गेले दोन, तीन वष्रे दुष्काळाचे सावट होते. पाण्याचा प्रश्न हा अतिशय गंभीर होता. पिण्यासाठी पाणी नाही तर शेतीसाठी पाणी आणायचे कुठून, असा प्रश्न होता. तेव्हा टंचाईग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी उसाची शेती करू नये, असा सल्ला देणाऱ्यांची संख्या मोठी होती. ज्यांच्याकडे गुंठाभर जमीन नाही, ज्यांच्या पाच पिढय़ांत शेती कधी केली गेली नाही अशी मंडळीही शेती कशी करावी याचे सल्ले देऊ लागली.

अडचणीत सापडलेल्या कोणत्याही व्यक्तीस सल्ले देणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात असते. सल्ला देणाऱ्यांचा त्या विषयातील अभ्यास आहे की नाही याला फारसे महत्त्व नसते. अडचणीत सापडलेल्यांना सल्ला देणे आपला जन्मसिद्ध अधिकार आहे या पद्धतीने लोक सल्ले देतात. गेल्या काही वर्षांत राज्यातील शेतकरी शेतमालाच्या बाजारपेठेमुळे अतिशय अडचणीत सापडलेला असून शेतकऱ्यांनी कोणते उत्पादन घेतले पाहिजे? पीक पद्धतीत कोणता बदल केला पाहिजे? याचे सल्ले देणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होते आहे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?

गेले दोन, तीन वष्रे दुष्काळाचे सावट होते. पाण्याचा प्रश्न हा अतिशय गंभीर होता. पिण्यासाठी पाणी नाही तर शेतीसाठी पाणी आणायचे कुठून, असा प्रश्न होता. तेव्हा टंचाईग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी उसाची शेती करू नये, असा सल्ला देणाऱ्यांची संख्या मोठी होती. ज्यांच्याकडे गुंठाभर जमीन नाही, ज्यांच्या पाच पिढय़ांत शेती कधी केली गेली नाही अशी मंडळीही शेती कशी करावी याचे सल्ले देऊ लागली. ऊस हे पाणी अधिक घेणारे पीक असल्यामुळे उसाची शेती करणे कसे चुकीचे आहे हे सांगण्याची चढाओढ सुरू झाली. शेतकऱ्याला काहीच कसे कळत नाही व आपण कसे अभ्यासू आहोत हे सांगणाऱ्यांची संख्या वाढली.

दुर्बळांना कोणीच विचारत नाही असे म्हटले जाते. त्याची अनुभूती गेल्या काही वर्षांपासून शेतकरी घेत आहे. भक्तीमार्ग स्वीकारावा की कर्मयोग साधावा? अशा विवंचनेत असणाऱ्या एका वारकऱ्याने ‘सांगा मी काय करू? भक्ती करू या पोट भरू?’ असा सवाल विचारला होता. यात थोडासा बदल करून आज राज्यातील शेतकरी ‘सांगा मी ऊस घेऊ की सोयाबीन, कापूस, तूर, भाजीपाला, फळे?’ असा सवाल विचारतो आहे. शेतकऱ्यांनी अत्याधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे. माती परीक्षण केले पाहिजे, खताचा कमीत कमी वापर केला पाहिजे असे सल्ले देणारे शास्त्रज्ञ मोठय़ा प्रमाणावर आहेत मात्र उत्पादित केलेल्या मालाची किंमत काय मिळाली पाहिजे याबद्दल मात्र कोणी बोलत नाही.

गेल्या काही वर्षांपासून सातत्याने टोमॅटो, कांदा, लसूण, वांगे, काकडी, मिरची, कोबी, अशा भाज्या उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारपेठेचा फटका इतका जोराचा बसतो आहे की, त्याचा उत्पादनाचा खर्चही निघेनासा झाला आहे. शासनाने कडधान्याकडे शेतकऱ्याने वळावे, तेलबियाचे उत्पादन घ्यावे असा सल्ला दिला. त्यासाठी हमीभाव वाढवून देऊ अशी घोषणा केली त्यामुळे शेतकऱ्यानी मोठय़ा प्रमाणावर तेलबिया व कडधान्याचा पेरा केला. या वर्षी चांगला पाऊस झाला त्यातून उत्पादनही दरवर्षीपेक्षा मोठय़ा प्रमाणावर झाले, मात्र बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी भावाने माल विकावा लागत असल्यामुळे चांगले उत्पादन होऊनही शेतकरी संकटात सापडला आहे.

पीक पद्धतीत बदल करायचा म्हणजे नेमके काय करायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतो आहे. राज्यात ८० टक्के शेतकरी कोरडवाहू शेती करतो. ही शेती करताना पावसाच्या पाण्यावरच त्याला अवलंबून राहावे लागते त्यामुळे वर्षांतून काही ठिकाणी एक पीक तर काही ठिकाणी मुश्कीलीने दोन पिके घेता येतात. अवेळी पावसामुळे उत्पादनाचा भरवसा नाही व उत्पादन झाले तर भाव मिळेल याची खात्री नाही. ‘इकडे आड अन् तिकडे विहीर’ अशी अवस्था शेतकऱ्याची सातत्याने होत आहे. उसाला किमान चांगला भाव तरी मिळतो.

ठिबक सिंचनाचा वापर करून उत्पादन घेतले तर उत्पादन वाढते. गारपीट, रोगराई याच्या संकटातून इतर पिकांपेक्षा उसाचा बचाव करता येऊ शकतो त्यामुळे अन्य पिके परवडत नाहीत म्हणून काही शेतकऱ्यांनी उसाकडे वळायचे ठरवले तर दोष कोणाला देणार? शेतकरी संकटात आहे म्हणून पंतप्रधानांपासून ते गावच्या फुटकळ पुढाऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांची कणव असल्याची भाषा तोंडी वापरली जाते प्रत्यक्षात जेव्हा देण्याची पाळी येते तेव्हा मात्र हात आखडता घेतला जातो.

खुल्या बाजारपेठेत आपल्याकडच्या शेतकऱ्यांचे पाय बांधून तीन टांगी दौड करायला लावली जाते, तर जगभरात शेतकऱ्यांना स्पध्रेत उतरवण्यासाठी आवश्यक तो सर्व खुराक दिला जातो. म्हणूनच शेतकरी आज टाहो फोडतो आहे. ‘सांगा मी काय पेरू, कोणते उत्पादन घेऊ?’ शेतकऱ्यांची ही हाक ना सत्ताधाऱ्यांच्या, ना विरोधी पक्षाच्या कानापर्यंत पोहोचते आहे, कारण दोघांनीही आपल्या कानात बोळे घातले आहेत की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.

pradeepnanandkar@gmail.com