चॅनेलीय चर्चेचं शीर्षक वाटलं ना तुम्हाला. एकमेकांवर तारस्वरात आगपाखड करणाऱ्या चर्चाच्या वाटेला आम्ही तुम्हाला नेणार नाही. महाराष्ट्राला गौरवास्पद असा सांस्कृतिक वारसा आहे. चित्रपट हा त्याचा अविभाज्य घटक. मराठी चित्रपट तुम्ही पाहिले असतीलच. पण बॉलीवूडसारखा सुपरस्टार तुम्ही मराठीत अनुभवला आहे का? मराठी अभिनिते अभिनयात निपुण आहेतच. पण हिंदीसारखं अढळत्व मराठी हिरोला का नाही. लिहायला निमित्त हवं असं जर्नलिझमवाल्यांना शिकवतात. आमच्याकडेपण ठाशीव निमित्त आहे, नुसतं नाही ‘लार्जर दॅन लाइफ’ आहे. परवा दसऱ्याला बच्चन साहेबांचा वाढदिवस होता. व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज आला. बच्चन साहेबांच्या चित्रपटातल्या वैैविध्यपूर्ण कामांची महती वदणारा होता. त्यांचा वाढदिवस होता ७४वा. त्यांच्या जीवनातल्या ़़विविध टप्प्यांचा नावात अंतर्भाव असणाऱ्या ७५ चित्रपटांचा आढावा घेतला होता. म्हणजे कसं कुटुंब-फॅमिली-परिवार, देशभक्तीपर, स्वातंत्र्य, न्याय, बांधिलकी, व्यावसायिक, शिष्टाचार, संवादकौशल्य, जादुई गोष्टी, सत्ता, देव, चव, नशीब, आत्मविश्वास, आवाज, मैत्री, लक्ष्य, भावना वगैरे. व्हॉट्सअ‍ॅपच्या मेसेजसाठी एवढा सूक्ष्म अभ्यास करतात लोकं, आम्हाला आश्चर्य वाटतं.

शाळा आणि कॉलेजात चित्रपट शिकवत नाहीत म्हणून नाहीतर दहावीलाच आयते समीक्षक

मिळाले असते. मुद्दा तो नाही.

बच्चन साहेबांकडून एवढं शिकण्यासारखं. मग आपल्या मराठमोळ्या नायकांबाबत असे मेसेज वगैरे का येत नाही. मराठी नायकांच्या चित्रपटांचा अभ्यास सोडा, चित्रपट येतो कधी जातो कधी समजतपण नाही. हा आमचा मराठी सुपरस्टार असं म्हटलं की चेहरा डोळ्यासमोर यावा असं काहीच होत नाही. असंख्य गुणी अभिनेत्यांचे चेहरे मनात आणि मेंदूत गर्दी करतात, पण झळाळून निघेल असा एक सुपरस्टार ठसत नाही. हे असं का? बॉलीवूडचं आपण सगळं फॉलो करतो- एरव्ही चारचौघांत नाचायचं म्हटलं की कठोरहृदयी पुरुषही लाजतो. बॉलीवूडमध्ये नायिकेबरोबर झाडांमागे, रम्य ठिकाणी असंख्य गाणी चित्रित होतात. आपल्यासारखी माणसं एकदा एलएफसी घेऊन वर्षांतून एकदा फिरायला जातात. फिरतात, खातात-पितात पण नाचल्याचं ऐकिवात नाही. तरीपण आपल्या सगळ्या चित्रपटांमध्ये खंडीभर गाणी असतात. बरं गाणी कथा पुढे नेतात म्हणावं तर तसंही नाही. संगीतकार व्यक्तीला रोजगार मिळावा या उदात्त हेतूने अनेकदा गाणी होतात. संवादांच्या मध्ये येणारी गाणी स्वतंत्रपणे अल्बम करून ऐकली तरी चालतील अशी परिस्थिती. बॉलीवूडवाले परदेशात चित्रीकरण करतात- मराठी चित्रपटपण जातो परदेशात. ते जात असतील स्वित्र्झलडला, आपण थायलंडला. शेवटी अंथरूण पाहून पाय पसरणार ना. हिंदीवाले दणक्यात प्रमोशन करतात. मग मराठी चित्रपट मागे आहे काय- हळदीकुंकू समारंभापासून ते आटय़ापाटय़ा स्पर्धेपर्यंत कुठेही जाऊन चित्रपटाविषयी मधाळ बोलतात. हल्ली तर म्हणे चित्रपटाचं शूटिंग महिन्याभरात होतं, प्रमोशन चार-पाच महिने चालतं. अ‍ॅक्टिंग थोडी कमीजास्त चालेल, पण प्रमोशनला असं भरभरून बोलता यायला हवं. सेटवर काहीही झालं असलं तरी आम्ही कित्ती चंमतगं केली हे बाँडिंग दाखवता यायलाच हवं. सिनेमॅटोग्राफी, साउंड, लोकेशन म्हणा तुम्ही- मराठी चित्रपट जरापण मागे नाही. मग आपल्या मराठी नायकाला सुपरस्टारत्व का नाही?

