१४४ जागांपेक्षा एकही कमी जागा स्वीकारणार नाही, वेळ पडल्यास स्वबळावर लढू’ हा अजत पवारांचा निर्धार आणि ‘१४४ पेक्षा कमी किंवा काही जास्तही जागा वाटय़ाला येतील. शेवटी पक्षाचा अध्यक्ष म्हणून आघाडीचा निर्णय मी घेणार’ ही शरद पवार यांची भूमिका.. आघाडीबाबत परस्परविरोधी मते व्यक्त करीत काँग्रेसला संभ्रमात पाडून झुलवित ठेवण्याचा प्रयत्न करून काँग्रेसला गाफील ठेवण्याच्या योजनेचाच हा भाग असल्याची चर्चा आहे.
जनता दल, काँग्रेस असा प्रवास केलेले माजी राज्यसभा सदस्य मौलाना खान आझमी यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यावेळी पत्रकार परिषदेत पवार यांनी आगामी निवडणूक काँग्रेसबरोबरच लढविणार असल्याचे स्पष्ट केले. मग अजित पवार यांच्या १४४ जागांची मागणी आणि स्वबळावर लढण्याची केलेली भाषा याकडे लक्ष वेधले असता पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी निर्णय घेणार, असे सांगत पक्षाची वाटचाल अजितदादांच्या कलाने चालणार नाही, असा संदेशही दिला. पण राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मते पवार काका-पुतणे अनेकदा ठरवूनच परस्परविरोधी वक्तव्ये करतात.
काँग्रेसबरोबर आघाडीचे धोरण नवी दिल्लीत केंद्रीय नेत्यांच्या पातळीवर आधी ठरवावे लागेल. मगच जागावाटपाचा निर्णय होईल. लोकसभा निकालाच्या आधारे विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्याची आवश्यकता आहे. कोणी किती जागा लढवाव्या यापेक्षा निवडून येण्याची क्षमता या निकषाच्या आधारेच जागावाटप झाले पाहिजे, असे मतही पवार यांनी मांडले.
मुख्यमंत्र्यांना चिमटा
निवडणुकीची सूत्रे शरद पवार यांच्याकडे सोपविण्यास काँग्रेसचा कोणताही प्रस्ताव नाही. ते स्वत:च तसे सांगत असावेत, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी विधान केले होते. पण अ. भा. काँग्रेस समितीच्या एका सदस्याने तसा प्रस्ताव आपल्याकडे मांडला होता. त्या बैठकीला मुख्यमंत्री चव्हाण उपस्थित नव्हते, असे सांगत पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर कुरघोडी करण्याची संधी सोडली नाही. मुख्यमंत्र्यांना बदलण्याची कोणताही मागणी आपण केली नव्हती. तसेच चव्हाण यांना बदलू पण त्यासाठी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्रस्तावही काँग्रेसने सादर केला नव्हता, असे स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या वतीने निवडणुकीनंतरच मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतला जाईल. मोदी यांची जागा घेण्याकरिता राज्यात विरोधकांकडे सहा-सात जण इच्छूक आहेत, असा टोलाही त्यांनी हाणला. मोदी यांची लाट कमी झाली या राज ठाकरे यांच्या विधानाकडे लक्ष वेधले असता पवार यांनी, ते (राज ठाकरे) लोकांमध्ये जास्त जातात म्हणून त्यांना आधी कळत असावे, आम्ही दिल्लीत असतो, अशी टीका केली.
भुजबळ राष्ट्रवादीमध्येच
अलीकडे प्रसार माध्यमांमध्ये बातम्या तयार करण्याचे कारखाने सुरू झाले आहेत. मुख्यमंत्र्यांना बदलण्याची मागणी केली नसतानाही मी ती मागणी केल्याचे प्रसिद्ध झाले. छगन भुजबळ यांच्याबाबतही तशाच बातम्या सुरू झाल्या आहेत. मात्र भुजबळ यांनी कोठेही जाणार नाही हे स्पष्ट केले आहे याकडे पवार यांनी लक्ष वेधले.