जागतिक पशुवैद्यक दिन नुकताच २९ एप्रिल रोजी झाला. पशुवैद्यकांच्या प्रति आदर आणि सद्भावना व्यक्त करण्याचा हा दिवस. निसर्गचक्रातील हालत्या, फिरत्या, चालत्या परंतु अबोल अशा सजीवांची अर्थात पशु-पक्षी-प्राणी यांची काळजी करणाराच नव्हे तर जीवनदान देणाऱ्या पशुवैद्यकासाठी मनोभावे कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.

एका बालरोगतज्ज्ञाची व पशुवैद्यकाची भूमिका सारखीच असते. एव्हाना पशुवैद्यकाची तुलनेने रोगनिदान समज एका बालरोगतज्ज्ञापेक्षा जास्त असावी. असे म्हटले जाते की, (Veterinarian is the only doctor who can understnad bleat of a goat to the pure of cat.) शेळीचे म्या-म्या ते मांजरीचे म्याव म्याव वरूनच एक पशुवैद्यक जनावराला असणाऱ्या वेदनेचे व आजाराचे निदान करू शकतो.

Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
Why is neem and jaggery consumed during Gudi Padwa 2024
गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळाचे सेवन का करतात? काय आहे कारण, तज्ज्ञांकडून जाणून घ्या….
Who was Ramses II
विश्लेषण: गेल्या अनेक वर्षांपासूनचे कोडे आता उलगडणार? कोण होता रामसेस दुसरा? का आहे जगाला त्याचे आकर्षण?
history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा

पृथ्वीतलावर विविध प्रकारचे पक्षी-प्राणी आहेत. काही जलचर, काही भूचर, काही उभयचर तर काही नभचर प्रकारातले आहेत. काही रवंथ करणारे तर काही रवंथ न करणारे. काही पाळीव तर काही रानटी, काही सस्तन तर काही असस्तन. प्रत्येक प्राण्याची वागण्याची सवय, खाणेपिणे वेगवेगळे, प्रत्येक प्राण्याची शरीररचना व शरीरक्रिया भिन्न. परंतु सर्वासाठी उपचार करणारा वैद्यक एकच. तो म्हणजे ‘पशुवैद्यक’. कमाल आहे पशुवैद्यकाची ज्याला अशा मुक्या प्राण्यांच्या आजाराचे निदान व उपचार करावे लागतात.

पशुवैद्यक शास्त्र हे तसे अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात असल्याचे पुरावे आपणास मिळतात. सन १७९९ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला आपल्या सैन्यातील घोडय़ांची काळजी घेण्याकरिता पशुवैद्यकाची गरज भासू लागली. त्या वेळी पशु शल्यचिकित्सकाची नेमणूक करण्याची कार्यपद्धती इंग्लंड व भारतात एकाच वेळी सुरू करण्यात आली होती. इतिहासात पांडव नकुल हा निष्णांत व प्रचंड अनुभवी असा पशुवैद्यक म्हणून प्रसिद्ध होता. घोडीच्या अंगावर मारलेल्या चाबकाच्या आवाजाच्या तरंग अथवा वारंवारतेवरून घोडी किती दिवसांची गाभण आहे इथपर्यंत पशुवैद्यक शास्त्राचे ज्ञान त्या वेळी नकुलला होते. सालीहोत्रला जगातील पहिला पशुवैद्यक म्हणून ओळखले जाते. त्याचेही अश्व परीक्षेचे ज्ञान अगाध होते. राजा अशोकाने प्राण्यांच्या सेवेसाठी पशुवैद्यक दवाखाने उभारल्याचे संदर्भ आहेत. भगवान कृष्णाने इ.स.पूर्व ९०० ते १००० या काळात पशुपालन व्यवसायाकडे विशेष लक्ष दिले. तेव्हापासून दिवाळी सणापूर्वी ‘वसुबारस’ हा सण साजरा करण्याची प्रथा रूढ झाली. १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात खेचरांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे लष्कराच्या अधिकृत पत्रकात म्हटले आहे. अर्थात या खेचरांची काळजी निगा व आरोग्य जपण्यासाठी पशुवैद्यकांनी अथक परिश्रम घेतले होते.

आजमितीस देशातील बहुतेक राज्यांमध्ये पशुवैद्यक शिक्षणाची स्वतंत्र विद्यापीठे निर्माण झाली आहेत. महाराष्ट्रातही ‘महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची’ स्थापना नागपूर येथे २००० मध्ये करण्यात आली. हे विद्यापीठ शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यात उत्तुंग कामगिरी बजावत आहे.

