शेतकरी आणि शेतीला उत्पन्न वाढीसाठी कंपन्यांचे बियाणे व रासायनिक खते वापरण्याची सवय लागल्यानंतर मागील काही वर्षांत खत व बियाणांच्या किमती वाढल्या, पण शेतीच्या मालाची किंमत वाढली नाही. जास्तीच्या उत्पन्नासाठी शेतकऱ्यांनी खताचा बेसुमार वापर आणि फवाऱ्यांचे डोस वाढवल्याने शेतीचा पोत खराब होत गेला, तसे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळही ढासळला. बियाणे व खतांसाठी होणारा खर्च शेतीच्या उत्पन्नातून निघणे अवघड झाल्याने शेती आतबट्टय़ाचा व्यवहार ठरली आहे. यावर मात करण्यासाठी मोगरा येथील लक्ष्मीकांत जोशी यांनी खर्चात पन्नास टक्के बचतीचा आणि चांगल्या उत्पन्नाची विषमुक्त ‘झिरो बजेट’ शेतीचे तंत्र विकसित केले आहे. पहिल्या वर्षी रासायनिक खते आणि बियाणे यावरील तब्बल दोन लाखांचा खर्च वाचवून सेंद्रिय पद्धतीने पाच एकरात तब्बल ४५ क्विंटल कापसाचे उत्पन्न घेतले, तर चार एकरांत चोवीस क्विंटल सोयाबीनचे तर दोन एकरात तीस क्विंटल बाजरीचे उत्पन्न काढले. बीजामृत संस्कारातून पेरणी, जीवामृताचा डोस आणि निमास्राने फवारणी करून ही शेती विकसित केली आहे.

बीडसह मराठवाडय़ाच्या बहुतांशी भागात कोरडवाहू शेती असल्याने काही वर्षांपासून रासायनिक खतांचा आणि कंपन्यांच्या बियाणांचा वापर सुरू झाल्यानंतर शेती कंपन्यांच्या बियाणे व खतावरच अवलंबून राहिली आहे. पूर्वी शेतकरी बियाणे घरीच साठवून ठेवत, खत म्हणून शेणखतालाच प्राधान्य होते. मात्र शेतीमधून अधिक उत्पन्न काढण्याच्या मानसिकतेतून कंपन्यांनी शेती आणि शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांची सवय लावली. दरवर्षी खत आणि बियाण्यांच्या किमती वाढत गेल्या. शेतीमधून उत्पन्न जास्त निघत असले तरी शेतीमालाच्या किमती मात्र त्या तुलनेत वाढल्या नाहीत. परिणामी मागच्या काही वर्षांपासून शेतीचे अर्थकारणच कोलमडून गेले.

बियाणे, खत आणि फवारणीवर मोठय़ा प्रमाणात खर्च होत असताना शेतातून उत्पन्न खर्चाइतकेही निघानेसे झाले आहे. अशा परिस्थितीत शासनही वेगवेगळ्या माध्यमातून नसíगक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना करत आहे. माजलगाव तालुक्यातील मोगरा येथील लक्ष्मीकांत जोशी यांनी काही शिबिरांमधून सेंद्रिय शेतीबाबत मिळालेल्या माहिती आणि तंत्राच्या आधारे आपल्या पारंपरिक शेतीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. जोशी यांच्याकडे एकूण अठरा एकर शेती असून यात पारंपरिक पद्धतीने वर्षांनुवर्ष कापूस, ज्वारी, गहू, मका, बाजरी, सोयाबीन ही पिके घेतली जात. मात्र या पिकांसाठी बाजारातून कंपन्यांचे बियाणे, खत आणि फवारणीसाठीचे औषधी यावर जवळपास दोन लाखांपेक्षा जास्त खर्च होत असे. खर्च आणि शेतीतून मिळणारे उत्पन्न याचा ताळेबंद जुळत नसल्याने जोशी यांनी रासायनिक खत, बियाणे व फवारणी याला बगल देत सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या वर्षी पाच एकरात कापसाच्या बियाणांची लागवड केली. बीजामृत संस्कार करून पेरणी झाल्यानंतर २१ दिवसांनी जीवामृतचा डोस दिला गेला.

एका एकरला साधारणपणे दोनशे लिटर जीवामृताचा डोस दिल्यानंतर बियाण्यांना चांगली शक्ती मिळते, तर फवारणी ही निमात्राने केल्यामुळे औषधांचा खर्च वाचतो. या पद्धतीच्या फवारणीतूनही पिकांवरील मावा, छोटे कीडे, अळी यांना प्रतिबंध होतो.

पहिल्याच वर्षी मोठय़ा प्रमाणात खर्च वाचला आणि उत्पन्नही चांगल्या पद्धतीने मिळाले. पाच एकरात ४५ क्विंटल कापूस, चार एकरात सोयाबीनचे प्रतिएकर सहा क्विंटलने २४ क्विंटल तर दोन एकरात बाजरीचे ३० क्विंटल उत्पन्न मिळाले. त्यामुळे जोशी यांचा शून्य खर्चाच्या शेतीचा प्रयोग यशस्वी झाल्याने परिसरातील अनेक लोक अशा पद्धतीच्या शेतीचे अनुकरण करू लागले आहे. खर्चात बचत आणि सेंद्रिय पद्धतीने उत्पादन वाढल्याने त्या उत्पादनाला बाजारातही चांगली किंमत मिळू लागली आहे.

बीजामृत

घरगुती बियाण्यांना देशी गाईचे गोमूत्र, चुना, निवळ याचे मिश्रण लावून पेरणी केली जाते.

जीवामृत

एकवीस दिवसांनी शेण, गोमूत्र, काळा गुळ, कडधान्यांचे पीठ याच्या मिश्रणाचे जीवामृत तयार करून त्याचा डोस उगवलेल्या पिकांना दिला जातो.

निमात्राने फवारणी

फवारणीसाठी िलबाच्या झाडाचा पाला, िलबोळ्या यांचे मिश्रण करून फवारणी केल्यानंतर मावा, छोटे किडे, अळी यांचा नायनाट होतो.

vasantmunde@yahoo.co.in