भारतात प्रत्येकाच्या घरात हरभऱ्यापासून केलेला पदार्थ वर्षभरात कधी ना कधी वापरला जातो. जगात सर्वाधिक हरभऱ्याचे उत्पादन करणारा देश म्हणून भारताची जशी ओळख आहे तशीच हरभऱ्याचा अधिक वापर करणारा देश म्हणूनही भारत जगात प्रसिद्ध आहे. जगातील एकूण हरभऱ्याच्या पेऱ्यापकी ७८ टक्के पेरा भारतात, ९ टक्के पाकिस्तानात व उर्वरीत १३ टक्के अन्य देशांत केला जातो. गेल्या काही वर्षांपासून भारतात हरभऱ्याच्या उत्पादनात होत असणारी घट व भारताची गरज लक्षात घेऊन ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आदी देशात हरभऱ्याचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. तेथील देश शेतकऱ्याला हरभऱ्याचे अधिक उत्पादन घेतले तर तुमच्या मालाची चांगल्या भावाने विक्री होईल याची हमी देतात व तेथील शासनाच्या मदतीमुळे ते शेतकरी भारतात आपला माल पाठवतात.

हरभऱ्याच्या कोवळय़ा शेंडय़ाची भाजी रब्बी हंगामात खाल्ली जाते. हरभऱ्याच्या मुळावरील गाठीमुळे नत्राचे जमिनीतील प्रमाण वाढते. हरभऱ्यात प्रथिनांचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे हरभऱ्याला घोडय़ाचा खुराक असेही संबोधले जाते व घोडय़ांना पौष्टिक आहार म्हणूनही हरभरा खाऊ खातला जातो. गोड व खारे पदार्थ तयार करण्यासाठीही हरभऱ्याचा वापर केला जातो. हरभऱ्याच्या टरफलात प्रथिनाचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत असते तर डाळीत ते २५ टक्के असते. हरभऱ्याच्या कोवळ्या पानात मॅलिक व ऑक्झॉलिक आम्ल असते. भारतात पंजाब, हरयाना, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल व कर्नाटक या राज्यांत हरभऱ्याचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. सर्वसाधारणपणे रब्बीच्या हंगामात हरभऱ्याचे उत्पादन घेतले जाते.

Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Analysis of adulterated food will be expedited report will be available within 14 days
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे विश्लेषण वेगात होणार, १४ दिवसांमध्ये मिळणार अहवाल
Household Consumption Expenditure Survey 2022-23
भारतीय कशावर किती खर्च करतात माहितीये? HCES च्या अहवालातून आली ११ वर्षांची आकडेवारी समोर!
how to make moringa curry recipe in marathi
Recipe : शेवग्याच्या शेंगांपासून बनवा पौष्टिक ‘शेकटवणी’; पाहा या आंबट-गोड पदार्थाचे प्रमाण अन् रेसिपी

हरभऱ्यासाठी मध्यम अथवा उत्तम प्रतीची जमीन वापरली जाते. ७०० ते १००० मिलिमीटर पाऊस पडणाऱ्या प्रदेशात याचे उत्पादन घेतले जाते. कडाक्याची थंडी या पिकाला सहन होत नाही. ५ सेल्सिअस तापमानाच्या वरील तापमानातच हरभऱ्याची वाढ चांगली होते. खरिपाचे पीक काढल्यानंतर नांगरट व कुळवाच्या पाळ्या झाल्यानंतर पेरणी केली जाते. जमिनीचा सामू (पीएच) ५.५ ते ८.६ असणाऱ्या जमिनीत हे पीक घेतले जाते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापासून १० डिसेंबपर्यंत हरभऱ्याचा पेरा केला जातो. कोरडवाहू जमिनीत एकरी ४.५० ते ५ क्विंटल तर बागायती जमिनीत १४ क्विंटलपर्यंत उत्पादन घेतले जाते. १०५ ते ११० दिवसांचा या पिकाचा कालावधी आहे.

