‘काहे दिया परदेस’सारख्या मालिकेतलं बनारसमधलं ऐसपैस घर असो की बाजार..

काही काळापूर्वी लोकप्रिय असलेल्या ‘होणार सून मी’ मालिकेतलं गोखल्यांच्या घरातलं चकचकीत किचन असो की गरिबीच्या खुणा दाखवणारं जान्हवीचं माहेरचं घर असो..

गेली नऊ वर्षे लोकप्रियता टिकवून असलेल्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधली सोसायटी असो की ‘गणपती’मधली पौराणिक पाश्र्वभूमी असो..

आपल्यासमोरच्या छोटय़ा पडद्याच्या माध्यमातून जशा लोकप्रिय व्यक्तिरेखा आपल्या मनात घर करतात, तशीच त्यांची घरंही आपल्या मनाचा ताबा घेतात. साहजिकच मालिका लोकप्रिय व्हायला लागते, तसतसं त्यातली घरं, इंटिरियर, एवढंच काय तर त्या घरातली पेंटिग्ज, पडदे, अगदी उशांचे अभ्रे यांचीही चर्चा व्हायला लागते. तसं आपल्या घरातही हवं असं काहींना वाटायला लागतं. त्या त्या मालिकांमधली विशिष्ट घरं त्या मालिकेतली व्यक्तिरेखाच होऊन जाते.

इतक्या सुंदर, सुबक, मोठमोठय़ा घरांत राहणाऱ्या माणसं कम व्यक्तिरेखांचा आपल्याला हेवा वाटायला लागतो.

पण तसं खरंच असतं का?

अजिबात नाही.

मालिकांमधली आपल्याला दिसणारी घरं हा सगळा खरं तर कॅमेऱ्याच्या नजरेचा आणि सेट घडवणाऱ्यांच्या हातांचा खेळ असतो.

महाभारतात नाही का पाणी होतं तिथं जमीन आणि जमीन होते तिथे पाणी आहे, असं वाटलं आणि दुर्योधन फसला.

तसंच काहीसं आहे हे.

आजच्या काळातलं उदाहरणच द्यायचं तर आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना आपण घरातल्या तरुण मुलाची बेडरूम थोडा जामानिमा बदलून आजोबांची बेडरूम म्हणून दाखवतो का?

पण मालिकावाले हे सगळं करतात. वर त्याला पॉझिटिव्ह अर्थाने ‘चीट करणं’ असंही म्हणतात. आणि ही सुंदर फसवणूक आपणही अगदी आनंदाने करून घेतो. कारण कॅमेऱ्याने आपली तशी नजरबंदीच केलेली असते. कॅमेऱ्याआडचं हे सगळं ‘चीटिंग’ खरं तर खूप गमतीशीर आहे. म्हणजे कसं तर ऑफिसमधून निघालेला मालिकेतला हिरो घामाघूम होऊन, दमून  हाश्शहुश्श करीत घरी घेऊन सोफ्यावर टेकतो. घरातलं कुणी तरी त्याला लगबगीने चहा-पाणी आणून देतं. खरं तर हा बिचारा प्रत्यक्षात वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर आलेला असतो. म्हणजे प्रत्यक्षात सेटवर त्याचं ऑफिस आणि घर एकाच इमारतीत वर-खाली असतं.

तर अशी सगळी गंमत. प्रत्येक मालिकेनुसार वेगवेगळी. वेगवेगळ्या मालिकांच्या सेटवर फेरफटका मारल्यावर ती उलगडत गेली.

