शेतकऱ्यांना पिकांवरील कीड आणि शासकीय योजनांची माहिती बांधावर जाऊन देण्याचे काम कृषी साहाय्यक करत असतात. अहमदनगर जिल्ह्य़ातील भातकुडगाव येथील सुखदेव जमदाडे हे गेवराई येथे मागील १२ वर्षांपासून कृषी साहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांसाठी ‘फार्मबुक’ हे अ‍ॅप तयार केले असून त्याद्वारे शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन आणि मदत करत आहेत.

या अ‍ॅपद्वारे शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती देण्याबरोबरच मालाची खरेदी-विक्री, कीटकनाशकांची माहिती आणि मोफत जाहिरात करता येत असल्याने हे अ‍ॅप राज्यभरातील शेतकऱ्यांना लाभाचे ठरत आहे. उत्पादक आणि ग्राहक थेट संवाद होत असल्याने शेतकऱ्यांना मालाची विक्री करणे सुलभ होत आहे. अवघ्या चार महिन्यांत चार हजार शेतकऱ्यांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. घरीच शेती असल्याने शेतीच्या अडचणी लक्षात घेत जमदाडे यांनी सर्व शेतकऱ्यांना एकत्र आणण्यासाठी विविध उपायांची चाचपणी केली. अनेकांशी चर्चा आणि अभ्यास करून त्यांनी ‘फार्मबुक’ नावाचे अ‍ॅप तयार केले. भाषा मराठी असल्याने शेतकऱ्यांना वापरासाठी हे अ‍ॅप सोपे आहे. शेती करताना बियाणांची निवड, पिकांवर पडलेली कीड, फळबागांचे नियोजन करताना कोणती झाडे लावावीत, फळबागांवरील किडीचे नियंत्रण कसे करावे तसेच, विविध पिकांबाबतच्या समस्या शेतकऱ्यांकडून या अ‍ॅपवर विचारल्या जातात. त्या शेतकऱ्यांना तात्काळ अ‍ॅपवर असलेले शेतीतज्ज्ञ, अभ्यासक आणि अनुभवी शेतकरी सल्ला देतात. त्यामुळे शेतकरी या अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्याजवळ असलेल्या माहितीची देवाण-घेवाण करत आहेत.शेतकरी या अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्याजवळ असलेल्या माहितीची देवाण-घेवाण करत आहेत.

राज्यभरातील शेतकरी या अ‍ॅपच्या माध्यमातून जोडले गेल्याने विविध बाजारांमधील शेतमालाच्या किमती सर्व शेतकऱ्यांना घरबसल्या उपलब्ध होतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून कृषिसमस्या कमी करण्यास काही प्रमाणात निश्चितच हातभार लागणार आहे. केवळ सरकारच्या मदतीच्या आशेवर बसून स्वत काहीही न करण्यापेक्षा अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये चर्चा घडवून आणण्याचे महत्त्वाचे कार्य जमदाडे यांनी केले आहे. त्यांच्या या कामगिरीचे शासकीय पातळीवरही कौतुक होत आहे. कृषि साहाय्यक म्हणून काम करताना, शेतकऱ्यांना मदत करतानाच या अ‍ॅपची कल्पना सुचल्याचे जमदाडे सांगतात. भविष्यातही वेगवेगळ्या माध्यमातून शेतकरी साहाय्यासाठी सदैत कार्यरत राहणार असल्याचेही जमदाडे यांनी यावेळी सांगितले.

  • शेती आणि शेतकरी अधिक स्मार्ट व्हावेत. पिकांना अधिकाधिक चांगली किंमत मिळावी यासाठी फार्मबुक या अ‍ॅपची निर्मिती केली आहे.
  • शेतीविषयक माहिती आणि कौशल्याची देवाण-घेवाण झाल्यास त्याचा इतर शेतकऱ्यांनाही लाभ होऊ शकतो, असे जमदाडे म्हणाले.
  • माहिती आणि तंत्रज्ञानामुळे शेतीची माहिती सहजतेने शेतकऱ्यांना देणे शक्य होत आहे. त्यामुळेच हे अ‍ॅप शेतकऱ्यांमध्ये प्रभावी ठरेल.

शेतीतील विविध समस्या सोडविणे सुलभ व्हावे आणि राज्यभरातील शेतकऱ्यांच्या मालाला निश्चित दर मिळावा यासाठी या अ‍ॅपची निर्मिती केली आहे. स्वत:च्या घरी शेती असल्यामुळे शेतीतील समस्या माहिती आहेत आणि शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याची इच्छा आहे.

–   सुखदेव जमदाडे, कृषी साहाय्यक