कथा – प्रथम क्रमांक
चहा-आंघोळ उरकून, बाहेर पडून केशवनं आपल्या बाइकला किक् मारली तेव्हा सकाळचे नऊ वाजत होते. दोन वर्षांपूर्वी साधारण याच सुमाराला आप्पांनी त्याला एका नोकरीत चिकटवला होता. त्याला सोयीचं व्हावं म्हणून ऑफिसमधल्या एकांकडून ही सेकण्डहॅण्ड बाइक घेतली होती. आप्पा एक मोठय़ा सरकारी कंपनीतले तृतीय श्रेणी कर्मचारी; राहायला कंपनीच्या कॉलनीतल्या ‘एफ’ लायनीतलं दोन खोल्यांचं बैठं घर होतं. घराबाहेर बाइक उभी करण्याइतपतही जागा नव्हती. तर घराच्या चतकोर व्हरांडय़ात बाइक चढवून ठेवता यावी म्हणून त्यांनी तेव्हा पदरमोड करून एक छोटासा रॅम्पही तयार करवून घेतला होता. कामावर जायचं म्हणून तेव्हा केशव घाईघाईत आवरून साडेसातला घराबाहेर पडायचा. पण आजच्या एकदशांश उत्साहही तेव्हा त्याच्या अंगात नसायचा. रॅम्पवरून बाइक खाली उतरवताना तो रोज एकदा मनोमन चरफडायचा. आप्पांना आपली स्वप्नं कळत नाहीत याचा सगळा तळतळाट तो बाइकच्या किक्वर काढायचा. जेमतेम सहा- एक महिनेच त्यानं ती नोकरी केली असेल. नोकरी सोडायची ठरवली तो दिवस त्याच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस होता! तितका आनंद त्याला डिग्री मिळाली तेव्हाही झाला नव्हता..

आणि आजचा दिवस त्यावरही कडी करणारा होता.

बाइक सुरू ठेवून त्यानं दिनेशला फोन लावला. पायाशी आलेल्या एका मरतुकडय़ा कुत्र्याला लाथ मारल्यासारखं करून दूर हाकललं. पलीकडे फोनची िरग वाजत होती. दिनेश अजून तयार झालेला नसणार हे त्याला अपेक्षित होतंच. पलीकडे फोनची िरग वाजत होती. दिनेश अजून तयार झालेला नसणार हे त्याला अपेक्षित होतंच. संभादादा कितीही म्हणत असले- ‘आमचे दोन नवीन पठ्ठे’- तरी केशवला कायमच आत्मविश्वास वाटायचा की दिनेशपेक्षा आपणच सरस आहोत. या आत्मविश्वासाच्या जोरावरच तर त्यानं आपला नाकेरी सोडण्याचा निर्णय आप्पांच्या गळी उतरवला होता.

‘‘हां, बोल,’’ अखेर पलीकडून दिनेशनं फोन उचलला.

‘‘काय रे? झोपलाय काय अजून..’’

‘‘नाय रे, तू नीघ, मी आलोच..’’

‘‘गेटपाशी ये, हां,, मी आत नाय येणार.’’

‘‘हो, हो, अरे, आणि माझ्या मेमरीकार्डचा कायतरी प्रॉब्लेम झालाय. आज फोटो नाय मारता येणार फटाफट.’’

‘‘छोड ना,’’ केशव शांतपणे म्हणाला, ‘‘तिथे दादांचा कोणतरी फोटोग्राफर असेलच की! आपण सांगू तितके फोटो मारेल तो.’’

