कथा – द्वितीय क्रमांक
बर्व्यांकडे तेव्हा माझे दोन वार होते. एक बुधवार आणि दुसरा शुक्रवार. बर्वे गावातलं बडं प्रस्थ. तालेवार असामी. लाकडाची वखार, जोडीला सावकारी, सरपंचासोबत ऊठबस. गावात त्यांचा फार दरारा. बोलणारा त्यांच्याशी अगदी अदबीने बोले. पोरंटोरं तर त्यांच्यापुढे उभीच राहात नसत. सहा फूट उंची, पीळदार शरीर, गौरवर्ण, कोकणस्थी निळे डोळे, भरघोस मिशा, अंगात तलम अंगरखा व परण, त्यावर सुगंध शिंपडलेला.. पायात नक्षीच्या चढावा, दोनदोन-तीनतीन अंगठय़ा, मनगटात कडं, गळय़ात गोफ, कानात भिकबाळीची शोभा, डोक्यावर मखमली टोपी, हातात बुट्टेदार काठी.. अशा रुबाबात स्वारी चालू लागली की बघणाऱ्याला धडकीच भरे. तो आपसूकच बाजूला सरून वाट करून देई. बव्र्याचा व्यवहार सरळसाधा. अडीनडीला कुणाला नाही म्हणणार नाहीत; पण ठरलेले व्याज कधी सोडणार नाहीत. त्यांनी कधी कुणाच्या परसातला पाला उचलला नाही; पण वेळ आल्यावर माळावरची पालंही उस्कटून टाकायला मागेपुढे पाहिलं नाही.

मी तेव्हा सातवीत होतो, असेन तेरा-चौदाचा. वडिलांना जाऊन तीन-चार र्वष झालेली. आई चार घरची कामं करून पोटापाण्याची व्यवस्था करी. मीही इकडचीतिकडची कामं करून चार पसे मिळवी. गावातले पोष्टमन दुसऱ्या गावात तार पोहोचवायला नाखूश असत. मी चार कोस चालत जाऊन तिथे तार पोहोचवायचो. दोन आणे मिळत एका तारेपाठी तेव्हा; पण रोजच्या रोज अशा कितीशा तारा असणार? मग कुणाचे दळण आणून दे, कुणाची ओझी उचल, अशीही कामे मी करायचो. तेवढीच आईला मदत; पण वाढत्या वयाची वाढती भूक शमवणे त्यात जमेना. तेव्हा आई ओळखीत शब्द टाकून वार शोधू लागली. सहा मिळाले, तशी बव्र्यानी त्यांच्याकडेच आणखीन एका वाराची सोय करून माझा आठवडा पूर्ण केला.

बव्र्याकडे मी संध्याकाळी सातच्या सुमारास जात असे. गेल्यावर हातपाय धुऊन देवापुढे शुभं करोती म्हणे, संध्या करी, निरांजन ओवाळून उदबत्ती पेटवी. अर्धा तास यात जात असे. मग बर्वेकाकूंना स्वयंपाकात काही मदत हवी का, ते पाही; पण त्यांना गरज नसे. स्वयंपाकाला त्यांच्याकडे बाई होती. मग त्यांचा धाकटा मुलगा दामोदर नेमका मला शोधत येई.

‘‘श्याम, मला जरा गणितात मदत कर ना.’’ तो आर्जव करी.

दामू माझ्या एक वर्ष मागे होता. अभ्यासात बेताचाच. गणिताचे नि त्याचे वाकडे. मग तो मला गळ घालायचा. मी हुशार. भराभर त्याची गणिते सोडवून देई. याचे काकूंना भारी कौतुक. त्या कधी खारीक, तर कधी बदाम मला देत. अभ्यास नसला तर आम्ही झोपाळय़ावर बसून गप्पा मारत असू किंवा झोके घेत श्लोकांच्या भेंडय़ा खेळत बसू. इतक्यात त्याच्या वडिलांच्या येण्याची चाहूल लागे. ते आल्यावर गडीमाणसे लगबगीने जेवायची तयारी करीत. पाटावर बसण्यापूर्वी ते देवघरात नजर टाकीत. तेव्हा माझ्या छातीत धडधडू लागे. निरांजन अजूनही तेवत असे. ते पाहून त्यांचा उग्र चेहरा थोडा सौम्य होई. निरांजनातलं तेल संपू नये यासाठी मी डोळय़ात तेल घालून त्यावर लक्ष ठेवी. त्यांची बाहेर जेवणे चालली असताना माजघरात आम्हा मुलांच्या पंगती बसत. कधीकधी ते मला श्लोक म्हणायला सांगत. पोटात कावळे ओरडत असत आणि मी समोरच्या ताटाकडे लक्ष ठेवून, हात जोडून मोठय़ाने श्लोक म्हणून दाखवी. कधी त्यांचे एकाच श्लोकाने समाधान होई, तर कधी श्लोकांच्या पंगतीच्या पंगती मला उठवाव्या लागत. बऱ्याचदा मुलांची पंगत उठून जाई आणि जेवणारा मी एकटाच उरे. पाणी तरळायचं तेव्हा डोळय़ांत.