जागतिक पशुवैद्यक संघटनेने २००० पासून एप्रिल महिन्याचा शेवटचा शनिवार हा जागतिक पशुवैद्यक दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. प्राणी हा निसर्गचक्रातला महत्त्वाचा घटक आहे. जगामध्ये आज ६३.३५ टक्के लोक मांसाहार करतात. त्यामुळे प्राण्यांवर उपचार करणारा पशुवैद्यक हा केवळ प्राण्यांच्या उपचारापुरताच मर्यादित नसून त्याचा संबंध निसर्ग, वातावरण, लोकांचे आरोग्य, समाज, अन्नाची सुरक्षितता इ. गोष्टींशीही संबंधित आहे. म्हणूनच जागतिक पशुवैद्यक संघटनेने पशुवैद्यकांच्या ज्ञानात भर पडावी, महत्त्वाच्या विषयात चळवळ उभी राहावी या अनुषंगाने दरवर्षी या दिनाचे औचित्य साधून एक सर्वसमावेशक विषय ठरविण्याचे चालू केले. त्यानुसार २०१७च्या जागतिक पशुवैद्यक दिनाचा विषय आहे. प्रतिजैविकांचा विरोध- जागरूकतेपासून कृतीकडे.

वैद्यक विज्ञानाने माणसाच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणले. स्वप्नवत वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरू लागल्या. असाध्य रोगांवर औषधे निघाली. माणसाचे व प्राण्यांचे देखील आयुष्यमान वाढले. प्रतिजैविके हीसुद्धा आपणास विज्ञानाचीच भेट. इ.स. १९२८ च्या अलेक्झांडर फ्लेमिंग यांच्या पेनिसिलीनपासून याची सुरुवात झाली. आज वैद्यकशास्त्रात परवलीचा व महत्त्वाचा शब्द म्हणजे अँटिबायोटिक्स. अर्थात प्रतिजैविके. परंतु त्यांचा बेभान वापर व सहज उपलब्धता यामुळे आज ही दुधारी तलवार बनली आहे. अँटिमायक्रोबायल रेझिस्टन्स म्हणजे काय तर एखाद्या प्रतिजैविक औषधांचा अधिकचा वापर झाल्याने, त्याची एखाद्या सूक्ष्म जिवाला मारण्याची क्षमता ऱ्हास होणे होय. विषयही गंभीर असल्याने जागतिक पशुवैद्यक संघटनेने हा विषय चर्चेस घेण्याचे ठरवले. यालाच आधुनिक विज्ञानात ‘सुपरबग्स’ असेही म्हटले जाते. भारतासारख्या कृषिप्रधान व विकसनशील देशात या सुपरबग्सची भयानकता अधिक आहे. भारतामधून प्राण्यांचे मांस इतर देशांत निर्यात केले जाते. तसेच, दुधाचा महापूर संकल्पनेने दूध उत्पादनातही प्रचंड वाढ झालेली आहे. तथापि या अधिकच्या प्रतिजैविकांच्या वापरामुळे मांस निर्यातीवर परिणाम झालाच, शिवाय दूध पिणाऱ्या बालकांवर व माणसांवरही त्याचा परिणाम झाल्याचे संशोधनाने स्पष्ट केले आहे. परिणामी हा विषय केवळ माणसाशीच नव्हे तर प्राणी, परिसर, वातावरण, अन्न इत्यादींवरही परिणाम करत आहे.

अँटिमायक्रोबायल रेझिस्टन्सची ठळक व महत्त्वाची कारणे पुढीलप्रमाणे-

  • वारंवार एकच प्रतिजैवक एकाच जनावराला परिसरातील जनावरांना वापरणे.
  • प्रतिजैविकांच्या औषधांची अयोग्य मात्रा.
  • प्रतिजैविक औषधाचा कालावधी व शरीरात घेण्याचा अयोग्य मार्ग.
  • जनावरांमधील आजाराचे अचूक निदान न होणे, ज्यामुळे चुकीच्या पद्धतीने जनावरांवर उपचार होतात.
  • औषधी कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून क्वचितप्रसंगी दिली जाणारी आमिषे.
  • आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार न होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांचा अभाव.
  • सहज उपचारांसाठी प्रतिजैविकांचा वाढता वापर.

pankaj_hase@rediffmail.com

(लेखक स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला येथे कार्यरत आहेत.)