पहिली चक्कर होती झी मराठीच्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेच्या सेटवर. तसा हा विषय फारसा नवा नाही; पण तरी ती औत्सुक्यपूर्ण आहे. याचं एक कारण म्हणजे या मालिकेतलं घर. मोठय़ा टॉवरमधलं ऐसपैस घर, खोल्यांमधली सजावट असं सगळंच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतं. मालिकेतली गुलमोहर सोसायटी म्हणजे प्रत्यक्षातलं दोस्ती इम्पीरिअर टॉवर. ठाणे शहराच्या घोडबंदर रोडवरील मानपाडा भागात हे टॉवर आहे. यातल्या ग्रेशिया ए या बिल्डिंगमध्ये चौथ्या माळ्यावर गुरुनाथ सुभेदार आणि राधिका सुभेदार यांचं घर. या घरात शिरल्यावर सगळ्यांची लगबग दिसू लागली. ‘स्पॉटदादा, आरसा द्या जरा’, ‘टेबल हलवा तिथून’, ‘क्लोज घेऊ या आता’ अशी वाक्यं ऐकायला येत होती. हॉलमध्ये राधिकाच्या क्लोज अप सीनचं शूटिंग सुरू होतं. राधिका ही व्यक्तिरेखा साकारणारी अनिता दाते तिच्या त्या सीनची आधी तालीम करत होती. एकदा तालीम झाल्यावर तो सीन वन टेक ओके झाला. ते बघून झाल्यावर घरात एक फेरफटका मारला. अथर्व, राधिका-गुरुनाथची खोली, स्वयंपाकघर असं सगळंच चकचकीत दिसत होतं. या घरात खरं तर तीन बेडरूम्स आहेत. मालिकेत मात्र दोनच बेडरूम्स दाखवतात. तिसऱ्या बेडरूमचा उपयोग मालिकेची तांत्रिक साधनसामग्री ठेवण्यास होतो. भरपूर उजेड, वारा असलेलं हे सुभेदारांचं घर प्रसन्न वाटतं. मालिकेत सुभेदारांचे अनेक शेजारीसुद्धा दाखवले आहेत. त्यांची घरं दाखवताना मात्र मालिकांच्या भाषेत ‘चीट’ केलं जातं. इथे ‘चीट’ या शब्दाचा अर्थ नकारात्मक नाहीय. याच बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर आणखी एक फ्लॅट आहे. इथे शनाया आणि नाना-नानी, रेवती, गुप्ते यांची घरं दाखवली जातात. यातला फरक स्पष्टपणे दिसावा यासाठी घरांच्या मुख्य दरवाजाची दिशा बदलली जाते. तसंच कॅमेराचा अँगल बदलला जातो. दोन फ्लॅट्समध्ये इतकी घरं दाखवायची म्हणजे खरं तर कला असते. शिवाय ते तसं केलंय हे भासू न देता सांगायचं म्हणजे आणखीच कौशल्य. बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर तुलनेने कमी शूटिंग असल्यामुळे तिथे कलाकार त्यांचं शूटिंग नसताना विश्रांती घेत असतात.  या दोन्ही घरांच्या शेजारी लोक राहतात. इतर दिवशी ते त्यांच्या कामात व्यग्र असतात; पण रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी मात्र या शूटिंगला हजेरी लावतात. या घरात रोज जवळपास ३५-४० जणांचा वावर असतो.

मालिकांच्या सेटवर ‘चीट’ केलं जातं. चीट करणं म्हणजे शब्दश: फसवणं; पण मालिकांच्या बाबतीत हा शब्द खरं तर त्यांचं कौशल्य दाखवतो. एकच खोली दोघा-तिघांची दाखवणं ही कलाच आहे. इथे चीट करणं ही मालिकांची गरज असते. मराठीमध्ये याचं प्रमाण जास्त असतं. बजेट हे अतिशय महत्त्वाचं कारण त्यामागे आहे. बजेट कमी असल्यामुळे सेटही तसा आवाक्यातच असतो. त्यामुळे मालिकेच्या एका घरात पाच-सात जण असतील, तर त्या प्रत्येकाचं बेडरूम दाखवणं कठीण असतं. याउलट हिंदूी मालिका. मुळातच हिंदूी  मालिकांमधली घरं म्हणजे मोठे बंगले, हवेली असं दाखवलं जातं. शिवाय त्यांचं बजेटही चांगलं असतं. त्यामुळे तिथे सेट मोठा करणं आणि त्यात प्रत्येकाच्या खोल्या दाखवणं सहज शक्य असतं; पण या सगळ्यात एक मराठी मालिका असा मोठा सेट घेऊन आली आहे. ‘काहे दिया परदेस’. या मालिकेत बनारसमधील हवेली दाखवली आहे. हा सेट अगदी भव्य नसला तरी नेहमीच्या मालिकांपेक्षा मोठा नक्कीच आहे. म्हणूनच मोर्चा वळवला तो मालाडमधल्या मढ आयलंडला.

