राहाता तालुक्यात चंद्रापूर नावाचे छोटे गाव आहे. ऊस व इतर बागायती पिकांचा तालुका अशी ओळख असलेल्या तालुक्यात बाळासाहेब गोपीनाथ घुले यांनी रेशीम व्यवसाय यशस्वी केला आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून पर्याय शोधत असताना घुले यांना रेशीम शेतीचा पर्याय मिळाला.

उसाच्या शेतीसोबतच बागायती पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणी (ता. राहाता) नजीक असलेल्या चंद्रापूरच्या बाळासाहेब गोपीनाथ घुले यांनी रेशीम व्यवसाय थाटला आहे. रेशीम व्यवसायातील योग्य नियोजनाने उत्पादनातही त्यांनी आघाडी घेतली आहे.

राहाता तालुक्यात चंद्रापूर नावाचे छोटे गाव आहे. ऊस व इतर बागायती पिकांचा तालुका अशी ओळख असलेल्या तालुक्यात घुले यांनी रेशीम व्यवसाय यशस्वी केला आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून पर्याय शोधत असताना घुले यांना रेशीम शेतीचा पर्याय मिळाला.

तुती लागवडीचे नियोजन

चंद्रापूर शिवारात सन २०१२-१३ मध्ये घुले यांनी दोन एकर तर २०१४-१५ मध्ये पुन्हा २० गुंठे क्षेत्रात ‘व्ही वन’ जातीच्या तुतीची पट्टा पद्धतीने लागवड केली. उन्हाळ्यातच शेतीची मशागत केली. एकरी आठ मेट्रिक टन शेणखत टाकले. त्यानंतर ४५ दिवसांनी खतांचा डोस देण्यात आला. तुती लागवडीच्या दीड महिन्यानंतर खुरपणी करण्यात आली. अडीच महिन्यानंतर गरजेनुसार बलाच्या साहाय्याने पाळ्या करण्यात आल्या. दोन किंवा तीन दिवसांच्या अंतराने ठिबकच्या मदतीने पाणी देण्यात आले. मशागत, खत व पाण्याच्या सुयोग्य व्यवस्थापनाने तुतीची बाग तीन महिन्यात चांगली बहरात आली.

कीटक संगोपनगृहाची उभारणी

तुतीची लागवड केल्यानंतर मित्रासह म्हैसूर येथे रेशीम अळी संगोपनासंदर्भातील विशेष प्रशिक्षण घेतले. यामुळे उद्योगातील आत्मविश्वास वाढल्याचे घुले सांगतात. कीटक संगोपनगृहाची उभारणीही त्यांनी केली आहे. ५० बाय २० फूट अंतरावर उभारण्यात आलेल्या शेडमध्ये रॅक तयार करण्यात आल्या. कोषनिर्मिती करण्यासाठी बायव्होल्टाईन डबल हायब्रीड जातीच्या अंडीपुंजांचे संगोपन केले. अळ्यांना वेळेनुसार तुतीचा पाला टाकण्यात आला. पीक सुरू करण्यापूर्वी व पीक संपल्यानंतर कीटक संगोपनगृहाचे र्निजतुकीकरण करण्यात आले. यंदाच्या वर्षी पहिल्या बॅचमध्ये ५०० अंडीपुंजांचे संगोपन करून ३९८ किलो रेशीम कोषांचे उत्पादन मिळाले. ३२५ रुपये किलो दराने विक्री केली असनू त्यातून १ लाख २९ हजार ३५० रुपयांचे उत्पन्न मिळाले. सद्यस्थितीत ५००  अंडीपुंजांचे संगोपन सुरू आहे. नगर रेशीम विकास विभागाच्या माध्यमातून रेशीम शेतीबाबत शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मार्गदर्शन करण्यात येते. तुती लागवड ते थेट बाजारपेठेपर्यंत मार्गदर्शन मिळत असल्याने रेशीम शेतीत शेतकऱ्यांचा सहभाग वाढतो आहे.

