मेष

वर्षांच्या सुरुवातीला तुमच्या राशीचे ग्रहमान संमिश्र आहे. तुमच्या उत्साही स्वभावाला अनुसरून अनेक गोष्टी नवीन वर्षांत तुम्हाला कराव्याशा वाटतील. पण ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या माणसांची आणि वातावरणाची साथ मिळवण्यात बराच वेळ आणि शक्ती खर्च होईल. संपूर्ण वर्षभर ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ असा पवित्रा तुम्हाला ठेवावा लागेल. पंचमस्थानातील गुरू तुम्हाला चांगली साथ देईल.

व्यवसाय उद्योगाच्या दृष्टीने २०१५ सालात वातावरण एकंदरीत समाधानकारक राहील. जानेवारी-फेब्रुवारी महिना तुमचा उत्साह वाढविणारे आहेत. नवीन काम मिळाल्यामुळे तुम्हाला खूप काही तरी करावेसे वाटेल. मार्च महिन्यात सावधतेने पाऊल पुढे टाका. मोठय़ा कामाला सुरुवात करण्यापूर्वी स्वत:ची आíथक मर्यादा आणि बाजारातील परिस्थिती याचा सारासार विचार करा. एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीमध्ये काही कारणाने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्याला तोंड देण्यासाठी तुमचे हितचिंतक आणि पूर्वी केलेल्या गुंतवणुका उपयोगी पडतील. सप्टेंबर ते पुढील दिवाळीपर्यंत बऱ्याचशा गोष्टी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न कराल.

मार्च महिन्यापर्यंत नोकरदार व्यक्तींच्या हातून एखादी चांगली कामगिरी पार पडेल. जादा पगारवाढ किंवा बढती मिळावी असे त्यांना वाटेल, पण अपेक्षेपेक्षा काही तरी कमी मिळाल्यामुळे थोडीशी नाराजी राहील. बेकार व्यक्तींना डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये नोकरी मिळेल. चालू नोकरीमध्ये मार्चपासून सप्टेंबपर्यंतचा काळ खडतर आहे. या दरम्यान वरिष्ठांचे मूड बदलत राहतील.  बदली होण्याची शक्यता आहे. ऑगस्टपर्यंत परिस्थिती थोडीशी निवळेल.

गृहसौख्याच्या दृष्टीने नवीन वर्ष थोडेसे तणावात जाणारे आहे. एखादे महत्त्वाचे कार्य जर आधी ठरले असले तर ते शक्यतो डिसेंबर-जानेवारीपर्यंत उरकून घ्या. जानेवारी ते मार्च या दरम्यान एखाद्या नतिक जबाबदारीची जाणीव होईल. जून-जुलनंतर विचित्र प्रश्नाला सामोरे जावे लागेल. ज्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी आहेत त्यांनी २०१६ सालात काळजी घेणे आवश्यक आहे.

तरुणांना एक प्रकारचा तणाव जूननंतर जाणवेल. त्यांनी नोकरीमध्ये शक्यतो बदल करू नये.

कलाकार आणि खेळाडूंना काळानुसार त्यांचे धोरण बदलावे लागेल. महत्त्वाच्या आणि मोठय़ा व्यक्तींशी त्यांनी वादविवाद घालू नये.

वृषभ

नूतन वर्षांच्या सुरुवातीला गुरूसारखा शुभ ग्रह सुखस्थानात आहे. पण त्यामानाने इतर ग्रहांची फारशी साथ नसल्यामुळे थोडीशी कष्ट करण्याची तयारी ठेवा. जानेवारी-मार्च हा कालावधी महत्त्वाच्या कामांना गती देण्यासाठी चांगला आहे. त्यानंतर पुढचा कालावधी बराच खळबळजनक जाईल. अशा वेळी तुमचे चित्त स्थिर ठेवणे आवश्यक आहे.

व्यापार आणि उद्योगाच्या दृष्टीने वर्षांची सुरुवात थोडीशी शांत आणि सुस्त वाटेल. जानेवारीपासून एखाद्या नवीन उपक्रमाला सुरुवात करावीशी वाटेल. व्यापारामध्ये बाजारातील स्पर्धकांना मागे टाकण्यासाठी मार्चपूर्वी तुम्ही एखादे धाडस कराल. त्याचा परिणाम ऑगस्टच्या सुमारास कळेल. भागीदारी किंवा मत्री कराराच्या संबंधात काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या कार्यपद्धतीमध्ये बराच फरक पडेल. बराच काळ चालू असलेले एखादे काम संपल्यामुळे सप्टेंबरनंतर नवीन प्रोजेक्टला सुरुवात होईल. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.

नोकरदार व्यक्तींना जानेवारीपर्यंत स्वास्थ्यकारक कालावधी आहे. जानेवारीनंतर हळूहळू कामाचा वेग आणि व्याप दोन्ही वाढणार आहे. मार्चनंतर वरिष्ठ अचानक तुमच्या कार्यपद्धतीत बदल करतील. काही जणांची लांबच्या ठिकाणी बदली होईल. जुलपासून सप्टेंबपर्यंत ज्या घडामोडी घडतील त्यामुळे तुम्हाला ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ असा अनुभव येईल. सप्टेंबरपासून पुढे तुमच्या दृष्टीने अनुकूल घटना घडतील.

कौटुंबिक जीवनामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्यामुळे वर्ष सुरू कसे झाले आणि संपले कुठे याचा तुम्हाला पत्ता लागणार नाही. एकत्र कुटुंबपद्धती न ठेवता घरामधल्या काही जणांना स्वतंत्र बिऱ्हाड करावेसे वाटेल. घटस्फोटाच्या मार्गावर असणाऱ्यांना ‘एक घाव दोन तुकडे’ करून प्रश्न सोडवावासा वाटेल. नोव्हेंबर २०१५ ते फेब्रुवारी २०१६ आणि सप्टेंबर २०१६ ते नोव्हेंबर २०१६ हा कालावधी त्यातल्या त्यात शांततेत जाईल.

