दरदिवशी आपण २.५ जलधी बाइट्स (एकावर १८ शून्य = एक जलधी) एवढा डेटा माहिती जगभरात निर्माण करतो. ही माहिती निर्माण करण्याचा आपला वेग एवढा जबरदस्त आहे की, सध्या जगभरात असलेला ९० टक्के डेटा हा माणसाने केवळ गेल्या दोन वर्षांमध्ये निर्माण केलेला आहे.

मुंबईहून वाशीला जाण्यासाठी सोपा मार्ग म्हणून आपण ऐरोली पुलावरून जाण्याचा निर्णय घेतो. मार्गक्रमण सुरूही होते आणि वातानुकूलित बसमध्ये असतानाच मोबाइलवर मेसेज येतो. ‘नवी मुंबईत जाण्यासाठी आता आमची टॅक्सी बुक करा, कमीत कमी खर्चात, आलिशान प्रवास!’

पवईला हिरानंदानीच्या बाजूने जाताना अचानक मोबाइलवर मेसेज येतो, ‘पाच मिनिटांवर विशिष्ट ब्रॅण्डच्या फास्टफूड सेंटरमध्ये अमुक इतकी सूट.’ तिथून थोडे पुढे गेल्यावर एका विख्यात ब्रॅण्डेड शूज कंपनीचा मेसेज येतो.. ‘वर्षभरापूर्वी खरेदी केली होतीत; त्यापेक्षा अधिक शूजचे वैविध्य आणि अधिक सूट.. पाच मिनिटांच्याच अंतरावर तुमच्या प्रतीक्षेत.’

नवीन घर शोधण्याचे काम सुरू असते आणि ई-मेल सुरू केल्यानंतर ई-मेलशेजारीच घरांच्या जाहिराती दिसू लागतात.. फेसबुक सुरू केल्यानंतरही घरांच्याच जाहिराती आणि इन्स्टाग्रामवरही तेच.

त्यांना कसं कळतं की, आपण घराच्या शोधात आहोत?

निष्ठावान ग्राहक म्हणून आपल्याला एक कार्ड ऑफर केलं जातं. आपण निष्ठावान आहोत हे त्यांना कसं कळलं, असं विचारताच ते आपल्याला गेल्या दोन वर्षांतील आपल्या सर्वत्र केलेल्या खरेदीची जंत्रीच सांगतात. त्यात त्यांच्याचकडे नेहमी अधिक खरेदी होते, तेही स्पष्ट करतात.

हे सारं या कंपन्यांना कळतं कसं?

ही सारी बिग डी अर्थात बिग डेटाची कमाल आहे.

बिग डेटा म्हणजे नेमके काय?

आपण वापरत असलेली सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे अर्थात मोबाइल, टॅब्लेट, कॅमेरा, मायक्रोफोन्स, आरएफआयडी टॅग्ज (जे अनेकदा आपल्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डामध्ये असतात), संगणक, वाय-फाय, ई-मेल, गाडय़ांमध्ये असलेले सेन्सर्स आदी सर्व उपकरणांच्या वापरामधून माहितीचे एक महाजंबाल तयार होते. आपण वापरत असलेली विविध अ‍ॅप्स, विविध सेवा किंवा उपकरणे आपल्या नकळत आपल्या सवयींची माहिती त्या सेवा पुरविणाऱ्या किंवा उत्पादन निर्माण करणाऱ्या कंपनीकडे पाठवत असतात. आपल्याला ‘अधिक चांगली सेवा पुरविण्यासाठी’ ही माहिती घेतली जात आहे, असे सांगितले जाते खरे, पण ते अर्धसत्य असते.

कारण याच आपल्या सवयींचा, वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांचा डेटाबेस या कंपन्यांतर्फे विश्लेषणासाठी वापरला जातो आणि त्यातून त्यांना अधिक आर्थिक फायदा होईल अशी उत्पादने विकसित केली जातात, त्यात ग्राहकांचा फायदाही असतो. पण प्राथमिकता असते ती त्यांच्या व्यावसायिक किंवा आर्थिक यशस्वितेला. त्यासाठी एका वेगळ्या अर्थाने कळत-नकळत आपल्यावर या कंपन्यांची नजर असते. हा डेटाबेस एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीला विकलाही जातो, चांगल्या किमतीला. त्यासाठी अनेक कंपन्यांची चांगले पैसे मोजण्याची तयारी असते. कारण फार कष्ट न घेता किंवा तुलनेने कमी खर्चात डेटाबेस उपलब्ध होतो. डेटाबेस असतो आपला म्हणजेच ग्राहकांचा आणि पैसे मिळतात ते या कंपन्यांना, प्रामुख्याने फायदाही त्यांचाच. त्यासाठी त्या डेटाबेसची साठवणूक, त्यावर केली जाणारी प्रक्रिया यावर या कंपन्या मोठी गुंतवणूकही करतात. पण या ‘बिग डेटा’चा वापर कोण, कसा आणि कशासाठी करेल, याची खात्री नसते. मग त्यातून येणाऱ्या माहितीचा गैरवापर झाला तर?

अगदी अलीकडे मुंबईनजीक मीरारोड येथे गैरपद्धतीने चाललेल्या कॉल सेंटरवर छापा घालून पोलिसांनी एक आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त केले. कॉल सेंटरमधील मंडळींनी अमेरिकेतील कर बुडवणाऱ्या नागरिकांचा डेटाबेस चोरून त्याद्वारे गैरमार्गाने अब्जावधींची लूट केली. झाल्या प्रकाराला जबाबदार कोण?

बिग डेटा म्हणजे किती मोठा?