कुटुंबाचा संपूर्ण सहभाग

रेशीम उद्योगात कुटुंबाचा संपूर्ण सहभाग आवश्यकच असतो, असे घुले सांगतात. रेशीम व्यवसायात त्यांना पत्नी सारिका, वहिनी लता व पुतन्या दीपक यांची मदत होते. प्रत्येकाकडे कामांची जबाबदारी विभागून देण्यात आली आहे. कुटुंबाची चांगली साथ मिळाल्याने मजुरांची फारशी आवश्यकता पडत नाही. अळीच्या चौथ्या अवस्थेनंतर मजुरांची गरज अधिक भासते. रेशीम कोष उत्पादनाच्या वेळी १२ महिलांची एक दिवसाकरिता, तर अंडीपुंजांच्या व्यवस्थेसाठी दोन मजुरांची १५ दिवस गरज असते. एकत्र कुटुंब असल्याने प्रथम एक एकर लागवड केली. परंतु पाणी कमी झाल्याने व झाडांची संख्या कमी असल्याने कमी उत्पन्न मिळत होते, त्यामुळे सन २०१२-१३ मध्ये पुन्हा दुसऱ्या क्षेत्रात दोन एकर तुती लागवड केली. योग्य नियोजन केल्यामुळे चांगले उत्पादन घेणे शक्य झाले.

घुले यांनी अळ्यांना आवश्यक असणारा पाला पुरवून उर्वरित वाढलेल्या तुती झाडांचा उपयोग कलम म्हणून विक्रीसाठी केला आहे. कलमांच्या विक्रीतून त्यांना ७५ हजार रुपयांचे बोनस उत्पन्न मिळाले आहे. अर्धा एकर क्षेत्रामध्ये नर्सरी तयार करून तुतीची रोपे तयार केली असून त्यातूनही घुले यांना चांगलाच आíथक लाभ झाला आहे. बाळासाहेब घुले यांच्या रेशीम शेतीतील प्रगती पाहून त्यांच्या पुतण्यानेही दोन एकरात तुती लागवड केली. आणखी एक ५० बाय २० फूट आकाराचे संगोपनगृह बांधले आहे. एकत्र कुटुंब असल्याने दोघांनी मिळून प्रत्येक पिकाला ५०० ते ६०० अंडीपुंज घेण्यास सुरुवात केली. प्रत्येक पिकाला किमान ८० ते ९० हजार रुपये उत्पन्न मिळते. वर्षभरात ४-५ पिके घेऊन एकरी ३ ते ३.५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे घुले सांगतात. तुतीचे पीक घेतल्यानंतर उरलेल्या पिकाचा मुरघास बनविला व तो शेळ्या-गायींना देण्यात आला. रेशीम उद्योगासोबतच शेळीपालन व दुग्धव्यवसाय अशा उद्योगांची जोड मिळाल्याने उत्पन्नात भर पडली आहे.

अशी आहे रेशीम कोषांची बाजारपेठ – रेशीम कोषांसाठी तीन बाजारपेठा आहेत. यात पहिली व्यवस्था आहे शासनाची. या व्यवस्थेअंतर्गत शासन शेतकऱ्यांकडून हमीभावाने कोषांच्या गुणवत्तेनुसार कोष खरेदी करते. ही गुणवत्ता एका किलोतील कोषांच्या संख्येवर ठरविण्यात येते. कोषांना प्रतवारीप्रमाणे १७८ रुपये प्रतिकिलोचा दर देण्यात येतो. दुसरी खरेदी खासगी व्यापाऱ्यांमार्फत केली जाते. शासनापेक्षा चढय़ा दराने किंवा किमान शासनदराने खरेदी करणे या केंद्रांना बंधनकारक करण्यात आले आहे. कमीत कमी ३२५ रुपये प्रति किलोचा दर या केंद्रांमार्फत देण्यात येतो. कोष खरेदीच्या तिसऱ्या प्रक्रियेत कर्नाटकातील रामनगर येथे रेशीम कोषांची मोठी बाजारपेठ आहे. कोषाला येथे २५० ते ५०० रुपयापर्यंत प्रति किलोचा भाव मिळतो. जिल्हा रेशीम कार्यालयाने रामनगर कोष बाजारपेठेतील दराचे रोजच्या रोज एसएमएस सुरू केले. त्यामुळे तेथील दराबाबत सर्व ती माहिती मिळाली. दरासंदर्भातील माहिती मिळाल्यामुळे बाजारपेठ सोयीची झाली.

