आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या बातम्यांमुळे आपल्याला अफगाणिस्तान माहीत असतो तो तालिबान्यांच्या कचाटय़ातला. सततची आक्रमणं, रक्तपात, मृत्यू यात होरपळलेला. हे सगळं तिथे आहेच, पण त्याशिवाय, त्यापलीकडचा अफगाणिस्तान कसा आहे, याचा आँखो देखा हाल.. एका पुरातत्त्व अभ्यासकाच्या नजरेतून..

अफगाणिस्तान. दहशतवादासाठी चच्रेत असणारा देश. भारतीय विमानाच्या अपहरणानंतर ते कंदाहारला नेल्यामुळे आणि नंतर तालिबान्यांनी उद्ध्वस्त केलेल्या बामियानच्या बुद्धमूर्तींसाठी भारतात विशेष चच्रेत असलेला देश.

इंडॉलॉजी म्हणजे ‘प्राचीन भारतीय कला आणि स्थापत्य’ शिकत असताना अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथील गांधार शैलीतील कलेचा आभास केलेला होता. पुढे लूव्र संग्रहालयातील स्कूल ऑफ लूव्र येथे ‘आर्ट हिस्ट्री आणि आíकऑलॉजी’ शिकत असताना ‘भारताबाहेरील भारतीय कला’ हा विषय घेतला होता. त्यामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, इंडोनेशिया, कंबोडिया इत्यादी देशांतील कला आणि स्थापत्य व त्यावरील भारतीय कलेचा प्रभाव याचा सखोल अभ्यास झाला होता. २०१०-१२ मध्ये युरोपमध्ये ‘मास्टर ऑफ कल्चरल लॅण्डस्केप्स’  दरम्यान बामियान येथील जागतिक वारसा म्हणून नोंद झालेल्या लेण्यांचाही अभ्यास केला. त्यादरम्यान २०११ मध्ये बामियान बघण्यासाठी अफगाणिस्तानचा प्रवासी व्हिसा देखील काढला, परंतु तेव्हा अधिक माहिती मिळवल्यावर काबूल ते बामियान प्रवासी विमानसेवा नाही असे कळले. हा सात तासांचा प्रवास रस्त्याने करताना रस्त्यात तालिबानची ठाणी असू शकतात ही माहिती कळली. त्यामुळे तेव्हा जाणे रद्द केले.

युरोपमधील शिक्षणानंतर युनेस्कोच्या दिल्ली ऑफिसमध्ये काम करताना एक दिवस युनेस्कोच्या काबूल येथील कार्यालयात प्रकल्प अधिकाऱ्याची जागा घोषित झाल्याचे समजले. घरी कोणालाही न सांगता त्या जागेसाठी अर्ज पाठवला होता. अफगाणिस्तानबद्दल वाचलेल्या पुस्तकातून तालिबानपूर्व किंवा तालिबानच्या काळातील अफगाणिस्तान कसा होता हे कळले होते, पण तालिबाननंतरच्या काळातील तेथील बॉम्बस्फोट किंवा चकमकी याशिवाय अधिक माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे युनेस्कोतील पुढील मुलाखती होऊन माझी निवड झाल्यानंतर काबूल ऑफिसमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून तेथील कामाबद्दल तसेच सुरक्षेबद्दल अधिक माहिती घेतली होती. हे काम स्वीकारताना एकच मुद्दा डोळ्यांसमोर होता की जम्मू काश्मीरमधील लोकही अनेक दशके दहशतवादाखाली जगत आहेत. मी जम्मूच्या भेटीत तेथील तणावपूर्ण परिस्थिती बघितली होती. त्यामुळे आपण काय पद्धतीचे आयुष्य स्वीकारायला जात आहोत याची थोडीफार कल्पना होती. काबूलमध्ये माझी निवड झाल्यावर घरी येऊन बायकोला त्याबद्दल सांगितले. तिने माझे ऐकून घेऊन माझ्या निर्णयाचे स्वागतच केले आणि मिळालेल्या संधीबद्दल अभिनंदन केले. तेथील सुरक्षेची घरच्यांना पूर्ण कल्पना देऊन काबूलमधील काम स्वीकारायचे हा निर्णय झाला होता. सुरक्षेच्या कारणाकरिता फक्त नातेवाईक व काही मित्रांनाच काबूलबद्दल सांगितले होते.

मधल्या काळात अफगाणिस्तानबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. अफगाणिस्तानची भाषा अफगाणी नाही तर त्यांच्या चलनाला अफगाणी म्हणतात. तिथे ‘दरी’ ही फारसीची बोलीभाषा आणि ‘पश्तू’ बोलली जाते हे कळले. या पश्तून शब्दावरून पठाण हा शब्द आला आहे. व्हिसाची प्रक्रिया पूर्ण करून जायचा दिवस उजाडला तेव्हा काबूलला जाण्याचा आनंद तर होताच, त्याचबरोबर काबूलमध्ये कशी परिस्थिती असेल हा विचारही सतत येत होता. दिल्ली ते काबूल विमानात सोबत अनेक अफगाण होते. दाढीवाले अफगाण म्हणजे तालिबान असा आपला एक समज असतो. त्यामुळे धास्तावलेल्या मन:स्थितीतच तो विमान प्रवास केला. नाही म्हणायला पाकिस्तानवरून विमान जाताना घडलेले सिंधू नदीचे दर्शन हाच एक सुखद धक्का!

