काही लोक अजून असे मानतात की निसर्गाला उपजाऊ असा मातीचा वरचा थर बनवायला कित्येक शतके लागतात. पण हे तितकेसे खरे नाही. कोणत्या वनस्पती नवी माती बनविण्याचे काम करतात त्यावर ते अवलंबून असते. कारण, वनस्पतींच्या वाढीने माती बनते. पिके मातीचा कस कमी करतात असा एक विचारप्रवाह आहे. परंतु तो बरोबर नाही. काही लोकांचे असे मत आहे की वृक्ष माती बनविण्याचे काम उत्तम तऱ्हेने करतात. बरीच वर्षे वाढलेले वृक्ष तोडून काढले तर तिथली माती चांगली असते, पण तरी वृक्ष हे माती बनविण्यात फार सक्षम नसतात. ह्य़ाची काही कारणे आहेत.

या बाबतीत एक गोष्ट उघड आहे. वृक्ष या कायमच्या वनस्पती असतात. ते वर्षांनुवर्षे जगतात आणि वाढत राहतात. वृक्षाचे खोड ज्याअर्थी मोठे मोठे होत जाते त्याअर्थी ते मातीतून काही तरी द्रव्य, शिवाय हवा आणि पाणी घेते आणि त्यांचे लाकडात रूपांतर करते. खोडाची वाढ याखेरीज दुसऱ्या कशानेही होणे शक्य नाही. तेव्हा वृक्ष मातीतून दर वर्षी काही तरी काढून घेतात. त्यामुळे ते जास्त वेगाने माती बनवीत नाहीत. खरं म्हणजे जंगलातल्या मातीचा विकास होणे ही गौण बाब असून झाडांची वाढ ही मुख्य बाब आहे. वृक्ष माती विकसित करतात कारण त्यांना ते करणे टाळता येत नाही. अमेरिकेच्या शेती खात्याच्या एका पत्रिकेत जंगलाच्या माती बनवण्याच्या कामाबद्दल फार चांगली चर्चा आहे. ते म्हणतात दर वर्षी दाट जंगलामध्ये एकरी दीड ते तीन टन कचरा पडतो. यात वाळलेली पाने, फांद्या आणि साल असते. हा सगळा कचरा वेगाने द्रव पदार्थात रुपांतरित करून वृक्ष भक्षण करतात. तेव्हा जंगलात पडलेला कचरा एका वेळी, वर्षभर पडलेल्या कचऱ्याच्या फक्त तिप्पट किंवा चौपट असतो. वृक्षाचे जीवन व वाढ या कचऱ्याचे विघटन होऊन त्याचा कुजलेला द्रव पदार्थ होण्यावर अवलंबून असते. हा द्रव वृक्ष मुळांद्वारे शोषून घेतात आणि सगळ्याकडे पसरवितात. त्यापासून पाने, मुळे आणि खोड यांची निर्मिती होते. पुन्हा हिवाळ्यात पानगळ सुरू होते. हे चक्र अव्याहत चालू असते. तेव्हा या सगळ्यात माती तयार व्हायला फारसा वावच नसतो. जे होते ते आनुषंगिक असते.