पेरणी करताना १० सेंटिमीटर खोल बियाणे पेरावे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दोन ओळीतील अंतर ३० सेंटिमीटर व दोन रोपांतील अंतर १० सेंटिमीटर इतके ठेवावे. बियाणांच्या प्रतीवर व आकारावर एकरी २५ ते ४० किलो बियाणे लागते. बीजप्रक्रिया करून बियाणे पेरावे. मुळावर नत्राच्या गाठी वाढत असल्यामुळे या पिकाला रासायनिक खत कमी लागते व हे पीक जमिनीची जैविक सुपीकता वाढवते. पेरणीनंतर सुरुवातीचे ४ ते ६ आठवडे जमीन तणविरहित ठेवणे आवश्यक आहे. खुरपणी व कोळपणी करून हवा खेळती ठेवल्यास पीक चांगले वाढते. हरभऱ्यावर मूळकुजव्या, मर, भुरी व गेरवा हे रोग पडतात. पेरणीनंतर हवेतील तापमान वाढले तर मूळकुजव्या रोगाचा उपद्रव होतो त्यामुळे जमिनीत ओल असेल व तापमान थंड असेल तेव्हाच पेरणी करावी. मर रोगामुळे वाढलेले झाडही संपूर्ण वाळू लागते तेव्हा तातडीने त्यावर औषध फवारणी करणे आवश्यक आहे. घाटेअळी नावाच्या कीड रोगामुळे ती घाटय़ातील दाणे फस्त करते. या पिकाला आवश्यकतेनुसार काढणी होईपर्यंत किमान तीन फवारण्या कराव्या लागतात.

लातूरमधील भाडगाव येथील बाळासाहेब दाताळ हे प्रगतशील शेतकरी आहेत. अत्याधुनिक शेतीतील बदलाचा वापर ते शेतात करतात. त्यासाठी अत्याधुनिक बियाणे व तंत्रज्ञानाचा वापर ते आवर्जून करतात. दाताळ यांनी हैदराबाद येथील इक्रिसॅट केंद्राने विकसित केलेले वाण घेतले. कोरडवाहू जमिनीत एकरी ८ क्विंटल उत्पादन मिळेल असा संशोधकांचा दावा होता. दाताळ यांनी प्रत्यक्षात १४ क्विंटल उत्पादन घेतले. पेरणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाऊस पडला तर जमिनीला धालपी बसते, त्यामुळे पेरलेले बी नीट उगवत नाही. त्यामुळे रब्बीच्या हंगामात पाऊस पडल्यानंतर उघडीपची खात्री लक्षात घेऊनच पेरणी करावी लागते.

पाऊस निश्चित नसल्याने रब्बीच्या हंगामातही दुबार पेरणीचे प्रसंग शेतकऱ्यांवर येतात. दाताळ यांनी शेतात िलबोळी पेंडीचा वापर केला. त्यांचा अनुभव असा आहे की यामुळे हरभऱ्याच्या पिकात कडवटपणा वाढतो व कीटकनाशकाची फारशी गरज लागत नाही. उत्पादकता वाढवणाऱ्या वाणांकडे शेतकऱ्यांचा अधिक कल आहे. शासनाने हरभऱ्याचा हमीभाव वाढवून दिला तर देश हरभऱ्याच्या डाळीत स्वयंपूर्ण होऊ शकतो, अशी स्थिती आहे. गरज आहे ती शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन साहाय्य करण्याची.

प्रमुख जाती

विकास, विश्वास, फुले जी १२, विजय, विशाल, श्वेता, भारती, बीडीएन या प्रमुख जाती आहेत. काबुली वाणही काही शेतकरी घेतात. त्यात विराट, श्वेता, आयसीसीव्ही १२ अशा जाती घेतल्या जातात.

प्रदीप नणंदकर – pradeepnanandkar@gmail.com