काँग्रेस- राष्ट्रवादीत नव्या सूत्रानुसार जागावाटप झाले पाहिजे, अशी अधिकृतपणे मागणी राष्ट्रवादीने बुधवारी काँग्रेसकडे केली आहे. तसेच या प्रस्तावावर काँग्रेसने लवकर प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादीने व्यक्त केली.
आघाडीतील जागावाटपाच्या संदर्भात शरद पवार, ए. के. अ‍ॅन्टोनी, प्रफुल्ल पटेल आणि अहमद पटेल या नेत्यांची बैठक नवी दिल्लीत पार पडली. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या वतीने निम्म्या जागांची मागणी करण्यात येत असली तरी काँग्रेसकडे तशी अधिकृतपणे मागणी करण्यात आली नव्हती. २००९चे जागावाटप आम्हाला मान्य नसून, नव्या सूत्रानुसार जागावाटप व्हावे, अशी भूमिका काँग्रेसकडे मांडल्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. किती जागा मिळाव्यात याची आकडेवारी सादर केलेली नाही. पण बदलत्या राजकीय परिस्थितीत जास्त जागा मिळाल्या पाहिजेत हे आम्ही स्पष्ट केल्याची माहिती पटेल यांनी दिली.
राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर महाराष्ट्रातील नेते तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून मगच पुढील चर्चेही फेरी होईल, असे काँग्रेसच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. निवडणुका पुढील आठवडय़ात केव्हाही जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेता काँग्रेसने लवकरात लवकर प्रतिसाद द्यावा, असे काँग्रेस नेत्यांकडे स्पष्ट केल्याचेही पटेल यांनी सांगितले.
राष्ट्रवादीने जास्त जागांची मागणी केली असली तरी गत वेळच्या तुलनेत १० ते १२ जास्त जागा देण्याची काँग्रेसची तयारी आहे. म्हणजेच १२५ ते १३०च्या दरम्यान जागा राष्ट्रवादीला दिल्या जातील, असे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात येते. राष्ट्रवादीचा आग्रह १३० पेक्षा जास्त जागा किंवा निवडून येण्याची शक्यता असलेल्या जागा पदरात पाडून घेण्याचा आहे. सद्यस्थितीत राष्ट्रवादीला काँग्रेसची जास्त आवश्यकता असल्याने आघाडी तोडण्याचा राष्ट्रवादीला कल राहणार नाही, असे काँग्रेसच्या वर्तुळात बोलले जाते.