दरदिवशी आपण २.५ जलधी बाइट्स (एकावर १८ शून्य = एक जलधी) एवढा डेटा माहिती जगभरात निर्माण करतो. ही माहिती निर्माण करण्याचा आपला वेग एवढा जबरदस्त आहे की, सध्या जगभरात असलेला ९० टक्के डेटा हा माणसाने केवळ गेल्या दोन वर्षांमध्ये निर्माण केलेला आहे.  बिग डेटा विस्ताराने सांगण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आणखी एक बिग डेटा निर्माण करणेच होय, असेही वैज्ञानिक म्हणतात. २००१ सालापासून बिग डेटा या विषयावर सातत्याने लिहिले गेले आहे, तज्ज्ञांचे लेखही प्रसिद्ध होत आहेत. तरीही आजवर एकच एक सर्वसमावेशक अशी बिग डेटाची व्याख्या नेमकेपणे करता आलेली नाही.

आजवर झालेल्या व्याख्यांच्या आधारे नव्याने याची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. ‘‘एकात्मिक माहितीचा असा साठा की ज्यामध्ये जगभरातील वैविध्यपूर्ण माहिती प्रचंड मोठय़ा प्रमाणावर एकवटली जाते. आणि तिच्या विश्लेषणामधून जग नव्याने समजून घेता येते. शिवाय पारंपरिक पद्धतींचा वापर करून ज्याची प्रोसेस किंवा विश्लेषण करता येत नाही आणि तो पारंपरिक मर्यादेबाहेर असतो असा डेटाबेस म्हणजे बिगडेटा होय’’

माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रसिद्ध विश्लेषक डग लॅनी याने २००१ साली या संदर्भातील शोधनिबंधामध्ये बिगडेटाच्या समस्या सांगण्यासाठी तीन संकल्पनांचा वापर केला. मात्र कालांतराने या तीन संकल्पनांनाच बिगडेटाचे निकष म्हणून जगभर स्वीकारले गेले.

१) आकारमान :  आकारमानाच्या बाबतीत तो अतिप्रचंड किंवा महाजंबाल असतो. त्याचे आकारमान सांगण्यासाठी एरवी कधीही फारशा आपल्या वापरात नसलेल्या संकल्पना उदाहरणार्थ जलधी (एकावर १८ शून्ये) आदी वापराव्या लागतात. अन्यथा त्याचे आकारमान सांगताच येणार नाही.

२) वेग किंवा आवेग :  बिग डेटाला प्रचंड वेग असतो आणि तेवढय़ाच प्रचंड वेगाने तो अखंड वाढत जातो.

३) वैविध्य : त्याच्या महाप्रचंडतेमध्ये वैविध्य ठासून भरलेले असते.

कालांतराने अनेकांनी या विषयावर काम करण्यास सुरुवात केली आणि त्यात चौथ्या निकषाचीही भर पडली-

४) नेमकेपणा किंवा सत्यता : ही संख्येमध्ये मोजता येते. उदाहरणार्थ नेमकी टक्केवारी आदी.

असंख्य व्यक्तींच्या वैयक्तिक वापरातून तयार झालेला असा हा महाडेटा आहे. माणसांची संख्याही प्रचंड असल्याने त्याचे आकारमान वाढत जाते आणि त्यावर प्रक्रिया करण्यास सुरुवात होते तेव्हा त्याच्या वर्गीकरणानुसारही त्यामध्ये अनेक पटींनी वाढ होत जाते. वैयक्तिक वापरानंतर समूहाचा वापर, विशिष्ट भौगोलिक प्रदेशातील लोकांचा वापर, विशिष्ट देशातील किंवा खंडांतील लोकांनी केलेला वापर या सर्व पातळ्यांवर आडव्या प्रतलात तर त्यांनी केलेल्या वापराच्या वैविध्यपूर्ण विषयांनुसार उभ्या सरळ रेषेत त्याचे मोजमाप केले जाते. या अशा उभ्या आणि आडव्या वर्गीकरण पद्धतीनुसार त्याची व्याप्ती आणि आकारमान सर्व बाजूंनी वाढत जाते. आधी केवळ एक विशिष्ट जागाच व्यापणारा तो डेटा नंतर सर्व बाजूंनी वाढू लागतो. त्याच वेळेस त्यामध्ये हळूहळू नेमकेपणाही येऊ  लागतो. सध्या ओरॅकल, मायक्रोसॉफ्ट, आयबीएम, सॅप, गुगल, फेसबुक, अ‍ॅटॉस आदी अनेक बडय़ा कंपन्या यांमध्ये उतरल्या आहेत.

या बिगडेटावरील प्रक्रियादेखील एकदम वेगळ्या पद्धतीने केली जाते. आजवरच्या संशोधनामध्ये वैज्ञानिकांना असे लक्षात आले आहे की, खूप मोठय़ा प्रमाणावर माहितीचे विश्लेषण करायचे असेल तर त्यासाठी दृश्यरचना अतिशय उपयुक्त ठरू शकते. त्यासाठी त्यांनी विविध रंगछटांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आणि रंगछटांच्या वापरासंदर्भातील जगभरातील सर्व प्रयोगांना यश आले. आता मोठय़ा माहितीच्या वर्गीकरणासाठी कलरकोड वापरले जातात. रंगछटांमुळे माहितीचे वेगळेपण लगेचच नजरेत भरते व विश्लेषण अधिक सोपे होते. मानवी डोळ्यांसाठी उपयुक्त असलेला हा कलरकोडचा वापर संगणकाच्या बाबतीत तर अधिक वेगात काम करतो. बिगडेटा ‘बिग’ असल्याने त्याच्या विश्लेषणाला वेळ लागला तर त्याची उपयुक्तता कमी होते. उदाहरणार्थ लंडनच्या रस्त्यावरचा ट्रॅफिक वाढला आणि पुढच्याच क्षणाला त्याचे विश्लेषण उपलब्ध झाले तरच सॉफ्टवेअर व बिगडेटाच्याच मदतीने त्याचे नियोजन लगेचच करता येते. त्यासाठी काही मिनिटांचा अवधी जावून चालणारे नसते. अनेक ठिकाणी बिगडेटाचा वापर लगेचच पुढच्या काही क्षणांमध्ये होणार असतो. अशावेळेस हे कलर कोिडग सर्वाधिक उपयुक्त ठरते.