काबूल विमानतळावर उतरल्यावर आपले एक स्वप्न पूर्ण होत आहे याची जाणीव झाली. तालिबाननंतरच्या काळात युनेस्कोच्या काबूल ऑफिसमध्ये येऊन बामियान आणि हेरातमध्ये काम करणारा मी पहिलाच भारतीय होतो. हे सर्व मनात येत असताना आजुबाजूला दिसणारे अफगाण आणि न येणारी भाषा यामुळे वास्तवात आलो. इमिग्रेशन खिडकीच्या पलीकडे बसलेल्या अफगाण अधिकाऱ्याने भारतीय पासपोर्ट बघून िहदी/उर्दूमध्ये विचारणा केली, तेव्हा हायसे वाटले. िहदी चित्रपट आणि अमिताभ बच्चन यांच्या कृपेने अफगाणिस्तानमधील बरेच लोक विशेषत: तरुण चांगली उर्दू बोलतात. उर्दूतील शब्द फारसी असल्यामुळे त्यांनाही उर्दू बोलणे सोपे वाटते. विमानतळाच्या बाहेर पडल्यावर समोर पाìकग बघितले. सगळीकडे सोलर पॅनेल्सचे आच्छादन असलेल्या या पाìकगमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव गाडय़ा पार्क करू दिल्या जात नाहीत. त्यामुळे हा विचार न करता काबूल विमानतळाच्या इमारतीसमोर इतक्या जवळ हे पाìकग उभारणाऱ्या अभियंत्याचे मला कौतुक वाटले. काही शे मीटर दूर असलेल्या व्हीआयपी पाìकगमध्ये युनेस्कोची चिलखती गाडी उभी असेल असे मला सांगितले गेले होते. पण त्या चिलखती गाडीपर्यंत पोहोचेपर्यंत काय होईल याची उगाचच धास्ती वाटत होती. माझ्या नावाची पाटी हातात घेऊन उभा असलेला एक साठीचा दिसणारा अफगाण माणूस युनेस्कोचा ड्रायव्हर होता. त्याच्याबरोबर केलेल्या संभाषणातून मी नंतर ‘दरी’ भाषा शिकू लागलो. या चिलखती गाडय़ांचे दार अत्यंत जड असते. ते धडकन जोरात आपटून लावल्याशिवाय बंद होत नाही. त्याचा उलटा परिणाम दिल्लीत टॅक्सीतून उतरल्यावर व्हायचा. काबूलमधील सवयीमुळे भारतीय टॅक्सीचे दार बंद करताना धाडकन आपटले जायचे.

विमानतळावरून त्या चिलखती गाडीतून गेस्ट हाउसपर्यंतचा अध्र्या तासाचा प्रवास हा मी आजपर्यंत जीव मुठीत धरून केलेला प्रवास आहे. पावलोपावली दिसणारे हातात एके फोर्टी सेव्हन घेतलेले सुरक्षा रक्षक, अनेक चेकपोस्ट्स, अनेक कंपाऊंडच्या उंच चिलखती िभती, त्यावरील काटेरी कुंपण, काही चेकपोस्टमध्ये हातात मशीनगन घेतलेले पोलीस ऑफिसर हे सर्व बघून गेस्ट हाउसपर्यंत आपण सुखरूप पोचावे अशी एकच इच्छा मनात होती. काबूलमधील रस्ते आणि इमारती बघताना धक्का बसत होता कारण ‘काबूल एक्स्प्रेस’ या चित्रपटातून किंवा काही डॉक्युमेंटरीमधून काबूलमधील हलाखीच्या परिस्थितीचे दर्शन झाले होते. काबूल म्हणजे एक किंवा दोन मजली मातीची उद्ध्वस्त झालेली घरे, कच्चे रस्ते, कचरा असा माझा समज होता. प्रत्यक्षात मात्र अनेक मजली उंच इमारती, काचेची तावदाने असलेल्या इमारती, मॉल, निवासी गृहसंस्था असा काबूलचा चेहरामोहरा दिसत होता. नॉर्दर्न अलायन्स आणि तालिबान यांच्यातील धुमश्चक्रीत काबूल जवळजवळ बेचिराख झाले होते. त्या काळात अनेकांनी काबूल सोडले होते, ते इराण किंवा पाकिस्तानमध्ये शरणार्थी म्हणून राहायला गेले होते. नंतर कळले की २००७ मध्ये काबूलमध्ये डांबरी रस्ते बांधले गेले आणि तालिबानच्या काळात रणगाडे धावत त्या काबूलमध्ये आता कोरोला, लँड क्रुजर अशा गाडय़ा घेऊन अफगाण त्याच रस्त्यांवरून जात होते.

युनेस्कोचे गेस्ट हाउस भरलेले असल्यामुळे त्यांनी माझी तीन दिवस राहण्याची व्यवस्था एका हॉटेलवजा गेस्ट हाउसमध्ये केली होती. तेथील सुरक्षा व्यवस्था भारदस्त होती. बाहेर अफगाण पोलीस आणि आत भारतीय सन्याच्या गुरखा रेजिमेंटमधील निवृत्त गुरखा होते. गुरखा असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवून निर्धास्तपणे झोपता येईल हा विचार मनात येऊन गेला. कडेकोट सुरक्षेतून आत गेल्यावर खोली ताब्यात घेतली आणि इतर सहकाऱ्यांना भेटायला युनेस्कोच्या गेस्ट हाउसवर गेलो. युनेस्कोच्या गेस्ट हाउसच्या समोर अजून एका आंतरराष्ट्रीय संस्थेचे ऑफिस आणि गेस्ट हाउस होते. शिवाय मागे एक पोलीस स्टेशन होते. यामुळे येथे बाहेर २५ अफगाण सुरक्षा कर्मचाऱ्यांचा पहारा होता. शिवाय दोन चेकपोस्ट होते. त्यातून तपासणी झाल्यावरच गाडी पुढे जायची. गेस्ट हाउसच्या दारासमोर अजून एक चेकपोस्ट होते, त्यात एक मशीनगन घेतलेला सुरक्षा अधिकारी होता. हे सर्व बघून छाती दडपते नाही तोच आपल्याला तीन बॉम्बविरोधी दरवाजे पार करून जायचे आहेत असे लक्षात आले. एका बंगल्यात निर्माण केलेल्या या गेस्ट हाउसमध्ये दहा देशांतील सहकारी राहत होते.