तरुणांना करियरमधल्या प्रगतीकरिता घरापासून लांब राहावे लागेल. जानेवारी ते मार्च किंवा सप्टेंबर २०१६ नंतर त्यांना बढतीचे योग संभवतात. येत्या वर्षांत वैवाहिक जीवनात पदार्पण होईल.

कलाकार आणि खेळाडूंना चांगले काम करता येईल. पण त्यांना त्यासाठी तीव्र स्पर्धाना तोंड द्यावे लागेल. काही विचित्र अनुभव येण्याची शक्यता आहे.

मिथुन

नवीन वर्षांत गुरू तृतीयस्थानात भ्रमण करणार आहे. रवी, बुध, शुक्र आणि मंगळ या चार ग्रहांची तुम्हाला चांगली साथ मिळणार आहे. आपल्या कामाला महत्त्व मिळून आपली आगळीवेगळी प्रतिमा निर्माण व्हावी यासाठी तुम्ही प्रयत्नशील असाल.

व्यापारउद्योगात वर्षांची सलामी उत्साहवर्धक राहील. दिवाळी २०१५ ते जानेवारी २०१६ या दरम्यान काही तरी अधिक आणि चांगले करण्याचा तुमचा हेतू असेल. जानेवारी ते मार्च या दरम्यान मोठय़ा व्यक्तींशी संपर्क होईल. येत्या वर्षांत स्पर्धकांचा विचार केल्याशिवाय कोणतेही नवीन बेत आखू नका, कारण स्पर्धा तीव्र होणार आहे. एप्रिल ते जुल या दरम्यान कामाचे प्रमाण वाढल्यामुळे उत्पन्नात भर पडेल. जुलच्या सुमारास स्पर्धकांमुळे एखादा विवित्र प्रश्न निर्माण होईल. त्यातून मार्ग काढायला सप्टेंबर महिना उजाडेल. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर त्यामानाने शांत जाईल. येत्या वर्षांत प्राप्ती वाढेल, पण वेगवेगळ्या कारणांमुळे तुम्हाला पसे अपुरे पडतील.

नोकरदार व्यक्तींना नवीन वर्षांची सुरुवात आव्हानात्मक वाटेल. त्यांच्या आवडीचे काम मिळाल्यामुळे जानेवारीपर्यंत कष्टाचे प्रमाण वाढेल, परंतु कामात आनंद असेल. जानेवारी ते मार्च या दरम्यान एखाद्या चांगल्या प्रोजेक्टकरिता त्यांची निवड होईल. या दरम्यान परदेशी जाता येईल. एप्रिलनंतर संस्थेत घडणाऱ्या घडामोडींकडे नीट लक्ष ठेवा. तुमचे साथीदार तुमची संधी हिरावून घेण्यासाठी काही तरी प्रयत्न करतील. जुल ते सप्टेंबर या दरम्यान तुमचे गुप्त शत्रू तुमच्याविरुद्ध काही तरी कारवाया करतील. अशा वेळी मन शांत ठेवून एकचित्ताने तुमचे काम करा. त्यानंतर पुढील दिवाळीपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येईल.

कौटुंबिक स्तरावरती दोन वेगवेगळे अनुभव तुम्हाला येतील. डिसेंबर-जानेवारीपर्यंत एखादी चांगली घटना किंवा सोहळा घरामध्ये पार पडल्याने वेळ गडबडीत, पण छान जाईल. तरुण मंडळींना नवीन घराचे बुकिंग पूर्वी केलेले असेल तर त्याचा ताबा जूनच्या सुमारास मिळेल, पण काही कारणाने तेथे राहायला जाणे सप्टेंबपर्यंत लांबेल. जुल ते सप्टेंबर या दरम्यान घरामधील काही जुने वादविवाद डोके वर काढतील. आरोग्यासंबंधी काही तक्रारी असतील तर त्यावर वेळेवर उपाय करा. ऑगस्ट-सप्टेंबरच्या सुमारास तुम्हाला एकाकीपण जाणवेल. त्यानंतर विस्कटलेली घडी पुन्हा बसवता येईल. एकंदरीत वर्ष संमिश्र आहे.

तरुण मंडळींना जूनपूर्वीचा कालावधी सर्वार्थाने प्रगतिकारक आहे. त्यांना गृहसौख्यात पदार्पण करावेसे वाटेल.

कलाकार आणि खेळाडूंना एप्रिल ते मेपर्यंतचा कालावधी चांगला आहे. त्यानंतर स्पर्धा तीव्र झाल्यामुळे एक प्रकारचा दबाव जाणवेल.

कर्क

संपूर्ण वर्षभर गुरू आणि शनी या दोन ग्रहांची चांगली साथ मिळत असल्यामुळे येत्या वर्षांत तुमचे इरादे बुलंद राहतील. तुमच्या उत्साही स्वभावाला भरपूर वाव मिळेल. घरगुती जबाबदाऱ्या, करियरमधील महत्त्वाचे आणि मोठे उद्दिष्ट गाठण्याची इच्छा बऱ्याच प्रमाणामध्ये सफल होईल.

व्यापार उद्योगात वर्षांची सुरुवात आनंदात होईल. एखादे फायदा मिळवून देणारे काम तुमच्या नजरेच्या टप्प्यात असल्यामुळे तुम्ही अविश्रांत मेहनत घ्याल. जानेवारी ते मार्च या कालावधीत एखादी पूर्वीची जबाबदारी हाताळावी लागेल. या कालावधीमध्ये जरी पसे मिळाले तरी खर्च वाढण्याचे संकेत मिळतील. जुल ते सप्टेंबर हा कालावधी डोकेदुखीचा ठरेल. मनामध्येच एक प्रकारची धास्ती असेल की, की पशाचे आणि इतर गणित जमून येईल की नाही. सप्टेंबरनंतर त्यावर तुम्ही चांगला तोडगा शोधून काढाल. येत्या वर्षांत जुनी कोर्टप्रकरणे शांततेने हाताळा.