नुकतंच शिव-गौरीचं लग्न झालंय. गौरी आता तिच्या सासरी बनारसला गेली आहे. बनारसचा माहोल, गंगा नदी, तिच्या किनारी असलेलं मंदिर, तिथल्या हवेल्या असं सगळं चित्र सध्या मालिकेतून बघायला मिळतं. शिवचं बनारसचं हे घर वसलंय चक्क मुंबईत. मालाडच्या मढ परिसरात ओशो स्टुडिओमध्ये बनारसचा सेट उभा केलाय. तिथे एका छोटय़ाशा दारातून आत गेल्यावर सुरुवातीला डोळ्यांपुढे फक्त अंधार होता. मग आणखी थोडं पुढे आल्यावर बनारसमधल्या हवेलीबाहेरील परिसर दिसला. वेगवेगळी दुकानं, तिथल्या भाषेतील काही होर्डिग, बोर्ड असं सगळं काही समोरच होतं. त्यानंतर प्रवेश केला तो शुक्ल परिवाराच्या घरात. घरात शिरल्यावर लगेच जो मोकळा भाग असतो त्याला दालन म्हणतात. या दालनात नेहमी गप्पा-गोष्टींचे किंवा एकत्र येऊन काही सांगायचे प्रसंग चित्रित होत असतात. शिव-गौरी आणि अम्मा-बाबूजींची खोली निश्चित असते. या हवेलीत आणखी एक खोली आहे. ही एक खोली दादी, छुट्टन चाचा, शिवचा मोठा भाऊ-भावजय या सगळ्यांची खोली म्हणून दाखवली जाते. इथे फिरताना एखाद्या हिंदी मालिकेच्या सेटवर फिरल्यासारखं वाटत होतं. हा सेट उभारताना बनारसच्या बारीकसारीक गोष्टींचा विचार केल्याचं जाणवत होतं. भिंतींच्या मध्यभागी आडव्या स्वरूपात विशेष नक्षीकाम असणं हे तिथल्या घरांची खासियत आहे. ती या घरात होती. मोठय़ा आणि ऐसपैस खोल्या हेही या हवेलीचं वैशिष्टय़. त्याच वेळी शिव, गौरी, अम्मा असं सगळ्यांचा एक प्रसंग चित्रित केला जात होता. तो झाल्यावर सगळे पुन्हा आपापल्या मेकअप रूममध्ये जाऊन बसले. गौरी मात्र जरा वेळ दालनात बसली होती. काही वेळानंतर तीही तिच्या खोलीत गेली. हवेलीतलं देवघर अतिशय प्रसन्न होतं. स्वयंपाकघर तर आणखी सुंदर. याचं वैशिष्टय़ असं की इथे एक चूलही आहे. छोटी मोरी आहे. चुलीवरील प्रसंग मालिकेत आजपर्यंत फारसे दाखवले नसले तरी पुढे काही भागांमध्ये ही चूल दिसेल. मालिकेत एकदा बनारसचा बाजार दाखवला होता. छोटय़ा-छोटय़ा गल्ल्यांमध्ये असलेली छोटी दुकाने ही तिथल्या बाजाराची ओळख. हवेलीबाहेर कलाकारांसाठी असलेल्या मेकअप रूमच्या बाहेर एक छोटासा उभा भाग आहे. गल्लीच जणू. तिथे जागेचा पुरेपूर वापर करून बनारसी घरांचा, दुकांनाचा, बाजाराचा अभ्यास करून हा सेट उभारला आहे. मालिकेतले कलाकार स्क्रिप्टचं वाचन करण्यासाठी अनेकदा अंगणात किंवा दालनात एकत्र जमतात. सहा हजार स्क्वेअर फूट इतक्या परिसरात असलेला हा सेट एका महिन्याभरात उभा केलाय. मुंबईतली ही बनारसची हवेली बघण्यासारखी आहे.

