कोणत्याही परिसरातील उत्पादकाला प्रचंड काबाडकष्ट करून पिकविलेली भाजी ग्राहकांपर्यंत पोहोचविताना भेडसावणाऱ्या बाजारपेठेतील विविध समस्या नको असतात. अशा स्वरूपाच्या समस्या आल्याच तर मात्र शेती न केलेलीच बरी, अशा वैफल्यग्रस्त मानसिकतेत येण्याऐवजी धुळे तालुक्यातील चौगाव येथे समूह शेती (शेतकऱ्यांचा गट) केली जाते. त्यामुळे भाजी, फळबाजारातील समस्यांना लीलया तोंड देता येते आणि हल्ली बेभरवशाचा म्हटला जाणारा हा व्यवसाय बिनधास्त करणे शक्य होते.

शेतकऱ्यांचे जीवन सरकार आणि निसर्गाच्या भरवशावर चालते असे म्हणतात. उत्पन्न अधिक झाले तरी शेतकऱ्यालाच फटका आणि कमी झाले तरी त्यालाच झळ, अशी स्थिती आहे. यंदा पावसाने साथ दिल्याने पिके, फळे उत्तम आली असताना त्यांना भाव नाही. त्यास निश्चलनीकरणासह इतर अनेक कारणांची किनार आहे. अशी परिस्थिती शेतकऱ्यांच्या नशिबी वारंवार येत असल्याने हातपाय गाळून चालणार नाही, तर त्यावर मात करण्यासाठी काहीतरी वेगळे करण्याची जाणीव ठेवून काही शेतकरी प्रयत्न करीत असतात. मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या शिक्षणानंतर फळ आणि पालेभाज्यांसारख्या कृषी उत्पादनाच्या प्रेमात पडलेल्या आणि पाहता पाहता आधुनिक तंत्रज्ञानाची साथ घेत या व्यवसायाकडे वळलेला धुळे जिल्ह्य़ातील विकास माळी हा युवा शेतकरी त्यापैकीच एक.

कोणत्याही परिसरातील उत्पादकाला प्रचंड काबाडकष्ट करून पिकविलेली भाजी ग्राहकांपर्यंत पोहोचविताना भेडसावणाऱ्या बाजारपेठेतील विविध समस्या नको असतात. अशा स्वरूपाच्या समस्या आल्याच तर मात्र शेती न केलेलीच बरी, अशा वैफल्यग्रस्त मानसिकतेत येण्याऐवजी धुळे तालुक्यातील चौगाव येथे समूह शेती (शेतकऱ्यांचा गट) केली जाते. त्यामुळे भाजी, फळबाजारातील समस्यांना लिलया तोंड देता येते आणि हल्ली बेभरवशाचा म्हटला जाणारा हा व्यवसाय बिनधास्त करणे शक्य होते. चौगावच्या दहा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सुमारे सत्तर एकर क्षेत्रात भूमिपुत्र फार्मर्स क्लब स्थापन केला. या क्लबने फळ आणि पालेभाज्यांचा बाजारात तसेच अलीकडे घराघरात आपली अभिनव सेवा सुरू केल्याची ही यशोगाथा.

मुंबईच्या वाशी बाजार समितीत भूमिपुत्राचा माल पोहोचला की हातोहात मालगाडी रिकामी होते आणि पुन्हा ती आपल्या गटाच्या शेतशिवारात परतून भरली जावी अशी व्यवस्था केली जाते. केवळ हंगाम हवा बस्स! नसला हंगाम तरी काय झाले?  स्थानिक बाजारात विकला जाणारा शेतमाल गटाकडे कधीही उपलब्ध असतोच. नसला तरी ग्राहकाला तो उपलब्ध करून देण्याची खात्री आणि जबाबदारी हा गट आत्मविश्वासाने पार पाडत आहे. गटातील प्रत्येक शेतकरी वेगवेगळी भाजी लावणे पसंत करतो. सत्तर एकरातील वेगवेगळ्या तुकडय़ांत लागलेली वेगवेगळी भाजी नंतर खोक्यात बंद होते. एकाच गटाने पिकविलेली ही भाजी नंतर खात्रीने अपेक्षित भावात विकली जाते.

ज्या काळात फुकटात द्यायची म्हटली तरी कोणी व्यापारी पपई घेण्यास तयार नव्हता आणि पपई अक्षरश: फेकून देण्याची वेळ आली होती, त्या काळात केवळ आंतरपीक म्हणून घेतलेल्या टरबूज आणि कोथिंबिरने या गटाचा आर्थिक गाडा न डगमगता रुळावर राखला. हा अनुभव गटाची मानसिकता अढळ ठरण्यास कारणीभूत ठरला. बागेतील पपई फुकटात तर विकली नाहीच, परंतु त्याच पपईला नंतर चक्क १५ रुपये दर मिळाला. शिवाय हाती टरबूज अन् कोथिंबिरसारखे आंतरपीक आले.

