लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला निर्णायक कौल न मिळाल्यास तिसरी आघाडी आकारास येऊ शकते, असे संकेत देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा संभ्रमाचे वातावरण तयार केले. छोटय़ा पक्षांची मोट बांधण्याकरिता काँग्रेसला विश्वासात घेतले जाईल अशी पुष्टीही पवार यांनी जोडली. तिसऱ्या आघाडीचे पिल्लू सोडून पवार यांनी आपणही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचे अप्रत्यक्षपणे सुचविले आहे.
राज्यातील अंतिम टप्प्यातील मतदान पार पाडल्यावर मी नवी दिल्लीला जाणार आहे. निकालापर्यंत विविध पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहे. या चर्चेतून अंदाज येईल. भाजपला २७२ हा जादुई आकडा गाठणे शक्य होणार नाही याचा पुनरुच्चार करतानाच पवार यांनी, काँग्रेस आणि तिसरी आघाडी एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकतात, असा विश्वास व्यक्त केला. अर्थात हे सारे निकालांवर अवलंबून असल्याची पुष्टीही पवार यांनी जोडली. या संदर्भात काँग्रेसशी अद्याप चर्चा झालेली नाही, हे त्यांनी स्पष्ट केले.  नरेंद्र मोदी यांच्याबद्दल विविध राजकीय पक्षांचा असलेला आक्षेप लक्षात घेता भाजपला जादुई आकडा गाठण्याकरिता मित्र मिळणे शक्य होणार नाही. ममता बॅनर्जी या भाजपबरोबर जाण्याची शक्यता नाही.  जरी ममता यापूर्वी भाजपबरोबर असल्या तरी यूपीए सरकारमध्ये त्या मंत्री होत्या. तशीच परिस्थिती निर्माण झाल्यास त्या काँग्रेस किंवा यूपीएबरोबर येतील. समाजवादी पार्टीचे मुलायमसिंग यादव आणि बिजू जनता दलाचे नवीन पटनायक हे भाजपबरोबर जाण्याची शक्यता नाही. आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी यांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. ते सुद्धा काँग्रेसला पाठिंबा देऊ शकतात. प्रादेशिक पक्षांचे वाढते महत्त्व लक्षात घेता छोटय़ा-छोटय़ा पक्षांच्या खासदारांचे संख्याबळ सरकार स्थापण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. यामुळे तिसरी आघाडी सत्तास्थापण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा दावा पवार यांनी केला.