सुपर म्हटल्यावर सुपरमॅन, बॅटमॅन, क्रिश असले स्पेशल इफेक्ट्सच्या साह्य़ाने यांत्रिक माकडचाळे करणारे स्टार नव्हे. तुमचा गैरसमज व्हायचा. रीतसर अभिनेते!

मिलिंद गवळींचं उदाहरण घ्या. ग्रामीण चित्रपटांचा एक्का आहे हा माणूस. गेली अनेक र्वष सातत्याने काम करत आहेत. अजीर्ण होईल एवढं प्रमोशन करण्याचे सध्याचे दिवस आहेत. मुंबई, पुण्यात अशा मेट्रोसिटीत त्यांचे चित्रपट चुकून कधीतरी पाहायला मिळतात. पण बाकी महाराष्ट्र आहे तिकडे या माणसाची सद्दी आहे. चॅनेलचं बूम घेऊन महानगरांमध्ये यांचा फोटो दाखवा आणि विचारा- यांना ओळखा. कितीजण ओळखतील? दुतोंडी दांभिक अशा पाकिस्तानातून भारतात आलेल्या आणि टिनपाट दर्जाचा चित्रपट करणारा य:कश्चित फवाद खानला ओळखतात माणसं. त्याचे नखरे लोक चवीचवीने चघळतात. मग आपल्या मातीतला प्रसिद्धीसाठी न हपापलेला मिलिंद दुर्लक्षित का? लगेच तुम्ही मकरंद अनासपुरेंचं नाव ऐकवाल. ग्रामीण आणि शहरी अभिरुची सांधणारा दुवा. अगदी खरं. वास्तव जगणं अनुभवलेल्या या अभिनेत्याला त्याच्या वैैचारिक तोडीचं काम मिळतं? ढेभळी पिंपळगावचा आणि च्या म्यायला तुझ्या, कळविलं नाही लग्नाचं असं एका चित्रपटात ७०वेळा म्हणावं लागतं. असे किती चित्रपट तुम्ही पाहिलेत तिथे त्यांनी निभावलेल्या पात्राची रेवडी उडवली गेली नाही. तुक्या तुकविला, नाग्या नाचविला, मला एक चानस हवा, बघ हात दाखवून हे लक्षात राहतात. पण हापूसमधला मास्तर, सुंबरानमधला कोंडीत अडकलेला संसारी माणूस, निशाणी डावा अंगठामधला समाजभान असलेला शिक्षक हे चित्रपट धोधो चाललेत आणि कायमस्वरूपी लोकांच्या स्मरणात राहिलेत असं का होत नाही. भरत जाधवच्या सही रे सहीला जे यश मिळालं तसं त्याचा सिनेमा डोक्यावर घेतलाय असं चित्र अगदी दुर्मिळ. मराठी इंडस्ट्रीमधला व्हॅनिटी व्हॅन घेणारा पहिला अभिनेता ही ओळख अभिमानास्पदच. पण भरतच्या अभिनयाची विनोदी सोडून दुसरी बाजू उलगडणारे ‘झिंग चिक झिंग’ किंवा ‘वनरूम किचन’ धड पोहोचलेपण नाही थिएटपर्यंत.