गटाचा उद्देश खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. एखाद्या चार ते पाच हजार लोकसंख्येच्या गावात युवा शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांची शेती ही एका क्षेत्रात समाविष्ट  करायची. बाजारपेठेतील शेतमालाच्या दराची आणि भविष्यातील उलाढालीची माहिती अद्ययावत ठेवायची. त्या आधारावर ज्याच्या त्याच्या क्षेत्रात आपआपल्या परीने पाले किंवा फळ भाजीची लागवड करायची. पीक हाती आले की मग ते शेतातून मागणीप्रमाणे काढून ग्राहकांना घरपोच द्यायचे. गटातील शेतकऱ्यांनी आपआपल्या क्षेत्रात लावलेला भाजीपाला आणि फळ-भाज्यांनी भरलेले हे खोके म्हणजे गटाचे आर्थिक उत्पन्न. एरवी भाजी उत्पादकांनी घेतलेल्या एखाद्या टनोगणती भाजीला अपेक्षेप्रमाणे उठाव होत नसे. व्यापाऱ्यांना अशी भाजी द्यायची म्हटली तर भाव मिळत नसे. जो भाव दारावर आलेला व्यापारी देऊ  इच्छितो त्यापेक्षा गुरांना वैरण म्हणून भाजी चारलेली काय वाईट. पुन्हा एखादीच भाजी रोज गुरांना घातली तर शेतीकामासाठी आवश्यक असलेली गुरे आणि दूधदुभत्या पशूंची प्रकृती बिघडण्याचीच शक्यता अधिक. अशा विवंचनेत शेतकरी असत. परंतु भूमिपुत्र फार्मर्स क्लब आणि ‘माय फार्म’च्या माध्यमातून गटातील शेतकऱ्यांना आता मोठा आधार झाला आहे. त्यांनी पिकविलेली भाजी किंवा फळे खात्रीने आणि चांगल्या भावात विकली जाऊ  लागली आहेत.

खरेतर अपेक्षेप्रमाणे भाव मिळत नाही म्हणून विशेषत: भाजीबाजाराची स्थिती अतिशय वाईट असल्याचे चित्र आहे. मोठय़ा प्रमाणावर टोमॅटो आणि अन्य भाजीपाला फेकला जात असताना किंवा पाले तसेच फळभाजीच्या शेतात चक्क गुरे सोडून देण्याची वेळ आली असताना चौगावच्या शेतकऱ्यांचा गट मात्र चार पाऊल पुढे जाऊन थेट ग्राहकाला द्वारपोच सेवा देत आहे. हिरव्या आणि फळ-भाज्यांचे बंदिस्त खोके शेतातून थेट ग्राहकाच्या घरी पोहोचविण्याची ही योजना गटाने सुरू केली असल्याचे विकास माळी आणि विनोद पाटील सांगतात.

विविध भाजीपाल्यांचे हा खोके घरात पोहचता होताच गृहिणींना हायसे वाटते. कारण त्यात हिरवागार आणि टवटवीत ताजा असा तास-दोन तासांपूर्वीच शेतातून काढलेला भाजीपाला आणि एखादी फळ-भाजी असते. दारावर किंवा भाजी बाजारात उपलब्ध होणाऱ्या भाजीपेक्षा नाममात्र किमतीत नफा ना तोटा या तत्त्वावर असे भाजीचे खोके गृहिणींना उपलब्ध करून देण्याची ही सुरुवात आहे. ५० आणि १०० रुपये अशा दोन वेगवेगळ्या किमतीच्या खोक्यांची बांधणी करून भाजी घरोघर पोहोचविली जाते. घरातील सदस्यांची संख्या आणि त्यांना दैनंदिन आहारात लागणारा भाजीपाला याची तुलना करून हे खोके भाजीबंद केले जातात. ५० रुपये किमतीच्या एका खोक्यात साधारणपणे दोन ते अडीच किलो तर १०० रुपये किमतीच्या खोक्यात चार किलो भाजी भरली जाते. एखाद्या भाजीला बाजारात किंमत नसली आणि एखादी भाजी खूप महाग असली तरी ग्राहकाला मात्र नाममात्र दरात म्हणजे ५० ते १०० रुपयात ती घरपोच उपलब्ध होते. त्यातही खोक्यात केवळ एकच भाजी नसते तर किमान पाच भाज्या असतात. सोबत फळ-भाजी म्हणून गाजर, मुळा, बीट, लिंबू, काकडी असते. भाज्यांसोबत अन्य कमी-अधिक भावाच्या भाज्याही ग्राहकाला मिळतात, असे माळी आणि पाटील यांचे म्हणणे आहे.

