मानवी केसात सल्फर व नायट्रोजन भरपूर प्रमाणात असतात. त्यापासून विशिष्ठ प्रक्रियेद्वारे अ‍ॅमिनो अ‍ॅसिड तयार होते. ते पर्यावरणपूरक आहे. त्यातील प्रथिने व हायड्रोजन पिकाच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. कालांतराने पाण्याऐवजी गोमूत्र मिसळून तयार केलेले द्रव्य अधिक फायदेशीर ठरल्याचे दिसून आले. सोयाबिन व कापूस पिकावर त्याची फवारणी केल्यावर एकरी दोन ते तीन क्विंटलने वाढ झाल्याचे दिसून आले आहे, असा दावा महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण (एमगिरी) संस्थेचे वरिष्ठ वैज्ञानिक के. आर. यादव यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रचलित रासायनिक खतांद्वारे कापसाचे उत्पादन वाढविण्याची खर्चिक बाब मागे टाकून केसांपासून तयार केलेल्या अ‍ॅमिनो अ‍ॅसिडद्वारे उत्पादन वाढ करण्याचा प्रयोग हजारावर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.

वर्षभरापूर्वी या प्रयोगास सुरुवात झाली होती. त्याचा तुलनात्मक अधिक फायदा दिसून आल्याने शेतकरी या पीकवर्धक द्रव्यरूप खताकडे पडू लागले. शेतकऱ्यांसाठी हा लघुउद्योग फायदेशीर ठरत असल्याचे पाहून जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी हा लघुउद्योग टाकण्यासाठी वीस बचतगटांना प्रत्येकी एक लाख रुपयाचे अनुदान मंजूर केले आहे. मानवी केस व गोमूत्र या मिश्रणातून अ‍ॅमिनो अ‍ॅसिड तयार करण्याची पद्धत येथील महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण (एमगिरी) संस्थेचे वरिष्ठ वैज्ञानिक के. आर. यादव यांनी विकसित केली. मानवी केसात सल्फर व नायट्रोजन भरपूर प्रमाणात असतात. त्यापासून विशिष्ठ प्रक्रियेद्वारे अ‍ॅमिनो अ‍ॅसिड तयार होते. ते पर्यावरणपूरक आहे. त्यातील प्रथिने व हायड्रोजन पिकाच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. कालांतराने पाण्याऐवजी गोमूत्र मिसळून तयार केलेले द्रव्य अधिक फायदेशीर ठरल्याचे दिसून आले. सोयाबिन व कापूस पिकावर त्याची फवारणी केल्यावर एकरी दोन ते तीन क्विंटलने वाढ झाल्याचे दिसून आले आहे, असा दावा यादव यांनी केला.

पीकवर्धक म्हणून अ‍ॅमिनो अ‍ॅसिडची उपयुक्तता सिद्ध करण्यास ते चाचणीसाठी नागपूरच्या कापूस संशोधन केंद्राकडे पाठविण्यात आले. वर्षभर चाचण्या झाल्या. ‘एमगिरी’ने कापूस संशोधन संस्थेशी करार केल्यानंतर या चाचण्यांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती संस्थेचे संचालक डॉ. प्रफुल्लकुमार काळे यांनी दिली. चाचण्यांत कापूस उत्पादनात २५ टक्के वाढ ही अ‍ॅमिनो अ‍ॅसिडची फवारणी केल्याने झाल्याचे दिसून आले. त्यानंतर ‘एमगिरी’तर्फे काही शेतकऱ्यांना हे अ‍ॅसिड फवारण्यास देण्यात आले. त्याचा फायदाच झाला. आता हे द्रव्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. गावातील शेतकऱ्यांनी बचतगटाच्या माध्यमातून अ‍ॅमिनोचे उत्पादन केंद्र सुरू केले.