नोकरदार व्यक्तींना येत्या वर्षांत नवीन आव्हाने स्वीकारण्याचा आनंद मिळेल. डिसेंबरपूर्वी महत्त्वाची जबाबदारी हातावेगळी केल्याचे समाधान लागेल. जे काम इतरांना अवघड वाटत होते ते काम वरिष्ठ जानेवारीच्या सुमारास तुमच्यावर सोपवतील. तुम्हीही त्यांच्या विश्वासाला पुरून उराल. मात्र शारीरिक श्रम आणि तणाव वाढेल. हे काम एप्रिलपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर ऑगस्टपर्यंत वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रयत्न करतील. हा कालावधी मानसिकदृष्टय़ा तणावाचा जाईल. सप्टेंबरपासून पुढे पुन्हा एकदा तुम्ही नवीन रामरगाडय़ामध्ये स्वत:ला हरवून बसाल. एकंदरीत नवीन वर्षांत पसे मिळतील, परंतु विश्रांती अशी मिळणार नाही. प्रमोशन नजरेच्या टप्प्यात येईल, पण त्याची कसर वरिष्ठ इतर सवलतींच्या रूपाने भरून काढतील.

गृहसौख्याच्या दृष्टीने नवीन वर्ष थोडेसे खडतर आहे. प्रत्येक बाबतीत इतरांच्या तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतील. त्याचे श्रेय देताना मात्र त्यांच्याकडून आढेवेढे घेतले जातील. पूर्वी ठरलेले घरगुती कार्य जानेवारीपर्यंत पार पडेल. त्यानंतर एप्रिलपर्यंत तुम्ही घरगुती जबाबदारीमध्ये जखडून जाल. त्याच वेळी प्रकृतीकडे लक्ष देणे भाग पडेल. एप्रिलनंतर हळूहळू एखाद्या वेगळ्या समस्येची जाणीव व्हायला सुरुवात होईल. मुलांच्या प्रश्नांकडे लक्ष देणे भाग पडेल. घरामधला एखादा सदस्य आणि त्याच्या समस्या यामुळे जुल ते सप्टेंबर या दरम्यान एक प्रकारची चिंता राहील. त्यानंतर हळूहळू वातावरण निवळू लागेल. येत्या वर्षांत महत्त्वाचे निर्णय शक्यतो जानेवारीपर्यंत घ्या.

तरुण मंडळींनी कठोर परिश्रमाला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. जे पसे त्यांना मिळतील त्याच्या बदल्यात मोठी जबाबदारी स्वीकारावी लागेल.

कलाकार आणि खेळाडूंनी कोणत्याही वादविवादात न पडता आपले काम करीत राहावे. त्यांना त्यांचे कौशल्य वाढवावे लागेल.

सिंह

नवीन वर्षांत भाग्यवर्धक गुरूची तुम्हाला वर्षभर उत्तम साथ मिळणार आहे, परंतु चतुर्थस्थानामधील शनी आणि बराच काळ तेथेच राहणारा मंगळ या दोन ग्रहांचे चतुर्थस्थानामधले वास्तव्य त्रासदायक ठरणारे आहे. तुम्हाला तुमचे करिअर आणि घर या दोन्ही आघाडय़ांवर सतर्क राहणे भाग पडेल, पण तुमची रास उत्साही असल्यामुळे ही जबाबदारी निभावून नेऊ शकाल.

व्यवसाय उद्योगात नवीन वर्षांच्या सुरुवातीला एखादा भव्य-दिव्य प्रोजेक्ट हाताळावासा वाटेल. त्यामध्ये तुम्ही नोव्हेंबरपासूनच लक्ष घालाल. आवश्यक ते भांडवल आणि इतर साधनसामुग्री याची जमवाजमव कराल. जानेवारी ते मार्च  दरम्यान तांत्रिक अडथळे आणि कामगारांचे प्रश्न हाताळावे लागतील. त्याकरिता पसे तयार ठेवा. एप्रिल ते जून या दरम्यान एखादे मोठे काम मार्गी लागेल. जुलपासून तुमचे उत्पन्न वाढल्यामुळे तुमच्यात एक नवीन ऊर्मी निर्माण होईल.  अतिमहत्त्वाकांक्षा आवरा. अनोळख्या व्यक्तींशी जपून व्यवहार करा. आíथकदृष्टय़ा नवीन वर्ष चांगले जाईल. तुमच्या क्षेत्रात एखादे मोठे पद भूषवता येईल.

नोकरदार व्यक्तींच्या नेतृत्वगुणांना भरपूर वाव देणारे नवीन वर्ष आहे. मोठय़ा कामगिरीकरिता वरिष्ठांनी तुमची निवड केल्याने वर्षांची सुरुवातच धावपळीत होईल. नोव्हेंबर ते जानेवारी या दरम्यान तुमच्या संस्थेचे प्रतिनिधित्व करण्याकरिता परदेशातसुद्धा जायला मिळेल. जानेवारी ते मार्च दरम्यान वरिष्ठ तुमच्यावर एखादे वेगळे काम सोपवतील. एप्रिलनंतर जूलैपर्यंत तुमचे ग्रह उच्चीचे आहेत. या दरम्यान तुमची एखादी खास मागणी वरिष्ठांकडून पूर्ण केली जाईल. पगारवाढ किंवा बढतीचे आश्वासन मिळाले असेल तर ते पूर्ण केले जाईल, पण काम खूप वाढेल. जुलनंतरचा कालावधी कष्टदायक पण श्रेयस्कर ठरेल.