गगनचुंबी फ्लेक्स किंवा होर्डिग आणि त्याला दुधाने आंघोळ वगैरे रजनीकांत पॅटर्नचे अतरंगी चाहते नकोत, पण एक नाव मांडलं आणि फक्त नावावर थिएटरं हाउसफुल्ल झाली असं होतं का? आजूबाजूचं घडणं सशक्तपणे लिखाणातून मांडणारा आणि तितक्याच ताकदीने पडद्यावर पेलणारा दिग्दर्शक अभिनेता म्हणून गिरीश कुलकर्णीचं नाव घेतलं जातं. दोन राष्ट्रीय पुरस्कार नावावर असणाऱ्या या आपल्या खऱ्या नायकाचा चित्रपट आठवडाभरही टिकत नाही थेट्रात. आलिया भट हायवे आणि अनुष्का शर्माचा एनएच टेन तुम्ही आवर्जून पाहिला. पण गिरीशने लिहिलेला आणि काम केलेला हायवेच्या मार्गावर तुम्ही गेला नाहीत. फेस्टिव्हलला गौरव झाला हे अभिमानास्पदच. पण सुपरस्टार आपल्या पाठिंब्यावर घडतो ना. गिरीशचं नाव आहे फक्त या बळावर वळतो का आपण थेट्राकडे. उलट जाऊ द्या ना. टोरंटवर बघू ही आपली मानसिकता. आशयघनतेची मागणी करणारा, चित्रपट हे बुद्धजीवी व्यासपीठ मानणारी मंडळी गिरीशचं काम पाहायला थेट्रात घाऊक गर्दी का करत नाहीत?

तुम्ही लगेच सांगाल. गिरीश आपल्यासारखा दिसतो. हिरो मटेरिअल नाही. तुमचा तर्कवाद बरोबर. स्वप्निल जोशीचं नाव आदळवाल आमच्यासमोर. इश्क-प्रेम-मोहब्बतच्या चौकडीपलीकडे त्याला रोलच देत नाही कोणी. स्वप्निल टीव्हीच्या माध्यमातून घराघरात पोहोचला. तो आधी टीव्हीचा स्टार आहे मग मोठय़ा पडद्यावरचा. टीव्ही फुकट असतो. म्हणजे केबल किंवा डिशला पैसे द्यावे लागतात पण चित्रपट अतिरिक्त खर्च म्हणून बघितला जातो. नायिकेबरोबर दिसणाऱ्या स्वप्निलऐवजी प्रामुख्याने त्याच्यातल्या अभिनयाची अन्य रूपं बाहेर काढू शकेल अशा चित्रपटाला गर्दी होते, होईल? देखणा, हट्टाकट्टा पण दबंग नाही, उंची उत्तम, आवाज भारी, मुळातच शरीराचा आकृतिबंध हिरोला साजेसा आणि अभिनय येणारे असे भूषण प्रधान आणि वैैभव तत्त्ववादी. त्यांच्या चित्रपटातून जेवढे दिसलेत त्यापेक्षा जास्त पिंजरा नावाच्या डेली सोपमध्ये दिसायचे. कसं जमणार सुपरस्टार अभियान! बरं हे दोघं परफेक्ट शेपमध्ये आणि यांच्या स्थूलत्वाकडे झुकणाऱ्या. चिवित्र वाटतं.