स्टार प्रवाहच्या ‘लेक माझी लाडकी’ या मालिकेने चांगलाच जम बसवलाय. यातही चकचकीत बंगला, इंटिरिअर, गार्डन असं सारं काही आहे. मालिका लोकप्रिय आहे ती तिचा विषय, पटकथा आणि संवादांमुळे. पण, यातलं घरही विशेष लक्षवेधी आहे. मढ परिसरातल्या भुल्लर गार्डनमध्ये मालिकेतल्या इरावतीच्या बंगल्याचा सेट आहे. या मालिकेत दाखवल्या जाणाऱ्या बंगल्यात फक्त दोनच बेडरूम्स आहेत. पण मालिकेत गरजेनुसार चार जणांच्या बेडरूम्स दाखवल्या जातात. इरावती-जयदेव यांची खोली महत्त्वाची आहे. इरावती-जयदेवच्या खोलीत जे बाथरूम म्हणून दाखवलं जातं ते बाथरूम नसून तो एका छोटय़ाशा खोलीचा दरवाजा आहे. तसंच त्यांचीच खोली मीराची खोली म्हणूनही दाखवली जाते. मीराच्या खोलीतले प्रसंग चित्रित करताना कॅमेऱ्याचा अँगल बदलला जातो. आणि त्या खोलीच्या रचनेतही थोडे बदल केले जातात. तसंच सानिका आणि सिद्धांत यांच्या खोलीचं आहे. या दोघांची खोली वास्तविक एकच आहे. पण, मालिकेत दाखवताना त्या दोन वेगवेगळ्या खोल्या होतात. या खोलीत जाण्यासाठी एक जिना चढावा लागतो. जिना चढून आत गेलं की ती एंट्री सानिकाच्या खोलीसाठी दाखवली जाते. सानिकाच्या खोलीतल्या पलंगामागे भिंत आहे तर सिद्धांतच्या खोलीतल्या पलंगामागे खिडकी आहे. ज्याची खोली दाखवायची आहे त्यानुसार पलंग हलवला जातो. तसंच त्यानुसार त्यांची खोली सजवलीही जाते. या सेटवर असलेले वेगवेगळे वॉलपीस ही सेटची खासियत आहे. रंगबेरंगी असा हा सेट चांगला सजवलाय. स्वयंपाकघरही नीटनेटकं आणि हेवा वाटेल असं आहे. मालिकेत अधेमधे बंगल्याचा लाँग शॉट दाखवला जातो. म्हणजे लांबून बंगला दाखवला जातो. त्या वेळी बंगल्याच्या आणि अंगणाच्या रचनेचा, आकाराचा अंदाज येतो. अंगणातील झोपाळा, खुच्र्या, हिरवळ अंगणाची शोभा वाढवत होतं. या सेटवर अलीकडेच एका कुत्रीला पिल्लू झालंय. सगळी कलाकार, पडद्याआडची मंडळी त्या पिल्लाची काळजी घेण्यात व्यग्र असतात. तेव्हा मिळालेल्या ब्रेकमध्येही कलाकार लगेच या पिल्लाकडे धावतात. त्या काय हवं-नको ते बघतात. हे पिल्लू सध्या जिथे आहे बंगल्याच्या त्याच भागात कलाकार मंडळी अनेकदा मोकळा वेळ घालवत असतात. कोणी वाचन करतं तर कोणी गाणी ऐकतं.

