महाराष्ट्रातील तरुण शेतकरी कमलेश पाटणकर तेलंगणातील पाच जिल्हय़ातील व ४५० गावांतील सुमारे २७०० एकर जमिनीचे व्यवस्थापन करतात. शेतकऱ्यांनाही शेती फायद्याची करून देत स्वत:ही नफा कमावतात. या पद्धतीने ते कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र, तेलंगणा या प्रांतात सुमारे ४० जण शेतीचे व्यवस्थापन करत आहेत. पाटणकर यांनी २७४० एकरवर काकडीची लागवड केली व गतवर्षीच्या हंगामात सुमारे २२ कोटी रुपयांची उलाढाल केली.

शहाण्याने शेतीकडे वळू नये, शेतीत मजूर काम करीत नाहीत, आíथकदृष्टय़ा शेती परवडत नाही, निव्वळ शेतीव्यवसाय हा फायद्याचा होऊच शकत नाही, शेती पूर्णपणे बेभरवशाची झाली आहे, अशी विधाने आपल्या सभोवताली सातत्याने ऐकायला मिळतात. मात्र, महाराष्ट्रातील एक तरुण तेलंगणातील पाच जिल्हय़ांतील व ४५० गावांतील सुमारे २७०० एकर जमिनीचे व्यवस्थापन करतो. शेतकऱ्यांनाही शेती फायद्याची करून देत स्वत:ही नफा कमावतो हे सांगितले तर यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. या पद्धतीने कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र, तेलंगणा या प्रांतात सुमारे ४० जण शेतीचे व्यवस्थापन करीत आहेत.

जागतिकीकरण व उदारीकरणानंतर संपूर्ण जग एक खेडे बनले. जगातील विविध देशांची गरज लक्षात घेऊन त्या ठिकाणी शेतमाल, भाजीपाला, फळेपुरवठा करण्याची विविध देशांची स्पर्धा सुरू आहे. कमी पशात अधिक गुणवत्तेची व चांगली सेवा जे देतात त्यांना प्राधान्य मिळते, हा बाजारपेठेचा नियम आहे. हे नियम कोणासाठी बदलले जात नाहीत. या नियमात बसून काय करता येईल याचा विचार करणारे अनेक जण आहेत. लातुरातील अभियांत्रिकीपर्यंतचे शिक्षण घेतलेले उद्योजक कमलेश पाटणकर हे धडपडे व्यक्तिमत्त्व. शेतीत नवे प्रयोग ते गेल्या अनेक वर्षांपासून करतात. २००९ साली लातूर, उस्मानाबाद जिल्हय़ातील सुमारे सात ते आठ तालुक्यांतील १०० एकर जमिनीवर काकडीची लागवड करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. प्रत्येक गावातील एक एकरचाच शेतकरी त्यांनी निवडला. उत्पादन आले मात्र ते पुरेसे झाले नाही. बाजारपेठ मिळाली मात्र आíथक गणित बसले नाही. त्यामुळे पाटणकरांना तोटा झाला.

सामूहिक शेती योग्य पद्धतीने केली तर त्यात नफा आहे, हे त्यांना ठाऊक होते पण त्याची अंमलबजावणी करण्यात आलेल्या अपयशामुळे ते खचले नाहीत. २०१५-१६ या वर्षीत तेलंगणा प्रांतातील मेहबूबनगर, मेडक, वरंगल, रंगारेड्डी व नलगोंडा या पाच जिल्हय़ातील ४५० गावांतील प्रत्येकी २० शेतकऱ्यांची त्यांनी निवड केली. ‘पॅटसन अ‍ॅॅग्रो एक्स्पोर्टस् प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी स्थापन करून त्या कंपनीद्वारे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ते पोहोचले. जे शेतकरी स्वत: शेतात राबतात, ज्यांच्याकडे पाण्याची थोडीबहुत सोय आहे अशा मंडळींना कमीत कमी अर्धा एकर व अधिकाधिक एक एकर जमिनीवर हॉलंड येथून आणलेल्या बियाणाची काकडीचे उत्पादन घेण्यासाठी सहभागी करून घेतले. तेथील मातीचा पोत कसा आहे? हे त्यांनी तपासले. शेतकऱ्यांची निवड करताना शेतीचे गावापासूनचे अंतर, कंपनीने ठरवून दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांची काम करण्याची तयारी, शेतकऱ्याला लागणारे बियाणे, खते व औषधे कंपनीतर्फे पुरवली जातील. तीन महिन्यांच्या कालावधीत काकडीचे उत्पादन होते. शेतकऱ्याला त्यासाठी हमीभाव दिला जाईल. काकडी तोडल्यानंतर २४ तासांच्या आत तिला योग्य ठिकाणी साठवावी लागते अन्यथा ती सुकून जाते. छोटय़ा काकडीस २३ रुपये किलो, त्यानंतर १८, १२, ८, ५ व २ रुपयांचा भाव मिळतो. हैदराबाद येथे ८ एकर जागेत आणलेला माल त्याची यंत्राद्वारे प्रतवारी करून, त्याला धुऊन, स्वच्छ करून तो रशिया, अमेरिका, युरोप अशा देशांत पाठवला जातो.

