंघात समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांचा मुलगा फरहान निवडणूक लढवीत आहे, तर आम आदमी पार्टीचे फिरोज पालखीवाला िरगणात आहेत. त्यांच्यामुळे प्रिया दत्त यांच्याच मतांमध्ये फूट पडण्याची चिन्हे आहेत. आघाडीचे काही स्थानिक पदाधिकारीही पूनम महाजन यांच्यासाठी काम करीत आहेत किंवा प्रिया दत्त यांच्यासाठी काम न करता तटस्थ राहून महाजन यांना मदत करीत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघात वैयक्तिक लक्ष घातले आहे. नरेंद्र मोदी यांचा प्रभाव, काँग्रेसविरोधातील नाराजी आणि नवीन मतदारांची झालेली वाढ लक्षात घेता महाजन यांच्यासाठी विजयाचे लक्ष्य गाठणे अशक्यप्राय नक्कीच नाही. किरकोळ मताधिक्याने पराभव जरी पदरी आला, तरी  अटीतटीची लढत दिल्याचे समाधान तरी त्यांना मिळेल, यातही शंका नाही.