मध्यंतरी फेसबुकवर भारतामधल्या एका शेतात गाजरे जमिनीतून उपटणारे मशीन दाखवले होते. हातांनी उपटल्या जाणाऱ्या गाजरांच्या कितीतरी पटींनी जास्त गाजरे मशीन उपटते. अमेरिकेतल्या वर्तमानपत्रात काही दिवसांपूर्वी गाजर-विषयक बातमी वाचली, त्याची आठवण झाली.

माईक युरोसेक हा कॅलिफोíनयातला सधन मळेवाला. त्याच्या मळ्यात बाकीच्या भाज्यांबरोबर गाजरेही लावली जायची. इतर फळे, भाज्या त्याला व्यवस्थित पसे मिळवून द्यायच्या, तरी गाजरे काही यश देत नव्हती. १९८०च्या पूर्वी अमेरिकेतल्या बहुतेक मळेवाल्यांना गाजराचे उत्पन्न चांगलीच डोकेदुखी होऊन राहिली होती. मळ्यात गाजरे तयार व्हायला खूप वेळ लागत असे. गाजरे वेडी-वाकडी असत. सुपरमार्केटवाले असली वेडी बिद्री गाजरे विकायला ठेवीत नसत. त्यांना गाठी असलेली, वाकडी तिकडी गाजरे चालायचीच नाहीत. त्यांचा बिझिनेस चालवायची ती एक चाल असते, म्हणाना. काय बिशाद आहे, तुम्हाला टोमॅटोच्या राशीतला एक टोमॅटो जरा लहान किंवा जरा मोठा दिसेल! सगळे कांदे, सगळे बटाटे एक सारखे दिसणारे. सगळ्या हिरव्या मिरच्यांची लांबी पट्टीनी मोजून घ्यावी. कमी जास्ती भरणारच नाही. सुपरमार्केट्सनी त्याची सुरुवात केली, की ग्राहकांनी तशी मागणी केली, ते कळायला मार्ग नाही, पण अशा शिस्तीच्या भाज्या सगळ्याच सुपरमार्केट्समधे असतात, एवढे मात्र खरे. युरोसेकच्या मळ्यात इतर फळभाज्यांबरोबर गाजरेही भरपूर यायची. मात्र ती सगळी साधीसुधी, लहान, मोठी, कधी वरती गाठी असलेली अशी असत. गावातली मोठी सुपर्मार्केट्स अशी गाजरे विकत घ्यायला नकार देत. काही थोडी गाजरे रस काढायला विकली गेली, तरी युरोसेकच्या मळ्यांमधले गाजरांचे उत्पन्न कितीतरी टन असे. एक वर्षी तर त्याच्या गाजरांपकी ७० टक्के गाजरे सुपरमार्केट्सनी नाकारली.

गरज ही शोधाची जननी असते असे जे म्हणतात, त्याचा प्रत्यय गाजरांच्या बाबतीत युरोसेकला आला. एक वर्षी युरोसेकनी एक प्रयोग केला. काही गाजरे एक इंच बुटकी कापली. ती जवळजवळ गोलच दिसायला लागली. त्या गाजरांना त्यानं नाव दिले ‘बनी बॉल्स’.  मात्र ही गाजरे काही विकली गेली नाहीत. नाउमेद न होता त्यांनी आणखी काही वेडीवाकडी गाजरे घेऊन बटाटे सोलायच्या सोलाण्यानं त्यांची पातळ साले काढली, आणि घरातल्या साध्या सुरीनं प्रत्येक गाजराचे तीन इंच लांबीचे तुकडे केले. प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधे गाजराचे तुकडे घातले. गावातल्या मोठय़ा सुपरमार्केटमधे इतर भाज्यांबरोबर त्यानं छोटय़ा गाजरांच्या पिशव्याही पाठविल्या. सोबत मॅनेजरला चिठ्ठीही पाठविली. चिठ्ठीमध्ये त्यानं विचारले की गाजराच्या पिशव्या हव्यात का म्हणून. सुपरमार्केटमधून संध्याकाळी उत्तर आले, गाजराच्या पिशव्या चांगल्या विकल्या गेल्या होत्या. मार्केटला तशा अजून पिशव्या हव्या होत्या. थोडय़ा दिवसातच युरोसेकच्या लक्षात आले की त्याच्या गाजरांना मागणी वाढत होती. सुरीनं तुकडे करण्यात वेळ आणि श्रम फारच होते. त्याच्या पाहण्यात मग एका फास्ट फूड कंपनीची जाहिरात आली. कंपनी दिवाळखोरीत निघाली होती. त्यांच्याकडे एक मोठे शेंगा कापण्याचं मशीन होतं. मशीनवर शेंगासारख्या तीन इंच लांबीच्या तुकडय़ांमध्ये कापता येत असत. गाजरे कापायला युरोसेकनी ते मशीन विकत घेतले. गावात एक पॅकेजिंग करणारी कंपनी होती, युरोसेक त्यांच्याकडे कापलेली गाजरे घेऊन जाई. तिकडे गाजराच्या तुकडय़ांवरची पातळ साल काढली जाई. गाजरे प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये बसून सुपर्मार्केटला जात. बघता बघता गाजरांचा खप वाढला. माईक युरोसेक आणि त्याचा मुलगा डेव्हिड या दोघांनी बेबी कॅरट्सची प्रसिद्धी केली. छोटय़ा आकारांची, डी. व्हिटॅमिननं भरलेली गाजरे चवीनं, गुणांनी आणि रूपानं सगळीकडे तुफान लोकप्रिय झाली. या गाजरांना ‘बेबी स्टाईल कट कॅरट्स’ म्हणतात. ती बेबी कॅरट्सहून वेगळी आहेत. बेबी कॅरट्स म्हणजे जमिनीत उगवलेली कोवळी गाजरे. बेबी स्टाईल कट कॅरट्स म्हणजे जमिनीतून उगवलेली. एकूण बेबी कॅरट्सच्या धंद्यापकी ९० टक्के धंदा हा फक्त दोन कंपन्यांमध्येच वाटलेला आहे. दोन्ही कंपन्यांमधे माईक युरोसेक आणि त्याचा मुलगा-दोघांचा मोठा शेअर आहे.