या विविध देशांतील सहकाऱ्यांबरोबर काम करायचे व त्यांच्यासोबत एकाच गेस्ट हाउसमध्ये राहायचे ही तारेवरची कसरत असायची. कारण प्रत्येक देशातील नागरिकाची कामाची, वागण्याची पद्धत वेगळी असते. दिवसभराच्या कामानंतर त्याबद्दल बोलणेही नको व्हायचे. पण संध्याकाळी दिवसभराचे अनुभव सांगायला तीच माणसे आजूबाजूला असायची. अर्थात अजून एक सगळ्यांनाच जाणवलेली गोष्ट म्हणजे ज्यांनी युद्धस्थितीतील देशात काम करण्याचा अनुभव घेतला आहे त्यांनाच तुमचे बोलणे आणि जगणे समजू शकते. इतरांना त्यातील त्रास आणि बारकावे कळू शकत नाहीत. आम्हाला सलग सहा आठवडे काबूलमध्ये राहावे लागे आणि मग दहा दिवसांची सुट्टी मिळत असे. सुरक्षिततेच्या कारणास्तव काबूलमधील गेस्ट हाउसरूपी सोन्याच्या िपजऱ्यात बंद झाल्यावर पुण्यात लक्ष्मी किंवा फर्गुसन कॉलेज रस्त्यावर चालणे किंवा रस्त्यावर उभे राहून गप्पा मारणे यात काय आनंद आणि स्वातंत्र्य आहे हे काबूलवरून परत आल्यावरच लक्षात आले. आपण भारतात किती सुखात राहतो आणि मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत आपल्याला नाही याची जाणीव पारतंत्र्याचा छोटासा अनुभव आला तरी लक्षात येते.

मी काबूलला गेल्यानंतर पहिल्या महिन्यातच जेवताना मी पहिल्यांदा रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेडचा हल्ला ऐकला. एकापाठोपाठ एक पाच हल्ले करण्यात आले. हे हल्ले काबूलजवळील टेकडीवरून करण्यात येत होते. त्यांचे टाग्रेट अमेरिकन अथवा भारतीय दूतावास असे. पण दर वेळेस त्यांचा नेम चुकत असे. ही सगळी माहिती आमच्या डायरेक्टरने पुरवली. यानंतर झालेल्या बंदुकांच्या फैरी या एके फोर्टी सेव्हनच्या आहेत असेही त्याने सांगितले. पहिल्यांदाच मी काबूलमध्ये एखादा हल्ला ‘ऐकत’ होतो. पण त्यावरून घाबरून न जाता आपण सुरक्षित आहोत तर निवांत जेवूया या विचाराने विविध शस्त्रास्त्र आणि त्यांची विध्वंसक ताकद यावरील बौद्धिक ऐकत आमचे जेवण पुढे सुरू झाले.

त्यानंतर पंधरा दिवसांनी गुरुवारी संध्याकाळी कामावरून घरी आल्यावर आम्ही यूएनच्या मुख्य कंपाउंडमधील रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणार होतो. पण संध्याकाळी सात वाजता आमच्या डायरेक्टरने सगळ्यांना बोलावून सांगितले की आज कोणीही बाहेर जायचे नाही. शहरात काही तरी घडू शकते. त्यामुळे सगळे इथेच जेवण करा. हे ऐकून आम्ही स्वयंपाकघरात जातोय न जातोय तोच प्रचंड स्फोट झाला. दारे-खिडक्या हादरल्या. पुढच्या मिनिटाला दुसरा स्फोट झाला, बंदुकांच्या फैरी ऐकू आल्या आणि मग सगळ्यांचा धीर सुटला. एवढा मोठा स्फोट गेस्ट हाउसजवळच झालेला असेल असे वाटत होते. शिवाय बंदुकांच्या फैरी जवळूनच झाडलेल्या असाव्यात असे वाटत होते. त्यामुळे सर्वानी आपापल्या खोलीत जाऊन आपली रन बॅग घेतली आणि हॉलमध्ये जमा झाले. तेवढय़ात आमचा सुरक्षा रक्षक आला आणि त्याने सांगितले ‘‘नक्की काहीही समजत नाहीये. मी गच्चीवरून स्फोट आणि धुराचा लोट बघितला. तुम्ही बंकरमध्ये जा.’’ इतर काही सहकारी घाबरलेले वाटल्याने डायरेक्टरने सर्वाना बंकरमध्ये जाण्यास सांगितले. बंकरमध्ये सुमारे ४५ मिनिटे गेली असतील तोच आमचा सुरक्षा अधिकारी सांगायला आला की ‘‘एक किलोमीटरवर हल्ला झाला आहे. अफगाण सन्यदलातील  अधिकाऱ्याच्या घरावर हल्ला झाला आहे आणि दुसरीकडे एका खाजगी इमारतीवरही हल्ला झालेला आहे. त्यामुळे हे दोन ठिकाणचे हल्ले ऐकू येत होते. तुम्ही आता वर येऊ शकता.’’ सर्वजण आपापल्या दूतावासामध्ये फोन करून सुरक्षित असल्याची खात्री देत होते. टीव्ही आणि फेसबुकवरून याची काय माहिती मिळते याचा शोध काहीजण घेऊ लागले. संध्याकाळी सव्वासात ते साडेनऊ वाजेपर्यंत लष्कर आणि अतिरेकी यांच्यात चाललेली धुमश्चक्री आम्हाला ऐकू येत होती. जवळजवळ नऊ बॉम्बस्फोट आणि अगणित फैरी त्या रात्री आम्ही ऐकल्या. हे ऐकतच जेवण केले आणि काहीजण झोपायला गेले. साडेनऊनंतर हा आवाज थांबला आणि लष्कराने दहशतवाद्यांना मारल्याची बातमी आली. त्यामुळे आम्ही गप्पा मारत बसून राहिलो. रात्री साडेअकरा वाजता परत स्फोटांचे आवाज आणि फैरी ऐकू आल्या आणि हेलिकॉप्टरची घरघर ऐकू येऊ लागली. एक दहशतवादी जिवंत होता आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न लष्कर करत होते. शेवटी रात्री दीड वाजता हे सर्व नाटय़ संपले आणि आम्ही झोपायला गेलो. त्या रात्री काही मला आणि इतर काही जणांना झोप आली नाही. त्या रात्री पहिल्यांदा मी कुठे येऊन पोचलो आहे याची जाणीव झाली आणि भीतीही वाटली. काबूलला येऊन दीडच महिना झाला आहे आणि अशा वातावरणात आपण किती दिवस काम करू शकतो याची मोजणी सुरू झाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी गाडीतून ऑफिसला जाताना रस्त्यावरचा फळवाला दिसला, नानचे दुकानही उघडेच होते. इतकेच नाही तर जिथे हल्ला झाला होता त्याच्या आजूबाजूची दुकानेही उघडलेली दिसली. रस्त्यात सगळे नॉर्मल सुरू होते. जणू काही घडलेच नाहीये अशा थाटात अफगाण आपापला व्यवसाय करत होते. त्या वेळेस लक्षात आले की अफगाणांसाठी हे सगळं रोजचंच आहे. मृत्यूला घाबरून आपली फळगाडी किंवा दुकानं ही लोकं बंद नाही करू शकत. आणि ही लोकं जर उघडय़ा माथ्याने रस्त्यावर वावरत आहेत तर आपण इतक्या सुरक्षित पद्धतीने राहून इथे काम नक्कीच करू शकतो. त्या क्षणी मरणाचे भय जाऊन त्याची जागा धर्याने आणि अफगाणांबद्दलच्या कौतुकाने घेतली.