अशा प्रकारचा बिगडेटा निर्माण होण्याची सर्वाधिक शक्यता सरकारी पातळीवर असते. आठवून पाहा, आधार कार्डचा अर्ज भरताना या माहितीचा वापर करण्यास हरकत आहे अथवा नाही, असाही एक रकाना त्यामध्ये समाविष्ट होता. किंबहुना आता तो अशा प्रकारे सर्वच अर्जामध्ये भविष्यात असणार आहे. या माहितीचा वापर करून व्यावसायिक कंपन्या ग्राहकांच्या सवयी जाणून घेतात आणि त्यांच्या गरजेनुसार नवीन उत्पादने विकसित करतात.  मुळातच ग्राहकांची आवड, गरज किंवा सवय त्यात गृहीत धरलेली असल्याने उत्पादन खपते आणि मग पुन्हा तुमच्या सवयींची माहिती घेऊन त्यानुसार नवे उत्पादन असे चक्र सुरू होते. जवळपास सर्वच कंपन्या बिगडेटाचा वापर ग्राहकांची माहिती घेऊन त्यावर सुयोग्य पद्धतीने निर्णय घेण्यासाठी करतात. अशा व्यवस्थित माहितीवर आधारलेल्या निर्णयामुळे कंपन्यांचा तोटा तर कमी होतोच पण त्यांच्या नफ्यामध्येही सुमारे ५० टक्क्य़ांहून अधिक वाढ होते असे लक्षात आले आहे. त्यामुळे एकाच वेळेस तोटय़ाचा धोका कमी होणे व उलट नफ्याच्या दिशेने वाटचाल असा बिगडेटाच्या वापराचा दुहेरी फायदा आहे. ग्राहकांची मानसिकता कळणे हा या बिगडेटाचा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे. मानवी वर्तन समजून घेण्यासाठी केलेल्या या बिगडेटाच्या वापरामुळे आता माणसाचेच  वर्तन बदलते आहे किंवा नियंत्रित केले जाते आहे अशी शंका येण्यासारखी स्थिती आहे.

व्यावसायिक कंपन्यांप्रमाणेच हवामानाचा वेध, सायबरहल्ला एवढेच नव्हे तर साथीच्या रोगांचा वेगात होणारा प्रसार आणि पोलिसांवर होणारे हल्ले रोखण्यासाठीही याचा वापर केला जाऊ  शकतो. बिगडेटामुळे माणसाचे संभाव्य वर्तन कळत असल्याने हल्ला होण्याची शक्यता केव्हा सर्वाधिक आहे, हेही नेमके लक्षात येते. प्रसारमाध्यमे, बँकिंग, रिटेल उद्योग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, विज्ञान- तंत्रज्ञान, क्रीडा आदी क्षेत्रांमध्ये याचा वापर मोठय़ा प्रमाणावर होतो आहे.  वैज्ञानिक पातळीवरही हिग्ज बोसॉन सारख्या मूलकणांचा शोध घेणाऱ्या लार्ज हॅड्रन कोलायडरसारख्या जगातील सर्वात मोठय़ा प्रयोगशाळेतील प्रयोगांपासून ते जिनोम प्रयोगापर्यंत सर्वत्र बिग डेटाचा वापर होतो आहे. पण माणसाच्या वर्तनाचा शोध घेताना बिग डेटासाठी स्रोत असलेल्या उपकरणांमार्फत घुसखोरी थेट आपल्या बेडरूमपर्यंतही पोहोचली आहे. त्यामुळेच उपग्रह तंत्रज्ञानापासून सेक्सपर्यंत सर्वत्र बिग डेटाचा वापर आणि परिणामही व्यापक होतो आहे. माणसाच्या लैंगिक सवयी जाणून घेण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये संपूर्ण जगभरात सर्वत्र बिगडेटाचा वापर होतो आहे. यात पोर्नोग्राफिक संकेतस्थळांपासून ते लैंगिकतेशी संबंधित प्रत्येक गोष्टीपर्यंत प्रत्येक बारीकसारिक गोष्टींचा समावेश आहे. म्हणजेच फेसबुक किंवा इन्स्टाग्राम अथवा व्हॉटस्अपवर लैंगिक उत्तेजना असलेला फोटो, व्हिडिओ किंवा मेसेज आला आणि तो शेअर झाला की, त्याची नोंद होते. त्याचवेळेस तो शेअर होताना त्यातील नेमके काय आवडले असावे याचीही नोंद होत असते. लैंगिक संबंध अर्थात सेक्सबद्दल लोक कसे व्यक्त होतात ते लक्षात घेऊन त्यानुसार काही कंपन्यांनी गेल्याच वर्षी नवीन प्रकारचे कंडोम बाजारात आणले आणि त्याचा खप हातोहात झाला. याचा अर्थ बिगडेटाची थेट एंट्री बेडरूममध्येही झालेली आहे.

बिगडेटाच्या चांगल्या परिणामाबाबत बोलायचे तर सरकारी पातळीवर आंतरराष्ट्रीय संबंध, युद्ध इथपासून ते शिक्षण आणि  आरोग्यापर्यंत त्याचे महत्त्व लक्षात आले आहे. गुगलने विकसित केलेल्या अ‍ॅनालेटिक्सच्या माध्यमातून २०१२ साली जगभरात वेगात पसरत चाललेली फ्लूची साथ सरकारी यंत्रणेच्या चार आठवडे आधी बिगडेटामुळे लक्षात आली. २०१२ साली ओबामांच्या तर २०१४ साली भारतीय जनता पक्षाने मोदींना सत्तारूढ करविण्यासाठी या बिगडेटाचा यशस्वी वापर करून आपली जाहिरात मोहीम आखली होती. दोन्ही ठिकाणी मिळालेल्या यशाच्या मुळाशी बिगडेटाच होता. त्यामुळेच मतदारांचा कल त्यांना नेमका जाणून घेता आला. आता सरकारी योजनांच्या बाबतीत फायदा आणि नागरिकांचा कल समजून घेण्यासाठी भारतातही त्याचा वापर होतो आहे. येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये आता आपल्याला या बिगडेटाची चुणूक पाहायला मिळणार आहे. मग ती निवडणूक अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची असो अथवा येऊ घातलेली उत्तर प्रदेशातील. आठवून पाहा म्हणजे मग लक्षात येईल की, मोदींच्या यशामागे त्यांचा बिगडेटा सांभाळणारा तंत्रज्ञ प्रशांत किशोर होता, हे लक्षात आल्यानंतर नितिश कुमार यांनी बिहारच्या निवडणुकांमध्ये त्याला हाताशी घेतले आणि त्यांना अपेक्षित यशही मिळाले. बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली.