कौटुंबिक आघाडीवर मात्र या वर्षांत तुम्हाला फारसे चांगले अनुभव येणार नाहीत. नोव्हेंबर ते जानेवारी या दरम्यान घरामध्ये एखादे शुभ कार्य पार पडेल. कुटुंबीयांसमवेत लांबचा प्रवास होण्याचे स्वप्न साकार होईल. जानेवारीपासून मार्चपर्यंत एखाद्या प्रश्नाची हळूहळू जाणीव व्हायला सुरुवात होईल. त्याकडे वेळीच लक्ष द्या. या दरम्यान जुने कौटुंबिक प्रश्न कोर्टव्यवहार आणि प्रॉपर्टीसंबंधी समस्यांना वेगळ्या ठिकाणी तोंड फुटेल. एकत्र कुटुंबपद्धतीत राहणाऱ्यांना वेगळ्या ठिकाणी जागा घ्यावीशी वाटेल. जुल ते सप्टेंबर डोकेदुखीचा काळ आहे. या दरम्यान नातेवाईकांशी ताटातूट होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरनंतर तुम्ही सुटकेचा नि:श्वास टाकू शकाल.

तरुण मंडळींना खूप काम करून स्वत:चे अस्तित्व सिद्ध करावेसे वाटेल.  सांसारिक जीवनात पदार्पण होईल. घरगुती कामांमुळे त्यांच्यावर काही मर्यादा येतील.

कलाकार आणि खेळाडू त्यांच्या क्षेत्रात प्रशंसनीय कामगिरी करतील. त्याचे श्रेय त्यांना आíथक आणि इतर बाबतीत मिळेल. व्यक्तिगत जीवनात मात्र थोडासा तणाव राहील.

कन्या

नवीन वर्षांत शनी आणि मंगळ यांच्यासारखे महत्त्वाचे ग्रह तुमच्या साथीला आहेत. इतर ग्रहसुद्धा तुमच्यावर प्रसन्न राहणार आहेत. त्यामुळे तुमच्या व्यवहारी स्वभावाला अनुसरून अनेक गोष्टी तुम्ही करू शकाल. त्याचा अभिमान तुमच्या वागण्या-बोलण्यातून दिसून येईल. मात्र जुलपर्यंत गुरूची साथ नसल्यामुळे प्रगतीमध्ये थोडेफार अडथळे असतील.

व्यापार उद्योगात नवीन वर्षांच्या सुरुवातीला तुमचे काम आणि उत्पन्न समाधानकारक असेल. तरीही जानेवारीपर्यंत तुमची अभिलाषा वाढतच राहील. जानेवारी ते मार्च या दरम्यान नवीन कार्यपद्धतीला सुरुवात होईल. त्यासाठी बरीच मोठी गुंतवणूक करावी लागेल. एप्रिलपासून पुढे तुमची घोडदौड चालू होईल. जूनपर्यंत एखादे मोठे काम पूर्ण केल्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसेल. जुल ते सप्टेंबर या दरम्यान नवीन करार करताना किंवा लांबचा प्रवास करताना जास्त धोका पत्करू नका. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी त्यातील संभाव्य धोक्यांचा अंदाज घ्या. सप्टेंबरपासून तुमच्या इच्छा-आकांक्षा सफल होतील.

नोकरदार व्यक्तींना नवीन वर्ष म्हणजे यशाची नवीन पर्वणी आहे. चांगले काम हातात असल्यामुळे भरपूर काम करण्याची इच्छा असेल. जानेवारीपर्यंत सतत दगदग आणि धावपळ असेल, पण केलेल्या कामाचा भरपूर आनंद मिळेल. जानेवारी ते मार्च या दरम्यान इतरांना न जमलेले आणि जिकिरीचे काम वरिष्ठ तुमच्या गळ्यात मारतील. त्याचा तुम्हाला अभिमान वाटेल, मात्र यश मिळविण्यासाठी प्रकृतीची साथ आवश्यक आहे हे लक्षात ठेवा. मे-जुल हा कालावधी तुम्हाला श्रेय देणारा ठरेल. काहींची एखाद्या प्रोजेक्टनिमित्त परदेशात जाण्याकरिता निवड होईल. जुल ते पुढील दिवाळी या दरम्यान खऱ्या अर्थाने तुम्हाला केलेल्या कामाचे चीज झाल्यासारखे वाटेल.

मनापासून इच्छा असूनही येत्या वर्षांत तुम्ही घराकरिता किती वेळ काढू शकाल याची शंका वाटते. दिवाळी ते जानेवारी या दरम्यान नवीन जागेचे बुकिंग, वाहन खरेदी किंवा इतर काही कार्यक्रमांमुळे तुम्हाला बरेच पसे लागतील.  जानेवारी ते मार्च हा कालावधी तुमची इच्छा-आकांक्षा वाढविणारा आहे. घरामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हावी यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहाल. एप्रिल ते जुल या कालावधीमध्ये एखादा कौटुंबिक सोहळा होईल. तुम्हाला लांबचा प्रवास करावासा वाटेल. जुलनंतर पुढील दिवाळीपर्यंत एखादी मोठी इच्छा-आकांक्षा साकार झाल्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसेल.

तरुणांना जुलनंतरचा कालावधी उत्तम आहे. त्या वेळी त्यांना पेरल्याशिवाय उगवत नाही याची आठवण येईल. तरुणांचे दोनाचे चार होतील.

कलाकार आणि खेळाडूंनी वर्षभर कष्टाची तयारी ठेवावी. त्याचे त्यांना निश्चित चांगले फळ मिळेल. पुढील दिवाळीपर्यंत व्यावसायिक स्थिरता लाभून वैवाहिक जीवनात पदार्पण करता येईल.

तूळ

साडेसातीच्या शेवटच्या अडीचकाची सुरुवात झाली आहे. या दरम्यान गुरूचे भ्रमण तुम्हाला संमिश्र आहे. मंगळही बराच काळ अनुकूल असणार आहे. थोडक्यात, करिअर आणि घर या दोन्ही आघाडय़ांवर तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय या वर्षांत घ्यावे लागतील. थोडक्यात येत्या वर्षांत तुम्हाला समाधान देणाऱ्या काही गोष्टी घडल्यामुळे तुमची तक्रार नसेल.