या हल्ल्यानंतर काबूलमध्ये सलग दहा दिवस सकाळ, दुपार संध्याकाळ असे स्फोट किंवा हल्ले होत होते. त्याची हळूहळू सवय होत गेली आणि अक्षरश ‘रोज मरे त्याला कोण रडे’ या म्हणीचा अनुभव आला. या दहा दिवसांतील एक हल्ला एका शाळेत झाला. काबूलमधील एका अफगाण शाळेच्या आवारात फ्रेंच शाळा आणि फ्रेंच सांस्कृतिक केंद्र होते. तिथे नाटकाचा प्रयोग सुरू होता. नाटकाचे नाव होते ‘हार्टबीट, द सायलेन्स आफ्टर द एक्स्प्लोजन’. नाटकाचे नावही आणि संहिताही शोधून निवडली होती बहुतेक. या नाटकाचा प्रयोग सुरू असताना िवगेत बॉम्बस्फोट झाल्याचा आवाज आला. सर्वानाच वाटले की हा नाटकाचा भाग आहे. पण खरेच िवगेत बॉम्बस्फोट झाला होता. कडेकोट बंदोबस्त असलेल्या या शाळेत एक अल्पवयीन मुलगा स्वतच्या अंगाभोवती स्फोटके गुंडाळून शिरला होता आणि त्याने हा स्फोट घडवून आणला. अशा सार्वजनिक ठिकाणी जाण्यास आम्हाला मज्जाव होता. त्यामुळे कार्यक्रमाचे निमंत्रण असूनही आम्ही गेलेलो नव्हतो. परंतु फ्रेंच दूतावासाबरोबर चांगले संबंध असल्यामुळे या फ्रेंच शाळेतील शिक्षक ओळखीचे होते. सुदैवाने त्यांच्यापकी सर्वजण सुखरूप असल्याचे कळले. परंतु एक परदेशी पत्रकार मात्र यात दगावला होता.

या सर्व अनुभवानंतर मी आमच्या अफगाण सहकाऱ्यांशी त्यांच्या घराविषयी, राहणीमानाविषयी बोलायला सुरुवात केली. आणि सर्वाचाच सूर आम्हाला हा दहशतवाद नको आहे. इतर देशांसारखे साधे राहणीमान आम्हाला हवे आहे असाच होता. काबूलमध्ये विमानतळ, रस्ते आणि कार्यालये इथे इतके चेकपोस्ट आहेत की खुद्द अफगाणांना त्याची सवय झालीये. काबूलच्या विमानतळावर माणसाची केली जाणारी झडती ह्य एक फुकट मसाज असतो. आलेला माणूस हातात, दंडात, पोटऱ्यांमध्ये एखादे शस्त्र नेत नाहीए याची खात्री करण्यासाठी ते येणाऱ्यांचे हात, दंड, खांदे, पोटऱ्या दाबून बघतात. हैदर चित्रपटात एक दृश्य आहे. एक काश्मिरी तरुण स्वत:च्याच घरात शिरत नसतो. त्यावर इरफान खान त्याच्या आईला सांगतो, त्याची झडती घेतली पाहिजे. इरफान खान त्या तरुणाची झडती घेतो आणि मगच तो तरुण त्याच्या घरात शिरतो. सुरक्षेकरता घेतल्या जाणाऱ्या झडतीवर भाष्य करणारा हा सीन आहे. मला या सीनची आठवण काबूलमध्ये सतत व्हायची. याची आम्हालाही इतकी सवय झाली होती की एखाद्या ठिकाणी आमची, आमच्या गाडीची तपासणी केली गेली नाही तर तेथील सुरक्षा व्यवस्थेमध्ये काहीतरी दोष आहे असे वाटायला लागे.

