भारतातील ६५ टक्के लोकसंख्या अजूनही शेती व्यवसायावर अवलंबून आहे. एका स्थित्यंतरातून शेतीची वाटचाल सुरू आहे. स्वातंत्र्यानंतर वाढत्या लोकसंख्येची भूक भागविणे हे सरकारसमोरील सर्वात मोठे आव्हान होते. त्यामुळे उत्पादकतावाढीसाठी विविध उपक्रम राबविले गेले. कृषी विस्तार यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यात आली. संशोधन संस्था जास्त उत्पादन देणाऱ्या जाती व उत्पादन तंत्रज्ञान यावर भर देऊ लागल्या. उत्पादनवाढीचा उद्देश फलद्रूप होऊ लागला. त्यातच हरितक्रांतीने मोठे योगदान दिले. हे यश अभिमान वाटण्याजोगे असले तरी लहान व गरीब शेतकरी अपेक्षित प्रगती करू शकलेला नाही, हे सत्य नाकारून चालणार नाही. देशाची त्या वेळची गरज व त्वरित उत्पादकतावाढीची निकड लक्षात घेऊन बहुतांश उपक्रम ‘वरून-खाली’ तंत्रज्ञानाचा ओघ या प्रकारात मोडल्यामुळे स्थानिक लोकांचा विविध टप्प्यांत सहभाग नाममात्र राहिला. विस्तार यंत्रणा व संशोधन संस्था यांच्या प्रयत्नांमुळे भारत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झालाच, शिवाय आता देश शेतीमाल निर्यातही करू लागला आहे; परंतु या स्थितीत आपल्या देशात ८० टक्क्यांहून अधिक संख्या असलेल्या लहान व सीमान्त शेतकऱ्यांचा विचार करणेही गरजेचे आहे. त्यासाठी विस्तार यंत्रणांना आपल्या कार्यपद्धतीत बदल करणे क्रमप्राप्त झाले. स्थानिक गरजा व समस्या, लोकसहभाग, पीक पद्धती, जोडधंदा यावर आधारित तंत्रज्ञानाचा प्रसार हाच शाश्वत शेतीचा राजमार्ग असून एकात्मिक शेती पद्धती हा त्याचाच एक भाग आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राने एकात्मिक शेती पद्धतीतून आदिवासी भागात विविध सुधारित तंत्रज्ञान राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गावे स्वयंपूर्ण व्हावीत, शाश्वत शेतीद्वारे विकास, महिलांचे सबलीकरण, संपूर्ण कुटुंबासाठी काम व त्यातून आदिवासी कुटुंबाचे जीवनमान उंचावणे, हा त्यामागील उद्देश.
एकात्मिक शेती पद्धती
शेतकऱ्यांकडे सद्य:स्थितीत असलेली पिके व जोडधंदे, त्यांची उत्पादकता, शेतकऱ्यांचा कार्यक्रम, आखणी प्रक्रियेत सहभाग, त्यांचे स्थानिक परिस्थितीचे ज्ञान यांचा वापर करून भावी कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली. स्थानिक लोकांचा विकास कार्यक्रमात क्रियाशील सहभाग हा कोणत्याही विकासाचा आत्मा असतो, हे तत्त्व वापरून केंद्राने प्रत्येक प्रक्रियेत शेतकऱ्यांचे साहाय्य घेतले. यासाठी कृषी विज्ञान केंद्रामार्फत चाकोरे येथे आदिवासी खेडे दत्तक घेण्यात आले. येथील शेतकऱ्यांसाठी एकात्मिक शेती पद्धतीचे विविध विकास कार्यक्रम राबविण्यात येत असल्याने आदिवासी शेतकऱ्यांमध्ये चैतन्य आले आहे.
