आम्ही एकदा श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी ताडोबाच्या अभयारण्यात सहलीला गेलो होतो. अर्थातच सगळ्या परिवारासहित. तर तिथे काय नयनमनोहर दृश्य बघायला मिळाले म्हणून सांगू.. सुंदर हिरवीगार वनराई, त्यात थुई-थुई नाचणारा मोर आभाळातील ढगाकडे बघून जणू डोळे मिचकावीत होता आणि आपल्याच तालात नाचत होता. रंगबिरंगी फुले तलावात डोलत होती. आम्हाला असं वाटत होतं की जणू ती आमच्या सोबत फिरायला यायचंय म्हणूनच आम्हाला खुणावत होती.
आकाशात तर सात रंगांची झालरच होती. आणि ती पृथ्वीच्या हिरव्यागार मंडपावर गालिचा पांघरून बसली होती. ते दृश्य बघून इतक्या कवितांच्या ओळी ओठांवर यायला लागल्या की काही सांगायलाच नको. मन झोपाळ्यावर िहदोळे घेऊ लागले. भिजल्या मातीच्या वासातून सुगंध अद्भुत येत होता. शतजन्मीचे माझे संचित धारांच्या ओजळीत घेऊन मी सुखावत होते. उन्हाळ्याच्या काहिलीचे वैराण वाटणारे ते दिवस अचानक क्षणार्धात मनोपटलांवर संगीत कोरून गेले. हळुवार एकतारीचे सूर मनात गुणगुणू लागले. हरणांचा थवा दिसला. त्यांच्यातील एकी बघून आपल्या जनमानसात असणारी हेव्यादाव्याची भावना किती तळच्या दर्जाची आहे हे जाणवू लागते. समोरून येणारे गार गार वारे कांतीला सुखावा देत होते. तेथील तो परिसर अवर्णनीयच होता. तेथील पर्वतरांगा, खळखळणारा नदीचा प्रवाह जणू आपल्या जीवनाचे संगीत गात आहे असे भासत होते.

श्रावण एक आठवण,
एक साठवण
सामूहिक नेणिवेतली
अनंत जन्मांची, अनंत काळाची
आजची, उद्याची
दु:खाची, आनंदाची, आनंदापलीकडची
अनंत अविनाशी श्रावण
आई वडिलांच्या तृषेने
व्यथित अंतकरणाने
अविरत रिमझिमत राहतो हृदयद्रावक
वा झरत राहतो.
वारकऱ्यांच्या डोळ्यांतून
विठाई बनून, झिरपत राहतो.
दाण्यादाण्यासाठी
घनश्याम धरतीतून
वारंवार अलगद निसटत राहतो.
सुरकुतलेल्या हातातून,
अन् एवढं होऊनही
श्रावण बांधून ठेवतो
एका अनोख्या नजरबंदीत
गुंतवून टाकतो अनंत काळ
अविरत रिमझिमणाऱ्या
अनाहत नादात.
रंजना वैद्य – response.lokprabha@expressindia.com