देशातील जैवविविधतेने समृद्ध प्रांत म्हणून कोकण ओळखले जाते. एकीकडे सह्य़ाद्रीच्या डोंगररांगा आणि दुसऱ्या बाजूला अस्पर्शित सागर किनारे यांच्या बेचक्यात वसलेल्या या सुमारे ४५ किलोमीटरच्या चिंचोळ्या पट्टीत असंख्य प्रकारच्या वनस्पती आढळतात. आंबा, काजू, फणस, कोकम, जांभूळ यांसारखी अतिशय चवदार फळे हे येथील आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़; पण ही फळे सर्वसाधारणपणे फेब्रुवारी ते मे या एकाच हंगामात पिकत असल्याने आणि त्यांच्या विक्रीची तगडी यंत्रणा नसल्यामुळे वाया जाण्याचे प्रमाणही लक्षणीय. त्यातल्या त्यात आंब्यापासून पल्प तयार करण्याचा व्यवसाय इथे बऱ्यापैकी स्थिरावला आहे; पण इतर फळांबाबत तशी परिस्थिती नाही. काजूची बोंडे तर टनावारी फेकून दिली जातात. या फळांवर प्रक्रिया करून वाइन बनवण्याचा विचार वेळोवेळी व्यक्त होत आला आहे; पण त्यावर पुढे संशोधन करून व्यावसायिक उत्पादनापर्यंत मजल गेली नव्हती. मुंबईच्या रसायन तंत्र संस्थेतील (इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी) प्रा. डॉ. एस. एस. लेले आणि त्यांचे संशोधक विद्यार्थी चेतन आरेकर यांनी मात्र त्या दृष्टीने संशोधन करून चिपळूण तालुक्यातील शेखर निकम यांच्या मदतीने स्थापन करण्यात आलेल्या सावर्डे व्हॅली फाऊंडेशन या कंपनीसाठी तसा पथदर्शी उत्पादन प्रकल्प उभारला आहे आणि त्यातून या ठिकाणी जांभूळ व आंब्यापासून वाइननिर्मिती सुरू झाली आहे.

pemsatish.kamat@gmail.com