आत्मा नाशिक यांच्या आर्थिक साहाय्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत विविध आधुनिक तंत्रज्ञान देताना मुख्यत: शाश्वत विकासावर भर देण्यात येत आहे. बहुधा विकास यंत्रणांनी राबविलेल्या तंत्रज्ञानाने अस्तित्व फक्त आर्थिक पाठबळ असलेल्या काळापर्यंत दिसते. कालांतराने ते अधिक काळ टिकाव धरत नाही. अशी परिस्थिती वारंवार न उद्भवता त्याची ठोसपणे अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने शाश्वत विकासावर आधारित उपक्रम या गावात राबविण्यात येत आहे. यासाठी गावातील विविध पीक पद्धती, पिकांची उत्पादकता, उत्पादन खर्च यांचा अभ्यास करण्यात आला. शेतीसोबत गावात असणारे परंपरागत शेतीपूरक जोड व्यवसाय यांचाही अभ्यास झाला. महिला व लहान मुलांचे आरोग्य, महिलांमार्फत करण्यात येणारी शेतीची कामे व त्यातील अडचणी समजून घेण्यात आल्या. त्याचबरोबर स्थानिकांचे व्यवसाय आणि त्यांच्या गरजा, समस्या व तंत्रज्ञान अवलंबनासाठी त्यांची इच्छाशक्ती जाणून घेण्यात आली. त्यानुसार स्थानिक लोकांच्या मदतीने आराखडा तयार करण्यात आला.
आद्यरेषा प्रात्यक्षिके
पीक उत्पादकता वाढ याअंतर्गत भात, नागली व खुरसणी या स्थानिक पिकांच्या सुधारित जाती शेतकऱ्यांना पुरविण्यात आल्या. भाताची चारसूत्री लागवड पद्धती, युरिया ब्रिकेटचा वापर यावर मार्गदर्शन करून आद्यरेषा प्रात्यक्षिके राबविण्यात आली. वरकस व मोकळ्या जागेवर केशर आंबा व पेरू लागवड व त्यांचे सहभागी तत्त्वावर खत व्यवस्थापन असे अनेक कार्यक्रम केंद्राने राबविले. पिकांसोबत केंद्राने जोडधंदा विकासावरही भर दिला. परसातील कोंबडीपालन हा आदिवासी भागातील परंपरागत व्यवसाय. कोंबडय़ाचे वजन वाढावे व अंडी देण्याची क्षमता वाढीस लागावी या दृष्टीने शेतकऱ्यांना गिरीराजा या कोंबडीची प्रजाती देण्यात आली. तसेच शेळीपालनात वजनवाढ व जुळी पिले देण्याची क्षमता वाढविण्यासाठी केंद्राने शेळी वंशसुधार कार्यक्रम हाती घेतला. त्यासाठी उस्मानाबादी बोकडाचे वाटप करण्यात आले.
महिलांचे श्रम कमी
शेतातील बहुतांश कामे महिला करतात हे लक्षात घेऊन त्यांचे कष्ट कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबविले गेले. त्यात विशेषत: भातकापणीसाठी वैभव आणि लक्ष्मी विळे, तण नियंत्रणासाठी कोनो विडर व सायकल कोळपे, वांगी व भेंडी तोडताना हाताला होणाऱ्या इजा टाळण्यासाठी विशिष्ट हातमोजे व तोडणी यंत्र तसेच भुईमूग फोडणी यंत्र आदिवासी महिलांना देण्यात आले. पावसाळ्यात भातशेतीमध्ये काम करतांना खास डिझाईन केलेला रेनकोटही महिलांना केंद्र देणार आहे. महिला व मुलांमध्ये असणाऱ्या प्रथिने व लोह कमतरता दूर करण्यासाठी प्रत्येक घराजवळ परसबाग उभारण्यात आली. यासाठी खास प्रथिने, लोह व शरीरास आवश्यक इतर अन्नद्रव्येयुक्त भाजीपाल्याचे बियाणे पुरविण्यात आले. धान्य साठविण्याची समस्या लक्षात घेता शास्त्रोक्त पद्धतीने त्याची साठवणूक करण्यासाठी धान्य पिशव्या देण्यात आल्या. स्वयंपाक चुलीवर होत असल्याने महिलांना धुरामुळे श्वसनाचे विकार जडतात. शिवाय जळणासाठी मोठय़ा प्रमाणात सरपण लागते. केंद्राने धुरविरहित चुली ग्रामीण भागांना पुरविल्या. त्यामुळे या चुलीवर
कमी सरपणात अन्न शिजवता येते. याचबरोबर महिलांना पापड, कुरडई, लाडू आदी कौशल्य प्रशिक्षणही दिले जात आहे.
