शहादा तालुक्यातील कवळीथ, सोनवद, टेंभरी, लोणखेडा, पुरुषोत्तमनगर, डोंगरगाव, कौठळ आदी गावे आणि परिसरातील पाण्याची पातळी काही वर्षांपासून कमालीची खालावली होती. सिंचनासाठी पाणीटंचाईचा परिणाम आपोआपच शेतीवर झाला. कोणीतरी या संकटातून बाहेर काढेल, या आशेत असतानाच महाराष्ट्र शासनाची जलयुक्त शिवार योजना त्यांच्या मदतीला आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र शासन जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत टंचाईपासून ग्रामीण भागाची कायमस्वरूपी सुटका होण्यासाठी प्रयत्न करीत असताना या प्रयत्नांना शेतकरी तसेच सामाजिक संस्थांची साथ मिळणेही आवश्यक आहे. केवळ शासकीय योजना म्हणून शासनाकडूनच सर्वकाही होईल, या भरवशावर राहिल्यास कामांना किती उशीर होतो, याचा अनुभव एरवीही येतच असतो. ‘गाव करील ते राव काय करील’ असे म्हटले जाते. कोणत्याही गावाने एकत्र येऊन एखाद्या योजनेसाठी हातभार लावण्याचे ठरविल्यास आणि हे प्रयत्न फलद्रूप होण्यासाठी एखादी संस्था पुढे आल्यास ती योजना नक्कीच यशस्वी होते याचे उदाहरण नंदुरबार जिल्ह्य़ातील शहादा तालुक्यात दिसून आले आहे.

शहादा तालुक्यातील कवळीथ, सोनवद, टेंभरी, लोणखेडा, पुरुषोत्तमनगर, डोंगरगाव, कौठळ आदी गावे आणि परिसरातील पाण्याची पातळी काही वर्षांपासून कमालीची खालावली होती. त्यामुळे विहिरी आटण्यासह अनेक कूपनलिकाही कोरडय़ा पडल्या होत्या. परिसराच्या समृद्धीलाच जणूकाही ग्रहण लागले होते. सिंचनासाठी पाणीटंचाईचा परिणाम आपोआपच शेतीवर झाला. अपेक्षेपेक्षा कमी उत्पन्न निघू लागल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले. कोणीतरी या संकटातून बाहेर काढेल, या आशेत असतानाच महाराष्ट्र शासनाची जलयुक्त शिवार योजना त्यांच्या मदतीला आली. जेएनपीटी व शहाद्यातील आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेनेही शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेतला. अर्थात, शेतकरी तर कोणत्याही कामासाठी तयारच होते. परिसरातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी काय करता येणे आवश्यक आहे याचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार सर्वाच्या संयुक्त प्रयत्नांनी कवळीथ वळण बंधाऱ्यातून निघणारे कालवे पुनरुज्जीवित केल्यास सिंचनाचा प्रश्न बऱ्याचअंशी सुटू शकेल हे लक्षात आल्यावर त्यादृष्टीने कामास सुरुवात करण्यात आली.

शासन, संस्था यांच्या खांद्याला खांदा लावून शेतकरीही मैदानात उतरल्याने २५ वर्षांत झाले नसेल असे परिसरात उत्कृष्ट दर्जाचे काम आकारास आले. कालव्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. त्यामुळे सुमारे दीड महिन्यापासून हे पुनरुज्जीवित कालवे पूर्ण क्षमतेने वाहत आहेत. या कामामुळे कवळीथ, सोनवद, टेंभरी, लोणखेडा, पुरुषोत्तमनगर, डोंगरगाव, कौठळ आदी गावे व परिसरातील शेतकऱ्यांसमोरील मोठी समस्या दूर झाली. कालव्यांमुळे पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाल्याने पाण्याअभावी कधीच मान टाकलेल्या कूपनलिका, विहिरींना पुन्हा पाणी आले. जणूकाही त्यांचेही पुनरुज्जीवन झाले. या कालव्यांमुळे सहा मोठे तलाव, १८ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पूर्ण क्षमतेने प्रथमच भरले गेल्याने शेतकऱ्यांचा आनंद ओसंडून वाहत आहे.

नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांसह इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी परिसरातील शेतकऱ्यांसोबत वरूळ-कानडी, वर्ढे-टेंभे, शिरुड येथील कालव्यांना भेट देऊन पाहणी केली. एखाद्या शासकीय योजनेस सर्वाची साथ मिळाल्यास परिसरात कसा बदल होऊ शकतो, याचे उदाहरण पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करून या कामात सहभागी असणाऱ्या सर्वाच्या प्रयत्नांना दाद दिली. शिरुड, वर्ढे-टेंभे येथील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने एक ते दीड किलोमीटपर्यंत कालव्यातील गाळ काढून त्यांच्या शेतापर्यंत पाणी नेले. त्यामुळे शिवारातील ५० ते ६० हेक्टर कपाशी, मका पिकांना जीवदान मिळाले. यामुळे जे पीक गेल्यात जमा म्हणून आशा सोडून देण्यात आली होती, त्याच पिकाकडून आता उत्पन्नाची आशा निर्माण झाली आहे. परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणून दीड महिन्यापासून कालव्याचे पाणी मिळत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. विकासाचा नवा अध्याय परिसरात लिहिला गेला.

या सर्व उपक्रमात पाटबंधारे विभागाचे पी. जी. पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आपल्या परिसरातील नाले, कालवे, बंधारे दुरुस्तीसाठी प्रस्ताव त्वरित सादर करावेत. जेणेकरून अशा योजनांमुळे आपल्या परिसरातील पाण्याची पातळी वाढेल, शेती सिंचनासाठी पाणी वाढेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी केले. अशा कामात सर्वानी पुढे यावे, श्रमदान, लोकसहभागातून कमी वेळेत, कमी खर्चात खूप मोठे कार्य घडू शकते याचे उदाहरण म्हणजे कवळीथ व सुसरी बंधाऱ्याचे पुनरुज्जीवित झालेले हे कालवे आपल्या समोरच असल्याचे त्यांनी सांगत सर्वाना यापुढेही अशा कामांसाठी पुढे येण्याची अपेक्षा व्यक्त केली.

शिरुड येथील माणक पाटील यांनी या वेळी या पुनरुज्जीवित कालव्यांचे महत्त्व आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मोठय़ा प्रमाणात पडलेला फरक स्पष्ट केला. आमच्या परिसरात बरेच गरीब शेतकरी आहेत, ज्यांच्याजवळ एक किंवा दोन एकर शेती आहे. जीवनाचा गाडा पुढे रेटण्यासाठी या शेतीतून थोडेफार तरी उत्पन्न हाती येणे आवश्यक असते. तसे न झाल्यास परिस्थिती बिकट होते. या भागातून ६५ वर्षांत प्रथमच कालव्याचे पाणी आल्याने आम्हा सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी उपलब्ध झाले. कूपनलिका पुन्हा साथ देऊ लागल्या. दोन पाझर तलाव भरले गेले. विहिरीला १० फुटांवर पाणी आल्यामुळे आम्ही खूप समाधानी आहोत, असे म्हणाले.

शहादा तालुक्यातील शेतकरी, आर्ट ऑफ लिव्हिंगसारख्या संस्थांनी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने विकासाचा घालून दिलेला आदर्श टंचाईच्या नावाने टाहो फोडणाऱ्या इतर अनेक गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विकासाची वाट धरावयाची असल्यास सर्वानी सहकार्याचा हात पुढे करण्याची गरज असते. केवळ काम होत नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा काम का होत नाही, काम होण्यासाठी कशाची आवश्यकता आहे याचा अभ्यास करून पुढे गेल्यास शेतकऱ्यांसमोर आत्महत्या करण्यापेक्षा जीवन जगण्याचे इतर अनेक पर्याय उभे राहू शकतात हे नक्की.

avinashpatil@expressindia.com

मराठीतील सर्व लोकशिवार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water scarcity irrigation project maharashtra government jalyukt shivar yojana
First published on: 23-09-2017 at 02:40 IST