आईजवळ मी माझं मन मोकळं करी. मी विचारी, ‘‘आई, किती दिवस मी हे असं दुसऱ्याकडे जेवायचं?’’

आई पटकन माझ्या तोंडावर हात ठेवी. ‘‘असं बोलू नये रे, श्याम.’’ ती माझी समजूत घालायचा प्रयत्न करायची, ‘‘अरे, ते आहेत म्हणून आपण दोन घास खातोय. आपले अन्नदाते आहेत ते.’’

‘‘पण मग मीच का असं दुसऱ्याकडे जेवायचं?’’

‘‘आपलं नशीब! दुसरं काय? तुझ्या वडिलांना देवाने लवकर बोलावून घेतलं आणि तुझ्या पावलांना अन्नासाठी वणवण फिरावं लागतंय. कुणाच्या का घरी असेना, पण माझी मुलं भुकेला दोन घास खाताहेत, हेही मला मेलीला काय कमी सुख आहे?’’

‘‘पण असं किती दिवस चालणार?’’

‘‘अरे, थोडे दिवस. तुला काय आयुष्यभर वारावर थोडंच जेवायचं आहे? उद्या तू मिळवता झालास की हा हा म्हणता सर्व परिस्थिती पालटेल.’’

मला यावर बोलायचं असतं; पण आई आम्हा भावंडांना जवळ घेऊन हळू थोपटायची. गोड आवाजात कविता म्हणायची. त्या लाटांवर स्वार होऊन मी कधी झोपेच्या अधीन व्हायचो, ते मलाच कळत नसे.

* * *

दामलेकाकूंचं घर गावाच्या एका टोकाला होतं. त्यांच्याकडे माझा शनिवार होता. तिथं जायला मला कधी कंटाळा वाटला नाही. त्याला कारणे दोन. एक म्हणजे त्यांच्याकडे संध्या केली नाही तरी त्या कधी रागावत नसत आणि दुसरं म्हणजे त्यांचा मधला मुलगा मोरू माझ्याच वर्गात होता. आमची चांगली गट्टी होती. त्याची आई स्वत: स्वयंपाक करी, आग्रहाने जेवू घाली. निघताना मला ब्राह्मण म्हणून नमस्कार करी. तिथे मला इतका आनंद होई की, मी स्वत:हून हवे तितके श्लोक त्यांना म्हणून दाखवी.

मोरूच्या वडिलांनापण देवानं असंच घाईघाईनं बोलावून घेतलं होतं; पण त्यांनी घराच्या पडवीतच धान्याचं दुकान काढलं होतं. शिवाय, नातेवाईकांचा त्यांना चांगला आधार होता. त्यामुळे दामले मंडळी चांगला पसा बाळगून आहेत, अशी गावात वदंता होती.

पण मला त्याच्याशी काही देणंघेणं नव्हतं. त्यांना माझ्याबद्दल माया होती, आपुलकी होती. तेच मला पुरेसं होतं. काकू जरा वेंधळय़ा होत्या. बोलण्याचा पाचपोच नव्हता त्यांना. इतर बायका त्यांच्याशी फटकून वागत; पण मी मात्र कधी एकदाचा शनिवार येतोय, याचीच वाट पाहात असायचो.

अशाच एका शनिवारची गोष्ट. मी आणि मोरू पडवीत बसून गप्पा मारीत होतो. जेवायला अजून अवकाश होता. तेवढय़ात माझं लक्ष गोठय़ाकडे गेलं. तिथे दावणीच्या मागची नेहमीची मोकळी जागा भरलेली दिसली.

‘‘हे रे, काय?’’ मी तिकडे बोट दाखवून मोरूला विचारलं. तिथं लाकडांचा एक ढीग होता.

‘‘अरे, पावसाळय़ासाठीची तयारी. लाकडं जमवून ठेवलीत. आईने आजच दोन मण लाकडं मागवलीत.’’

मी पुढे झालो. डोळे बारीक करून पाहिले; पण मला काही तो व्यवहार रुचला नाही. लाकडं दोन मण वाटत नव्हती. खात्री करून घेण्यासाठी मी पुन्हा विचारलं, ‘‘किती मण म्हणालास?’’

‘‘दोन मण. का रे?’’ तोही आता भांबावला. पुन्हा मी तो ढीग निरखून पाहिला. माझी खात्रीच झाली.

‘‘शक्यच नाही. ही दोन मण लाकडं नाहीत.’’ मी ठामपणे म्हणालो.