पाटणकर यांनी २७४० एकरवर काकडीची लागवड केली व गतवर्षीच्या हंगामात सुमारे २२ कोटी रुपयांची उलाढाल केली. काकडीच्या लावणीनंतर ३० ते ३५ दिवसांत ती तोडणीला येते. काही ठिकाणी रोज तर काही ठिकाणी एक दिवसाआड तोडणी करावी लागते. जितकी बारीक काकडी तितका तिला अधिक भाव मिळतो. तेलंगणातील शेतकऱ्यांना तीन महिन्यांत खर्च वजा जाता एक एकरात ३० ते ३५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले तर काही शेतकऱ्यांनी उत्पन्न ७० हजार रुपयांपर्यंतही मिळविले असल्याचे पाटणकर म्हणाले.

कंपनीतर्फे माल काढणीला आल्यानंतर शेतकऱ्यांच्या बांधावर लोक वाहन घेऊन जातात व तेथे शेतकऱ्याच्या समोर मालाची प्रतवारी करून त्याचे वजन केले जाते व शेतकऱ्याच्या पासबुकवर त्याची नोंदणी केली जाते. गोळा केलेला माल १२ ते १५ तासांच्या आत हैदराबादला आणला जातो. सुमारे सव्वाशे कर्मचारी या कामात गुंतले आहेत. रोज किमान १५ ते २० टन माल उपलब्ध होईल या पद्धतीने त्यांनी वर्षभर कामाची साखळी आखली. तीन महिन्यानंतर तेच पीक घेण्याची इच्छा एखाद्या शेतकऱ्याने व्यक्त केली तर त्यासाठी त्याला दुसऱ्या जमिनीचा वापर करण्यास सांगण्यात येते. किमान ८ ते ९ महिन्यानंतर त्याच जमिनीत पुन्हा तेच पीक घेणे लाभदायक ठरते. तेलंगणातील शेतकऱ्यांनी यात चांगला सहभाग दिला. गवार, चेरी, टोमॅटो अशा अनेक भाज्यांना विदेशात मागणी आहे. तेथे शेतीचे उत्पादन कमी होते. चार महिने ऊन व आठ महिने थंडी असल्यामुळे उत्पादनाचा कालावधी त्यांच्याकडे कमी असतो. त्यामुळे त्या कालावधीत ते विदेशातून भाजीपाला मागवतात. त्यांच्या मागणीनुसार गुणवत्तेचा माल देता आला तर तो त्यांना हवा असतो. गतवर्षी या पद्धतीने आपण नियोजन करू शकलो. आपल्याच पद्धतीने सुमारे ४० लोक भाज्यांची शेती कंत्राटी पद्धतीने करतात. ज्यात शेतकऱ्याला त्याच्या मालाचा हमीभाव मिळतो, लागवडीचे तंत्रज्ञान मिळते, फवारणीच्या औषधापासून ते सर्व बाबतीचे मार्गदर्शन कंपनीमार्फत होते. आíथक लाभ तर मिळतोच शिवाय आपल्या शेतीतून अधिक उत्पादन मिळू शकते याचा आत्मविश्वास त्यांच्यात जागृत होतो. शेती ही फायद्याची ठरू शकते, मात्र तिच्याकडे उद्योगाप्रमाणे दृष्टिकोन ठेवून नियोजन केले पाहिजे, असे पाटणकर म्हणाले.

pradeepnanandkar@gmail.com