एक किलो केसांपासून तीन लिटर अ‍ॅमिनो अ‍ॅसिड तयार होते. मात्र, त्यासाठी केस गोळा करण्याची पायपीट आहे. ‘जिज्ञासा अ‍ॅग्रो’ या केवळ महिला सदस्य असणाऱ्या समूहाच्या श्रीमती मनीषा आसोले सांगतात की, आम्ही काही महिलांनीच केस गोळा करण्यात प्रत्यक्ष पुढाकार घेतला. केस कर्तनालयांना विनंती करीत केस गोळा करणे सुरू केले. अ‍ॅमिनो अ‍ॅसिड तयार करण्याची जबाबदारी एका महिला अभियंत्याकडे सोपविली आहे. कापसासाठी खरच हे द्रव्य फायदेशीर ठरते काय ही शंका उपस्थित होऊ नये म्हणून मी माझ्या शेतातच त्याची फवारणी केली. त्याचा लाभ सर्वाना दिसून आला. पऱ्हाटीची चांगली वाढ असून पात्या, बोंडे वाढली. प्रथम आम्ही गटाच्या महिलांचाच या द्रव्याचा पुरवठा करीत आहे. बाजारात हजार रुपये लिटरने विकल्या जाणारे अ‍ॅमिनो आम्ही केवळ तीनशे रुपयात देतो. शंभर लिटरची नोंदणी झाली. उत्पादन पुढे वाढवू. कसलाच धोका नसणारा हा उद्योग आहे. अशी भावना श्रीमती आसोले व्यक्त करतात. आज जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने २० अ‍ॅसिड निर्मिती केंद्र सुरू झाली आहे. एकप्रकारे लघुउद्योगाची साखळीच यामुळे तयार होत आहे. हे काम सध्या छोटय़ा स्वरूपातच आहे. कारण मोठे युनिट टाकण्यासाठी तेवढी पुंजी जमा करणे गावपातळीवर साध्य होत नसल्याचा दाखला मिळतो.

सेलू येथील संत केजाजी संस्थेचे अमोल माहुरे म्हणतात की,  रोजगार, केस खरेदी, उत्पादन व अन्य खर्च वजा जाता आमच्याकडे दहा हजार रुपये महिन्याकाठी वाचतात. हा नफाही समाधानकारक आहे. आम्हाला फुकटच केस मिळतात. त्यामुळे दिलासा मिळाला. पुढे आम्ही केस विकतच घेऊ. एका महिन्यात किमान एक हजार लिटर अ‍ॅसिड आम्ही तयार करीत आहोत. लिटरला १८० रुपये खर्च येतो. तयार करताना वेगवेगळी द्रव्ये टाकावी लागतात. लोकांना रोजगार मिळाला. हे अ‍ॅसिड मागण्यासाठी आता शेतकऱ्यांचा रांगा लागतात. कारण फवारणीत कुठलीच जोखीम नाही  व उत्पादनात वाढ होत असल्याचे सिध्द झाल्याने अ‍ॅमिनो अ‍ॅसिड लोकप्रिय होत आहे. गटातील शेतकऱ्यांना प्रथम वितरित करतो. अडीचशे रुपये लिटरमुळे हे इतरांच्या तुलनेत स्वस्त पडते.

  • बहुराष्ट्रीय कंपन्यांचे पीकवर्धक ७५० ते १००० रुपये लिटरने बाजारात विकले जाते. संत्रा, मूग व हळदीच्या उत्पादनातही हे अ‍ॅसिड फवारल्यास फायदाच होतो. केसाखेरीज सोयाबीनच्या चिपाडापासून अ‍ॅमिनो तयार करण्यात येते. पण अद्याप त्याचा प्रायोगिकच वापर आहे, अशी माहिती डॉ. काळे यांनी दिली.

prashant.deshmukh@expressindia.com

मराठीतील सर्व लोकशिवार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amino acid will increase production of soybean and cotton
First published on: 23-09-2017 at 02:42 IST