ते ऐकून दिनेशला जरा हायसं झालं. त्यानं फोन बंद केला. आई त्याला चहा प्यायला हाका मारत होती. तो गॅलरीतून परत आत वळला. शेजारचे सापत्नेकर काका गॅलरीच्या कठडय़ाला टेकून पेपर वाचत उभे होते. पेपरआडून त्यांचा एक कान दिनेशच्या फोनकडेच होता. दिनेशलाही ते माहिती होतं. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तो आत गेला. त्यानं पटापट कपडे केले. केस विंचरता विंचरता खिडकीतून गेटकडे एक नजर टाकली. केशव कुठल्याही क्षणी आला असता. दुमजली सी आकाराची चाळ, पुढे गेट; मधल्या मोकळ्या जागेत पोरं खेळत असायची, बायकांची धुणीभांडी चालायची, वाळवणं, जास्तीचं सामान, गाडय़ा उभ्या केलेल्या; त्यामुळे केशव त्याची बाइक कधीच आत आणायचा नाही. दिनेशनं कंगवा आरशासमोर ठेवून त्याच्या शेजारचा फोन उचलून खिशात टाकला. आई चहाचा कप टेबलावर ठेवून गेली होती. उभ्या उभ्या तीन-चार घोटांत त्यानं चहा संपवला आणि कप हाता तिथेच ठेवून तो बाहेर पडला. ‘जेवायला घरी आहेस का?’ या आईच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत दडादडा पायऱ्या उतरून तो खाली आला. आई पुन्हा तोच प्रश्न घेऊन गॅलरीत आली असणार हा विचार येताच त्याची मान वर वळली. आई नव्हती, पण सापत्नेकर काका मात्र पेपर मिटवून त्याच्याकडेच पाहत होते.

सापत्नेकर गेले आठ- दहा महिने असेच दिनेशवर लक्ष ठेवून होते. दिनेशला वाटायचं रिटायर्ड म्हाताऱ्याला काही कामधंदा नाही. पण सापत्नेकरांच्या लक्षात आलं होतं, एक कुणीतरी बाइकवाला फोन करतो अणि पाच मिनिटांत याला न्यायला येतो. त्याचा फोन आला, की हा हातातलं काम टाकून घाईघाईनं बाहेर पडतो. मागल्या वर्षी चाळीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या वेळी तो बाइकवाला एकदा त्याच्या घरी आला होता. विसर्जनाच्या आदल्या दिवशी गणपतीच्या आरतीला तो कुणीतरी स्थानिक नेत्यालाही घेऊन आला होता. त्या दिवशी दिनेश आणि तो बाइकवाला दोघंही त्या नेत्याच्या आगेमागेच होते. त्या नेत्याच्या पतसंस्थेची एक आणि टायपिंग इन्स्टिटय़ूटची एक, अशा दोन जाहिराती चतुर्थीपासून गणपतीच्या चतकोर मांडवाच्या बाहेर लटकत होत्या.

त्यानंतर एकदा सापत्नेकर आपलं पेन्शन आणायला बँकेत गेलेले असताना त्यांनी दिनेशला टायपिंगचा क्लास अर्धवट टाकून याच बाइकवाल्याबरोबर जाताना पाहिलं;  आपल्या बायकोकरवी त्यांनी ते दिनेशच्या आईच्या कानावरही घातलं. पण आईनं आपल्या कर्दनकाळ नवऱ्यापासून आजतागायत बहुतेक ते लपवून ठेवलं होतं.

‘‘आधी पांचाळकडे, मग तिथून ग्राउंडवर जाऊ.’’ बाइक गिअरमध्ये टाकत केशव म्हणाला.

‘‘हां, चालेल. दादांकडून आलेले पैसे परवाच दिलेत पांचाळला.’’

‘‘किती?’’

‘‘पंधराशे.’’

‘‘फक्त पंधराशेच?’’ केशव आश्चर्यानं म्हणाला.

‘‘दादांनी तेवढेच दिले साजनकडे.’’

‘‘साजन्यानं दिले तुला पैसे??’’

‘‘हो, आणि म्हणाला हे पांचाळला दे. बाकी कायच नाय बोलला.’’