अभ्यास दौरा
महिलांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांना इतर भागांतील महिलांमार्फत करण्यात येणाऱ्या विविध उद्योगधंद्यांची ओळख व्हावी, ते अभ्यासता यावे आणि त्याजोगे त्यांना विविध कामांसाठी उद्युक्त करणे यासाठी महिलांची अभ्यास सहल कोसबाड येथे नेण्यात आली. या दरम्यान त्यांना परसबागेतील सुधारित कोंबडीपालन, फळरोपवाटिका, भाताच्या विविध लागवड पद्धती, शेळीपालन, गांडूळखत प्रकल्प, मधुमक्षिकापालन यांसारखे प्रकल्प दाखविण्यात आले.
अंमलबजावणी कार्यपद्धती
प्रत्येक कार्यक्रम व आद्यरेषा प्रात्यक्षिके राबविण्यासाठी त्यांना त्याविषयीचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात आली. त्यामुळे तंत्रज्ञान व त्याच्या वापराविषयी भीती दूर करून आत्मविश्वासाने शेतकऱ्यांमार्फत
ते राबविले गेले. उत्पादनाच्या विभिन्न टप्प्यांवर
केंद्राच्या शास्त्रज्ञांनी भेटी देऊन वेळोवेळी समस्यांचे निरसन केले.
प्रत्येक उपक्रम राबविताना त्याची सद्य:स्थितीतील उपयुक्तता, अधिकचे उत्पन्न, संपूर्ण कुटुंबासाठी काम, गरज व समस्या निवारण व सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा क्रियाशील सहभाग या गोष्टी प्राधान्याने लक्षात घेण्यात आल्या. आदिवासी कुटुंबे स्वावलंबी करणे, पिकांसोबत जोडधंदे विकास व त्याद्वारे त्यांचे जीवनमान उंचावणे यामुळे एकात्मिक शेती पद्धती हा प्रकल्प केवळ कृषी विज्ञान केंद्राचा न राहाता तो स्थानिक लोकांचा प्रकल्प ठरला आहे.
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (नाशिक) येथे विस्तार शास्त्रज्ञ आहेत.)

आदिवासी खेडे दत्तक
नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथील चाकोरे परिसरातील आदिवासी खेडे दत्तक घेण्यात आले. विद्यापीठाच्या पथदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून शाश्वत विकासाचे हे उदाहरण इतर आदिवासी भागांत राबविणे व मोठय़ा प्रमाणात तंत्रज्ञान अवलंबनातील दूरी दूर करणे सहज शक्य होत आहे. अर्थात, यासाठी गावकऱ्यांची एकजूट, विश्वास अतिशय महत्त्वाचा होता. हा प्रवास तसा अवघड. मात्र जिद्द, इच्छाशक्ती आणि प्रचंड आत्मविश्वास असेल तर गावाचा कायापालट कशा प्रकारे होऊ शकतो हेच यावरून स्पष्ट होते. अशा प्रकारच्या पथदर्शी प्रकल्पाचा राज्याच्या विविध भागांत वापर केल्यास महाराष्ट्रातील असंख्य खेडी स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करू शकतील.

environment, elections, nations,
चारशे कोटी विसरभोळे?
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!