एखाद्या व्यक्तीला २४ तासांत देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात पोहोचता यावे यासाठी रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे जाळे तयार करण्याचा एक भाग म्हणून तटवर्ती क्षेत्रात द्रुतगती महामार्ग उभारणे, कामगारांना कंत्राटी पद्धतीऐवजी कायमस्वरूपी रोजगार मिळण्यासाठी कामगारविषयक सुधारणा करणे, गुंतागुंतीच्या हितसंबंधांबाबत नवा कायदा करणे आणि प्रत्येक जिल्हा हॉस्पिटलमध्ये आरोग्यविषयक माहिती पुरविणारी संस्था स्थापन करणे असा जवळपास १७ कलमी जनताभिमुख कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखला असून तो मंत्रिमंडळातील मंत्र्यांना पाठविण्यात आला आहे.
मोदींनी हा कार्यक्रम १० जुलै रोजी सर्व मंत्र्यांना पाठविला असून त्याबाबतची सविस्तर कृती योजना त्याच्या अंमलबजावणीच्या पद्धतीसह लवकरच मंत्र्यांनी पाठवायची आहे. या १७ कलमी कार्यक्रमामुळे आता ‘अच्छे दिन’ येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
देशातील परिवहन क्षेत्रात सुधारणा व्हावी यासाठी संपर्क आणि ऊर्जा यावर मोदी यांचा भर आहे. पूर्व आणि पश्चिम तटवर्ती क्षेत्रांना जोडणारा द्रुतगती महामार्ग प्रस्तावित असून तो १३ अंश, १५ अंश आणि १७ अंश अक्षांश मार्ग द्रुतगती महामार्गाने जोडण्याचे प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे मध्य प्रदेश ते आंध्र प्रदेश असा कान्हा-कृष्णा मार्ग प्रस्तावित असून त्यावर रेल्वे आणि महामार्गासह तेल आणि वायूच्या पाइपलाइनही प्रस्तावित आहेत. त्याचप्रमाणे मोठय़ा शहरांमध्ये मेट्रो रेल्वे आणि बीआरटी यंत्रणा प्रस्तावित असून शहरी भागातील नागरिकाला एका तासात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी परवडणाऱ्या दरात पोहोचता येईल, या योजनेचाही अंतर्भाव आहे.

* द्विपकल्पाच्या दोन्ही बाजूंना जागतिक दर्जाची बंदरे उभारणार
* देशभरात रोमिंग दर आकारणी रद्द करणार
* २४ तास वीजेसाठी ग्रीडचे विकेंद्रीकरण
* कामगार कायद्यांमध्ये सुधारणा
* लघु उद्योगांना फॅक्टरी कायदा लागू नाही
* आधार कार्डाचा सर्वत्र वापर