मालाडमधील मढ, मालवणी हा मालिका, सिनेमांच्या शूटिंगसाठी अतिशय महत्त्वाचा परिसर आहे. हा सगळा पट्टा शूटिंग लोकेशन म्हणूनच ओळखला जातो. इथे अनेक स्टुडिओ, सेट उभारले आहेत. काही बंगलेही शूटिंगसाठी भाडय़ाने दिले जातात. सध्या बरीच मराठी-हिंदी चॅनल्स अस्तित्वात आहेत. त्यांच्या किमान एका तरी मालिकेचं शूट या परिसरात सुरू असतं. मढ-मालवणी जुळी भावंडंच जणू. दोन्ही ठिकाणं वेगवेगळ्या दिशेला असली तरी शूटिंगसाठी दोन्ही सारखीच आहेत.

सोनी चॅनलवर सध्या गाजत असलेल्या ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेचं शूटिंग मालवणीमध्ये सुरू आहे. या सेटची मजा प्रत्यक्षात बघण्यातच आहे. बाहेरून बंदिस्त असं एक गोदाम पाहताना आतून सेट इतका देखणा असेल वाटतच नाही. देव दीक्षित म्हणजे मालिकेच्या हिरोचा बंगला अतिशय सौम्य रंगात, नीटनेटका आणि लॅव्हिश. दीक्षित घराण्याची श्रीमंती झळकावी असाच. लांबलचक हॉल. त्यापुढेच असलेलं डायिनग टेबल आणि त्याच्या बाजूला असलेलं स्वयंपाकघर. सगळंच सुटसुटीत, पण देखणं. देवच्या आईच्या एका सीनचं शूटिंग सुरू होतं. दोन टेकमध्ये हा सीन झाला. लायब्ररी रूम खुणावत होती. वरच्या मजल्यावर मधोमध लायब्ररी रूम आहे. तिच्यात पुस्तकं ठेवण्यासाठी केलेलं शेल्फ आकर्षक होतं. लायब्ररी रूमच्या एका बाजूला देवची खोली. त्याच्या खोलीतही एक छोटासा जिना आहे आणि वर गॅलरीसारखा छोटा भाग आहे. हे या खोलीचं वेगळंपण. लायब्ररीच्याच दुसऱ्या बाजूला सोनाक्षीची माहेरची खोली. तिथून थोडं आत गेलं की, तिच्या माहेरच्या घराचा हॉल. तिथून आणखी पुढे गेलं की तिच्या आई-बाबांची खोली. तिच्या खोलीपासून तिचं माहेर सुरू होतं. ते जिथे संपतं तिथे खाली उतरलं की देवच्या ऑफिसचा सेट लागतो. मालिकेत दिसणारा गार्डन एरिआ हा हॉलच्या बाजूलाच आहे. म्हणजे तो प्रत्यक्षात आतमध्येच आहे. थोडक्यात काय, तर एकाच सेटमध्ये दोन घरांचा सेट उभारला आहे. मोकळ्या वेळेत कलाकार मंडळी गार्डन, लायब्ररी रूम किंवा हॉलमध्ये गप्पागोष्टी करत बसतात. काही जण लायब्ररी रूममध्ये पुस्तक वाचत बसतात.

मढ आणि मालवणीप्रमाणेच फिल्म सिटीसुद्धा मालिकांच्या शूटिंगसाठी लोकप्रिय आहे. गोरेगावातील दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजे फिल्म सिटी ही शूटिंगसाठी हक्काची जागा. गेली अनेक र्वष चालणाऱ्या अनेक मालिकाचं इथे नित्यनियमाने शूटिंग करतात. फिल्म सिटीमध्ये एखाद्या मालिकेच्या सेटचा पत्ता तपशीलवार सांगणं म्हणजे थोडंसं कठीण. काही मैदानांची नावं, ठिकठिकाणी असलेल्या बडय़ा कंपन्यांचे ऑफिस अशा खुणा सांगितल्या जातात. कधीकधी तर एखाद्या मालिकेचा सेट अतिशय लोकप्रिय असेल तर त्या मालिकेच्या मागे किंवा त्या मालिकेच्या बाजूला असं सांगितलं जातं. फिल्म सिटीत गेल्यावर ‘मस्ट व्हिजिट’ असा एखादा सेट असेल तर तो ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतली गोकुळधाम सोसायटीचा.