‘खारीगावचा इम्रान हाश्मी’ अशी एक इमेज केलेय संतोष जुवेकरची. चाळीत राहणारा, बेतास बेत आर्थिक परिस्थिती, दहीहंडी खेळणारा, वडापावची गाडी चालवणारा, गुंड होऊ शकतो पण मध्यमवर्गीय पांढरपेशा अशा धाटणीचेच रोल संतोषला मिळतात. सदोदित नायक असा राहिला तर सुपरस्टारत्व कसं येणार राव? जे संतोषचं तेच अंकुश चौधरीचं. इतकी र्वष काम केल्यानंतरही ‘डबल सीट’मध्ये अंकुश पुन्हा चाळकरी मुलाच्या भूमिकेतच. हल्ली नवीनच ट्रेंड रूढ झालाय- एक सोडून चार हिरो असतात. एकाचे वांदे आहेत, चार म्हणजे स्कोप आणखी कमी होतो. ‘क्षणभर विश्रांती’पासून ‘सतरंगी रे’पर्यंत आणि अगदी अलीकडचा ‘घंटा’ घ्या. त्रिकुट किंवा चौकडी असते. हिरोपणातही वाटेकरी वाढतात. वलय बिलय म्हणतात ते चौघांना कसा विभागून व्यापणार. एकवेळ हे परवडलं पण हल्ली तर लहान मुलंच हिरो असतात. हल्ली पौगंडावस्था लवकर येते मुलांमध्ये असं शास्त्र सांगतं. तसं मराठी चित्रपटांचे हिरोच मुळी पौगंडावस्थेतील असतात. पेपर टाकणारी मुलं निम्न आर्थिक स्तरातली असतात. पण ही मुलं टीशर्ट आणि थ्रीफोर्थमध्ये असतात. स्वच्छ आणि टापटीप असतात. व्यवस्थित मराठी बोलतात. केसांचं जंगल डोळ्यावर अजिबात आलेलं नसतं. त्यामुळे ‘दगडू’ हिरो म्हणजे चित्रपटाच्या सुरुवातीला पट्टी येते ना सगळं काल्पनिक असल्याची. मग सुपरस्टार वगैरेही काल्पनिकच राहतं.

हरहुन्नरी अभिनेता म्हणून चिन्मय मांडलेकरचं नाव घेतलं जातं. पण अभिनयाव्यतिरिक्त लेखन तसंच अन्य जबाबदाऱ्यांमुळे अभिनेता चिन्मय मागे पडतो. बऱ्याच दगडांवर पाय ठेवायला गेलं की त्याचा इरफान पठाण होतो म्हणतात. इरफान टीम इंडियाचा सुपरस्टार नाही. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेलच. बालगंधर्व या नावाला गतवैैभवाची पुण्याई आहे, कटय़ार हा एकत्रित सांगीतिक अनुभव होता, लोकमान्य टिळक हे जाज्वल्य राष्ट्रपुरुष होते. या सगळ्या चित्रपटांमागे सुबोध भावेचं नाव येतं. सुबोध आणि अन्य चमू यासाठी प्रेक्षक गर्दी करतात. पण प्रत्येक काम जीव ओतून करणारा माणूस म्हणून सुबोधच्या प्रत्येक कामाला अशी गर्दी होते? विशेष मुलांसंदर्भातला ‘आम्ही असू लाडके’ थिएटरमध्ये आला कधी गेला कधी कळलंही नाही. सळसळत्या ऊर्जेच्या सिद्धार्थ जाधवचं नाटक चालतं, हिंदीत तो एका कॉमेडी शोमध्ये धमाल उडवून देतो. पण एकटय़ाच्या बळावर चित्रपट धावतोय असं होत नाही. गश्मीर महाजनी हिंदीत गेल्यावर त्याच्या चित्रपटाची सर्व प्रमुख वृत्तपत्रांत पहिल्या पानावर जाहिरात झळकली आहे. मराठी नायकाची अशी जाहिरात तुम्ही पाहिलेय? हिंदीनुसार सुपरस्टार १८ ते ३० वयोगटाचा असतो. काही मंडळींनी तिशी ओलांडली आहे म्हणून सुपरस्टारत्वासाठी त्यांचा विचारच होऊ शकत नाही असं अजब तर्कट. अतुल आणि संदीप कुलकर्णी, हृषीकेश जोशी, नंदू माधव सुरेख अभिनय करतात. अनेकदा अभिनय करत आहेत हे लक्षात येऊ नये इतकं समरसून काम करतात. पण एकुणात वाटय़ाला काय येतं- पूरक भूमिका. जितेंद्र जोशीचं दोन स्पेशल नाटक जोरदार सुरू आहे. तसं चित्रपटाच्या बाबतीत का होत नाही. लुक मॉडर्न पण रोल ग्रामीण अशी अवस्था अनिकेत विश्वासरावची. मोजकं काम पण अस्सल काम करणाऱ्या उपेंद्र लिमयेला आपण मखरात बसवलंय असं होत नाही. मणी, मंगळसूत्र, लग्न या भूमिकांच्या साच्यात उमेश कामतला अडकवून ठेवलंय. दाढी स्मार्टफुली कॅरी करणाऱ्या सिद्धार्थ चांदेकरवर अख्खा चित्रपट बेतलाय असं होत नाही.