समाजशास्त्रज्ञांच्या मते बिगडेटा ही माणसांची माहिती आहे. त्यामुळे इतर माहिती आणि माणसांची माहिती यात फरक करायला हवा. ही खरे तर माणूसपणाचीही माहिती आहे. आणखी काहीशे वर्षांनी एखाद्याला वाटले तर ही माहिती घेऊन २१ व्या शतकातील माणूस कसा जगला त्याचा इतिहास पुराव्यानिशी पुन्हा उभा करता येईल. मनुष्यवंशशास्त्रज्ञांना वाटते की, खरे तर माणूस आणि तंत्रज्ञान यामधील नातेसंबंध यांची ही गोष्ट आहे.  माणसाचे तंत्रज्ञानासोबत बदलत गेलेले नाते. त्या बदलत्या नात्याचा त्याच्या आयुष्यावर असलेला प्रभाव आणि झालेला परिणाम यातून माणूसच माणसाला नव्याने समजून घेतोय.

बिग डेटा अस्तित्वात येण्यापूर्वीही उत्पादनांसाठी सर्वेक्षण केले जायचेच. भारतात ‘ओएमजी मार्ग’चे सर्वेक्षण बाजारपेठेवर मोठा परिणाम करणारे असायचे. एक प्रश्नावली तयार केली जायची त्याच्या उत्तरामधून, मुलाखतीमधून हाती आलेल्या माहितीतून संशोधनाअंती असे काही बाहेर यायचे की, त्याचा वापर उत्पादन आणि त्याच्या जाहिरातींसाठी केला जायचा. अंघोळ हे केवळ एक आन्हिक नाही तर ती माणसाची ‘पर्सनल स्पेस’ आहे आणि तिथे त्याला सर्वाधिक आनंदी राहायला व अंघोळ उपभोगायलाही आवडते असे लक्षात आल्यानंतर ‘लिरिल गर्ल’ची वेगळी जाहिरात अस्तित्त्वात आली आणि गाजलीही. त्या सर्वेक्षणांतील आणि आता बिगडेटामधून येणाऱ्या डेटामध्ये दोन महत्त्वाचे फरक आहेत. पहिला म्हणजे पूर्वी प्रत्यक्ष किंवा  फोनवरून प्रश्न विचारले जायचे. काही प्रश्नांच्या वेळेस लोक संकोचायचे. त्यावेळेस प्रश्नाची उत्तरे मिळायची तरी नाहीत किंवा चुकीची अथवा फसगत करणारी असायची. पण आता बिगडेटा तुमच्या नकळत गोळा केला जातो तोही अनेकदा थेट तुमच्या परवानगीशिवायच.

दुसरा फरक म्हणजे आता सुरू असलेली माहितीच्या निर्माणाची प्रकिया म्हणजेच डेटा तयार होणे हे अखंडपणे सुरूच आहे, ते तसेच सुरू राहणार आहे. माणसाची लहानातील लहान कृती मग ती फेसबुक पोस्ट असो किंवा त्याने केलेले ट्विट, गुगलवर केलेले सर्च किंवा मग ऑनलाइन खरेदीसाठी केलेले क्लिक, गाडीचे वेळापत्रक पाहण्यासाठी वापरलेले एम-इंडिकेटर, इंटरनेटवर असलेल्या चित्रांमधील काही चित्रे किंवा व्हिडिओ पाहणे आणि काही टाळणे यासारखी क्षुल्लक वाटणारी कृतीही असेल या सर्वामधून ती करणाऱ्या माणसाचे चित्र तयार होत असते. फेसबुक प्रोफाईल हे खोटे असू शकते पण हे बिगडेटातून तयार झालेले वापरकर्त्यां माणसाचे चित्र मात्र वास्तववादी आणि तितकेच नेमके म्हणजे त्याच्या सवयींविषयीची नेमकी माहिती देणारे असते.

अ‍ॅनालेटिक्स आणि कलरकोड या माध्यमातून बिगडेटावर वेगात प्रक्रिया केली जाते. त्यातही माहितीमध्ये नेमकेपणा आणि वैविध्य यावे यासाठी आपल्याला सोयी आहेत, असे सांगून काही पर्याय दिले जातात आणि नकळत माहिती मिळवली जाते. फेसबुकने काही महिन्यांपूर्वी वेगवेगळे इमोटिकॉन्स आपल्याला विविध भावना व्यक्त करण्यासाठी देऊ  केले. आपल्याला वाटले की ते आपल्या सोयीसाठी दिले आहेत. वस्तुत: तुमच्या भावनांचे कोडिंग व्यवस्थित, नेमके आणि वेगात करता यावे म्हणून त्यांनी स्वतसाठी केलेली ती सोय होती. त्यामुळे बिग डेटा विश्लेषणाचे फेसबुकचे काम सोपे झाले. २०१२ साली फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार २५ दशकोटी लिंक्स आणि कंटेंट पिसेस, २७ दशकोटी लाइक्स आणि ३०० दशकोटी फोटो प्रतितास अपलोड होतात आणि त्याचे तेवढय़ाच वेगात बिग डेटासाठीचे प्रोसेसिंग फेसबुककडून केले जाते. आज आपण २०१६मध्ये आहोत. जगभरातील आयटी कंपन्यांच्या माहितीनुसार गेल्या दोन वर्षांत माहिती येणे आणि त्यावर प्रक्रिया होण्यामध्ये ४० पटींनी वाढ झाली आहे. म्हणजे आज त्यांचा वेग काय असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी.