गेली नऊ वर्षे सर्व वयोगटात प्रचंड लोकप्रिय असलेली ही मालिका.  तिच्यातल्या गोकुळधाम सोसायटीबद्दल अनेकांना कुतूहल असतं. या मालिकेच्या सेटची एक गंमत आहे. बाहेरून दिसणारी सोसायटी एका ठिकाणी आणि सोसायटीच्या आत असलेलं प्रत्येकाचं घर, क्लब हाऊस दुसऱ्या ठिकाणी. सोसायटीचं आवार हा मालिकाप्रेमींसाठी जास्त आवडीचा आहे. या सोसायटीचे बारकावे योग्य रीतीने हाताळले आहेत. प्रत्येकाच्या घराबाहेर त्या-त्या घराचं वैशिष्टय़ सांगणाऱ्या चिन्हात्मक वस्तूही आहेत. गॅलरीतून आत जाताना दार उघडले की िभत आहे. पण, मालिकेत दाखवताना गॅलरीतून आत आलं की त्यांच्या घरातले प्रसंग दाखवले जातात. सोसायटीच्या परिसरात एक मंदिरही आहे. हे मंदिर अनेकदा मालिकेत दाखवलं जातं. या मंदिराची एक गंमत आहे. या मंदिराची देखभाल करणाऱ्या एका भटजीने सेटच्या आत जाताना अडवलं. कुठे चाललात, कोण आहात वगरे विचारलं. सगळी उत्तरं दिल्यावर आत सोडलं. नंतर कळलं की, मंदिराची देखभाल करण्यासाठी ते २४ तास तिथे वास्तव्यास असतात. मंदिरासोबत ते सेटचीही काळजी घेतात. ते कधीकधी मालिकेच्या भागांमध्येही दाखवले जातात. या सेटवर शूटिंग असो वा नसो ते येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करतात. समाधानकारक उत्तरं मिळाल्यानंतरच लोकांना सेटवर सोडतात. ‘तारक मेहता..’च्या सेटची आणखी एक खासियत आहे. या मालिकेत सोसायटीतल्या प्रत्येक घराच्या वेगवेगळ्या खोल्या दाखवल्या आहेत. जेठालालच्या घरात स्वयंपाकघरही दाखवलंय. इतरांच्या घरात मात्र बाहेरची खोली म्हणजे हॉल आणि बेडरूम असं दाखवलं आहे. या सगळ्या खोल्या खूप मोठय़ा आहेत. एकेकाची घरं बघता बघता एक गोष्ट लक्षात येत होती की, या सगळ्यांची घरं एकमेकांना जोडली गेलेली आहेत. म्हणजे एकाच्या बेडरूममधून दुसऱ्याच्या घरात जायला एंट्री. तर एखाद्या स्वयंपाकघरातून दुसऱ्याच्या बेडरूममध्ये जायचा रस्ता. हा भूलभुलैया मजेशीर होता. याच ठिकाणी क्लब हाऊसही आहे. कलाकारांना शूटिंगमधून थोडा मोकळा वेळ मिळाला की सगळे क्लब हाऊसमध्ये जाऊन वेगवेगळे खेळ खेळतात. सोसायटीच्या परिसरातही मंदिराजवळील भागात अनेक जण शतपावली करत असतात. तसंच स्क्रिप्टचं रीडिंग सोसायटीच्या मधल्या मोकळ्या भागात करत असतात. सेटवरून निघताना पर्यटकांचा एक मोठा ग्रुप या सेटची सर करण्यासाठी येत असताना दिसला.