रेशीम विभागाकडून मार्गदर्शन

अहमदनगर जिल्ह्यत ३०९ एकरावर तुतीची लागवड करण्यात आली आहे. २६९ शेतकरी नियोजनातून रेशीम उद्योग करतात. ८० हजार अंडीपुंजाचा पुरवठा करण्यात आला असून ६० मेट्रिक टन कोषांचे उत्पादन घेण्यात आले असल्याचे जिल्हा रेशीम विकास अधिकारी डॉ. कविता देशपांडे यांनी सांगितले. रेशीम विभागाकडून  मनरेगाअंतर्गत रेशीम उद्योग सुरू करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगासाठी पुढे यावे, असे आवाहन देशपांडे यांनी केले आहे.

‘चॉकी’ संगोपन केंद्र

पीक चांगल्या पद्धतीने घेत असल्याने रेशीम कार्यालयाच्या मार्गदर्शनाने चॉकी संगोपन केंद्र सुरू केले आहे. या केंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पहिल्या दोन अवस्थेतील अळया तयार करून देण्यात येतात. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना अवघे १५ दिवस अळयांचे संगोपन करून कोष मिळविणे शक्य झाले. यासाठी २० गुंठय़ात तुतीची लागवड केली व ५००० अंडीपुंजांचे चॉकी संगोपन घेता येईल असे स्वतंत्र चॉकी संगोपनगृह तयार केले आहे. केंद्र उभारणीसाठी रेशीम कार्यालयाकडून ७० हजार रुपये अनुदान मिळाले. मराठवाडय़ातील चॉकी सेंटर पाहून तसेच म्हैसूर येथे प्रशिक्षण घेतल्यामुळे चॉकी केंद्र चालविणे सोपे झाले. प्रत्येक पिकाला मागणीप्रमाणे सरासरी २००० ते ३००० अंडीपुंज घेऊन १० दिवसांत शेतकऱ्यांना दोन अवस्थेच्या अळया तयार करून देण्यात येतात. त्यामुळे उत्पन्नात वाढ झाली आहे.

घुले यांच्या रेशीम शेतीची वैशिष्टय़े

* कमी गुंतवणूक, अधिक मिळकत

* दोन एकर क्षेत्रामध्ये वर्षभर चार लोकांना रोजगार

* ग्रामीण भागातच अनेकांना रोजगार

* कुटुंबातील महिलांनीच केला उद्योग यशस्वी, संपूर्ण कुटुंबाचा उद्योगाला हातभार

* रेशीम व्यवसायात पाल्याची प्रत अत्यंत महत्त्वाची. शेतकऱ्यांनी आंतरमशागत, माती परीक्षण, खतांचा डोस या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक.

* पिकांचे नियोजन करून वेळेत अंडीपुंजांची मागणी नोंदविणे गरजेचे.

* पीक सुरू करण्यापूर्वी व पीक संपल्यानंतर कीटक संगोपनगृहाचे र्निजतुकीकरण करणेही आवश्यक.

* रेशीम व्यवसायाचे यश वातावरणातील बदलांवर अवलंबून असल्याने कीटक संगोपनगृहाचे तंत्रज्ञान वापरायला हवे.

(लेखक उपमाहिती कार्यालय शिर्डी येथे माहिती अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)

गणेश फुंदे – shirdisio@gmail.com