व्यापारी वर्गाला दिवाळी ते जानेवारी या कालावधीत मनाप्रमाणे काम झाल्यामुळे चार पसे हातात खुळखुळतील. महत्त्वाच्या कामाकरिता लांबचा प्रवास होईल. जानेवारीपासून एप्रिलपर्यंत काही मोठे सौदे होऊन आíथक दर्जा उंचावेल. एप्रिलपासून जुलपर्यंत कामाचा विस्तार करण्याकरिता नवीन गुंतवणूक करावी लागेल. जुलनंतर सप्टेंबपर्यंत तुमच्या मनातील एखादी स्वप्नमयी कल्पना अस्तित्वात येईल. येत्या वर्षांत ‘अति तेथे माती’ एवढेच फक्त लक्षात ठेवा. नवीन व्यावसायिक जागा किंवा भविष्यातील तरतूद करण्यासाठी तुम्ही जिवाचे रान कराल, पण त्यासाठी स्वत:चे स्वास्थ्य बिघडू देऊ नका.

नोकरदार व्यक्तींना बऱ्याच दिवसांनंतर एखादी चांगली संधी मिळाल्यामुळे भरपूर काम करावेसे वाटेल. दिवाळी ते जानेवारी या कालावधीमध्ये अवघड कामगिरी पूर्ण केल्याने वरिष्ठ खूश होतील. त्यांना एखादी विशेष सवलत मिळेल. जानेवारीपासून एप्रिलपर्यंत मोठय़ा प्रोजेक्टकरिता त्यांची निवड होईल. परदेशगमनाची संधीही मिळेल. एप्रिल ते जुल हा कालावधी बराच गडबडीचा जाईल. विशिष्ट कामगिरीच्या निमित्ताने काही काळापुरती बदली होण्याची शक्यता आहे. त्याव्यतिरिक्त संस्थेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. जुलनंतर वरिष्ठ नको असलेली जबाबदारी त्यांच्या गळ्यात मारतील. सप्टेंबर-पासून पुढील दिवाळीपर्यंत काम भरपूर पण मोबदला कमी अशी स्थिती असेल.

कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने नवीन वर्ष थोडे तणावाचे पण आनंदाचे जाईल. दिवाळीपासून जानेवारीपर्यंत काही कारणाने तुमच्या सभोवतालचे वातावरण बदलेल. पूर्वी ठरलेले शुभकार्य पार पडेल. जानेवारी ते एप्रिल यादरम्यान घरामध्ये घडणाऱ्या घडामोडींमुळे तुमची दैनंदिनी धावपळीची असेल. एप्रिल ते जुल यादरम्यान वडिलोपार्जति प्रॉपर्टी किंवा राहती जागा विकून नवीन घर घ्यावेसे वाटेल. जुल ते सप्टेंबरदरम्यान घरात महत्त्वाचे निर्णय  झाल्यामुळे तुमचे भावनाविश्व बदलेल. सप्टेंबरनंतर लांबच्या प्रवासाचे योग संभवतात.

तरुण मंडळींना येत्या वर्षांत भरपूर काम करून भरपूर पसे कमविण्याचा योग आहे. त्याचा त्यांनी चांगला फायदा उठवावा. स्वत:ची जागा आणि विवाह होणे या दोन्हींकरिता वर्ष अनुकूल आहे.

कलाकार आणि खेळाडू त्यांचे कौशल्य प्रदíशत करून एखाद्या पुरस्काराचे मानकरी होतील. चांगले काम झाल्यामुळे त्यांना प्रगतीचा नवीन उच्चांक गाठता येईल.

वृश्चिक

शनीसारखा कठोर ग्रह तुमच्या राशीत येऊन ठाण मांडून बसला आहे. या वर्षी मंगळही बराच काळ तुमच्या राशीतून भ्रमण करेल. या दोन्ही ग्रहांचे भ्रमण तुम्हाला फारसे चांगले नाही, पण भाग्यवर्धक गुरू तुम्हाला चांगली साथ देणार आहे. प्रयत्नांती परमेश्वर असा पवित्रा तुम्ही ठेवलात तर तुम्ही अडचणीतून सहीसलामत बाहेर पडू शकाल. कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढळू देऊ नका.

व्यापार-उद्योगाच्या दृष्टीने वर्षांची सुरुवात चांगली हाईल. डिसेंबपर्यंत एखादे महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असा इरादा असेल तर तो सफल होईल.  जानेवारी ते एप्रिल यादरम्यान एखादे मोठे प्रोजेक्ट हातात घ्यावेसे वाटेल. त्यासाठी वेळप्रसंगी मोठा धोका पत्करण्याचीही तुमची तयारी असेल. अशा वेळी हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. एप्रिल ते जुल यादरम्यान काही जुने प्रश्न अचानक डोक वर काढतील. जुल ते सप्टेंबर यादरम्यान तुमची सत्त्वपरीक्षा होणार आहे. महत्त्वाचे निर्णय अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्यानुसार घ्या. सप्टेंबरनंतर परिस्थिती हळूहळू आटोक्यात येईल.

नोकदार व्यक्तींनी येत्या वर्षांत कोणताही वेडावाकडा निर्णय घेऊ नये. जानेवारीपर्यंत कामाचा वेग उत्तम राहील. जानेवारीनंतर एप्रिलपर्यंत निरभ्र आकाशात अचानक ढग आल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होते तशी तुमची स्थिती असेल. नवीन ठिकाणी बदली, नव्या टेबलावर मिळणारे काम यामुळे तुमची दैनंदिनी बिनसण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जुल यादरम्यान नोकरीच्या ठिकाणी सत्तेपुढे शहाणपण नसते हे लक्षात ठेवून वागा. तुमच्या हातून झालेली चूक वरिष्ठांना आवडणार नाही. जुलनंतर आपण कुठे चुकलो हे लक्षात येईल. ऑगस्ट-सप्टेंबरनंतर वातावरण हळूहळू शांत होत जाईल.