मध्यंतरी कल जाणून घेण्यासाठी मतदानासारखे ‘पोल’ घेण्याची सोय फेसबुक आणि ट्विटरने उपलब्ध करून दिली, त्यावेळेस केवळ कोणत्या विषयावर कुणाची काय मते आहेत तेवढेच समजून नव्हते घ्यायचे त्यांना, तर या ‘पोल’च्या मागच्या बाजूस कोणता वयोगट, कोणत्या देशातील मंडळी कसा विचार करतात, त्यांना काय आवडते काय नाही, कोणता नेता आवडतो, त्यांच्या इच्छा-आकांक्षा काय आहेत हे सारे समजून घेऊन या कंपन्यांना त्याचा भविष्यात व्यावसायिक वापर करायचा होता.

मानवी वर्तनाची शक्यता नेमकी वर्तविण्याच्या बिगडेटाच्या या क्षमतेचा वापर ज्याप्रमाणे गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी होऊ  शकतो त्याचप्रमाणे दहशतवाद्यांकडूनही होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. किंबहुना तसा तो त्यांच्याकडून केलाही जातो असे अमेरिकन गुप्तचर यंत्रणा असलेल्या एफबीआयचे म्हणणे आहे. म्हणूनच जगभरातील सरकारांनी त्यांच्या संकेतस्थळांवर होणारे सायबर हल्ले गांभीर्याने घ्यायला हवेत; अन्यथा संभाव्य युद्धाची सुरुवात तिथेच असेल, असा इशारा जगभरातील गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. जगाचा प्रवास सध्या डेटासेंट्रिक वॉरफेअर म्हणजे माहितीच्या माध्यमातून लढल्या जाणाऱ्या युद्धाच्या दिशेने सुरू आहे. म्हणजेच भविष्यात ड्रोनच्या माध्यमातून शत्रू प्रदेशातील माहिती मिळवली आहे.  प्रत्यक्ष माहितीसाठी लढाऊ विमानाने त्या भागाचा अंदाज घेतला आहे आणि जवळच असलेल्या नौदलाच्या युद्धनौकेवरून आणि त्याचवेळेस लढाऊ विमानातून एकाच वेळेस क्षेपणास्र डागले गेले आहे. या सर्व कार्यकृतींचे संचलन होते ते बिगडेटाच्या माध्यमातून. अलीकडेच ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडय़ात लिबियाजवळ अमेरिकन युद्धनौकेवर दहशतवाद्यांनी दूरवरून चढविलेला हल्ला हेदेखील बिगडेटाच्या वापराचेच  प्रतीक होते, असे सामरिकतज्ज्ञ मानतात.

मध्यंतरी लंडनमध्ये एक महत्त्वाचे चित्रप्रदर्शन पार पडले, त्याचा विषय होता बिगडेटा.  बिगडेटामुळे झालेले परिणाम सांगणारे असे हे बोलके प्रदर्शन होते. यामध्ये एका गोदामामध्ये बिगडेटा सेंटर उभारलेले दाखविले होते. सर्व िभतींवर विश्लेषण करणारे अवाढव्य स्क्रीन्स आणि हिमग मशीनमधून येणारे आवाज होते खरे पण माणसे मात्र नव्हती. होते ते इंद्रियगोचर वास्तव. दुसऱ्या एका कलावंताने एका सेकंदात पाठविली जाणारी ट्विट्स् एकत्र केली त्यानेच केवळ १,२२२ पाने भरून गेली. कलावंतांच्या लंगिक आयुष्याचा वेध घेणारे बिगडेटा पॅनलही होते; आता वैयक्तिक किंवा खासगी असे काही राहिलेच नाही हे सांगणारे. त्यात ३६५ रंगछटांमध्ये कलावंताच्या लंगिक आयुष्याचे विश्लेषण होते. आजूबाजूला असलेल्या अशा अनेकांच्या लंगिक आयुष्याच्या माहितीतूनच नवीन प्रकारची उत्पादने बाजारपेठेत दाखल झाली आहेत.  तिसऱ्या एका कलाकृतीमध्ये फेशिअल रेकग्निशनसाठी मुखवटा तयार केला होता. आडव्या धातूसळ्यांचा हा चेहऱ्याचा िपजराच जणू. चेहऱ्याच्या या िपजऱ्यातच आपण अडकलोय हे नेमकेपणाने त्याने सूचित केले. फेसबुकवर ‘टॅग अ फ्रेंड’ अशी सोय आपल्यासमोर येते त्यामागेही अशाच प्रकारचे तंत्र वापरण्यात आलेले असते.  त्यासाठीही बिगडेटाचाच वापर केला जातो. विविध रंगछटांचा प्रभावी वापर करून डेटा व्हिज्युअलायझेशन कंट्रोल रूमच या प्रदर्शनस्थळी  उभारण्यात आली होती..

बिगडेटामुळे सध्या जग डिसरप्शनला सामोरे जाते आहे. म्हणजे पारंपरिक गोष्टींना आव्हान मिळाले आहे आणि खूप बदल होत आहेत. पूर्वी रंगांची कंपनी आणि ग्राहक यामध्ये पुरवठादार, दुकानदार असायचे. आता ग्राहक थेट कंपनीला सांगू शकतात, त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात. बीएमडब्लूसारख्या गाडय़ांमध्ये असलेले सेन्सर्सच आता थेट देखभाल-दुरुस्तीची वेळ झाली हे चालकाला, मालकाला सांगतात. या डिसरप्शनमुळे काही नोकऱ्या आणि रोजगाराच्या संधी बाद झाल्या तर काही नव्याने निर्माण झाल्या.