काबूलमधील अफगाण पार्लमेंटवर हल्ला झाला त्या वेळीही ऑफिसमध्ये आमची एक मीटिंग चालू होती. स्फोटाचा आवाज आल्याने नक्की कुठे आणि काय झाले आहे याची खात्री करून घेतली. भारतात घरी मी सुखरूप असल्याचा मेल केला आणि आमची मीटिंग पुढे चालू राहिली. डिसेंबर २०१५ मध्ये काबूलमधील एक हल्ला सुरू असताना आम्ही व्हरांडय़ात बसून अफगाणिस्तानच्या भविष्याचा विचार करत होतो. येथील बेरोजगारी संपवण्यासाठी काय करता येईल, कसे उपक्रम आखता येतील. जगातील स्तरावरील बदलत्या दहशतवादाचे अफगाणिस्तानात काय पडसाद उमटतील याविषयी पहाटे तीन वाजेपर्यंत आमची चर्चा सुरू होती.

काबूलची पोिस्टग स्वीकारताना तुम्ही थोडे तरी वेडे असावे लागते असे माझे म्हणणे होते. मुळात जे नाव ऐकून कोणी पुढचा विचार करणार नाही अशा अफगाणिस्तानात आपल्या कुटुंबापासून दूर राहून काम करण्याची तयारी असणे हे तुम्हाला कुठले तरी वेड असल्याशिवाय तुम्ही करू शकत नाही. हे माझे म्हणणे माझ्या सहकाऱ्यांकडे आणि काबूलमधील इतर परदेशी रहिवाशांकडे बघून सार्थ ठरत होते. काबूलमध्ये घडणाऱ्या हल्ले आणि बॉम्बस्फोटांनंतरही प्रत्येक जण आपापले काम करत असायचा. काम करताना एक न दिसणारा ताण सर्वाच्या मनावर असायचा. अर्थात सुरक्षेचे सर्व नियम पाळून आणि सावधगिरी बाळगूनच सर्व मीटिंग्ज, भेटी व्हायच्या. तरीदेखील ज्यांना भीती वाटत असे ते काबूलमधील नोकरी सोडून जायचे. पण त्याचबरोबर अफगाणिस्तानात गेली १० ते १५ र्वष काम करणारे परदेशी नागरिकही मला भेटले. मुळात तुम्हाला तणावपूर्व वातावरणात काम करण्याच्या थ्रिलची सवय व्हावी लागते. आणि हळूहळू त्याची िझग चढून काबूलनंतरच्या नोकरीत आपले कसे होणार असा विचार सर्वाच्याच मनात येऊ लागतो. काबूलमधील कामानंतर इतर देशांत केलेले काम हे कितीही महत्त्वाचे असले तरी त्याला या थ्रिलची पाश्र्वभूमी नसल्यामुळे ते अजिबात आव्हानात्मक वाटत नाही. याशिवाय एका देशाच्या सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनाच्या कामाची किंवा शिक्षण क्षेत्राची आपण पायाभरणी करतो आहोत ही गोष्टच दरवेळी मनाला बळ देऊन जायची. त्या बाबतीत अफगाणिस्तान ही इतकी र्वष पडीक राहिलेली उत्तम कसदार जमीन आहे आणि तिथे विविध प्रयोग करायला वाव आहे असे मला सतत वाटत आले आहे. त्यामुळे भारतात परत आल्यावरदेखील अफगाणिस्तानातील एका संस्थेच्या प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून भारतातून काम करतो आहे.

येथील यूएनच्या सुरक्षा प्रशिक्षणात विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांची माहिती दिली होती. लँड माइन्स, अ‍ॅण्टी टॅँकमाईन लपवलेल्या जागा कोणत्या, त्याविषयी काळजी कशी घ्यायची याचे प्रशिक्षण दिले होते. तुमचे अपहरण होऊ नये म्हणून काय दक्षता घ्यायची, अपहरण होताना आणि केल्यावर कसे वागायचे, रस्त्यावर अपघात झाला तर काय करायचे याचे प्रात्यक्षिकासह शिक्षण झाले होते. त्यामुळे अनेक गोष्टींचे संदर्भ लागत होते. सुरक्षेसाठी काय काळजी घ्यायची, किती आणि कोणती माहिती दुसऱ्याला सांगायची याचा दरवेळेस अंदाज घ्यावा लागत होता. विशेष म्हणजे आपल्याकडचे मध्ययुगातील किल्ले कसे वापरत असतील याचा या सगळ्या सुरक्षा यंत्रणेमुळे अंदाज येऊ लागला.

अफगाणिस्तानात युनेस्को बामियान, हेरात येथे वारसा संवर्धनाचे प्रकल्प राबवणार होती. त्यातील दोन प्रकल्पांवर माझी नेमणूक झाली होती. बामियान येथील शहर ए घोलाघोला या किल्ल्याच्या पुरातत्त्वीय उत्खनन आणि संवर्धन प्रकल्पावर तसेच हेरातमधील गोहारशाद हिच्या सोळाव्या शतकातील मकबऱ्याच्या संवर्धनाच्या प्रकल्पावर मी प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम बघत होतो. तज्ज्ञनिवडीपासून ते खर्चाच्या नियोजनापर्यंत कामाचे सर्व अधिकार मला दिले गेले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले तज्ज्ञ आणि संस्था आम्ही या कामासाठी निवडल्या होत्या.