कौटुंबिक स्तरावरती काही मजेशीर अनुभव देणारे वर्ष पुढे आहे. डिसेंबर ते जानेवारीपर्यंत तुम्ही मौजमजेच्या मूडमध्ये असाल. एखादी सुखद घटना घडल्यामुळे तुमची निराशा कमी होईल. जानेवारी ते एप्रिल यादरम्यान एखाद्या प्रश्नाची किंवा धोक्याची तुम्हाला जाणीव होईल. त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच ठोस उपाय योजा. घरामध्ये एकत्र कुटुंबातून बाहेर पडण्याचे निर्णय होण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जुल यादरम्यान ज्या घडामोडी घडतील त्यामुळे पूर्वी ठरलेले बेत बदलावे लागतील. जुलनंतर काही कठोर निर्णय घेऊन तुम्हाला परिस्थिती नियंत्रणात आणावी लागेल. त्यामुळे तुमची दैनंदिनी आणि जीवनपद्धती बदलण्याची शक्यता आहे. सप्टेंबरनंतर सुटकेचा नि:श्वास टाकाल.

तरुणांनी येत्या वर्षांत स्वप्नापेक्षा सत्य हे महत्त्वाचे असते हे लक्षात ठेवावे. नोकरी व्यवसायात अदबीने राहावे. विनाकारण बदल करू नये.

कलाकार आणि खेळाडूंनी यश मिळविण्याकरिता त्यांचे कौशल्य वाढवावे आणि त्यांच्या तत्त्वांशी तडजोड करण्याची तयारी ठेवावी.

धनू

नवीन वर्षांत राश्याधिपती गुरू भाग्यस्थानात आणि दशमस्थानात भ्रमण करेल. गुरूचे हे भ्रमण चांगले असल्यामुळे मनामध्ये एक प्रकारची उभारी राहील. व्ययस्थानातील शनी आणि तेथेच बराच काळ राहणारा मंगळ तुम्हाला त्रासदायक आहे. प्रत्येक गोष्ट मिळवताना ज्या हालअपेष्टा सहन कराव्या लागणार आहेत, त्यावरून ‘जया अंगी मोठेपण तया यातना कठीण’ याची तुम्हाला आठवण येईल.

व्यापार-उद्योगात डिसेंबपर्यंतचा कालावधी चांगला आहे. पसे मिळत राहिल्यामुळे तुमच्या इच्छा-आकांक्षा बळावतील. जानेवारी ते मार्च यादरम्यान ओळखींमुळे किंवा पूर्वी केलेल्या चांगल्या कामामुळे तुम्हाला नवीन काम मिळेल. जे काम तुम्ही पूर्ण केले आहे त्याची ताबडतोब वसुली करण्याचा प्रयत्न करा. मार्चनंतर साधी आणि सोपी वाटलेली कामे अवघड झाल्यामुळे तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रयत्न करावे लागतील. काही नवीन आणि अनपेक्षित खर्च उद्भवल्यामुळे तुमचे पशाचे गणित मागे-पुढे होण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जुल यादरम्यान नवीन कामाचा मोह न धरता जे आहे त्यावर समाधान माना. जुलनंतर पुढील दिवाळीपर्यंत मोठय़ा कष्टाने सर्व गोष्टी तुम्ही स्थिरस्थावर करू शकाल.

नोकरदार व्यक्तींना जानेवारीपर्यंतचा कालावधी संमिश्र आहे. कामाच्या वेळी काम आणि इतर वेळेला आराम करण्याची त्यांची मनोवृत्ती राहील. जानेवारी ते मार्च यादरम्यान एखादी विशेष सुविधा कंपनीतर्फे पुरविण्यात येईल. पण त्याच्या बदल्यात कष्टदायक कामाची नांदी केली जाईल. एप्रिल ते जुल या कालावधीत चांगले काम मिळेल. मात्र विश्रांती हा शब्दच नको. जुलनंतर वरिष्ठ एखादे आमिष दाखवून तुमच्याकडून जास्त काम करून घेतील. सप्टेंबरनंतर तुमचा तणाव कमी होईल.

कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने नवीन वर्षांचे वर्णन मानलं तर समाधान असे करता येईल. जानेवारीपर्यंत पूर्वी ठरलेला एखादा कार्यक्रम पार पडेल. कुटुंबीयांसह छोटी ट्रिप काढल्यामुळे तुम्ही ताजेतवाने व्हाल. एप्रिल ते जुल यादरम्यान एखादे जुने घरगुती प्रकरण अचानक उद्भवल्यामुळे तुमचे लक्ष विचलित होईल. मनातल्या गोष्टी मनात ठेवाव्या त्याचा राग इतरांवर काढू नका. जुने आजार असतील तर ते डोके वर काढतील. जुलनंतर तुम्ही उसने अवसान आणून काम कराल. एखादे लांबलेले शुभकार्य सप्टेंबर ते पुढील दिवाळीपर्यंत पार पडेल. येत्या वर्षांत नातेवाईक, शेजारीपाजारी यांच्याशी हितसंबंध बिघडू देऊ नका.

तरुणांना शॉर्टकट घेऊन चालणार नाही. करिअरमध्ये बेसावध राहू नये. विवाह आणि मोठी गुंतवणूक असे निर्णय शक्यतो सप्टेंबरनंतर घ्यावे.

कलाकार आणि खेळाडूंच्या कौशल्याची या वर्षी परीक्षा होणार आहे. त्यांनी स्पर्धकांना कमी लेखून चालणार नाही.

मकर

राश्याधिपती शनी वर्षभर लाभस्थानात भ्रमण करणार आहे. मंगळही बराच काळ याच स्थानामध्ये वक्रीमार्गी स्थितीत राहत असल्यामुळे तुम्हाला तो स्वस्थता लाभू देणार नाही. भरपूर काम करण्याची तुमची इच्छा असली तरी, जूनपर्यंत गुरू अष्टमस्थानात असल्याने परिस्थितीशी मुकाबला करत तुम्हाला तुमचे उद्दिष्ट साध्य करावे लागेल.