बिग डॅडी आणि दहशतवाद

बिगडेटाबाबत चिंता करण्यासारख्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बिगडेटामध्ये माणसाच्या भावभावना-संवेदना यांचा वापर करून त्यातील बारकावे जाणून घेऊन त्याचा वापर उत्पादन निर्मितीसाठी केला जातो खरा. पण त्याचा वापर माणसावर लक्ष ठेवण्यासाठी ‘बिग डॅडी’सारखाही केला जातो. हा ‘बिग डॅडी’ तुम्हाला नियंत्रित करू शकतो, तुमच्या सवयींना नियंत्रणाखाली ठेवू शकतो. त्याचा वापर दहशतवादासाठीही केला जाऊ शकतो. किंबहुना दहशतवादी त्यांच्या विघातक कृत्यांसाठी बिगडेटाचा वापर करत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडे आहेच.

बिगडेटा इकनॉमी

इंटरनेट ऑफ िथग्जमुळे (आयओटी) सर्व जग जोडले जाणार आहे. म्हणजेच टोमॅटो संपल्यानंतर तुमचा फ्रिजच वाण्याकडे मागणी नोंदवणार आणि पसे थेट खात्यातून वळते होणार हे सारे मानवी कृतीशिवाय होणार आहे. या आणि अशा सर्व जुळणी झालेल्या स्वयंचलित व्यवस्थेमधून निर्माण होणारा डेटा नकळत आपल्या खासगी आयुष्यातील माहिती अपलोड करत असतो, ज्यामधून बिगडेटा आणि त्यावर चालणारी अर्थव्यवस्था अर्थात ‘बिगडेटा इकनॉमी’ तयार होते. येणाऱ्या काळात या ‘बिगडेटा इकनॉमी’चा प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेतील वाटा उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. माणसाच्या आयुष्यात पसे आणि अर्थव्यवस्था याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे असे नको व्हायला की, अर्थव्यवस्थेला फटका नको म्हणून आपण खासगी वैयक्तिक आयुष्यातील घुसखोरी निमूटपणे सहन केली आहे. कारण त्याचा थेट प्रभाव मग तुमच्या माझ्या आयुष्यावर होणार आहे. तज्ज्ञ खास करून समाजशास्त्रज्ञ याचाच धोका आपल्याला स्पष्टपणे लक्षात आणून देतात. त्यांचे म्हणणे आहे की, बिगडेटा हा माणसांचा डेटा आहे, यंत्रांचा नाही हे या ‘बिगडेटा अर्थव्यवस्थे’ने लक्षात ठेवायला हवे आणि त्याच वेळेस माणसाच्या खासगीपणावर, त्याच्याशी संबंधित त्याच्या हक्क व अधिकारांवर गदा येणार नाही हेही व्यवस्थेनेच म्हणजे बिगडेटा निर्माण करणारी यंत्रणा अर्थात खासगी कंपन्या व सरकारांनी लक्षात ठेवायला हवे.

‘डिजिटल हक्कांची सनद’

नव्याने तयार झालेल्या या ‘डिजिटल नागरिकां’च्या ‘डिजिटल हक्कांची सनद’ नव्याने लिहिली जायला हवी आणि त्याच्या संरक्षणासाठी नव्याने कायदे अस्तित्वात यायला हवेत.

बिगडेटामुळे स्वातंत्र, खासगीपणा आणि माणसाची स्वायत्तता यांच्यावर परिणाम होतो आहे. त्यामुळे एकप्रकारे ही भांडवलशाहीची विषवल्लीच आहे, असे काहींचे मत आहे तर काहींच्या मते भरपूर ऊर्जा आणि शक्यता असलेला असा हा कच्चा माल आहे ज्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी येईल म्हणून तो वाढायला हवा, जपायला व संवर्धन करायलाही हवा.

आजही जगभरामध्ये अमेरिकनांपेक्षाही युरोपीय समाज अधिक सजग मानला जातो. युरोपियन समुदायाने (ईयू) म्हणूनच या प्रकरणी पुढाकार घेऊन युरोपिअन देशांतील नागरिकांच्या डिजिटल खासगी हक्कांवर बिग डेटाचे अधिक्रमण होऊ नये म्हणून एक श्वेतपत्रिकाच जारी केली. नागरिकांकाकडून आक्षेप, सूचना मागवल्या आणि आता डिजिटल खासगी जीवन अधिक्रमित होणार नाही, असा कायदा व त्याला अनुसरून नवीन नियमावलीच युरोपियन देशांमध्ये कार्यरत बिगडेटा कंपन्यांसाठी जारी केली आहे. त्यानुसार बिगडेटा इकनॉमीमध्येही व्यक्तीच्या खासगीपणासंदर्भातील मूलभूत हक्कांचे संरक्षण ही कंपन्यांची कायदेशीर जबाबदारी असणार आहे. त्यामुळे बिगडेटा निर्माणाची प्रक्रियाच अशा प्रकारे कार्यान्वित करण्यात येईल की, त्यात या मूलभूत अधिकारांचे संरक्षण अध्याहृत असेल. ठरावीक कालावधीने या मूलभूत हक्कांच्या संरक्षणाबाबत म्हणजेच ते कायम राखण्याबाबत पुनरीक्षण करण्यात येईल. (कारण बिगडेटा सतत वाढतच जाणार असून त्यावरची प्रक्रिया करण्याची पद्धतीही नवनवीन येणार आहे.)