केशवही त्यावर काही बोलला नाही. संभादादांनी पांचाळचं सगळं काम त्याच्यावर सोपवलं होतं. हे उद्घाटनाचं गेले दोन महिने घाटत होतं. त्याची कधीपासून तयारी करायची, काय काय कामं आहेत हे विचारायला केशव एकदा संभादादांच्या घरी गेलेला होता. संभादादा त्याच्याशी बोलून मीटिंगला म्हणून घरातून निघाले आणि त्यांना पांचाळच्या अ‍ॅडव्हान्सचं आठवलं. त्यांच्याकडे खिशात तेव्हा पाच हजार रुपये होते. त्यांनी काढून ते केशवकडे दिले, त्याला आपल्या गाडीत घेतलं;  वाटेत त्याच्या घराशी त्याला सोडलं. त्यांच्या सांगण्यावरून केशवनं त्या पाचात पदरचे दोन हजार घातले आणि पांचाळला सात हजार अ‍ॅडव्हान्स म्हणून दिले. आता उरले होते साडेसात. पण त्यातले दादांनी पंधराशेच का पाठवले हे त्याला कळेना. आता पांचाळकडे जावं तर तो सामान देण्याआधी उरलेले पैसे मागणार अशी त्याला भीती वाटली.

तो नीट आठवायला लागला, की दादांनी नक्की दोन हजारांचीच भर घालायला सांगितली होती ना? आपण काही चुकीचं तर ऐकलं नाही ना?

त्या दिवशी संभादादा त्याला ‘चल, बस गाडीत,’ असं म्हणल्यावर तो जो काही हवेत तरंगायला लागला होता! त्याच आनंदात पांचाळला अ‍ॅडव्हान्स देऊन परत येताना त्यानं उद्घाटनाच्या तयारीच्या कामांसाठी गाडीत पेट्रोल असलेलं चांगलं असा विचार करून बाइकची टाकी फुल्ल करून आणली होती. पेट्रोलवर एका फटक्यात ७००-८०० रुपये खर्च केलेले पाहून आप्पांचं त्याच्याशी चांगलंच वाजलं होतं. पण त्यानं त्यातलं काही मनावर घेतलं नव्हतं. नोकरी सोडल्यापासून, संभादादांच्या संपर्कात आल्यापासून असं मनावर घेणं, चरफडणं त्यानं प्रयत्नपूर्वक सोडून दिलं होतं. भविष्यात या गोष्टींनी झालं तर त्याचं नुकसानच झालं असतं. शिवाय आप्पांना त्याच्या स्वप्नांची किंमत कधी कळणार नव्हतीच. त्यांना हे कधीच पटलं नसतं, की दादांच्या गाडीत प्रवेश मिळाला या गोष्टीपुढे ७००-८०० चं पेट्रोल म्हणजे काहीच नव्हतं.

पण त्या नादात आपण दादांच्या सूचना नीट ऐकल्या नाहीत की काय अशी आता केशवला चांगलीच शंका यायला लागली. पण अ‍ॅडव्हान्स घेताना तरी पांचाळ तशा प्रकारचं काही बोलला नव्हता. दादांना तो काही म्हणाला असेल तर ते कळायला काही मार्ग नव्हता. कारण त्या दिवसानंतर संभादादाही केशवला पुन्हा भेटलेच नहते. दिनेशला यापैकी कशाबद्दलही विचारण्यात काहीही अर्थ नव्हता. त्याला केशवनं दादांनी आपल्याला त्यांच्या गाडीत घेतलं हे अजिबात कळू दिलेलं नव्हतं. केशव गप्प असल्याचं दिनेशच्या लक्षात आलं होतं. पण त्याला काही अंदाज येईना. त्यामुळे तो मेमरी कार्डचा लोच्या, ब्लू-टूथनं फोटो घ्यावे लागतील, कार्यक्रम संपल्यावर त्याला वेळ मिळेल का, मोठय़ा साइजचे फोटो असतील तर काय, आज रात्री झोपण्यापूर्वी आपला प्रोफाइल- फोटो बदलता येईल की नाही यावर विचार करत बसला. आजचा हा कार्यक्रम एकदा झाला की आईकरवी पप्पांकडे लग्गा लावून अशीच एखादी सेकण्डहॅण्ड  बाइक पदरात पाडून घ्यायची असं त्यानं ठरवलेलं होतं. आईला आधी आजच्या कार्यक्रमाचे फोटो दाखवायचे आणि मग हळूच बाइकचा प्रस्ताव तिच्यासमोर ठेवायचा अशी त्याची योजना होती. महिन्याभराच्या आत आपला बाइकसहितचा फोटो प्रोफाइलवर आला पाहिजे या दृष्टीने वाटचाल करणं त्याच्यासाठी फारच आवश्यक होतं. त्या दृष्टीने आजचा कार्यक्रम अगदी नेमकं ‘टायमिंग’ साधून आलेला होता.

