भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी गांधी कुटुंबीयांवर घराणेशाहीबाबत टीका केल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियांका गांधी यांनी मोदींविरोधात आघाडी उघडली आह़े  महिलेवर पाळत प्रकरणाची उजळणी करीत, महिला सक्षमीकरणाबद्दल बोलण्याच्या मोदींच्या अधिकारावरच प्रश्न उपस्थित केला आह़े
उत्तर प्रदेशातील रायबरेली या सोनियांच्या पारंपरिक मतदारसंघात प्रियांका आपल्या आईचा प्रचार करण्यासाठी आल्या होत्या़  या वेळी त्यांनी सर्व सत्ता स्वत:च्या हातात केंद्रित करणाऱ्या व्यक्तीला मत न देण्याचे आवाहन मतदारांना केल़े  तसेच विभाजनवादी राजकारणाला मूठमाती देण्याचीही त्यांनी आग्रहाची विनंती केली़
महिलांना सबल करायचे असेल, तर तुम्ही ते कसे कराल? आमचे दूरध्वनी संभाषण बंद खोलीत बसून ऐकून आम्हाला सबल करणार का, असे खोचक प्रश्न प्रियांका यांनी मोदींचे नाव न घेता उपस्थित केल़े  जे नेते महिलांचा आदर करीत नाहीत़, त्यांना तुमच्या घरांतून बाहेर काढून टाका, असे आवाहनही त्यांनी या वेळी केल़े
सबलीकरण हा महिलांचा अधिकार आह़े  आपण जर महिलांच्या सबलीकरणाबाबत बोलत असू, तर आपण महिलांची बलस्थानेही ओळखली पाहिजेत़  महिला सक्षमीकरणाचा साकल्याने विचार केला पाहिज़े  आई, बहीण, मुलगी यापलीकडे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून महिलांचा आदर केला पाहिजे, असेही प्रियांका म्हणाल्या़  भाजप या प्रश्नावर दुहेरी भूमिका घेत असल्याचीही टीका त्यांनी या वेळी केली़  
राहुल गांधींचे मताधिक्य घटण्याच्या भीतीने प्रियंका अस्वस्थ?
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यापेक्षा वरुण गांधी यांना जास्त मताधिक्य मिळण्याच्या शक्यतेमुळे बहीण प्रियंका गांधी-वढेरा यांची अस्वस्थता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून वरुण गांधी व प्रियंका यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीमागे हेच प्रमुख कारण आहे.
अमेठी मतदारसंघात आम आदमी पक्षाचे कुमार विश्वास यांनी काँग्रेसविरोधात प्रचारात जोरदार आघाडी उघडल्याने राहुल गांधी यांचे मताधिक्य घटण्याची भीती काँग्रेस नेत्यांना आहे. आठवडाभरापूर्वी अमेठीत सोनिया गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीतदेखील भाजप व आम आदमी पक्षाच्या प्रभावामुळे राहुल यांच्या मताधिक्यावर परिणाम होण्याची भीती स्थानिक कार्यकर्त्यांनी वर्तवली होती. प्रक्षोभक विधानांसाठी प्रसिद्ध असलेल्या वरुण गांधी यांना मोदीलाटेचा लाभ होऊन त्यांचे मताधिक्य वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय वरुण गांधी यांचे कार्यकर्ते अमेठीत राहुल गांधी यांच्याविरोधात प्रचार करीत असल्याची माहिती प्रियंका यांना मिळाली. राहुल व सोनिया यांच्या मतदारसंघांत प्रचाराची धुरा प्रियंका यांच्याकडे असल्याने मताधिक्य घटल्यास जबाबदारी कुणाची असाही प्रश्न आता काँग्रेसमधून उपस्थित होऊ लागला आहे. विशेष म्हणजे परंपरागत मतदारसंघातून संजय गांधी यांनाही पराभव पत्करावा लागला होता. वरुण गांधी यांच्यावरच्या रागापोटीच प्रियंका यांनी त्यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविला. राहुल गांधी यांच्या प्रचारासाठी दिल्लीहून रायबरेलीला गेलेल्या एका कार्यकर्त्यांने दिलेल्या माहितीनुसार, वरुण यांच्यावर प्रियंका यांनी कधीही यापूर्वी टीका केली नव्हती. परंतु, वरुण गांधी यांचे समर्थक कार्यकर्ते सध्या अमेठीत तळ ठोकून आहेत. याची कुणकुण लागल्यानंतर प्रियंका यांनी पहिल्यांदाच वरुण गांधींविरोधात तोंडसुख घेतले.