भारताच्या बाबतीत बोलायचे तर आपल्याकडे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ ने आपल्याला व्यक्तिगतता आणि खासगीपणाचे अधिकार मूलभूत अधिकार म्हणून बहाल केले आहेत. म्हणूनच ‘माहिती तंत्रज्ञान कायदा, २०००’ अस्तित्वात आला त्यावेळेस ‘कलम ४३-अ’ मध्ये खासगी अधिकारांचे उल्लंघन झाल्यास नुकसानभरपाई आणि कलम ७२- अ अन्वये शिक्षेची तरतूद करण्यात आली. या तरतुदी पुरेशा  नाहीत असे लक्षात आल्यानंतर २०११ साली खासगीपणाच्या सुरक्षेसाठी कलम ४३-अ अंतर्गत नियमावलीची तरतूद करण्यात आली. त्यात खासगी माहितीचे नेमके स्पष्टीकरण करण्यात आले.

सर्वच जग आता डिजिटल होत असल्याने या डिजिटल नागिरकांच्या अधिकारांसाठी जगभरात चळवळी सुरू आहेत. नागरिकांच्या खासगी आणि वैयक्तिक आयुष्यावर होणारे अधिक्रमण रोखणे हा त्यांचे मूळ हेतू आहे. भारतातही त्याची सुरुवात झाली आहे. या चळवळीतील मंडळींचे म्हणणे आहे की, सध्या असलेली कायदेशीर तरतूद ही फारच ढोबळ आहे. हा कायदा अधिक कडक होण्याची गरज आहे. तर पलीकडच्या बाजूस भारतात येणाऱ्या विदेशी कंपन्यांनाही त्यांच्या डेटासुरक्षेविषयी असलेल्या कायदेशीर तरतुदी अपुऱ्या वाटताहेत. मिरारोड प्रकरण तर ताजे उदाहरण आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी हा कायदा कडक होणे, गरजेचे आहे. त्यासाठी नागरिकांकडून सूचना, हरकती मागविणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागरिकांमध्ये या विषयावर जनजागृती करणेही तेवढे महत्त्वाचे आहे. कारण या नागरिकांमधील सुमारे ८५ टक्के  जणांना तर असे काही आपल्याबाबतीत या बिगडेटामुळे होते आहे, याची पुसटशी कल्पनाही नाही. काय होतेय ते लोकांना नेमके कळले तर काय व्हायला नको, याचा निर्णय त्यांना घेता येईल. यासाठीच जाणीवजागृती व्हायला हवी. तिच आपल्यासाठी आशादायी असेल.

इशारावादी मंडळी नेहमीच टोकाची भूमिका घेतात. त्यांना असे वाटते आहे की, माहितीच्या या विस्फोटातून निर्माण झालेला माहितीचाच भस्मासुर माणसाला खाक करणाऱ्या कृतींच्या मोहात पाडेल आणि नाश अटळ असेल. असे काहीही होऊ द्यायचे नसेल तर बिगडेटा हा आता अर्थव्यवस्थेचा मोठा भाग झाला असून तो टाळणे किंवा त्यापासून सुटका शक्य नाही हे मनावर कोरले पाहिजे. त्याचवेळेस भविष्यात कोणत्याही अनवस्था प्रसंगाला सामोरे जावे लागू नये म्हणून काळजी घेण्यासाठी कायदेशीर तरतुदी कडक करण्यासाठीही सरकारसोबत सक्रिय व्हायला हवे. कारण हे तुमचे-माझे खासगी आयुष्य आहे. त्याचे सार्वजनिकीकरण होणे योग्य नाही. खासगी आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार अर्थव्यवस्थेलाही नाही. या दोन्हीमध्ये एक पुसट लक्ष्मणरेषा आहे ती, दोघांनीही म्हणजे अलीकडे असलेले सरकार व खासगी कंपन्या आणि पलीकडे असलेले तुम्ही- आम्ही दोघांनीही समजून घ्यायला हवी! तंत्रज्ञान हे दुधारी असते      आणि न-नतिकही, त्याचा वापर कसा होणार, हे त्याच्या वापरकर्त्यांच्या मनावर आणि त्यावर झालेल्या संस्कारांवर ठरते. म्हणजेच पशांऐवजी माणूस, माणुसकी आणि माणूसपणा या नव्या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहिला तर फारशी अडचण असणार नाही!

गुगल आणि बिगडेटा

२००९ मध्ये गुगुलने ‘नेचर’ या विख्यात संशोधन पत्रिकेमध्ये बिगडेटावर प्रबंध सादर केला. बिगडेटा या विषयावर गाजलेला जगभरातील पहिलाच प्रबंध होता. या प्रबंधाने बिगडेटा कोणत्या करामती घडवू शकतो, त्याचा साक्षात्कारच जगाला दाखवून दिला. आपण ‘सर्च’ पर्यायामध्ये शब्द टाइप करतो, त्याचवेळेस समोर शब्दांचे असंख्य पर्याय येत जातात. यात आपल्या जे शोधायचे आहे, त्याचा पर्यायही नेमकेपणे येत असतो, क्षणार्धात येणारा हा पर्याय ही बिगडेटाची करामत असते. २००९ सालातील हा शोधप्रबंध लिहिण्यासाठी गुगलने केलेला बिगडेटावरील प्रयोग हा त्याचा ओनामा होता. ४५ ‘बेस्ट सर्च’ निश्चित करण्यासाठी त्यांनी बिगडेटा वापरला. ५० दशलक्ष सर्च संकल्पना वापरल्या आणि ४५० दशलक्ष मॉडेल्स वापरली.

लिबियातील उठाव व बिगडेटा

२०११ साली लिबियातील उठावाच्या वेळेस बंडखोरी करणाऱ्यांची माहिती घेण्यासाठी नेते गद्दाफी यांनी बिगडेटाचा वापर केला, असे नंतरच्या तपासामध्ये लक्षात आले. त्यानंतर या संपूर्ण बिगडेटा प्रकरणाची सविस्तर चौकशी झाली आणि त्यात फ्रान्समधील बिगडेटा कंपनीचे नावही उघड झाले. आता त्या फ्रेन्च कंपनीविरोधात पॅरिस येथे लवादासमोर सुनावणी सुरू आहे.

