बारामती मतदारसंघात सुप्रियाताईंच्या प्रचारासाठी मासाळवाडी परिसरात फिरत असताना आपला आवाज काढून आपली बदनामी सुरू करण्यात आली आहे. पाणी बंद करू असा दम दिला, असे आरोप होत आहेत. मात्र हे सर्व आरोप खोटे असून गेल्या २५ वर्षांपासून हा माझा मतदारसंघ आहे. इथून लोक मला निवडून देत आहेत. त्यांचेच पाणी बंद करण्याची भाषा केली, तर लोकच माझं पाणी बंद करून घरी बसवतील. मी चूक केली नाही, तर मी स्वत:ला दोषी का समजू असा सवाल मासाळवाडीप्रकरणी अजित पवार यांनी ठाण्यात आयोजित प्रचारसभेत केला.
ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजीव नाईक यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार ठाण्यातील किसननगर परिसरात आले होते. त्या वेळी भाषणामध्ये त्यांनी मासाळवाडी प्रकरणाविषयी आपली बाजू मांडली. कारण नसताना आमची बदनामी केली जाते. पुण्यातील मतदारांची नावे गहाळ झाली त्याचा आरोपही काँग्रेस राष्ट्रवादीवर केला जातो. निवडणूक आयोग त्यावर निर्णय घेईलच. बारामती मतदारसंघात सुप्रियाताईंचा प्रचार संपल्यानंतर १६ तारखेला कार्यकर्त्यांच्या घरी भेट देत असतानाच कोणीतरी आपल्या आवाजची नकली ध्वनिफीत तयार केली, असेही त्यांनी सांगितल़े