सलग चार वष्रे दुष्काळाने मुक्काम ठोकल्यामुळे एकामागून एक संकटाची मालिका शेती आणि शेतकऱ्यांचे आíथक व्यवस्थापन विस्कळीत करीत होते. या दुर्दैवी फेऱ्यामुळे दोन वर्षांत तब्बल सवा तीनशे शेतकऱ्यांनी परिस्थितीसमोर शरणागती पत्करत आपली जीवनयात्रा संपवली. मात्र काही जणांनी दुष्काळी प्रश्नाला भिडण्यासाठी सातत्य, कष्ट आणि नुकसान सहन करण्याची मानसिकता निर्माण करीत मोठा लढा दिला. परिणामी पाच वर्षांच्या अथक परिश्रमानंतर दुष्काळाचा पराभव झाला आणि चिकाटीला यश मिळाले आहे. कळंब तालुक्यातील शिराढोण येथील राजेंद्र मथुरादास मुंदडा या तरुण शेतकऱ्याच्या कष्टाला लाखो मोसंबीची फळे लगडली आहेत. दुष्काळात पाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी अजिबात पीक घेतले नव्हते. त्यामुळे बाग जिवंत राहिली. दुष्काळात त्यांनी उत्पन्न घेण्याऐवजी बाग जोपासण्यावर भर दिला आणि आता निसर्गाच्या दुष्काळी चक्रातून वाचलेली बाग मुंदडा यांच्या कुटुंबाची आíथक जोपासना करीत आहे.

कळंब तालुक्यातील मथुरादास मुंदडा हे उत्तम कृषक पुरस्कार मिळालेले जुनेजाणते शेतकरी. त्यांचा हा वारसा त्यांचे उच्चशिक्षित पुत्र राजेंद्र मुंदडा यांनी अत्यंत चिकाटीने जोपासला आहे. शेती सोडून उद्योग व्यवसायाकडे ग्रामीण भागातील बहुतांश तरुणांचा कल आहे. अशा काळात टीव्हीएस सुझुकीचे स्वत:चे शोरूम बंद करून मुंदडा यांनी शेतीची कास धरली. कुटुंबाला शेती आणि शेती व्यवस्थापनातील अनुभवाचा मोठा वारसा होता. एकत्रित कुटुंब असल्याने मोठे भाऊ प्रेमकिशोर मुंदडा यांच्या मदतीने त्यांनी शेतात आंबा, द्राक्ष, फुलांची शेती असे वेगवेगळे प्रयोग केले. एकाच वेळी ओसाड माळरानावर ८० एकर क्षेत्रावर सात हजार ६०० केशर आंब्याची झाडे लावण्यात आली. त्याचबरोबर ३० एकरांवर असलेला उसाचा फड मोडून न्यू सेलार रंगपूर क्रॉस या सुधारित मोसंबीची पाच हजार पाचशे रोपांची लागवड करण्यात आली. सीताफळाची दोन हजार ५०० झाडेदेखील याच काळात मुंदडा यांनी शेतामध्ये लावली. उद्योग बंद करून शेती व्यवसायात नवनवीन प्रयोग करणाऱ्या या तरुण शेतकऱ्याने एक-दोन नव्हे, तर तब्बल पंधरा हजार सहाशे झाडांना रक्त वाळवून टाकणाऱ्या भयानक दुष्काळात प्रचंड कष्टाने जिवंत ठेवण्याचे काम केले. टँकरने पाणी विकत घेऊन या काळात पोटच्या मुलांप्रमाणे राजेंद्र मुंदडा यांनी पंधरा हजार ६०० झाडांना जिवंत ठेवण्याचे काम केले. उपलब्ध असलेले पाणी आणि त्यातून उत्पादन मिळणार नाही, याची हमी आल्यानंतर त्यांनी झाडांना लागलेली फळे दर वर्षी तोडून टाकली आणि बाग जोपासण्यावर भर दिला.

मोसंबीच्या बागेस गतवर्षी प्रचंड मृगबहार लगडून गेला. मात्र दुष्काळात मुंदडा यांनी झाडांना प्राधान्य देण्यासाठी आच्छादन, ठिबक सिंचन आणि झाडांवर पाण्याचा फवारा मारून दिवसरात्र झाडांची काळजी घेतली. झाड जगले तर भविष्यात आपण तगू, हा विश्वास त्यांना असल्यामुळे अत्यंत इमानेइतबारे या काळात उत्पन्नाची अपेक्षा न बाळगता त्यांनी घेतलेल्या परिश्रमाला आता रसाळ गोमटी फळे लागली आहेत. यंदा त्यांच्या आंब्याला मोठा मोहर लागला आहे. मोसंबीची बाग लगडून गेली आहे. झाडाला पानांपेक्षा फळांची संख्या अधिक आहे. सलग पाच वष्रे वनवास सोसल्यानंतर यंदा त्यांच्या पदरात मोठे उत्पन्न पडले आहे. लगडलेली त्यांची बाग पाहण्यासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यांतील अनेक शेतकरी आणि कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ आवर्जून भेट देत आहेत.