‘‘काय, सांगतोस काय?’’ आता तोही घाबरला. रडकुंडीला आला. ‘‘खात्रीने सांगतोस?’’

‘‘अगदी खात्रीने. अरे, पण तसं कशाला? आपण मोजूनच पाहू ही लाकडं.’’

‘‘पण, आता जेवायची वेळ होत आलीय.. आई बोलावेलच इतक्यात.’’

‘‘जेवायचं काय इतकं घेऊन बसलास तू? इथं तुझ्या आईला फसवलंय. चल, मला मदत कर.’’

‘‘पण, लाकडं तोलायची तागडी कुठाय आमच्याकडं?’’ त्यानं आणखीन एक कारण पुढं केलं.

‘‘अरे, पण, धान्य देता ना तोलून तुम्ही गिऱ्हाईकांना? त्या तराजूनंच तोलू की ही लाकडं. जरा वेळ जास्त लागेल इतकंच; पण शंकेला थारा नको.’’

मी उत्साहानं कामाला लागलो. दुकानाच्या फळय़ा जरी लावलेल्या असल्या तरी तराजू बाहेरच होता. मी त्यात थोडी थोडी लाकडे टाकून तोलू लागलो. मोरूही आपल्या परीनं आता मला मदत करू लागला होता.

वास्तविक या भानगडीत पडायची मला गरज नव्हती. लाकडं कमी भरली काय किंवा जास्त भरली काय, मला काय फरक पडणार होता? माझी ती जबाबदारी नव्हती, की मला कुणी विचारलंही नव्हतं. बरं, या समाजसेवेबद्दल कुणी शाबासकीही देणार नव्हतं. आलोय तसं जेवावं आणि चालू पडावं, हे खरं तर माझं काम; पण कुणाचं नुकसान होतंय म्हटल्यावर मला राहवत नाही. शक्यतो मी त्याला मदत करतो. त्यात माझ्यावर माया करणाऱ्या दामलेकाकूंना कुणी तरी फसवतंय म्हटल्यावर मी गप्प कसा बसणार?

* * *

शेवटी माझीच शंका खरी ठरली. लाकडं दीड मणच भरली. अर्धा मण लाकडं कमी देऊन काकूंना फसवलं होतं. आम्ही ती लाकडं पुन्हा गोठय़ात टाकली. घामाघूम होऊन दम खात पायरीवर बसलो.

‘‘बघ, माझंच म्हणणं खरं ठरलं की नाही?’’ मोरूला मी बोललो.

इतक्यात काकू आम्हाला जेवायला बोलवायला आल्या. आम्ही इतका वेळ काय करीत होतो, याचा त्यांना पत्ताच नव्हता. मोरू तिच्याजवळ जात म्हणाला, ‘‘आई, लाकडं अर्धा मण कमी आहेत. कुणी तरी फसवलं आपल्याला.’’

‘‘हो काकू, व्यवहार जमला नाही तुम्हाला.’’

‘‘अरे देवा!’’ काकू मटकन् उंबऱ्यातच बसल्या. ‘‘आणि मी तर दोन मणांचे पसे देऊन बसले की रे.’’

‘‘कुणाकडून घेतलीत ही लाकडं?’’ मी पोक्त माणसाच्या गांभीर्यानं विचारलं. हेतू हा की, जमल्यास त्या माणसाकडे रदबदली करून अध्र्या मणाचे पसे काकूंना परत आणून द्यावेत.

‘‘बव्र्याकडून!’’ त्यांनी सहजपणे सांगितलं. बाप रे! आता मटकन खाली बसायची पाळी माझी होती. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. या सर्व भानगडीत माझं नाव जर बव्र्याना कळलं तर माझी कंबख्तीच भरली असती. माझ्या आईला त्यांनी काही कामं मिळवून दिली होती. ती त्यांनी काढून घेतली तर? मोठय़ा भावाला शाळेत नादारी मिळत होती, ती केवळ त्यांच्या शब्दाखातर. शिवाय माझेही त्यांच्याकडे दोन वार होतेच की! वर आता आईची बोलणी खावी लागतील, ती निराळीच.

‘‘उद्याच जाऊन बव्र्याना याचा जाब विचारते मी.’’ काकू निग्रहाने म्हणाल्या.

‘‘पण काकू, माझं नाव घेऊ नका. तुम्हालाच शंका आली असं सांगा.’’ मी चाचरत म्हणालो.

पण तिकडे दुर्लक्ष करीत फणकाऱ्याने त्या म्हणाल्या, ‘‘मी कशाला खोटं बोलू? त्या बव्र्याचं मी काही देणं लागत नाही बरं.’’