‘फ्रेंच आíकओलोजिकल डेलिगेशन फॉर अफगाणिस्तान’ ही फ्रेंच संस्था १९२३ पासून अफगाणिस्तानात कार्यरत आहे, त्यांनी अफगाणिस्तानात केलेल्या उत्खननांचे ८४ खंड फ्रेंच भाषेत प्रसिद्ध झालेले आहेत. हेरात आणि बामियानमधील युनेस्कोच्या प्रकल्पात पुरातत्त्वीय उत्खनन आणि पुरातत्त्वशास्त्राचे शिक्षण अफगाण विद्यार्थ्यांना देण्यासाठी ही संस्था आमच्या प्रोजेक्टमध्ये सहभागी झाली. या संस्थेसोबतच्या पहिल्या मीटिंगमध्येच त्यांचा फ्रेंच संचालक मला म्हणाला की तू ‘या प्रोजेक्टचा मॅनेजर आहेस, त्यामुळे तुला आमच्याकडून जे काम करून हवंय ते तू सांग. कारण या प्रोजेक्टमध्ये आमचा सहभाग कसा आणि किती प्रमाणात हवा आहे हे तुलाच माहीत आहे.’ माझ्यासारख्या नवख्या माणसावर पूर्ण विश्वास ठेवून माझ्या प्रकल्पातील जेवढे पुरातत्त्वीय काम त्यांच्याकडून करून हवे होते ते त्यांनी कुठलाही गर्व न बाळगता केले. नंतरच्या काळात आम्ही चांगले मित्र बनलो आणि त्यांनी मला संस्थेचे ग्रंथालय वापरायला परवानगी दिली. त्यामुळे अफगाणिस्तान आणि मध्य आशिया येथील पुरातत्त्वीय स्थळांवरील पुस्तकांचा खजिनाच माझ्यासमोर उघडला गेला.

बामियानला पहिल्यांदा जाण्याची संधी लगेचच मिळाली. तिथला प्रकल्प व्यवस्थापक असल्यामुळे बामियानला भेट देणे महत्त्वाचे होते. २०११ पासून बामियानला जाण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. बामियानला जाणारी विमाने खराब हवामानामुळे अनेकदा रद्द होत. त्यामुळे आमचे विमान रद्द झाले नाही याचाच आनंद होता. िहदुकुश पर्वतावरून आम्हाला घेऊन जाणारे छोटेसे विमान बामियानमध्ये उतरताना खिडकीतून बामियान बुद्धांच्या रिकाम्या कमानी आणि इतर लेणी दिसल्या. त्याच्या समोर एक पडका किल्ला होता. याच किल्याच्या संवर्धनाचे काम युनेस्कोने हाती घेतले होते. या प्रकल्पाचे व्यवस्थापन मला करायचे होते. इथल्या कामासंबंधी पूर्वमाहिती गोळा केली होती. परंतु ते स्थळ प्रत्यक्ष बघण्याचा फायदा असतो. येथील किल्ल्याचे नाव शहर-ए-घोलाघोला असे आहे. म्हणजे किंकाळ्यांचे शहर. चेंगीझखानने जेव्हा तेराव्या शतकात बामियानवर हल्ला केला तेव्हा त्यातील सर्व रहिवाशांना मारून टाकले. त्या वेळी घुमलेल्या किंकाळ्यांचे शहर म्हणून ते शहर-ए-घोलाघोला. सोव्हिएत आक्रमणाच्या काळात राशियनांविरुद्ध लढणाऱ्या मुजाहिदीनांनी बामियान येथील अनेक लेणी व हा किल्ला युद्ध क्षेत्र म्हणून वापरला होता. त्यामुळे येथे अनेक माइन्स पुरलेले होते, तसेच उत्खनन करताना काही वेळा ग्रेनेड, बॉम्ब इत्यादी सापडत. त्यामुळे उत्खनन करताना माइन अ‍ॅक्शन टीम सोबत असावी लागे. आमच्या प्रकल्पाच्या सुरुवातीला या किल्ल्याचे स्वरूप म्हणजे दगडमातीचा ढिगारा ज्यात काही ठिकाणी तटबंदी व बुरूज दिसत असे होते. त्यात उत्खननामुळे अनेक भाग दिसू लागले होते. किल्ल्याचा जुना मार्ग आणि प्रवेशद्वाराचे अवशेष उजेडात आले. सनिकांच्या आणि उमरावांच्या राहण्याच्या जागा उत्खननात सापडल्या. तसेच किल्ल्याची तटबंदी अनेक ठिकाणी दिसू लागली. यावरून किल्ल्याच्या एका भागाचे मूळ स्वरूप समजण्यास त्यामुळे सुरुवात झाली. या सर्व अवशेषांचे संवर्धन लगेच करावे लागे. त्यामुळे संवर्धनाची टीमदेखील तेव्हा काम करत असे. अफगाणिस्तानातील हवामानामुळे पुरातत्त्वीय स्थळांवर हिवाळ्यात बर्फामुळे व उन्हाळ्यात अतिउष्णतेमुळे काम करता येत नसे. त्यामुळे फक्त मे महिन्यात व सप्टेंबर, ऑक्टोबरमध्येच येथे काम करता येत असे. त्यामुळे या तीन महिन्यांतील कामाचे अतिशय बारकाईने नियोजन करावे लागे. इतर काळात तिथे सापडलेल्या खापरांवर आणि वस्तूंवर संशोधन सुरू असे.