व्यापारी वर्गाला नवीन वर्ष जास्त कमाई करण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. जेवढे जास्त काम तेवढी जास्त कमाई असे समीकरण असेल. दिवाळी ते जानेवारीपर्यंत एखादे मोठे काम हातावेगळे होईल. त्यातून भविष्यामध्ये चांगले उत्पन्न होण्याचे संकेत मिळतील. एप्रिलपासून जुलपर्यंत एखादा मोठा धोका पत्करून बाजारपेठेत आपली प्रतिष्ठा वाढवाविशी वाटेल. देशात किंवा परदेशात एखादी शाखा उघडून कामाचा पसारा वाढविण्याची इच्छा असेल. जुलपासून सप्टेंबपर्यंत थोडासा तणावाचा काळ आहे. केलेल्या कामाचे पसे मिळण्यात अडथळे येतील. सप्टेंबरनंतर तुमचे मन शांत होईल.

नोकरदार व्यक्तींना नवीन वर्षांच्या सुरुवातीला वरिष्ठांकडून काही चांगले संकेत मिळतील. त्यामुळे त्यांना मूठभर मांस चढल्यासारखे वाटेल. जानेवारी ते एप्रिल या कालावधीमध्ये कामाची धावपळ इतकी वाढेल की तुम्हाला नियोजन करणे कठीण होऊन बसेल. तुमच्या कामाच्या स्वरूपात बदल केला जाईल. एप्रिल ते जुल हा कालावधी तुम्हाला मोहात टाकणारा आहे. केलेल्या कामातून जादा अधिकार आणि पसे मिळण्याची संधी मिळेल. जुल ते सप्टेंबर दरम्यान तुम्ही केलेल्या चांगल्या कामामुळे सहकाऱ्यांची असूया जाणवेल. छोटय़ा-मोठय़ा कामांकरिता परदेशात जाता येईल. सप्टेंबरनंतर सर्वाशी अदबीने वागा.

सांसारिक जीवनाच्या दृष्टीने वर्ष म्हणजे तारेवरची कसरत आहे. दैनंदिन कामाचा व्याप वाढल्यामुळे घरामध्ये म्हणावे तितके लक्ष देता येणार नाही. पूर्वी ठरविलेले काही महत्त्वाचे निर्णय डिसेंबपर्यंत कार्यान्वित केले जातील. लांबच्या प्रवासाचे योग संभवतात. जानेवारी ते एप्रिल या दरम्यान नवीन जागेचे बुकिंग होईल किंवा तेथे स्थलांतर केले जाईल. या दरम्यान जुनी प्रॉपर्टी विकायचे ठरेल. एप्रिल ते जुल हा कालावधी आíथकदृष्टय़ा लाभदायक आहे. मुलांच्या गरजांकरिता पशाची तरतूद झाल्याने बरे वाटेल. जुल ते सप्टेंबपर्यंत घरामधले जुने प्रश्न नव्याने डोके वर काढतील. त्यामध्ये सर्वाचे एकमत होऊन निर्णय होणे कठीण आहे. घरामध्ये शुभकार्य ठरेल. माहोल आनंदी असेल.

तरुण मंडळींना वर्ष प्रगतीच्या दृष्टीने उत्तम आहे. मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा त्यांनी चांगला उपयोग करून घ्यावा. नोकरी किंवा व्यवसायात स्थिरता आल्यामुळे सांसारिक जीवनात पदार्पण करावेसे वाटेल.

कलाकार आणि खेळाडूंच्या गुणांना भरपूर वाव मिळेल. त्यांना केलेल्या कामाचे पशाच्या किंवा इतर स्वरूपात चांगले फळ मिळेल.

कुंभ

नवीन वर्षांच्या सुरुवातीला गुरू आणि शनी हे दोन्ही महत्त्वाचे आणि मोठे ग्रह तुमच्यावर प्रसन्न आहेत. गेल्या एक-दोन वर्षांमध्ये ज्या इच्छा-आकांक्षा तुमच्या मनामध्ये होत्या त्या पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारे वातावरण लाभेल. नवीन आणि भरपूर काम करण्याची तुमची इच्छा असेल. या सगळ्याला अनुसरून आवश्यक असणारे प्रयत्न फळाला येतील.

व्यापारी वर्गाला आपण काहीतरी इतरांपेक्षा वेगळे आहोत हे दाखविण्याची इच्छा असेल. नवीन वर्षांच्या सुरुवातीला मोठे धाडस आणि गुंतवणूक करून प्रतिष्ठा वाढविणारा एखादा प्रोजेक्ट हाती घ्यावासा वाटेल. जानेवारी ते मार्च या दरम्यान प्रत्यक्ष कामाला वेग येईल. एप्रिल ते जुल या दरम्यान अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडतील. बाजारपेठेतील चढ-उतार आणि गिऱ्हाईकांची गरज याचा विचार करून कदाचित तुम्ही आधी ठरविलेली कामाची पद्धत बदलाल. या दरम्यान ‘अति तेथे माती’ एवढेच लक्षात ठेवा. जुलनंतर सप्टेंबपर्यंत काही महत्त्वाचे बदल संभवतात. त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्या मनात नवीन विचारांना कोंब फुटेल. सप्टेंबरनंतर लाभदायक कालावधी आहे.

नोकरदार व्यक्तींना नवीन वर्षांत त्यांचे कौशल्य पणास लावून येणाऱ्या संधीचा चांगला फायदा उठविता येईल. जेवढे जास्त काम तेवढी जास्त कमाई असे समीकरण असेल. दिवाळी ते जानेवारी या दरम्यान एखादी आवडती कामगिरी त्यांच्यावर येऊन पडेल. जानेवारी ते एप्रिल या दरम्यान तुमच्या मागणीपायी किंवा संस्थेच्या गरजेपोटी बदली किंवा कामाच्या स्वरूपात फेरफार केला जाईल. हे काम आव्हानात्मक असेल. जुल ते सप्टेंबर या कालावधीत सभोवतालचे वातावरण बदलल्यामुळे तुम्ही थोडेसे गोंधळात दिसाल. सप्टेंबरनंतर पुन्हा एकदा सर्व गोष्टी रुळावर आल्यासारख्या वाटतील.