अध्र्या तासात दोघं पांचाळच्या प्रिंटिंग प्रेसपाशी पोहोचले. प्रेस अजून बंदच होती. पण संभादादांकडून आलेला माणूस म्हटल्यावर केशवला अध्र्या रात्रीही प्रेसमध्ये शिरण्याची मुभा होती. शेजारच्या गल्लीतून दोघं प्रेसच्या मागल्या दाराशी गेले. ते दारही बंद होतं. केशवनं वर पाहून ‘चिरागभाईऽ’ म्हणून हाक मारली. पांचाळ वरच्या मजल्यावरच राहायला होता. दिनेशला ही सगळी माहिती नवीन होती. हाक ऐकून पांचाळ बाहेर आला आणि यांच्याकडे पाहून हातानं ‘थांबा’ अशी खूण करून पुन्हा आत गेला. पांचाळचं चौथी- पाचवीतलं पोरगं खिडकीशी आलं आणि यांच्याकडे पाहत उभं राहिलं. पांचाळ पुन्हा बाहेर आला. त्यानं वरूनच यांच्या दिशेने मागच्या दाराच्या कुलपाची किल्ली टाकली आणि म्हणाला, ‘‘दरवाजे के बाजूमेंच रखा है, ले ले और खाली कुंडी लगा ले।’’

‘‘ताला किधर रखूं?’’ किल्ली झेलून ती दिनेशकडे देत केशवनं विचारलं.

‘‘कुंडी में अंदरसे लटका दे, ताला और चाबी दोनो।’’ असं म्हणून पांचाळ आत निघून गेलासुद्धा!

त्यानं पैशांचा काहीच विषय काढला नाही हे पाहून केशवला हायसं वाटलं. दरम्यान दिनेशनं दार उघडलं होतं. केशव दोन पावलं आत गेला. दाराच्या डाव्या बाजूला ठेवलेल्या दोन मोठय़ा प्लॅस्टिकच्या पिशव्या त्यानं उचलल्या आणि तो बाहेर आला. दिनेशनं कुलूप- किल्ली आत कडीला अडकवलं आणि दार लोटून घेतलं. केशवनं पिशव्या दिनेशकडे दिल्या आणि दोघं निघाले.

दिनेशला मागच्या सीटवर बसल्या-बसल्या त्या पिशव्यांमध्ये डोकावून पाहण्याचा अतिशय मोह होत होता. आजचा हा असा दिवस उजाडेल याची त्याला महिनाभरापूर्वी तिळमात्रही कल्पना नव्हती. ‘केवळ जानगुडेसाहेबांमुळेच!’ तो स्वत:शी म्हणाला. त्यानं ठरवून टाकलं- रात्री प्रोफाइल-फोटो आणि स्टेटस दोन्ही बदलायचं, साहेबांचे आभार मानायचे. स्टेटसमध्ये थेट साहेबांचं नाव टाकायचं या कल्पनेनंच तो मोहरला. बदललेलं स्टेटस आणि फोटो सर्वात आधी सापत्नेकरकाकांना दाखवायला त्याला आवडलं असतं.

पप्पांनीही ते पाहिलं तर बेस्ट होईल, आपलं पुढलं काम जरा सोपं होईल, असंही त्याला गुपचूप वाटून गेलं.

