२००४च्या निवडणुकीत जेम्स लेनच्या पुस्तकाचा खुबीने वापर करीत मतांच्या ध्रुवीकरणाचा राष्ट्रवादीचा प्रयत्न यशस्वी झाला होता. यंदा याच धर्तीवर अध्र्या चड्डीवाल्यांच्या हातात देश देणार का, असा खोचक सवाल करीत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मराठा, इतर मागासवर्गीय, दलित आणि अल्पसंख्याक मतांचे ध्रुवीकरण करण्यावर भर दिल्याचे मानले जाते.
अर्धी चड्डी म्हणजे रा. स्व. संघावर पवार यांनी थेट निशाणा साधला. विशेष म्हणजे कल्याण-डोंबिवली या संघाचे प्रस्थ असलेल्या परिसरातच पवार यांनी या मुद्दय़ाला हात घातला. जातीच्या आधारावर मतांचे ध्रुवीकरण करण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न राजकीय नेत्यांकडून केला जातो.  २००४च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने मोठय़ा खुबीने जेम्स लेनचा मुद्दा प्रचारात वापरला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणारे पुस्तक जेम्स लेन यांनी लिहिले होते. यावरून पुण्यातील भांडारकर संस्थेच्या कार्यालयावर हल्ला करण्यात झाला़  जेम्स लेनचा मुद्दा तापवून राष्ट्रवादीने पद्धतशीरपणे मराठा समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण केले आणि राज्यात राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. रा. स्व. संघात ब्राम्हण समाजाचे प्राबल्य असल्यानेच पवार यांनी या मुद्दय़ात हात घातला. मराठा, इतर मागासवर्गीय, दलित आणि मुस्लिम मतांचे जास्तीत जास्त ध्रुवीकरण करण्याच्या उद्देशानेच पवार यांनी हा प्रयोग केला असण्याची शक्यता व्यक्त केली जाते.