ऑलिम्पिकमध्येही बिगडेटा

ऑलिम्पिक म्हणजे जगभरातील सर्वात मोठा क्रीडामेळाच. ज्या ठिकाणी ते भरते त्या ठिकाणच्या पर्यटनामध्ये मोठी वाढ होते. जगभरातून आलेले क्रीडापटू आणि त्यांचे चमू, सोबत असलेली मंडळी, प्रसंगी या साऱ्यांचे नातेवाईक आणि हौशी मंडळी हा लवाजमा लाखोंच्या घरात असतो. साहजिकच त्यामुळे ज्या शहरात याचे आयोजन होते त्या शहरावर, त्यांच्या व्यवस्थेवर खूप मोठ्ठा ताण पडतो. त्याच वेळेस ऑलिम्पिक असलेल्या देशाच्या  अर्थव्यवस्थेसाठी ही खूप मोठी संधीही असते.

लंडन ऑलिम्पिकच्या वेळेस इंग्लडची अर्थव्यवस्था युरोपसह मंदीच्या फेऱ्यात अडकली होती. अर्थव्यवस्थेला त्यातून बाहेर काढण्यासाठी ऑलिम्पिक ही नामी संधी होती. म्हणून इंग्लंडने एकाच वेळेस ऑलिम्पिकशी संबंधित सर्व व्यवस्थांचे नियोजन करण्यासाठी आणि दुसरीकडे त्याचवेळेस अर्थव्यवस्थेला चांगला फायदा होईल असे गणित जुळवून आणण्यासाठी बिगडेटाचा वापर २०१२ साली केला. त्यानंतर यंदा २०१६च्या रिओ ऑलिम्पिकसाठीही अधिक व्यापकतेने शहर व ऑलिम्पिक नियोजनासाठी बिगडेटाचा वापर यशस्वीरित्या करण्यात आला.

कार्डामागची डेटा लॉयल्टी

पँटलून, शॉपर्स स्टॉप, बिग बझार आदी कंपन्या ज्यावेळेस खास डिस्काऊंटसाठी ग्राहकांना स्वत:ची लॉयल्टी कार्डस् बहाल करतात, त्यावेळेस दोन महत्त्वाची कामे या कंपन्या करत असतात. त्यात दर्शनी दिसते ते म्हणजे या कंपन्या तुम्हाला अधिक खरेदीसाठी अधिक पॉइंटस् देऊन, तुमच्यावर स्पेशल गिफ्टस्चा वर्षांव करून   अधिकाधिक खरेदीसाठी प्रवृत्त करतात आणि पलीकडच्या बाजूस न दिसणारा भाग म्हणजे तुमच्या खरेदीविषयक सवयी जाणून घेणारी माहिती अर्थात बिगडेटा अर्थात ‘बिग डी’ (तुमच्यावर नजर ठेवणारा बिग डॅडी)  तयार होत असतो. हा फक्त तुमच्या एकटय़ाचा नसतो तर तो कोटय़वधी ग्राहकांचा असतो. यात तुमचा पगार, विकत घेण्याच्या पद्धती, त्यातील प्राधान्यक्रम, महिन्यातील खरेदीसाठी प्राधान्य असलेल्या तारखा किंवा सोय आदींचा त्यात समावेश असतो. काही वेळेस या गोष्टी इतक्या पर्सनल होतात की, एखादी महिला गर्भवती राहिली आहे हेही तुमच्या खरेदी पॅटर्नवरून या कंपन्यांना अचूक कळते. कधी ते लॉयल्टी कार्ड असते तर कधी तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड एवढाच काय तो फरक!

बिगडेटाची वैशिष्टय़े

  • बिगडेटाचा आíथक प्रभाव आणि सामाजिक परिणाम मोठा असतो.
  • तो एकाच वेळेस विखुरलेला आणि जोडलेलाही असतो.
  • अंत:प्रेरणेने घेतलेल्या निर्णयासाठी मात्र बिगडेटा हा पर्याय असू शकत नाही.
  • बिगडेटाने जन्म दिलेल्या नव्या संकल्पनांपैकी काही.. डेटामायिनग अर्थात माहितीचे खणकाम, डेटालीडर्स आदी
  • बिगडेटा नीट हाताळला नाही तर माहितीच्या महाजंबालात हरवून जाण्याचा धोकाही तेवढाच मोठा असतो. याचा फटका कंपन्यांना जबरदस्त बसू शकतो.
  • बेकारी संदर्भातील चौकशी आणि ‘सर्च’ कमी होतात तेव्हा मंदी हटत असल्याचे संकेत बिगडेटामधून मिळतात.

वॉलमार्टकडून स्मार्ट वापर

बिगडेटा नावाची संकल्पना अस्तित्त्वात नव्हती त्यावेळेस वॉलमार्ट या रिटेल चेनने जगभरात सर्वप्रथम संगणकाधारित माहितीचा वापर केला तो १९७० साली. रॉय मेअर आणि रॉय्सी चेम्बर्स यांनी याचा वापर किंमत निश्चितीसाठी केला जाऊ शकतो आणि त्याबळावर सर्वाधिक नफाही कमावता येऊ शकतो हे सॅम वॉल्टनला पटवून दिले आणि जगात सर्वप्रथम कॉस्ट कटिंग फिलॉसॉफी वापरली गेली. त्याचा प्रचंड फायदा वॉलमार्टला झाला.

पौगंडावस्था अन् बिगडेटा

अनेक तज्ज्ञांनी पौगंडावस्थेतील लंगिक संबंधांशी बिगडेटाची तुलना केली आहे, ते म्हणतात.. प्रत्येकजण ‘त्या’बाबत बोलतो पण कुणालाच माहीत नाही ‘ते’ कसे करायचे. प्रत्येकाला वाटतं इतर ‘ते’ करताहेत, इतरांना जमते आहे आणि त्यामुळेच प्रत्येकजण सांगतो की, मीही ‘ते’ केलंय किंवा करतो!

विनायक परब –  @vinayakparab
vinayak.parab@expressindia.com