केशवचं मनही गुपचूप त्या पिशव्यांभोवतीच घुटमळत होतं. पण त्याला प्रोफाइल- फोटोची वगैरे चिंता नव्हती. योग्य जागी, योग्य ते फोटो झळकणार होतेच. आजच्या कार्यक्रमाला जानगुडेसाहेबांसोबत धायरीकरसाहेबही येणार असल्याचं त्याला कळलं होतं. राज्याच्या पार्टीप्रमुखांच्या हस्ते उद्घाटन म्हणजे तिथे पेपरवाले येणार, चॅनलवाले येणार; बस्स! हेच त्याला हवं होतं. आजचा दिवस त्याच्या राजकीय आयुष्यातला पहिला ‘माईलस्टोन’ ठरणार होता! आप्पांना ७००-८०० रुपयांच्या पेट्रोलची खरी किंमत लक्षात आणून देणारा होता! त्यापुढे प्रोफाइल-फोटो वगैरे म्हणजे अगदीच किरकोळ गोष्ट!

कॉलेज- चौकातल्या सिग्नलचा पिवळा दिवा लाल होता होता केशवनं खुशीत बाइक पुढे दामटली. दोघं ग्राऊंडवर पोहोचले. एका कोपऱ्यात एक तीन चाकी टेंपो, दोन-चार बाईक्स, लुना, सायकली वगैरे उभ्या होत्या. तिथेच शेजारी केशवनं आपली बाइक लावली. उद्घाटनाचा स्मारकाचा स्तंभ फुलांनी सजवण्याचं काम सुरू होतं. मुख्य स्तंभ आणि खालची पितळी पाटी दोन्ही झाकलेलं होतं. पाटीवरचा मजकूर तयार होतानाची संभादादांच्या ऑफिसमधली चर्चा केशवनं दाराबाहेर उभं राहून ऐकलेली होती. स्तंभाच्या शेजारीच कनात टाकलेली होती. छोटं स्टेज उभारलेलं होतं. स्टेजच्या एका कडेला प्लॅस्टिकच्या लाल खुच्र्याचे ढीग होते. शंभर-दीडशे माणसं तरी सहज बसतील इथे- केशवनं अंदाज घेतला.

तो कनातीतून बाहेर आला. संभादादांचे वडील आणि माजी नगरसेवक दिवंगत रायजी शिंदे यांच्या स्मारकाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संध्याकाळी होणार होता. ग्राऊंडच्या प्रवेशद्वारापाशी आणि कनातीच्या प्रवेशद्वारापाशी असे दोन ठिकाणी कार्यक्रमांच्या फ्लेक्ससाठी बांबू ठोकून झाले होते. पांचाळच्या प्रेसमधून आणलेले दोन फ्लेक्स त्या दोन ठिकाणी लावायचे होते. केशवनं दिनेशकडून एक पिशवी घेतली, दुसऱ्या पिशवीसहित त्याला ग्राऊंडच्या प्रवेशद्वाराकडे पिटाळलं आणि तो कनातीच्या प्रवेशद्वारापाशी काम करणाऱ्या मजुरांकडे वळला. त्यानं फ्लेक्स चढवण्यासंबंधीच्या काही सूचना देऊन तो तिथेच उभा राहिला. आता तो काम स्वत:च्या देखरेखीखाली पूर्ण करून घेणार होता. त्याला उचंबळून आलं. पण ते आपल्या चेहऱ्यावर दिसू न देता तो वरकरणी मख्खपणे तिथे उभा राहिला. इतक्यात संभादादांचा फोन आला.

‘‘हां, कुठेयस तू?’’

‘‘ग्राऊंडवरच आहे, दादा.’’

‘‘हां, हे बेस्ट झालं. हे बघ, एक काम करायचं. तिथे माईकवाला आला असेल, तो एक माणूस बरोबर देईल, त्याला घेऊन सर्किट-हाऊसवर जायचं. गाडी आणलीय का?’’

‘‘हो, दादा.’’

‘‘हां, मग त्याला घेऊन लगेच नीघ. सर्किट-हाऊसला ए.सी.चा काय तरी प्रॉब्लेम झालाय. धायरीकरसाहेब बारापर्यंत येतील. त्याच्या आत तो रिपेअर झाला पाहिजे. काय ? तू उभं राहून करून घे ते काम.’’

‘‘दादा, पण इथे..’’

‘‘तिथे कोण आहे तुझ्याबरोबर?’’