‘तारक..’च्या सेटवरून थोडंसंच पुढे ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या स्टार प्लसच्या मालिकेचं शूटिंग सुरू होतं. या मालिकेचं घर हवेलीसारखं आहे. भव्यदिव्य, आकर्षक सजावट, टापटीपपणा सगळंच देखणं वाटावं असं. उदयपूरला राहणाऱ्या सिंघानिया कुटुंबाचं घरंही तसंच श्रीमंत दिसतं. या मालिकेतही मुख्य पात्रांच्या खोल्या दाखवल्या जातात. इतरांच्या खोल्या प्रसंगानुसार तयार केल्या जातात. मालिकेतल्या अक्षरा, नक्ष, नायरा अशा मुख्य पात्रांच्या खोल्या मोठय़ा आणि त्यांच्या स्वभाववैशिष्टय़ांनुसार सजवल्या आहेत. या एकाच सेटवर अनेकदा तीन ठिकाणी शूटिंग सुरू असतं. हॉल, डायनिंग टेबल, स्वयंपाकघर असं दिल्ली स्टाइलने सजवलं आहे.

काही वर्षांपूर्वी फिल्म सिटीमध्ये मराठी मालिकांच्या चित्रीकरणाची संख्या तशी कमी होती. गेल्या काही काळात ती झपाटय़ाने वाढली आहे. मालिकेच्या सेटसाठी मोठी जागा लागत असल्यामुळे सहसा फिल्म सिटीची निवड केली जाते. कलर्स मराठीच्या ‘गणपती बाप्पा मोरया’चा सेटही फिल्म सिटीतच आहे.  ‘गणपती..’चा सेट मूळ रस्त्यावरून थोडं खाली उतरून उभारलेला आहे. सेटबाहेरील व्यवस्था अतिशय चोख होती. सगळ्या ऋतूंपासून बचाव करण्यासाठी योग्य ती सोय मालिकावाल्यांनी केली होती.

पौराणिक मालिकांच्या सेटबद्दल प्रेक्षकांच्या मनात नेहमीच कुतूहल असतं. अशा मालिकांमध्ये आता व्हीएफएक्स इफेक्ट्स, क्रोमा अशी तंत्रज्ञानं असली तरी त्यांचे सेट आकर्षक असतातच. या सेटवर किमान ७० जण रोज असतात. या सेटवरच क्रोमाचासुद्धा सेट आहे. शिवाय इथेच एडिट रूमदेखील आहे. त्यामुळे या सेटवर कलाकार, तंत्रज्ञ, पडद्याआडचे सगळे जण असे बरेच लोक असतात. या सेटवर कमालीची स्वच्छता होती. कुठेही कागदाचा कपटा नाही की चहा-कॉफीचे थर्माकॉल-प्लॅस्टिकचे रिकामे ग्लास नाहीत. पाण्याच्या रिकाम्या बाटल्याही नीट कचरापेटीत टाकल्या जातात.  या सेटच्या अवतीभवती भरपूर झाडं आहेत. इथे अनेक प्राण्यांचा वावर असतो. माकड, बिबटे, साप, कुत्रा, मांजर असे काही प्राणी इथे येत-जात असतात. त्यामुळे सेटवरील सगळ्यांनी स्वच्छतेबद्दल खूप काळजी घेतली आहे. मालिकेतल्या स्त्री कलाकारांच्या मेकअपरूममध्ये बाथरूमच्या दारावर एक सूचना आढळली. मालिकेतल्या स्त्री व्यक्तिरेखा नऊवारी साडीत असल्यामुळे बाथरूममध्ये फरशांवर पाणी सांडल्यास ते पाणी पुसावे लागेल यासंबंधीची ती सूचना होती. अशाच आणखी काही सूचना बाहेरही होत्या. मोबाइल बंद ठेवणे, कचरा करू नये, तंबाखू-सिगारेट ओढू नये असे काही नियम तेथे होते आणि त्या नियमांचे पालन न करणाऱ्याला दंड आकारला जाईल असंही त्यात होतं. असाच टापटीपपणा सेटच्या आवाराबाहेर दिसून आला. या मालिकेचा सेट अतिशय भव्य होता.  पौराणिक काळी भिंती नसायच्या. त्यामुळे आतही तो सेट अतिशय विस्तारलेला आहे. शिवालय, पार्वती कक्ष, गणपती कक्ष, कार्तिक कक्ष, अतिथी कक्ष, ध्यान कक्ष असं सगळं आहे. पार्वती कक्ष आणि कार्तिक कक्ष हे एकाच ठिकाणी तयार केले जातात. शिवालयातील प्रसंगांच्या वेळी संपूर्ण शिवालय दिव्यांनी सजवलं जातं. शिवालयात अँटिक मूर्तीचे नमुनेही आहेत. शिवालयात मनसा आणि कैकसीच्या एका प्रसंगाचं शूटिंग सुरू होतं. मनसा साकारलेली तृष्णिका शिंदे अतिशय उत्तम अभिनय करत होती. हे शूटिंग बघायला काही प्रेक्षक मंडळीही आली होती. गणपती झालेल्या स्वराज येलवेचं शूटिंग व्हायला जरा वेळ असल्यामुळे तो मेकअप करून खेळत होता.

