वाढत्या महागाईने उत्पादन खर्चात वाढ झाल्याने एकीकडे शेतकरी आíथक स्थितीने कर्जबाजारी होत असतानाच दुसऱ्या बाजूला चांगला आणि दर्जेदार शेतीमाल विशेषत भाजीपाला मिळत नाही. बाजारात मिळणारा भाजीपाला रासायनिक प्रक्रियेपासून अलिप्त असेल याची खात्री देता येत नाही. मग काय? असा प्रश्न मिरज तालुक्यातील तरुण शेतकऱ्यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला असून मागणीप्रमाणे पुरवठा करीत थेट बांधावरून तुमच्या स्वयंपाकघरापर्यंत वातानुकूलित वाहनातून भाजीपाला घरपोच देण्याची व्यवस्था केली आहे. हा नवा प्रयोग आरोग्यासमोर ठेवून केला असल्याने मागणीत दिवसेंदिवस वाढच होत आहे.

मिरज शहरालगत असलेल्या मल्लेवाडी, मालगाव आणि बोलवाड या गावातील तरुणांनी बाजारपेठेचा अभ्यास करून बाजारात नेमके काय हवे आहे याचा अभ्यास करून ग्राहकांच्या मागणीनुसार पुरवठा केला तर शेती लाभदायी आणि किफायतशीर होऊ शकते याचे गणित मांडले. यासाठी अविनाश देसाई, मदन िशदे, दत्ता म्हैसाळे, श्रीमती स्मिता कुपवाडे, जहीर मुजावर, महेश चौगुले आणि डॉ. के. जी. पठाण यांनी ‘ऑरगॅफ्रेश जाईंट फाìमग’ या कंपनीची स्थापना केली.

शेतात उत्पादित होणारा भाजीपाला विक्रीसाठी बाजारात आणला आणि मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाला तर दर पडणार हे ठरलेलेच असते. दुसऱ्या बाजूला नाशवंत माल असल्याने बाजाराच्या मागणीप्रमाणे काढणी मागे-पुढे करणेही अशक्य असते. शीतगृहात ठेवण्याची व्यवस्थाही उपलब्ध नसल्याने मिळेल त्या दरात भाजीपाला विक्री करण्याविना पर्यायच उरत नाही. तरीही काही वेळा बाजारात माल पाठविण्याचा खर्चही परवडत नाही, म्हणून भाजीपाला रस्त्यावर टाकणे हाच पर्याय नुकसानीचा असला तरी स्वीकारावा लागतो.

दुसऱ्या बाजूला बाजारात मिळणारा भाजीपाला रसायनयुक्त असल्याचे आणि आरोग्यास अपायकारक असल्याचेही स्पष्ट होत आहे. चांगल्या आणि दर्जेदार भाजीसाठी दोन रुपये जादा मोजण्याची तयारी असलेल्या ग्राहकांनाही सत्वहीन आणि रसायनयुक्त भाजी घ्यावी लागते. बऱ्याचदा बाजारात टवटवीत आणि चांगली भाजी दिसावी यासाठी रंगाचा वापरही केला जातो. उत्पादन जास्त देणारे संकरित बियाणे बाजारात आले असल्याने या संकरित भाजीला रंग आणि तजेलदारपणा असला तरी मूळची चव मात्र मिळत नाही ही सार्वत्रिक तक्रार ऐकावयास मिळते. यावर उपाय म्हणून मिरजेच्या तरुणांनी रसायनाचा वापर नसलेला आणि देशी भाजीपाला घरपोच देण्याची कल्पना मांडली. यामध्ये दैनंदिन लागणाऱ्या वांगी, दोडका, फ्लॉवर, कोबी, गवार, टोमॅटो, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, पालक, कोिथबीर, मेथी या देशी वाणाच्या भाज्यांचे उत्पादन घेण्याचा निर्णय तरुणांनी घेतला. यासाठी त्यांनी शहरालगत १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या आपापल्या शेतीमध्ये दहा गुंठय़ापासून एकरापर्यंत देशी वाणाच्या भाजीपाल्याची लागवड केली. यासाठी रसायनाचा वापर टाळून सेंद्रिय खतांचा वापर करण्यात आला. जमिनीचा पोत चांगला राहण्याबरोबरच भाजीचा दर्जा आणि गुणवत्ता चांगली राहिल याची दक्षता घेतली. आरोग्याला हितकारक ठरेल अशाच पद्धतीने भाजीपाला उत्पादन करण्यात येत आहे. माल तयार केल्यानंतर त्याला ग्राहक तयार करण्यासाठी तरुणांनी सर्वप्रथम आरोग्य रक्षणासाठी कायम सजग असलेल्या सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील डॉक्टरांना कल्पना पटवून देण्याबरोबरच दररोज आवश्यकतेप्रमाणे भाजीपाला घरपोच देण्याची तयारी दर्शवली. डॉक्टरांनीही या कल्पनेला चांगला प्रतिसाद देत मागणी नोंदविली.

सध्या या तरुणांनी फेसबुक पेज तयार केले असून लवकरच ऑनलाइन मागणी नोंदविण्याची सुविधाही देण्यात येणार आहे. आरोग्यदायी कृषी उत्पादन घरपोच देण्याच्या या कल्पनेतून शाश्वत शेतीकडे या तरुणांची धाव सुरू आहे.

  • आज या कंपनीकडे २२५ ग्राहकांची नोंद असून यापकी दररोज ४५ ते ५० ग्राहकांना भाजीपाला घरपोच केला जात आहे. यासाठी आदल्या दिवशी कंपनीकडून ग्राहकाला फोनवरून उद्या कोणती आणि किती भाजी हवी याची नोंद केली जाते.
  • मागणीप्रमाणे सकाळच्या टप्प्यात भाजी पुरवठा केला जातो. यासाठी वातानुकूलित वाहनाचीही व्यवस्था करण्यात आली असून भाजी काढणीपासून दोन तासांत ग्राहकाच्या स्वयंपाकघरात ही भाजी पोहोच केली जाते. वातानुकूलित वाहनामुळे भाजीची प्रत आणि दर्जा कायम राहत असल्याने आणि जंतुसंसर्गही टाळला जात असल्याने या मागणीमध्ये वाढ होत आहे.
  • भाजीची पेंडी २० रुपये आणि फळ व शेंगवर्गीय भाजीचा दर ६० रुपये किलो असा निश्चित करण्यात आला असून यासाठी ग्राहकाकडून नोंदणीवेळीच ३ हजार रुपये भरून घेतले जातात. भाजी घरपोच दिल्यानंतर अनामतपोटी जमा करण्यात आलेल्या पशातून ही रक्कम वजा केली जात असल्याने परत-परत पसेही ग्राहकाला द्यावे लागत नाहीत.

digambarshinde64@gmail.com