‘‘दिनेश..’’

‘‘हां, मग त्याला सांगून जा तिथलं काय काम असेल ते. लगेच निघ.’’

केशव ‘‘हो, दादा.’’ असं म्हणेपर्यंत पलीकडून संभादादांनी फोन कट केलासुद्धा.

केशव मनातून जरा खट्ट झाला. इकडे मजुरांनी पिशवीतून फ्लेक्स बाहेर काढला होता. तो वर चढवायला त्याच्या वरच्या दोन टोकांशी ते सुतळ्या बांधत होते. फ्लेक्स चांगला दणदणीत होता. घडीच्या आतल्या फोटोंच्या चौकटी, काही अक्षरं मधूनच दृष्टीला पडत होती. पण आता ते न्याहाळत बसायला केशवला फुरसत नव्हती. फोन खिशात टाकून तो जरा पाय ओढतच बाइककडे गेला. माईकवाल्याच्या माणसाला घेऊन, ग्राऊंडच्या प्रवेशद्वारापाशी दिनेशला काही सूचना देऊन तो तिथून निघाला.

ए.सी.चं काम उरकेपर्यंत साडेबारा वाजले. केशव तिथून निघणार तेवढय़ात धायरीकरसाहेब आणि संभादादा तिथे येऊन पोहोचले. दादांना लांबूनच नमस्कार करून सटकायचा केशवचा विचार होता. पण दादांनीही लांबूनच हात करून त्याला थांबण्याचा इशारा केला. सगळा लवाजमा सर्किट-हाऊसमध्ये लुप्त झाला. केशव चुळबुळत बाहेर उभा राहिला. १५-२० मिनिटांनी दादांच्या पी. ए. नं बाहेर येऊन त्याला ‘चहा घेऊन तू गेलास तरी चालेल’ असं सांगतलं. केशव हतबुद्ध होऊन त्याच्याकडे पाहत राहिला. पण पुन्हा काही काम उपटायच्या आत इथून निघालेलं बरं असा विचार करून त्यानं चहा यायच्या आधीच तिथून काढता पाय घेतला.

तीन सिग्नल्स, पाच किलोमीटर आणि वाहनांचा मुरंबा यांतून वाट काढत तो पंधराव्या मिनिटाला कॉलेज- चौकातून डावीकडे वळला. समोर पन्नासेक मीटरवरच उद्घाटनाचं ग्राऊंड. तिथली लगबग आता जरा वाढलेली वाटत होती. प्रवेशद्वारापाशी झळकणारा फ्लेक्स लांबूनच त्याला दिसला. त्याला परत एकदा उचंबळून आलं. काही सेकंदांतच तो तिथे पोहोचला. बाइक एका कडेला लावून झपाझप पावलं टाकत फ्लेक्सच्या समोर जाऊन उभा राहिला. फ्लेक्सवरून त्यानं झरझर नजर फिरवली आणि तो गोंधळून गेला..

तसाच धावत तो कनातीपाशी आला. तिथेही तसाच फ्लेक्स दिमाखात झळकत होता- सुरुवातीला पार्टीचं मोठय़ा अक्षरातलं नाव, शेजारी पार्टीचे राष्ट्रीय प्रमुख यादवजी यांचा मोठा फोटो, मग मध्यात स्मारकाचा फोटो, खाली जरा छोटय़ा साईझचे धायरीकरसाहेब आणि जानगुडेसाहेब, त्याहून जरासे छोटे संभादादा शिंदे आणि मग सर्वात खाली ‘ताज्या दमाच्या’ कार्यकर्त्यांची रांग- आप्पा सुतार, नितीन सुतार हे दोघं भाऊ, दीपक पांडे, रतन कुलकर्णी, कर्तार.. साजन पण होता!!! पण त्याचं आणि दिनेशचं नाव कुठेच नव्हतं.

त्यानं सैरभैर होऊन इकडेतिकडे पाहिलं. त्याला दिनेश कुठे दिसला तर हवा होता.. किंवा नकोच होता!
प्रीती छत्रे – response.lokprabha@expressindia.com