देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात काँग्रेसच्या नेत्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आता भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणजेच पंतप्रधानपदासाठी उतावीळ झालेले उमेदवार नरेंद्र मोदी देश काँग्रेसमुक्त करण्याची भाषा करीत आहेत. काँग्रेसमुक्त देश करून मग देश काय अर्धी चड्डीवाल्यांचा हातात देणार का? असा खोचक प्रश्न करून, ज्या घटकावर सामान्य नागरिकांचा विश्वास नाही ते देश काय चालवणार, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींचे नाव घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला.
आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारसभेसाठी ते बुधवारी कल्याणमध्ये आले होते. या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. ‘‘गुजरातमध्ये हजारो माणसे दंगलीमध्ये मारली. यामध्ये जातिभेदाचे राजकारण मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी खेळले. मेलेल्या माणसांविषयी ज्यांनी खेद व्यक्त केला नाही असे मोदी सामान्य माणसाला कुत्र्याच्या पिल्ल्याची उपमा देतात. अशा माणसाच्या हातात देशाची सूत्रे गेली तर देशात अराजकसदृश परिस्थिती निर्माण होऊन देश हुकूमशाहच्या हातात जाईल,’’ अशी भीती  पवार यांनी मोदींवर टीका करताना व्यक्त केली.
‘दोन निवडणुकांप्रमाणेच मतदार ‘कट-पेस्ट’ करतील’
मुंबई:भाजपचा जाहीरनामा म्हणजे काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या कट-पेस्टचा प्रकार आहे. नरेंद्र मोदी यांची भाषणे ही जुनीच आहे. ही पाश्र्वभूमी लक्षात घेता मतदारही २००४ आणि २००९च्या निकालांचे ‘कट-पेस्ट’ करतील, अशी टीका काँग्रेसने भाजपवर केली आहे. मोदी यांचा इतिहास कच्चा आहे हे वारंवार स्पष्ट झाले आहे. जनताही त्यांच्या त्याच त्याच भाषणांना विटली आहे. भाजपने कितीही आव आणला तरी जनता काँग्रेसला पुन्हा निवडून देईल, असा विश्वास काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी व्यक्त केला. भाजपने हिंदुत्व आणि अल्पसंख्याक याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे.