निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीने केवळ राजकीय पक्षांच्या कानठळ्या बसवणाऱ्या प्रचारालाच चाप लावला असे नाही, तर मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांभोवती घुटमळणाऱ्या कार्यकर्त्यांच्या झुंडींही फर्लागभर दूरच राहिल्या. मतदान केंद्र आणि भोवतालचा पूर्ण ताबा पोलिसांनी घेतला होता. झोपडपटय़ांच्या परिसरात तर पोलिसांची एक वेगळीच दहशत जाणवत होती.  
या वेळी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या उमेदवारांचा किंवा पक्षाचा प्रचार होईल असे कोणतेही साहित्य घेऊन बसायचे नाही, अशी सक्त ताकीद देण्यात आली होती. दुपारी साडेतीन नंतर राजकीय पक्षांची टेबले उठवण्यात आली. मतदान केंद्राच्या परिसरात सरकारी कर्मचारी मतदारांना माहिती देत होते.
मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली होती. परंतु काही ठिकाणी पोलीस अतिरेक करीत असल्याचे दिसले. घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगरमधील मतदान केंद्रापासून बऱ्याच अंतरावर असलेले दूध विक्री केंद्र पोलिसांनी जबरदस्तीने बंद करायला लावले. त्यावेळी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते व पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना मतदानाच्या आवारात फिरकण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र पोलीस मतदारांशीही हुज्जत घालत होते. परंतु पोलीस बंदोबस्ताचा बऱ्याच ठिकाणी कारण नसताना अतिरेक झाल्याचे दिसले.