कौटुंबिक जीवनात नवीन वर्षांच्या सुरुवातीला आनंददायी माहोल असेल. डिसेंबपर्यंत पूर्वी ठरलेला एखादा कार्यक्रम पार पडेल. जानेवारी ते एप्रिल या दरम्यान ज्या घडामोडी घडतील त्याचा थोडासा तणाव असेल. पण त्यातूनच तुम्हाला आनंद मिळेल. आवडत्या व्यक्तीची साथ मिळाल्याने तुम्ही खूश असाल. एप्रिल ते जुल या कालावधीमध्ये असे निर्णय होतील, ज्यामुळे तुमचे जीवनमान आणि दैनंदिनी बदलण्याची शक्यता आहे. नवीन ठिकाणी राहावयास जायचा योग येईल. जुलनंतर आणि सप्टेंबरपूर्वी आधी ठरलेल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी होईल. त्यामुळे तुम्हाला तडजोड करावी लागेल. सप्टेंबरनंतर पुन्हा एकदा एखाद्या वेगळ्या गोष्टींचा अनुभव घ्याल.

तरुण मंडळींना जुल २०१६ पर्यंत उत्तम कालावधी आहे. नवीन व्यक्तीचा सहवास लाभेल. नोकरी आणि सांसारिक जीवनात मोठे बदल होतील.

कलाकार आणि खेळाडूंना मान-सन्मान आणि प्रसिद्धीचे योग आहेत. त्यांनी आलेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी त्यांचे धोरण लवचीक ठेवावे.

मीन

नवीन वर्षांच्या सुरुवातीला राश्याधिपती गुरू जरी अनुकूल नसला तरी शनी आणि मंगळ या ग्रहांचे भ्रमण तुम्हाला अनुकूल आहे. त्या जोरावर बऱ्याच गोष्टी साध्य करायच्या आहेत. ‘प्रयत्नांती परमेश्वर’ या म्हणीनुसार तुम्हाला पुढे जावे लागेल. जुलनंतर पुढील दिवाळीपर्यंत तुमच्या अनेक मनोकामना पूर्ण होतील. त्यामुळे तुम्ही सुटकेचा निश्वास टाकाल.

व्यापारउद्योगात पेरल्याशिवाय उगवत नाही याची आठवण ठेवा. कंटाळा न करता तुमचे काम करत राहा. दिवाळी ते डिसेंबपर्यंत थोडासा कष्टदायी काळ आहे. केलेल्या कामाचे पसे वेळेत न मिळाल्याने थोडय़ा काळासाठी कर्ज काढावे लागेल. जानेवारीपासून एप्रिलपर्यंत तुमच्या मनामधल्या कल्पना हळूहळू आकार घेऊ लागतील. तुमचा आत्मविश्वास हळूहळू वाढायला लागेल. एप्रिल ते जुल या दरम्यान महत्त्वाची कामे वेग घेऊ लागतील. आपल्याला पुढे काहीतरी मिळणार या आशेने तुम्ही भरपूर काम कराल. नवीन भागीदारी किंवा मत्रीकरार प्रस्ताव पुढे यतील. जुलपासून पुढील दिवाळीपर्यंत केलेल्या कामाची पावती मिळेल. अपेक्षित पसे, नावलौकिक आणि नवीन काम मिळाल्याने तुम्ही हुरळून जाल.

नोकरदार व्यक्तींना येत्या वर्षांत सफलता मिळवण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागेल. दिवाळीपासून डिसेंबपर्यंत एखादे किचकट आणि कष्टदायक काम उपसावे लागेल. तुमच्या अडचणींकडे वरिष्ठ कानाडोळा करतील. जानेवारी ते एप्रिल या दरम्यान एखादे महत्त्वाचे प्रोजेक्ट तुम्हाला हाताळावे लागेल. एप्रिल ते जुल या दरम्यान मोठे उद्दिष्ट गाठण्यासाठी तुम्ही अहोरात्र मेहनत कराल. जुलनंतर तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक वरिष्ठांकडून ऐकायला मिळेल. पगारवाढ किंवा विशेष सवलतींकरिता तुमची निवड होईल. सप्टेंबरनंतर परदेशगमनाची संधी उपलब्ध होईल. नवीन नोकरीही मिळू शकेल.

वर्षांच्या सुरुवातीला तुमच्या मनात थोडीशी चिंता असेल. आपल्या प्रिय व्यक्तींना सर्व काही देण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. डिसेंबर-जानेवारीमध्ये स्वत:ची तब्येत सांभाळा. जानेवारी ते एप्रिल या दरम्यान मुलांच्या प्रगतीकडे तुम्हाला विशेष लक्ष पुरवावे लागेल. घरामधल्या व्यक्तींच्या तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतील. एप्रिल ते जुल या दरम्यान तुम्ही तुमचे हक्क मिळविण्याकरिता बंडखोर बनाल. जुल ते सप्टेंबर या दरम्यान अर्धवट राहिलेली अनेक कामे मार्गी लागतील. नवीन जागेचे बुकिंग करावेसे वाटेल. सप्टेंबरनंतर तुम्ही जिवाची मुंबई कराल.

तरुणांना नवीन वर्षांत कष्टाशिवाय काही मिळत नाही, याची जाणीव होईल. जुलनंतर करियरमध्ये स्थिरता लाभून पुढील दिवाळीपर्यंत विवाह निश्चित होईल.

कलाकार आणि खेळाडूंना आळस करून चालणार नाही. त्यांच्या क्षेत्रामधल्या असूयांचा त्यांना अनुभव येईल. त्यातूनच प्रगतीचे द्वार खुले होईल. जुलनंतर त्यांना प्रसिद्धी आणि मान-सन्मानाचे योग आहेत.

विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com