शाहरुख, सलमान, आमिर, दीपिका, रणबीर यांचा स्वत:चा असा पॅन इंडियन फॅनबेस आहे. अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत असा. तसा महाराष्ट्रातल्या वैैविध्यपूर्ण संस्कृतीला व्यापेल तसंच जात, धर्म, पंथ, वंश यांच्यापल्याड पोहोच असलेला सर्वसमावेशक सुपरस्टार असा कोणीच समोर येत नाही. बरं आमिरचा चित्रपट येऊ घातला की वादाची राळ उडवून दिली जाते. चर्चा होते, व्हायरल होतं. हल्ली तर सकारात्मकपेक्षा नकारात्मक पब्लिसिटी कामाची मानली जाते. चित्रपट व्यवस्थित प्रदर्शित होतो, चालतो. नंतर त्या वादाचा मागमूसही उरत नाही. मराठी चित्रपटांच्या नायकाबाबत असंही काही होत नाही. सुपरस्टारचे कपडे, लकबी, ब्रँड या सगळ्याकडे चाहत्यांचं बारीक लक्ष असतं. मराठी सुपरस्टारमुळे अमक्या जॅकेटची किंवा अतरंगी दाढीची स्टाइल फोफावली आहे असं झाल्याचं स्मरत नाही. या सगळ्यामागचं गुपित म्हणजे मराठी माणसं हिंदी चित्रपट पाहतात. असंख्य मराठी घरांमध्ये इंग्रजी पेपर येतो. तसं चित्रपट पाहायचा आहे तर हिंदीला प्राधान्य मिळतं. लाडक्या मराठी कलाकारचा चित्रपट येतोय म्हणून आतुरतेने खोळंबलेले प्रेक्षक दिसतात का? चित्रपटगृहातही हिंदी चित्रपटांची चळत असते. मराठी चित्रपट तोंडी लावण्यापुरते असतात. हिंदीतले किंवा दाक्षिणात्य सुपरस्टार्स प्रत्येक वेळी बावनकशी काम करत नाहीत. अनेकदा थुकरट दर्जाचे त्यांचे चित्रपटही खपतात. कारण चाहत्यांचा जनाधार.

टीव्हीवर जुने चित्रपट लागतात. आजही नामावलीत अशोक सराफ नाव दिसलं की आपण खुर्चीला खिळतो. अजूनही ‘गुपचूप’मधला त्यांचा मि. धोंड अनेकांना पाठ आहे. प्रसिद्धीची नानाविध तंत्रं नसतानाही अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी नाव कमावलं. मात्र त्यांच्यानंतर असं सुपरस्टारत्व कोणाला मिळालेलं नाही. एका सिनेमासाठी ५० लाख घेतले म्हणजे सुपरस्टार झालाच असं होत नाही. पैसा एक भाग झाला. भूमिका किती लक्षात राहिल्या हेही बघणं आवश्यक. निर्माते, दिग्दर्शक, लेखक यांच्याइतकंच प्रेक्षक म्हणून आपणही मराठी नायकांना मागे ठेवण्यात कारणीभूत आहोत.

पराग फाटक – response.lokprabha@expressindia.com