भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना ज्येष्ठ नेत्यांबाबत आदर नाही, अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी केली. मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी, जसवंतसिंह यांसारख्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना जसे बाजूला केले, त्याचप्रमाणे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी जर राजकीय जीवनात सक्रिय असते, तर त्यांनाही दूर करण्यात मागेपुढे पाहिले नसते, असे टीकास्त्र राहुल गांधी यांनी सोडले.
राजस्थानमधील करौली मतदारसंघात काँग्रेसच्या प्रचारसभेत राहुल बोलत होते. ‘मी देशाचा चौकीदार बनणार आहे,’ असे वक्तव्य मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्याचाही राहुल गांधी यांनी समाचार घेतला. मोदी केवळ ठरावीक उद्योगपतींचे चौकीदार बनणार आहेत आणि अदानी यांच्या साहाय्याने पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना दूर करणार आहेत, असे राहुल यांनी सांगितले.
‘‘मोदी नेहमी गुजरातच्या विकासाबाबत बोलतात, मात्र केवळ एका व्यक्तीमुळे गुजरातमध्ये परिवर्तन झालेले नाही. शेतकरी व कामगार यांनी घेतलेल्या कठोर मेहनतीमुळे या राज्याचा विकास झाला आहे,’’ असे राहुल गांधी म्हणाले. मोदी म्हणतात, देशाची सत्ता माझ्या हातात द्या. मात्र गुजरातमध्ये काय झाले? गुजरातच्या जनतेने त्यांच्या हातात सत्ता दिली, मात्र त्यांनी केवळ अदानी आणि अन्य उद्योजकांचेच भले केले, असे गांधी म्हणाले.
गुजरातमध्ये एका शीख शेतकऱ्यांच्या गटाने मला सांगितले, त्यांचे पूर्वज फाळणीनंतर पाकिस्तानातून गुजरातमध्ये आले. त्यांनी कठोर मेहनत करून पैसा कमावला. मात्र गुजरात सरकार आता त्यांना सांगत आहेत की, ते परप्रांतीय आहेत. त्यांच्या जमिनीही अधिग्रहित करण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांशीही मोदी यांची हीच भूमिका आहे. या पक्षातील नेत्यांना बाहेरचा रस्ता कसा दाखवायचा, याचाच विचार मोदी करत आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.