वर्षांनुवर्षे कोरडवाहू शेतीत बाजरी, सोयाबीन तर पाणी असलेल्या ठिकाणी भाजीपाला पिकवण्याची पारंपरिक पद्धत सुरू असताना सहा वर्षांपूर्वी अवघ्या सोळा शेतकऱ्यांनी गट स्थापन बावीस एकरमध्ये ‘तुती’ लागवडीचा प्रयोग केला. दरवर्षी साधारणत: तीस हजार रुपये उत्पन्न मिळणाऱ्या शेतकऱ्यांना तुती लागवडीच्या पहिल्याच प्रयत्नात तब्बल एकरी दीड लाख रुपये निव्वळ नफा मिळाला. दुसऱ्या वर्षी या पिकाकडे गावातील शेतकऱ्यांचा ओढा वाढल्याने सहा वर्षांत चनईतील सत्तर शेतकऱ्यांनी तब्बल प्रति एकर तीन लाख रुपये नफा मिळविण्याचा आर्थिक मार्गच पकडला. कृषी विभागाच्या ‘आत्मा’च्या सहकाऱ्याने धागा काढणी प्रकल्पही उभा केल्याने वाहतुकीचा खर्च वाचवून थेट गावात धागाच तयार झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीच्या धाग्यानेच जोडले आहे.

बीड जिल्ह्य़ातील चनई (ता. अंबाजोगाई) हे तीन हजार लोकसंख्येचे गाव. गावाचा शिवार साधारणपणे ८७१ हेक्टरचा बहुतांशी कोरडवाहू. केवळ ८० हेक्टपर्यंत बागायती. मुख्य पीक बाजरी, सोयाबीन तर ओलिताखाली भाजीपाला घेण्याची पारंपरिक पद्धत. परिणामी एका एकरमध्ये वर्षांकाठी जास्तीत जास्त तीस हजार रुपयांचे उत्पन्न निघत असल्याने शेती तोटय़ातील व्यवसाय म्हणूनच पण नाइलाजाने करतात. सहा वर्षांपूर्वी पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देऊन काही शेतकऱ्यांनी गटाची स्थापना करून ‘रेशीम कोश’ उत्पादित करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा गावातील अनेकांनी नव्या पिकाच्या उत्पादनाबाबत शंकाही उपस्थित करून ‘जुनं ते सोनं’चा धोशा बरा म्हणण्यातच धन्यता मानली. मात्र सोळा शेतकऱ्यांनी २२ एकरमध्ये पहिल्याच प्रयत्नात तुती लागवडीतून प्रति एकर जवळपास दीड लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला.  दुसऱ्या वर्षी जास्तीच्या क्षेत्रात लागवड करण्यावर भर दिल्याने तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात चांगला पसा आला व त्यांची आर्थिक प्रगती झाली. परिणामी गावातील इतर शेतकरीही या तुती लागवडीकडे वळले. पाच वर्षांनंतर ७० एकरवर तुतीची लागवड सुरू झाली आणि शेतकऱ्यांना एकरी स्वप्नवत वाटणारे जवळपास तीन लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळू लागले आहे. शेतकऱ्यांचा उत्साह लक्षात घेऊन रेशीम विभागाने चनईतच धागा काढणी प्रकल्प उभा केला. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाचून उत्पन्नात आगाऊ भर पडल्याने पारंपरिक पीक पद्धतीत बदल केल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात शेतकऱ्यांना नवा आर्थिक उन्नतीचा राजमार्गच सापडला. शासनाकडून कृषी विभागामार्फत आधुनिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढावा यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र पारंपरिक पीक पद्धत बदलण्यास शेतकरी तयार होत नाहीत. त्यात निसर्गाचे ऋतुचक्रही शेतकऱ्यांना साथ देत नसल्याने शेतीकडे कायम तोटय़ाचाच व्यवसाय म्हणून बघितले जाते. अशा परिस्थितीत चनईतील शेतकऱ्यांच्या सहा गटांनी कधी काळी एकरी २५ ते ३० हजार रुपये उत्पन्न मिळणाऱ्या शेतातच तुती लागवडीतून तब्बल तीन लाख रुपये निव्वळ नफा मिळवायला सुरुवात केली.  शेतकऱ्यांचा उत्साह पाहून २०१०-११ साली कृषी विस्तार कार्यक्रम (आत्मा) अंतर्गत शेतकऱ्यांना प्रक्षेत्र भेट, सहलीच्या माध्यमातून रेशीम कोष उत्पादन दाखवले. यातून प्रेरणा घेऊन सुरुवातीला १६ शेतकऱ्यांनी २२ एकरवर तुती लागवड करून प्रति एकर ८० किलो कोष उत्पादित केले. बंगळुरू येथील रामनगर बाजारात या कोषांना ३०० ते ४०० रुपये प्रति किलो भाव मिळाला.

परिणामी एकरी २४ ते ३२ हजार रुपये प्रति बॅच नफा हातात पडला. एका वर्षांत साधारणत: आठ बॅच घेतले जात असल्याने दीड ते दोन लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न मिळाले. या नफ्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह दुप्पटीने वाढला व रेशीम विकास गटाची स्थापना झाली. पारंपरिक पीक पद्धत बदलण्याची शेतकऱ्यांनी िहमत केली तर आधुनिक तंत्रज्ञान व नव्या पीक पद्धतीतून शेतकऱ्यांची आर्थिक क्रांती होऊ शकते हेच चनईत दिसून आल्याने इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांनीही प्रयत्न केला पाहिजे असे मत आत्माचे प्रकल्प संचालक भास्कर कोळेकर यांनी व्यक्त केले आहे.

आत्माकडून सर्वतोपरी सहकार्य

आत्माने गट बळकटीकरणासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले, आवश्यक साहित्य खरेदी व शेड उभारणी गटाच्या माध्यमातून केली. पुढे गटांची संख्या वाढली. आणि तीन वर्षांपूर्वी रेशीम विकास गट व जिल्हा रेशीम कार्यालयाने शेतकऱ्यांना रेशीम विषयाचे ज्ञान व कौशल्य दिले. त्यातून मागच्या वर्षी ३७ शेतकऱ्यांनी ४९ एकरावर तुतीची लागवड करून प्रति एकरी निव्वळ नफा ६४ हजारांपर्यंत वाढवला. त्यामुळे सध्या चनईत ७० शेतकऱ्यांनी गट स्थापन करून एकत्रितपणे तुती लागवड करत जास्तीचे उत्पन्न मिळवण्याची धडपड यशस्वी केली. तर कोषापासून धागा तयार करण्याचे यंत्र गावातच उभारले गेल्याने थेट धागाच बाजारात नेला जातो. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाचत असल्याने आता प्रत्येक गटाचे उत्पन्न पन्नास लाख रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. तर शेतकऱ्याला एका एकरमध्ये तीन लाखांपर्यंतचा नफा मिळू लागला आहे.

vasantmunde@yahoo.co.in