बीड जिल्ह्य़ाच्या वडवणी तालुक्यातील चिंचवण गावातील बाळासाहेब बडे यांनी दहा वर्षांपूर्वी पारंपरिक पीक पद्धतीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नाला वैतागून नवीन फळ पिकाची शेती सुरू केली. सुरुवातीला सहा एकरमध्ये डाळिंब लागवड केल्यानंतर दोन वर्षांत दोन लाख रुपयांचे उत्पन्न राहिल्याने भगव्या डाळिंबाची बाग सत्तावीस एकरवर फुलवली.

डोंगरपट्टय़ातील दुष्काळी चिंचवण गावातील बाळासाहेब बडे यांनी दहा वर्षांपूर्वी पारंपरिक पीक पद्धतीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नाला वैतागून नवीन फळ पिकाची शेती सुरू केली. सुरुवातीला सहा एकरमध्ये डाळिंब लागवड केल्यानंतर दोन वर्षांत दोन लाख रुपयांचे उत्पन्न राहिल्याने भगव्या डाळिंबाची बाग सत्तावीस एकरवर फुलवली. वर्षांकाठी पारंपरिक पिकातून कुटुंबाची मजुरीही निघत नसताना डाळिंबाच्या शेतीतून तब्बल चार लाख रुपयांचा नफा मिळू लागल्याने अनेक शेतकरी कर्जाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडले. बडे यांनी शंभर शेतकऱ्यांचा गट करून तालुक्यात अडीचशे एकरमध्ये बाग फुलवल्याने वर्षांला तब्बल सव्वाशे कोटी रुपये उत्पन्नाची आíथक क्रांतीच झाली आहे.

वडवणी तालुका बालाघाटच्या डोंगर पट्टय़ात विसावलेला असल्याने शेती ही डोंगराळ आणि हलक्या प्रतीची. बहुतांशी कोरडवाहू असल्याने पीकही पारंपरिकच. त्यामुळे एकरी शेतीच्या उत्पन्नातून कुटुंबाच्या वार्षकि मजुरीही निघणे कठीण असल्याने शेतकरी असलेले कुटुंब ऊसतोडणी मजूर म्हणून राज्यभर कारखान्यावर जात. अशा परिस्थितीत दहा वर्षांपूर्वी चिंचवण गावातील बालासाहेब बडे या तरुणाला शेतीतील पारंपरिक पीक पद्धतीतून येणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नाचा तिटकारा आल्याने शेतीत नव्या पिकाची वाट धुंडाळायला सुरुवात झाली. परिसरातील एकूण जमिनीचा पोत लक्षात घेता डाळिंबाची शेती फायद्याची होऊ शकते हे जाणून त्यांनी सुरुवातीला सहा एकरमध्ये डाळिंबांची लागवड केली. दहा महिन्यांत दोन लाख रुपयांचा नफा मिळाल्यानंतर भगव्या जातीच्या डाळिंबाचे आकर्षणच वाढले आणि सध्या सत्तावीस एकरमध्ये या डाळिंबाची बाग फुलली आहे. एकदा लागवड केली की तब्बल पंधरा वर्ष उत्पन्न देणाऱ्या या फळी पिकाला या परिसरात पोषक वातावरण असल्याने बडे यांनी गावातील इतर शेतकऱ्यांनाही डाळिंबाच्या भगव्या शेतीसाठी प्रोत्साहित करण्यास सुरुवात केली. बडे यांच्या शेतातील डाळिंबाचे उत्पादन पाहून इतर शेतकऱ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली डाळिंब बागा फुलवल्या. डाळिंबाचे उत्पादन वाढू लागले तसे विक्रीसाठी हक्काचे व्यापारीही मिळाले. फळ आले की बाहेर जिल्ह्यातील व्यापारी येऊन शेतात काटा करून माल घेऊन जात असल्याने शेतकऱ्यांना खर्च वजा जाता एका एकरात तब्बल चार लाख रुपयांपेक्षा जास्त नफा मिळू लागल्याने अनेक शेतकरी कर्जाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडले आणि आज आíथकदृष्टय़ा सक्षम झाले आहेत. काही वर्षांपूर्वी या परिसरात सोन्नाखोटा हा मोठा प्रकल्प झाल्याने पाण्याची उपलब्धता वाढली आणि डाळिंबाच्या शेतीकडे शेतकऱ्यांचा ओढाही वाढला. बाळासाहेब बडे हे कोणताही खर्च न घेता स्वत गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना भगव्या डाळिंबाच्या शेतीसाठी मार्गदर्शन करतात. या डाळिंबाचे झाड परिपक्व  झाल्यानंतर झाडाला शंभर ते सव्वाशे फळे लागतात आणि तब्बल पंधरा वर्षांपर्यंत हे झाड उत्पन्न देते. त्यामुळे ही फळशेती आíथकदृष्टय़ा फायद्याची ठरली. बडे यांनी तालुक्यातील वडवणीसह चिंचवण, सोन्नाखोटा, बाहेगव्हाण, कोठरबन, िपपळटक्का, रुई, रोकडेश्वर वस्ती, धुनकवड, साळिंबा या गावातील शंभर शेतकऱ्यांचा गट करून तब्बल अडीचशे एकरमध्ये भगव्या डाळिंबाची शेती फुलवली आहे. दररोज एका गावाला भेट देऊन दहा-पंधरा शेतकऱ्यांच्या बागेची पाहणी करायची आणि कोणती फवारणी, कोणते खत वापरणे आवश्यक आहे, याबाबतची चर्चा करून मार्गदर्शन करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्यावर पूर्ण विश्वास बसल्याने मोठय़ा प्रमाणात शेतकरी डाळिंबाच्या शेतीकडे येऊ लागले आहेत. आता रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खतावर पिकवलेल्या डाळिंबाला बाजारात जास्त भाव मिळू लागल्याने सर्वत्र आता सेंद्रिय डाळिंब बागेकडे शेतकऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

मोठय़ा पाणी साठवण प्रकल्पामुळे शेतकऱ्यांनी शेतामध्ये विहिरी, बोअर घेऊन पाण्याची उपलब्धता करीत डाळिंबाच्या शेतीला ठिंबकच्या माध्यमातून कमी पाण्यात शेती फुलवली आहे. वडवणी तालुका हा मानवविकास निर्देश अंकामध्ये सर्वात कमी दरडोई उत्पन्न असणारा आणि दुष्काळी तालुका. मात्र बाळासाहेब बडे या तरुण शेतकऱ्याच्या प्रयत्नातून तालुक्यात अडीचशे एकर शेतावर डाळिंबाचे उत्पन्न सुरू झाल्याने शंभर कुटुंबात आíथक क्रांतीच झाली आहे. या वर्षी आणखी पन्नास शेतकऱ्यांनी गटात सहभागी होत डाळिंबाची लागवड केल्याने तालुक्यात डाळिंबाचे क्षेत्र आता जवळपास चारशे एकपर्यंत पोहोचले असल्याचेही बडे यांनी सांगितले. एकत्रित डाळिंब शेती होत असल्याने खत, फवारणीसाठीचे औषधे कमी किमतीमध्ये मिळते तर खरेदीसाठी व्यापारी बांधावर येत असल्याने मालाला भावही चांगला मिळतो. त्यातून खर्च कमी आणि उत्पन्न जास्त, अशी भगव्या डाळिंबाची आíथक क्रांतीच झाली आहे.

vasantmunde@yahoo.co.in