वृक्ष जो कचरा टाकतात तो कुजविण्याचे काम नाना तऱ्हेच्या अळ्या, किडे करतात. अर्थात ते फक्त स्वतच्या उपजिविकेकरता हे करतात, माती बनविण्यासाठी नव्हे. ते कचरा खाऊन तो कुजवितात आणि त्याचा द्रव पदार्थ बनवितात,  जो वृक्ष तत्परतेने खाऊन त्यापासून स्वतची साधतात. पण तरीही कुठल्याही क्षणी वर्षभरात टाकतात त्या कचऱ्याच्या तीन ते चार पट कचरा त्यांच्या खाली असतो. आता आपण असे समजूया की या दाट झाडीतय बऱ्याचशा भागातले वृक्ष काढून टाकले. तर काय होईल? पूर्वी आतापर्यंत पोचत नसलेल्या वाऱ्यामुळे तोडलेल्या आणि उभ्या वृक्षांखालचा कचरा पटापट वाळून जाईल. किडय़ांनी तो कुजविण्याची प्रक्रिया पुरेशी होणार नाही. शिवाय वृक्षांखालून काढलेली जी जमीन आहे ती योग्य प्रकारे वापरात आणली नाही तर पाऊस थोपविण्याला काहीच साधन उरणार नाही आणि ते पाणी जमिनीवरून वाहून जाईल. जमिनीखाली थोडेफार पाणी असल्यास वृक्ष ते वापरून आपली वाढ काही काळ साध्य करू शकतील. पण मग तेही संपल्यावर वृक्षांची वाढही थांबेल आणि शेजारची जमीनही पडीक होईल. परत जंगल लावून ती वाईट व्यवस्थापनामुळे पडीक झालेली जमीन पुन्हा कसदार येईल का? तर जंगल लावून ते चांगल्या तऱ्हेने वाढविण्यासाठी पूर्वी त्या ठिकाणी जशी परिस्थिती होती जवळपास तशी परिस्थिती निर्माण करावी लागेल. आणि तशी परिस्थिती जर असली तर आपल्याला कसदार माती निर्माण करायला जंगलांची गरज राहणार नाही. याचा अर्थ जंगले लावूच नयेत असा नाही. आपली लाकडाची गरज भागविण्यासाठी वृक्ष लावावेत पण मातीचा दर्जा उंचवण्यासाठी नव्हे. मातीचा दर्जा उत्तम तऱ्हेने आणि वेगाने सुधारणारा पर्याय वेगळाच आहे.  तो म्हणजे गवत.

जंगलाखालची जमीन आणि गवताखालची जमीन यातील मुख्य फरक म्हणजे त्यांची खोली. समृद्ध जंगलाखालील जमीन एक ते तीन फूट काळी माती असते, तर गवताळ प्रदेशातली माती त्याच्या कित्येक पट खोल असू शकते. गवत बहुधा वार्षिक असते. हंगामाच्या शेवटी त्याचा उरला सुरला भाग परत मातीत जातो. जर ते शाश्वत असले तर त्याचा प्रत्येक हंगामाला जमिनीवर वाढणारा भाग पुढल्या हंगामातल्या वाढीसाठी मातीला जैविक पदार्थ पुरवतो. म्हणजेच वृक्ष जर जमीन लुटणारे असले तर ते दर वर्षी नवीन लाकूड तयार करतात म्हणून तर गवत तसे नसते. ते मनापासून जमिनीच्या विकासाचे काम करीत असते, पण इथे सुद्धा जमिनीचा विकास हा उदरभरणाला आनुषंगिक असतो. गवत स्वतच्या मृत अवशेषांवर पाय ठेवून पुढील हंगामात स्वतची जास्त व चांगली वाढ करतात. यामुळेच गवताळ प्रदेशात खूप तऱ्हेतऱ्हेचे प्राणी दिसतात आणि जंगलात फारसे नसतात. वृक्ष माती तयार करतात, गवतही माती तयार करते. परंतु जंगलापासून मातीला फक्त उरलासुरला चुरा मिळतो. तर गवत मातीला त्याचे सर्वस्व देते. गवतामुळे मातीला जैविक भार मिळतो ज्यामुळे तिला आम्ले तयार करता येतात. माती खडकांच्या भुग्याची बनलेली असते. त्यात अनेक खनिजे असतात. ती विरघळून वापरता यावी यासाठी आम्लांचा उपयोग होतो. हस्तक्षेपाविना वाढणारी गवते ही अशा तऱ्हेने माती तयार करणारी सर्वोत्तम साधने असतात. पण आज गवत क्वचितच मोकळेपणाने वाढू दिले जाते. शेतावरच्या गवतावर जनावरे चारली जातात, किंवा ते वाळले की कापून त्याचे भारे बांधतात त्यामुळे माती तयार करण्यात त्यांचा फारसा उपयोग होत नाही.

(क्रमश)

(‘प्लाउमॅन्स फॉली’ या एडवर्ड फॉकनर लिखित पुस्तकातील प्रकरणाचा जाई निंबकर यांनी केलेला अनुवाद)