कोकणात भाजी उत्पादनाची फार मोठी परंपरा नाही. किंबहुना पावसावर आधारित भातशेतीचा हंगाम संपल्यानंतर अतिशय कमी प्रमाणात उन्हाळी शेती केली जाते. त्यातही घरच्या गरजेपुरते किंवा फार तर आसपासच्या गाव-वाडय़ांमध्ये विकले जाईल एवढंच कडधान्य किंवा भाजीपाल्याचे हंगामी उत्पादन. पण या कृषिशैलीला छेद देत रत्नागिरी जिल्ह्य़ातल्या काही शेतकऱ्यांनी संघटित होत शेतात पिकलेला भाजीपाला रत्नागिरीच्या ग्राहकांना थेट उपलब्ध करून दिला आहे आणि तोही या खरेदी-विक्री व्यवहारासाठी खास बनवलेल्या अ‍ॅपद्वारे!
संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथील शेतकऱ्यांचे गट गेल्या काही वर्षांपासून उन्हाळी भाजीपाला पिकवीत आहेत. यंदाच्या वर्षी मात्र डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांचे प्रोत्साहन आणि प्रा. डॉ. पराग हळदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजवाडीसह धामणी आणि शेंबवणे गावातील पुरुष व महिलांचे बचत गट बारमाही भाजीपाल्याचे नियोजन आणि उत्पादन करू लागले आहेत. भातशेतीचा हंगाम संपल्यानंतर पहिल्या टप्प्यात तयार झालेल्या माठ, पालक, मुळा यांसारख्या पालेभाज्या विकण्याचे नियोजन सुरू झाले तेव्हा स्थानिक पातळीवर किंवा व्यापाऱ्यांना देतील त्या किमतीवर तो विकण्याऐवजी रत्नागिरीतील ग्राहकाला थेट विकण्याचा विचार सुरू झाला. मात्र त्यासाठी तिथल्या बाजारपेठेत जाऊन न बसता व्हॉट्स अ‍ॅपवर ‘राजवाडी भाजी’ या नावाने स्वतंत्र ग्रुप निर्माण करण्यात आला. रत्नागिरी शहरातील चार केंद्रांवर आठवडय़ातून तीन दिवस ही भाजी उपलब्ध करून देण्याची योजना त्यावर जाहीर करण्यात आली आणि अल्पावधीतच रत्नागिरीकरांनी उत्तम प्रतिसाद देत या ग्रुपवरच आपल्याला हव्या असलेल्या भाज्यांची मागणी नोंदवायला सुरुवात केली.
गेल्या ८ जानेवारी रोजी सुरू झालेल्या या उपक्रमामध्ये पहिल्या महिन्यात फक्त पालेभाज्या देण्यात आल्या. पण फेब्रुवारीपासून भेंडी, गवार, वांगी, दुधी भोपळा, तांबडा भोपळा, ढोबळी मिरची इत्यादी फळभाज्या, सुरण व घोरकंदसारखी कंदपिके, आणि काकडी, मक्याचे कणीस, भुईमुगाच्या शेंगा यासारख्या स्थानिक रानमेव्याची त्यामध्ये भर पडली. शिवाय, नोकरदार गृहिणींची गरज लक्षात घेऊन यापैकी पालेभाज्या धुऊन व चिरून तर अन्य भाज्या धुऊन साफ करून प्रत्येकी पाव किलो वजनाच्या पाकिटांमधून विकण्याचे धोरण सुरुवातीपासून अवलंबण्यात आले. कोकणात अतिशय लोकप्रिय असलेली फणसाची कुयरी चिरून, शिजवून थेट फोडणीला टाकण्याजोगी पुरवण्याच्या योजनाही अतिशय लोकप्रिय झाली. या सगळय़ा प्रकारांसोबतच गृहिणीला आवश्यक मिरच्या-कोथिंबीर आणि कढीपत्ताही वेळोवेळी पुरवण्यात आला. शंभर टक्के सेंद्रिय आणि कमी अंतरामुळे टिकणारा ताजेपणा, ही या सर्व प्रकारांची आणखी दोन महत्त्वाची वैशिष्टय़े ठरली. त्यामुळे आठवडय़ातील तीन दिवस या प्रकारे जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांमध्ये मिळून फक्त ३६ दिवसांमध्ये सुमारे १ टन पालेभाज्या व फळभाज्यांची विक्री या उपक्रमाद्वारे झाली आणि त्यातून शेतकऱ्यांनी तब्बल ७५ हजार रुपयांची कमाई केली. या कालावधीत व्हॉट्सअ‍ॅपवरील सदस्य ग्राहकांची संख्याही सतत वाढती राहिल्याने दोन ग्रुप तयार झाले.
या उपक्रमाला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेऊन रत्नागिरीच्या गद्रे इन्फोटेक या कंपनीने ‘राजवाडी भाजी’ याच नावाने खास अ‍ॅप विकसित केले.
गेल्या आठवडय़ात ज्येष्ठ उद्योगपती दीपक गद्रे यांच्या हस्ते या अ‍ॅपचा आरंभ करण्यात आला आणि गेल्या सोमवारपासून सुमारे चारशे ग्राहकसंख्या असलेल्या या अ‍ॅपवरून नियमितपणे भाज्यांची मागणी नोंदवणे आणि त्यानुसार पुरवठय़ाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव गोगटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याची रचना वापरण्यास अतिशय सोपी आणि सुटसुटीत केली असल्याने पहिल्याच दिवशी सर्व सदस्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर मागणी नोंदवण्याचा गेल्या तीन महिन्यांचा परिपाठ सोडून पहिल्याच प्रयत्नात या अ‍ॅपचा वापर सहजपणे सुरू केला. त्याचबरोबर नायशी (चिपळूण) आणि चरवेली (रत्नागिरी) इथल्या शेतकऱ्यांचा दर्जेदार भाजीपालाही या माध्यमातून रत्नागिरीकरांना मिळू लागला आहे. तसेच नजीकच्या काळात आणखी काही गावांमधून शेतकरी पिकवीत असलेला भाजीपाला, स्थानिक फळफळावळ ‘राजवाडी भाजी’च्या ग्राहकांना मिळणार आहे. शेतीमालाला रास्त भाव मिळावा ही रास्त मागणी गेल्या अनेक वर्षांपासून बहुतांशी कागदावरच आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला ग्राहकांना ताज्या, निभ्रेळ व दर्जेदार भाज्या किंवा फळे योग्य दरात मिळत नाहीत, अशीही तक्रार असते. या उपक्रमात बळीराजा आणि ग्राहकराजा या दोघांचेही हित सांभाळले जात असल्याने तो परिणामकारक ठरला आहे.

 

सतीश कामत
pemsatish.kamat@gmail.com