हेरात हे शहर अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात आहे. इराणच्या जवळील या शहरावर इराणी संस्कृतीचा प्रभाव आहे. दुतर्फा लावलेली झाडे आणि रस्त्यावर कुठेही कचरा न आढळणारे असे हे हेरात शहर आहे. हेरातमध्ये तमुरलंग याची सून गोहरशाद हिच्या मकबऱ्याच्या संवर्धनाचे काम युनेस्को करत होते. त्यावरही प्रकल्प व्यवस्थापक म्हणून माझी नेमणूक झाली होती. तिच्या सोळाव्या शतकातील मकबऱ्याच्या घुमटावर तमुरलंग याच्या काळातील निळ्या नक्षीदार टाइल्स बसवलेल्या होत्या. मकबऱ्याच्या आवारात पडलेला रशियन रणगाडा आणि येथील घुमटावर आणि मिनारांवर रॉकेट आणि गोळ्यांचे झालेले हल्ले सोव्हिएत आक्रमणाच्या काळातील निशाणी म्हणून अजूनही दिसतात. या घुमटावरील नक्षीदार टाइल्सचे व तेथील ३६ मीटर उंचीच्या विटांच्या मनोऱ्याचे जतन आणि संवर्धन करण्याचा हा प्रकल्प होता. या नक्षीदार सिरामिक टाइल्सच्या संवर्धनाचे काम जास्त काळजीपूर्वक करायचे होते. त्याकरता इटालियन सरकारच्या रोममधील नामांकित अशा संवर्धनाच्या संस्थेबरोबर करार केला. त्यांच्या प्रयोगशाळेत या विटांचे व टाइल्सचे तुकडे परीक्षणासाठी पाठवून त्यांची बनवण्याची प्रक्रिया तसेच त्यातील रंगांची परीक्षाही केली होती. या संवर्धन संस्थेतील विटा आणि चुना यांचे संवर्धनतज्ज्ञ आणि टाइल्सचे संवर्धनतज्ज्ञ सुरक्षेच्या कारणास्तव महत्प्रयासानंतर अफगाण व्हिसा मिळवून काबूलला आले. नंतर ऑगस्टमध्ये २० दिवस आणि ऑक्टोबरमध्ये १५ दिवस सलग त्यांनी हेरातमध्ये त्या घुमटावर काम केले. या काळात या वारसास्थळावर काम करताना कमालीची गुप्तता पाळली होती. कामाची एकच वेळ न ठेवता वेगवेगळ्या वेळी तिथे जायचे ठरवले होते. तसेच या घुमटावरील खाली पडलेल्या टाइल्सचे तुकडे हेरातमधील गेस्ट हाउसवर आणले होते. त्यामुळे संध्याकाळी आणि रात्री काम करून या तज्ज्ञांनी हे तुकडे जोडून त्यातील अनेक टाइल्स पुन्हा उभ्या केल्या. या काळात त्यांच्यासोबत काम करताना संवर्धनाचे अनेक पलू शिकता आले.

या सर्व कामांमध्ये आणि काबूलमध्ये राहताना अफगाण सहकाऱ्यांची खूप मदत झाली. अर्थात बाहेर जाणे शक्य नसले तरी विविध अफगाणांशी बोलून परिस्थितीची कल्पना येत होती. एकतर भाषेचा आणि संस्कृतीचा समान धागा असल्यामुळे कदाचित ते जास्त मोकळेपणाने बोलू शकत होते. अफगाण म्हटल्यावर जे रूप डोळ्यासमोर येते त्यापेक्षा वेगळे रूप या अफगाण तरुणांचे आहे. एक पाय त्यांच्या संस्कृतीत रोवलेला आहे, पण त्यांना आधुनिक जगाशी स्पर्धा करायची आहे. मध्यमवर्गातील अनेक तरुण-तरुणी आयफोन वापरतात. त्यांची केशरचना आणि कपडे अत्याधुनिक असतात. अर्थात दुबई हे त्यांचे आवडते डेस्टिनेशन आहे. एका अफगाण सहकाऱ्याच्या लग्नात पुण्यात शिकलेले त्याचे मित्र भेटले. भारताबद्दल त्यांना विशेष जवळीक वाटते, हा अनेक वष्रे आपले अफगाणिस्तानशी असलेल्या चांगल्या संबंधांचा परिणाम आहे. भारतातील सर्व िहदी चित्रपट पायरसीच्या मार्फत अफगाणिस्तानमध्ये पोचतात. आणि सर्वजण ते डीव्हीडीवर आवडीने बघतात. त्यांना उर्दू किंवा िहदी येण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. पण तरीसुद्धा भारताविषयी अफगाणांना विशेष जिव्हाळा आहे. भारताने त्यांना पार्लमेंटची इमारत बांधून दिली किंवा एक धरण बांधून दिले आहे याचे त्यांना कौतुक आहे. भारत अफगाणिस्तानच्या विकासासाठी पसे देतो आहे आणि इतर देशांसारखा दहशतवाद देत नाहीये हेसुद्धा अनेकांना महत्त्वाचे वाटते.

अफगाण तरुणवर्ग किती जागरूक आहे याचे एक उदाहरण म्हणजे अफगाण तरुणांनी पुढाकार घेऊन फेसबुकवर पाकिस्तानी माल विकत न घेण्याची मोहीम राबवली होती. ते दुकानातून शीतपेये, बिस्किटे, ब्रेड वगरे विकत घेताना त्यावरील माहिती बघायचे आणि अफगाणिस्तानात तयार झालेला मालच विकत घ्यायचे. हा विचार तिथे सतत होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यातून पुढे आला होता. यामुळे दुकानदारांनाही चांगलाच फटका बसला होता.