पोकळा, मेथी, शेपू, पालक, फूल आणि गड्डा कोबी अशा कितीतरी भाज्या आलटून पालटून अशा खोक्यातून गटातर्फे ग्राहकांना घरपोच पुरविल्या जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे शेतातून निघणाऱ्या अशा भाज्या दाबून-रेटून वाहनांत भरल्या जात नाहीत. खुल्या बाजारात असंख्य ग्राहक भाजीच्या जुडय़ा हाताळून खरेदी न करताच सोडून जातात. यामुळे ताजी असली तरी हिरवी भाजी काही वेळातच शिळी वाटते. तसे हे खोके भरताना होत नाही. शेतातून खुडलेली भाजी थेट बंद पॉलिथिन पिशवीत आणि ती पिशवी एका खोक्यात अशी ही पद्धत आहे. यामुळे प्रदूषण होत नाही की कुठला संसर्गही होत नाही. भ्रमणध्वनीवर कोणीही भाजीपाल्याच्या खोक्यासाठी नोंदणी करू शकतो. मागणी नोंदविली की दुसऱ्या दिवशी सकाळी शेतातून काढलेली भाजी दुपापर्यंत खोकेबंद करून ग्राहकाच्या घरी पोहोचविली जाते. मागणीप्रमाणे गटाकडे भाजी किंवा फळभाजी उपलब्ध नसली तर अन्य शेतकऱ्यांकडून ती खरेदी करून ग्राहकाला पुरविण्याचे प्रयत्न होतात. कांदे, बटाटे, टोमॅटो किंवा अन्य फळ-भाज्या मोठय़ा प्रमाणात मागविल्या तर ही सेवा अधिकाधिक क्षमतेने राबविता येईल असे माळी मांडतात.

कोणतीही दहा किलो भाजी विकण्यासाठी विक्रेत्यांची गल्लीबोळात दमछाक होत असताना शेतकऱ्यांच्या ‘माय फार्म’ या घरपोच सेवेला शहरातून प्रतिसाद मिळू लागला आहे. हिरव्या भाजीचे पडलेले भाव किंवा टवटवीत भाजीची कालांतराने झालेली केविलवाणी अवस्था ही विवंचनेत टाकणारी मानसिकता भूमिपुत्र फार्मर्स क्लबच्या शेतकऱ्यांमध्ये काहीशी कमी झाली आहे. ग्राहकांना घरपोच सेवेतूनही आपल्याला अपेक्षेप्रमाणे उत्पन्न  मिळू शकते यावर विश्वास बसू लागला आहे. हमखास आर्थिक लाभ मिळविण्यासाठी मात्र या गटाला आणखी राबावे लागणार आहे. गटातील प्रत्येक युवा शेतकरी आपापल्या कल्पनेतून आणि आधुनिक तंत्रज्ञानातून आवश्यक ती माहिती संकलित करतो. त्यावर विचारविनिमय आणि आवश्यक वाटल्यास निर्णय घेण्यात येतो. सर्वानुमते घेण्यात येणाऱ्या अशा निर्णयांमुळे कुठलीही शंका राहत नाही आणि अतिशय पारदर्शकपणे या व्यवसायाने अनेक टप्पे पार केले आहेत. रोकडरहित व्यवहारामुळे तर घरपोच सेवेला अधिकच चालना मिळेल. कारण वसुलीसाठी स्वतंत्र माणसाची गरज राहणार नाहीच उलट वाहनचालकच भाजीचे खोके ग्राहकाच्या घरी पोहचवून परत येईल. ‘माय फार्म’ नावाने व्हॉटसअ‍ॅप ग्रुप सुरू करण्यात आला असून या ग्रुपच्या माध्यमातून मागणी नोंदविणे किंवा संकल्पना, विचारांचे आदानप्रदान केले जाते. अन्य बाजारपेठेतील शेती उत्पन्न, दरांची माहिती घेतली जाते. शेतकऱ्यांच्या काही मुलांनी शेती करता करता समाजाची गरज लक्षात घेऊन शेतकरी आणि उपभोक्ता या दोघांच्या हितासाठी धुळ्यात ‘ताज्या भाजीची गाडी आपल्या दारी’ ही संकल्पना राबविली असून भाव नसल्याने डोक्याला हात लावून बसणाऱ्या राज्यातील सर्वच शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम निश्चितच बोध घ्यावयास लावणारा आहे.

कृषी विज्ञान केंद्रातून चालना

*  शेतातून थेट ग्राहकांच्या घरी विविध भाज्यांचे खोके पोहोचविण्याचा या संकल्पनेला कृषी विज्ञान केंद्रातूनच खरी चालना मिळाली. या ठिकाणी स्टॉल लावण्यात आला होता.

* कशा पद्धतीने आपल्या घरी ताजी भाजी पोहोचविली जाते त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

* शहरातील मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू कुटुंबीयांनी नोंदणी करून या योजनेला भरभरून प्रतिसाद दिला.

* शेतमजूर, वीज, पाणी, वाहतूक आणि संपर्क यंत्रणा तसेच तत्सम बाबी यांचा खर्च वजा जाता घरपोच भाजी या अभिनव योजनेतून अपेक्षित उत्पन्न मिळेल याची खात्री झाली.

* गटातील शेतकऱ्यांना अन्य ठिकाणची बाजारपेठ पाहणे गरजेचे वाटत नाही. फळभाजीसाठी किमान दहा टन माल निघाला तर मात्र इतर जिल्ह्य़ात मालमोटारीने माल पाठवून उत्पन्न मिळवू शकतो, असे माळी यांनी सांगितले.

संतोष मासोळे – santoshmasole1 @gmail.com