* * *

नंतरचे चार दिवस अतिशय बेचनीत गेले. कशातही माझं लक्ष लागत नव्हतं. जरा कुठं खुटूक झालं की मला वाटे, बर्वे आले आणि मला दरदरून घाम फुटायचा. शाळेत मोरू तर नेहमीसारखाच वागत होता. त्याला काही विचारायचंही मला धाडस होत नव्हतं. कसाबसा मी आला दिवस ढकलत होतो.

बुधवारी संध्याकाळी मी जेव्हा बव्र्याच्या घरी गेलो, तेव्हा ते झोपाळय़ावर बसून झोके घेत होते. माझंही मन तसंच हेलकावत होतं. एकीकडे बव्र्याचं सुपारी कातरणं चालू होतं. मी मान खाली घालून बाजूने जाऊ लागलो. तसं कातरणं थांबवून ते मोठय़ाने गरजले, ‘‘या, विद्वान या. आपण काय दिवे पाजळलेत ते कळलंय आम्हाला.’’

त्या आवाजाने बर्वेकाकू बाहेर आल्या. इतरही गडीमाणसं घुटमळू लागली. मी शरमलो. नशीब, दामू कुठे दिसत नव्हता.

काकूंनी विचारलं, ‘‘काय झालं एवढं ओरडायला?’’

‘‘ते आम्हाला काय विचारता? याला विचारा की. अरे, समाजसेवाच करायची होती तर स्वत:च्या हिमतीवर करायचीस. लोकांच्या घरी जेवून नव्हे.’’

मी गप्प राहिलो.

तशी काकू माझी बाजू घेत म्हणाल्या, ‘‘अहो, जाऊ द्या हो. उगाच त्याच्यावर ओरडू नका. लहान आहे तो.’’

‘‘लहान? जेवायचं कळतं ना पोटभर? आणि तुम्ही आत जा पाहू. भलत्या गोष्टीत नाक खुपसू नका.’’ काकू बिचाऱ्या हिरमुसल्या होऊन आत गेल्या.

त्या आत गेल्यावर बव्र्यानी पुन्हा आपला मोर्चा माझ्याकडे वळवला. मी तरीही गप्पच होतो. तसे ते आणखीनच रागावले.

‘‘आता का गप्प? त्या दामलिणीला माझ्याविरुद्ध भडकावताना जीभ फारच सल सुटली होती म्हणे तुझी..’’

‘‘पण. पण.. माझ्या मनात तसं काही नव्हतं..’’

‘‘तर, तर.. त्या दामलिणीनं मला सर्व सांगितलंय बरं.’’

मला दामलेकाकूंचा रागच आला. त्या वागल्या ते चुकीचंच वागल्या. बव्र्याना त्या म्हणतात कशा- ‘‘बर्वे भावोजी, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती हो. तुम्ही दोन मणांचे पसे घेऊन दीडच मण लाकडं पाठवलीत. अध्र्या मणाची फसवणूक केलीत हो माझी. श्यामच सांगत होता..’’

आता या काकूंना माझं नाव घ्यायची काय गरज होती? अर्धा मण लाकडं कमी आहेत, एवढाच मुद्दा होता. तेवढाच मांडायचा.

बव्र्याना तो अपमान वाटला. गावात कुणी त्यांच्या नजरेला नजरही देत नसे आणि मी नखाएवढा पोर! सरळ त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप ठेवून मोकळा झालो की! मी वस्तुस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते काहीही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते.

‘‘आणि महाशय..’’ ते ओरडले, ‘‘कुणा विधवेला फसवून पोट भरण्याची बर्वे घराण्यावर अजून वेळ आलेली नाही, समजलं? आम्हाला व्यवहार चांगला कळतो. त्यांना दोन मण लाकडे हवी होती. गणप्यानं दुपारपासून बलगाडीच्या तीन फेऱ्या करून दीड मण लाकडे पोहोच केली. संध्याकाळी बल दमले. गाडी ओढेनात. तसा तो मला म्हणाला, उद्या सकाळी एक खेप करून उरलेली लाकडं पोहोच करतो. म्हटलं, ठीक आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याने लाकडं पोहोच केलीही. आता मला सांग, यात फसवणुकीचा प्रश्नच कुठे येतो? अरे, उभ्या जन्मात मी कसला डाग लावून घेतला नाही आणि तुझ्यामुळे..’’

बर्वे बोल बोल बोलत होते. खाली मान घालून मी उभा होतो. आईच्या कानावर हे सर्व गेलं तर ती मला काय म्हणेल, याचा विचार डोक्यात होता. त्यांना लाकडं मिळाली, ह्य़ांना पसे मिळाले, मधल्यामधे माझे मात्र दामलेकाकूंचे व बव्र्याकडचे दोन्हीही वार बंद झाले. दोन्ही घरचा पाहुणा.. दुसरं काय?
श्रीनिवास मेघ:शाम आठल्ये – response.lokprabha@expressindia.com