मुंदडा यांची मोसंबी सध्या नागपूर, अहमदाबाद आणि दिल्लीतील बाजारपेठेत मोठा भाव खात आहे. अंदाजे शंभर ते सवाशे टन उत्पन्न त्यांना यंदा मोसंबीने दिले आहे. प्रति टन १६ ते १८ हजार रुपये दर दिल्ली, अहमदाबादच्या बाजारात त्यांच्या उत्पादनाला मिळाला. त्यांच्या बागेतून मोसंबीचा प्रवास दिल्ली, अहमदाबादकडे सध्या नेमाने सुरू आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर मोसंबीची विक्री स्थानिक बाजार, ज्यूस बनविणारे कारखाने त्याचबरोबर काही व्यापाऱ्यांना विदेशातदेखील पाठविला जात आहे. पाच वष्रे तळहाताच्या फोडाप्रमाणे दुष्काळी कालावधीत मुंदडा यांनी बाग जोपासली. खत, पाणी, निगराणी, फवारणी, वर्षभराची मजुरी आणि स्वत:चे श्रम असा सगळा मेळ घातल्यास बाग जोपासण्यासाठी वर्षांकाठी त्यांना पाच लाख रुपयांचा खर्च करावा लागतो. सलग पाच वष्रे उत्पन्न नसल्यामुळे बाग जिवंत ठेवण्यासाठी तब्बल २५ लाख रुपये त्यांना खर्चावे लागले. यंदा बागेने पाच वर्षांचे पांग फेडले. सव्वाशे टनाहून अधिक उत्पन्न पदरात पडले. दरही चांगला मिळाला. त्यामुळे सुमारे २० लाखांच्या घरात उत्पन्न यंदाच्या बागेने मुंदडा यांना मिळवून दिले आहे. सलग पाच वष्रे बाग सांभाळण्यासाठी झालेला खर्च आणि यंदाचे उत्पन्न याचा लेखाजोखा घातला तरीदेखील पाच लाख रुपयांचा तोटा झाला असल्याची प्रतिक्रिया मुंदडा यांनी व्यक्त केली. पाच लाखांच्या नुकसानीपेक्षा दुष्काळात सातत्य ठेवल्यामुळे बाग जिवंत राहिली, याचा सर्वात मोठा आनंद असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. तात्कालिक लाभासाठी अनेक जण उपलब्ध असलेले पाणी फळधारणा होत असताना झाडांना लागणारे पाणी याचा अभ्यास न करता, बागेतून उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतात. परिणामी उत्पन्नही कमी मिळते आणि बागदेखील जोपासली जात नाही. झाडाला फळधारणा होत असताना झाडांची पाण्याची मागणी वाढते. अशा वेळी मुबलक पाणीसाठा नसेल तर झाडांना लागलेली फळे काढून टाकण्याशिवाय पर्याय नाही. नवीन बाग जोपासू इच्छिणाऱ्या तरुण शेतकऱ्यांनी हा मूलभूत विचार प्राधान्याने करायला हवा. ‘सर सलामत तो पगडी पचास’ ही आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेली म्हण याचीच प्रचीती देत असल्याचेही मुंदडा यांनी सांगितले.

२० लाखांचे उत्पन्न

माळरानावर पाच वर्षांच्या दुष्काळी चक्रातून तावून सुलाखून निघालेल्या मोसंबीच्या झाडांना आता लाखो फळे लगडली आहेत. पाच हजार झाडांच्या अंगाखांद्यावर झोके घेणाऱ्या मोसंबीतून २० लाख रुपयांचे उत्पन्न यंदा तरुण शेतकरी राजेंद्र मुंदडा यांना मिळाले आहे. फळधारणा होत असताना झाडांची पाण्याची मागणी, आवश्यक असलेली खत आणि निगराणी त्यांनी स्वत: जातीने केल्यामुळे फळांचा आकार आणि रंग दिल्ली आणि अहमदाबादच्या बाजारात भाव खाऊन जात आहे. कळंब तालुक्यातील शिराढोणसारख्या दुष्काळी पट्टय़ातील गावातून राष्ट्रस्तरावरील बाजारपेठेला आपल्याकडे खेचण्याची क्षमता केवळ सातत्य, जिद्द आणि कष्टाच्या माध्यमातूनच निर्माण झाली असल्याची बोलकी प्रतिक्रिया राजेंद्र मुंदडा यांनी व्यक्त केली आहे.

ravindra.keskar@rediffmail.com