सांगली जिल्ह्य़ातल्या दुष्काळी जत, कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी आणि मिरज पूर्वभाग या तालुक्यांमध्ये यंदा उन्हाचा तडाका चांगलाच बसत असून उष्माक्षयामुळे जनावरांची स्थिती दैनिय बनली आहे. अशक्त जनावर जन्माला येणे, आजारी पडणे, गर्भपात होणे, असे प्रकार मोठय़ा प्रमाणात घडू लागले असून पशुपालक यामुळे पुरता धास्तावून गेला आहे. जिल्ह्य़ातला पशुसंवर्धन विभाग मात्र निर्धास्त आहे. आधीच पाणी आणि चाराटंचाई यामुळे जनावरे जगवणे मुश्कील होत असताना पशुपालकांसमोर हे नवे संकट येऊन उभे राहिले आहे. दुभत्या गायी-म्हशी, शेळ्या-मेंढय़ा यांच्यावर उष्माक्षयाचा मोठा परिणाम होत आहे. या वाढत्या तापमानाचा सर्वाधिक वाईट परिणाम होत आहे तो गाभण जनावरांवर. पूर्ण वय न झालेले रेडकू जन्माला येणे, जन्मत:च ते अशक्त असणे असे प्रकार घडू लागले आहेत. काही ठिकाणी तर जन्मानंतर काही मिनिटांतच नवजात रेडके अखेरचा श्वास घेतल्याच्या दुर्घटना घडू लागल्या आहेत. या साऱ्याच घटनांनी पशुपालक मात्र चांगलाच हबकून गेला आहे.

कायम दुष्काळी असलेल्या या सांगली जिल्ह्य़ातल्या जत तालुक्यात कायमच चारा आणि पाण्याचे संकट उद्भवत असते. दरवर्षी पशुपालकाला जनावरे जगवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. यात मोठा आर्थिक फटका बसत असतो. शेती अधिक प्रमाणात कोरडवाहू असल्याने पूरक व्यवसाय दुधाचा व्यवसाय करण्यावर इथला शेतकरी भर देत आहे.

तालुक्यात डोंगराळ भाग, पडीक जमीन मोठय़ा प्रमाणात जनावरे जगवणे सोपे होते, मात्र अलीकडच्या काही वर्षांत पावसाचे प्रमाणात कमीच होत आहे. गेल्या तीन-चार वर्षांत सरासरी इतकाही पाऊस झाला नाही. त्यामुळे शेती करणे तर मुश्कील झाले आहेच, शिवाय जनावरे जगवणेही अवघड झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवला आहे. आता जी काही जनावरे जगवली जात आहेत, त्यांच्यावरही वेगवेगळी संकटे येत असल्याने पशुपालक शेतकरी हतबल झाला आहे.

आजारांची लागण

उष्माघाताच्या झटक्याने जनावरे अशक्तपणा, पाण्याचा अंश कमी होणे, अपचन, लाल सुरक्त येणे यांसारख्या आजारांची लागण होत असून त्यामुळे जनावरांच्या जीविताला धोका पोहोचत आहे.

जनावरांमध्ये वाढत असलेले आजाराचे प्रमाण, अशक्त रेडकू, वासरू जन्माला येणे व गर्भपात घटनेत वाढ यामुळे हतबल झालेल्या पशुपालकांना दिलासा देण्याची आवश्यकता असून अशा परिस्थितीत काय उपाययोजना करता येतील यासाठी संबंधित प्रशासनाकडून गांभिर्याने लक्ष देतानाच प्रबोधन मोहीम उघडण्याची गरज आहे.

गर्भपाताचे संकट

  • वाढत्या तापमानामुळे शेळ्या-मेंढय़ा या लहान जनावरांवर गर्भपाताचे महासंकट उभे राहिले आहे. दिवस न भरताच शेळ्या, मेंढय़ांचा गर्भपात होत आहे. तसेच माजावर न येणे याही घटना घडू लागल्याने वांझ होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
  • एकीकडे या घटना होत असताना पशुसंवर्धन विभाग मात्र जणू आपण त्या गावचे नाहीच अशा पद्धतीने वागत आहे. शिवाय जत तालुक्यासह आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, मिरज पूर्व भाग या दुष्काळी पट्टय़ात पशुसंवर्धन विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मोठय़ा प्रमाणात रिक्त जागा आहेत, याचाही फटका पशुसंवर्धनाला बसत आहे.
  • जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत तक्रारींचा आकडा उपलब्ध नसल्याचे सांगितले.

ainapurem1674@gmail.com