शिवसेना-भाजपमध्ये सुरु असलेल्या ‘आयाराम’ संस्कृतीवर महायुतीतील घटक पक्षांचे नेते आणि पक्षातील कार्यकर्तेही नाराज आहेत. तर काँग्रेस आणि विशेषत राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे.
काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक नेते शिवसेनेच्या तंबूत दाखल होत आहेत. काँग्रेसचे माजी खासदार भास्कर खतगावकर, आमदार विनायक निम्हण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बबनराव पाचपुते हे भाजपमध्ये प्रवेशास इच्छुक असून काही नेत्यांचे प्रवेश झाले आहेत. त्याला स्वाभिमानी पक्षाचे खासदार राजू शेट्टी यांनी तीव्र विरोध केला आहे. गेली काही वर्षे ज्यांच्याविरूध्द संघर्ष केला, त्यांच्या कामगिरीवर आक्षेप केले, आरोप झाले, त्यांना युतीच्या नेत्यांनी पक्षात प्रवेश देऊ नये, अशी शेट्टी यांची भूमिका आहे.
भाजपच्या कार्यकर्ते व काही नेत्यांचाही आयाराम संस्कृतीला आक्षेप आहे. त्यांना पुन्हा सत्ता दिल्यास युती आणि आघाडी यात फरक काय, असा कार्यकर्ते व घटकपक्षांचा सवाल आहे. भाजपकडे जागावाटपात कमी जागा असून पक्षातील इच्छुक नेतेच भरपूर आहेत. प्रत्येक मतदारसंघात किमान तीन प्रबळ नेते इच्छुक आहेत. त्यामुळे अन्य पक्षातील नेत्यांची गरज नसताना त्यांना पक्षात का आणले जात आहे, असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांना पडला आहे.