गाजराच्या लागवडीत खूपच अचूकता आली आहे. ५ ते ८ इंच डायामीटर असलेले, १४ इंच लांबीचे असे प्रत्येक गाजर लागते. एका गाजरातून चार बेबी कॅरट्सचे तुकडे काढायचे असतात. गाजरे सडपातळ हवी असतात, त्यामुळे त्यांची लागवड जवळ जवळ करायची असते. बरोबर १२० दिवसांनी गाजरे प्रोसेसिंग हाऊसला पाठविली जातात. गाजरांचे तुकडे करून ते तुकडे किंचित घासून क्लोरीन मिश्रित पाण्यात बुडवून काढले जातात. आता मळ्यातली गाजरे उपटायला मोठाली मशिन्स वापरतात.  ही मशिन्स एका तासात ७५ टन गाजरे उपटतात. त्यानंतर ती गार करायची, निवडायची, कापायची, साली काढायच्या, त्यांना पॉलिश करायचं, वजन करून बॅगेत घालायची अशी कामे मशिन्सद्वारेच होतात. अमेरिकेत पोटात अन्न म्हणून काय घालतो आहोत, ते कुठून आले आहे याबाबतीत लोक बेफिकीर दिसतात. अजून कितीतरी लोकांना हे माहीत नसेल की बेबी कॅरट्स ही तशी उगवलेली नसून ती माणसानं केलेली कलाकृती आहे. व्यस्त जीवनशैलीत बॅग उघडून खाता येणाऱ्या, चविष्ट, आरोग्यपूर्ण अशा या खुराकाला अजून पर्याय नाहीये. गाजरे लोकप्रिय करायला पॅकेजिंग इंडस्ट्रीनीही मदत केली आहे. बटाटय़ाच्या चिप्सच्या पाकिटासारखेच दिसणारे पाकीट, एकावेळेला तोंडात सबंध घालता येईल अशा आकाराचा तुकडा, फक्त पाकीट उघडण्याचे श्रम घेतल्यावर खायला तयार मिळणारा पौष्टिक आणि चविष्ट खुराक, ‘व्हेजी’च्या वर्गात मोडणारे काहीतरी खाल्ल्याचे समाधान, वगरे, वगरे. युरोसेक आणि त्याच्या मुलानं बेबी कॅरट्सच्या खपासाठी खूप मेहनत घेतली. त्यांची गाजरे सबंध अमेरिकेत पोचली. बटाटय़ाच्या फ्राईजच्या ऐवजी हेल्दी स्नॅक म्हणून लोकांना हा पर्याय आवडला. गाजरे आणि रँच ड्रेसिंग हे एकत्रीकरण ग्राहकांच्या पसंतीस उतरले. विमानात लंच मेन्यूत ही गाजरे द्यायला सुरुवात झाली, आणि विमानातल्या लोकप्रियतेमुळे युरोप, इंग्लंडमधेही त्यांची मागणी वाढली. आणि किती गाजरे वर्षांला बेबी कॅरट्समध्ये रूपांतरित केली जातात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्याचं उत्तर आहे १७२ दशलक्ष टन! कोरलेल्या गाजरांनी ग्राहकांप्रमाणेच मळेवाल्यांनाही समाधान मिळते. एकंदरीत बेबी कॅरट्स वर ती खाणारे, ती तयार करणारे, ती विकणारे – सर्वच खूश.

आयुष्याच्या संध्याकाळी युरोसेक संतुष्ट होता. कधी कधी बायकोला तो त्यांच्या दोघांच्या आवडीचा कॅरट केक करायची फर्माईश करीत असे. ऐंशी वष्रे ओलांडलेला युरोसेक यशस्वी धंद्याची धुरा आपल्या मुलावर आणि नातवावर सोपवून २००६ साली कॅन्सरने गेला. गाजरासारख्या साध्या विषयात त्याला मोठा आशय आढळला आणि गाजराच्या मळ्यात क्रांती झाली.

शशिकला लेले –  naupada@yahoo.com