नंदनवन अतिशय प्रसन्न, देखणं, उत्साहवर्धक असं आहे. इथेच एक  झोपाळाही आहे. मालिकेतल्या पार्वती आणि तिच्या मैत्रिणी म्हणजे जया विजया या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री ब्रेकमध्ये नंदनवनात रमतात. तिथेच त्यांचं अनेकदा फोटोशूटही असतं. गणपती बाप्पाचं स्नानकक्ष हे या सेटचं आणखी एक आकर्षण आहे. हे स्नानकक्ष जमिनीला म्हणजे लाकडी फ्लोअरिंगला जोडलं गेलेलं असून बंद असतं. स्नानकक्षातील प्रसंग चित्रीत करायचे असतील तेव्हा ते उघडलं जातं. शिवालय, पार्वती कक्ष, कार्तिक कक्ष, अतिथी कक्ष, गणपती कक्ष, ध्यान कक्ष असं सगळं आजूबाजूला आहे. शिवाय या सगळ्याचं विभाजन करायला इथे भिंती नाहीत. त्यामुळे हा सेट अतिशय मोकळा आहे; पण तितकाच बंदिस्तही आहे. एसीची सोय असूनही मोठमोठाल्या लाइट्समुळे प्रचंड उकाडय़ात कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक काम करत असतात. सेटच्या बाहेर झोपडय़ाही बांधल्या आहेत. पटकथेच्या गरजेनुसार त्या झोपडय़ांचा वापर केला जातो. या सेटच्या आजूबाजूच्या परिसरात झाडंझुडपं असल्यामुळे त्या ठिकाणी अनेकदा भूलोकाचे काही प्रसंगही चित्रित केले जातात.

तर असे हे काही मोजक्या मालिकांचे सेट. विशिष्ट जागेत, विशिष्ट रचना करून कॅमेऱ्याचे विशिष्ट अँगल करून एकाच मालिकेतल्या एकाची बेडरूम आणि त्याच जागेवर पुन्हा रचना बदलून त्याच मालिकेतल्या दुसऱ्याचा हॉल दाखवणं म्हटलं तर अगदी सोपं आणि म्हटलं तर अवघड.. आपल्याला कॅमेरा जे दाखवतो तेच आपण बघतो आणि खरं मानतो. पण त्यामागे असलेल्या या हिकमती लोकांच्या नाना करामती गुंग करून सोडणाऱ्या आहेत, हे मात्र नक्की!

चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com