महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक लढविणार मात्र निवडून आल्यास नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देणार, अशी घोषणा करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दोन बोके आणि माकडाच्या कथेला मूर्त रूप दिले आहे. एक तिरंगी बोका आणि एक संपूर्ण केशरी बोका, असे दोन भांडणारे बोके पंचवार्षिक लोण्याच्या वाटपासाठी रंगीबेरंगी माकडाकडे गेले होते. त्यातील दोघांचेही थोडे-थोडे हातचे राखून राज यांनी स्वतःच्याही पदरात काही पडेल, याची तजवीज केली आहे.
मनसेने निवडणूक लढवावी जेणेकरून भगव्या बोक्याची मते कमी व्हावीत आणि स्वतःचा मार्ग सुकर व्हावा, असा तिरंगी बोक्याचा आग्रह. मनसेने निवडणूक लढवू नये, असा भगव्या बोक्याचा प्रयत्न. त्यासाठी नितीन गडकरी, विनोद तावडे आणि शेलार यांच्यासारख्या तगड्या प्रतिनिधींनी राज यांची भेट घेऊन त्यांचे मन वळविण्याचाही प्रयत्न केला. गेल्या निवडणुकीसारखी मतविभागणी टाळावी आणि देशातील तिसऱ्या सर्वाधिक जागा असलेल्या राज्यात जागांसाठी फारसे झगडावे लागू नये, हा त्यामागे हेतू.
मनसेने हुशारी दाखवून दोन्ही बोक्यांशी सलगीही ठेवली आणि स्वतःला हवे ते पदरातही पाडून घेतले. आता निवडणूक लढविल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीही मनसेवर खुश आणि निवडणुकीनंतर मोदींना पाठिंबा देणार असल्यामुळे भाजपही खुश. मनसेचे भांडण एकट्या शिवसेनेशी (किंबहुना नेमके सांगायचे तर उद्धव ठाकरेंशी), तर त्यांची गोची केल्याचे पुण्यही पदरात पडणार.
युद्ध आणि राजकारणात ‘शत्रूचा शत्रू तो मित्र’ असा एक सिद्धांत सांगतात. राज ठाकरे यांनी मनसेच्या निर्णयाद्वारे एक नवा सिद्धांत समोर आणला आहे. ‘एका प्रतिस्पर्ध्याचा मित्र तो मित्र आणि दुसरा एक प्रतिस्पर्धी तो ही आपला मित्र’ असा तो सिद्धांत.
याशिवाय निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यामुळे मनसैनिकही आनंदात येणार. आधीच नवथर तरुणांचा पक्ष असल्यामुळे मनसेनेच्या सर्व शिलेदारांचे घोडे फुरफुरत असतात. साहेब कुठे सेटलमेंट करतात आणि लढण्याची संधी हातातून घालवतात, अशी नाही म्हटले तरी सुप्त भीती त्यांच्या मनात होतीच. या निर्णयामुळे ती भीती दूर पळाली आहे.
इतके करून या निर्णयामुळे आपण कोणतीही तडजोड केली नाही, हे सांगायला राज ठाकरे मोकळे आहेत. प्रत्यक्ष निवडणूक लढवून सेना-भाजप युतीला आणि मोदींना पाठिंबा देऊन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला दुखावून त्यांच्याशी पंगा घेतल्याचा दावा ते घेऊ शकतात. शिवाय जे कोणी निवडून येतील ते त्यांच्या खात्यावर जमा होणारच आहेत. ना तिरंगी ना भगवा, ‘रंग माझा वेगळा’ असं म्हणायला त्यांना वाव आहेच.
इकडे दोन्ही बोक्यांची मागणी अंशतः मान्य झाल्यामुळे हे दोन्ही बोकेही खुश. तेव्हा लहानपणी ऐकलेल्या कथा निव्वळ मनोरंजनासाठी नसतात, त्या प्रत्यक्षातही उतरू शकतात, हा यातील धडा. फक्त त्यासाठी माकडाची हुशारी लागते!
– देविदास देशपांडे
devidas@didichyaduniyet.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)