अफगाणिस्तानातील काही प्रदेश हा प्राचीन काळी ‘आरीयाना’ या नावाने ओळखला जात असे. हा आर्याचा प्रदेश होता असे त्यांचे मानणे आहे. अर्थात ऋग्वेदामध्ये ‘कुभा’ या नावाने काबूल नदीचा उल्लेख आलेला आहेच. अफगाणिस्तानातील बाल्ख प्रदेशातच झरतृष्ट्राने अग्निपूजक इराणी धर्माची स्थापना केली असे मानले जाते. यावरून इराण, अफगाणिस्तान आणि भारत या तीनही देशांत मतमतांतरे असली तरी ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान’मधील नागरिकांना आपण पूर्वी आर्य होतो याची जाणीव आहे. आणि हे ते नाकारत नाहीत याची खूण म्हणजे काबूलमध्ये ‘आरीयाना’ सिनेमागृह आहे. नवीन तयार झालेल्या एका गृहसंकुलाला ‘आर्य सिटी’ असे नाव देण्यात आलेले आहे. इस्लामच्या आगमनापूर्वी इथे विविध धर्म नांदत होते आणि त्यांचे असंख्य अवशेष अफगाणिस्तानात विखुरलेले आढळतात. त्यांचे जतन, संवर्धन करताना कोणताही धर्म आड येत नाही. मेस आयनाकसारख्या तांब्याचा खाणीच्या जागी जेव्हा बौद्ध स्तुपांचे आणि विहारांचे अवशेष सापडू लागले तेव्हा त्या तांब्याच्या खाणीसाठी चीनबरोबर करार केलेला असतानासुद्धा अफगाण सरकार तिथे उत्खनन करत आहे. मेस आयनाक येथील सुंदर बौद्ध मूर्ती काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयात आणल्या जात आहेत. मेस आयनाकला भेट देण्याची संधी ऑक्टोबर २०१५ मध्ये आली. तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर मी आणि माझी एक सहकारी आम्ही दोघे मेस आयनाकला गेलो. मेस आयनाक काबूलच्या दक्षिणेला लोगार प्रांतात आहे. तिथे तालिबान असल्यामुळे आमच्याबरोबर सहा पोलीस गाडय़ांचा ताफा होता. आणि मागे एक मशीनगन ठेवलेली गाडी होती. मेस आयनाकच्या तीन किलोमीटर अलीकडे जवळजवळ १०० मीटर वर एक सशस्त्र पोलीस अधिकारी तनात होता. दोन माणसांसाठी केलेला हा बंदोबस्त अचाट होता. पण तिथे आजूबाजूला तालिबानचे साम्राज्य असल्यामुळे ही सर्व काळजी घेणे जरुरीचे होते. सहा तास मेस आयनाकमधील विविध अवशेष बघणे, तेथे सापडलेली खापरे आणि नाणी हाताळणे हा एक विलक्षण अनुभव होता. खुद्द काबूलच्या आजूबाजूला वीस किलोमीटरच्या परिसरात उत्खननात २८ पुरातत्त्वीय स्थळांवर स्तूप, बौद्ध मूर्ती यांच्याशिवाय सूर्य, शिव, दुर्गा यांच्या मूर्ती सापडल्या होत्या. आता काबूलमध्ये असलेल्या खैरखाने या ठिकाणी सूर्यमंदिराचे अवशेष सापडले होते. काबूलमध्ये सुरू असलेल्या एका उत्खननाला भेट देण्याची संधी मला मिळाली. काबूलच्या ‘बाला हिस्सार’ या किल्ल्याच्या समोर असलेल्या टेकडीवर हे उत्खनन चालू होते. तिथे मिळालेल्या बौद्ध मूर्ती, स्तुपाचे अवशेष आणि त्यावरील काम बघून थक्क व्हायला होत होतं. आत्तापर्यंत फोटोत बघितलेल्या भाजक्या मातीच्या मूर्ती, त्यावरील ग्रीक प्रभाव हे सर्व प्रत्यक्ष बघणे हे स्वप्नवत होते.

अशा कामातून आणि तिथल्या ताणातून सुटकेसाठी विरंगुळा म्हणून मी कधी कधी अफगाण टीव्ही बघायचो. अफगाण टीव्ही चॅनेल्स बघताना एकदा मी थबकलो. तिथे अफगाण आयडॉल हा गाण्याचा कार्यक्रम सुरू होता. अफगाण मुलं आणि मुली दोघांनीही त्यात भाग घेतला होता. कित्येक गायिका यातून पुढे आल्या आहेत. अर्थात त्यांना मूलतत्त्ववाद्यांकडून धमकी मिळाल्यामुळे गाण्यातील पुढील करिअरसाठी त्या युरोपमध्ये स्थायिक होतात. मात्र काबूलमध्ये त्यांचे कार्यक्रम होतात. अफगाणिस्तान म्हणजे निळ्या बुरख्यातील स्त्रिया हे समीकरण मात्र जुने झाले आहे. काबूलमध्ये तुरळक प्रमाणातच निळ्या बुरख्यातील स्त्रिया दिसतात. तरुण मुली अमेरिकन युनिव्हर्सटिी किंवा काबूल युनिव्हर्सटिीमध्ये शिकत आहेत. अर्थात हे शहरांमध्ये दिसणारे चित्र असले तरी सरकार आणि आंतरराष्ट्रीय संस्था दूर गावातील स्त्री-पुरुष आणि लहान मुलांकरता शिक्षणाचे विविध कार्यक्रम राबवत आहे.

पुढारलेले अफगाण नव्याची कास धरताना दिसतात, तर त्याच वेळी अफगाणिस्तानातील काही भागांत पुन्हा उसळी मारणाऱ्या तालिबानची त्यांना भीती वाटते. दहशतवादाच्या भ्रष्टाचाराच्या छायेत असताना सकारात्मक वृत्तीने जगणारी तरुण अफगाण पिढी बघितली की आपल्या देशातील साधनांचा आपण किती दुरुपयोग करतो याची जाणीव होते. इतरांसारखे शरणार्थी म्हणून युरोपात जाण्याची संधी असलेले तरुण-तरुणीही मी पहिले, पण नव्याने निर्माण होणाऱ्या अफगाणिस्तानासाठी काहीतरी करण्यासाठी अफगाणिस्तानातच राहून काम करण्याची त्यांची इच्छा आहे.

दीड वर्षांच्या माझ्या काबूलमधील वास्तव्यात अनेक अनुभव आले. अनेकांशी चर्चा झाल्या. तालिबानच्या काळात ज्या पद्धतीने स्वतचा जीव धोक्यात घालून अफगाणिस्तानातील सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी त्यांचा इस्लामपूर्व काळातील सांस्कृतिक वारसा जपला होता, त्याची कहाणी या लेखात तर मांडताच येणार नाही. नुकतेच त्यांचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी अफगाणिस्तानचा पुरातत्त्वीय नकाशा बनवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्या स्थळांची सूची तयार करण्याचे कामही सुरू आहे. सॅटेलाइट इमेजेसचा वापर करून नवनवीन पुरातत्त्वीय स्थळांची नोंद केली जात आहे. या सर्व कामासाठी अफगाणिस्तानची भूमिका काय आहे हे त्यांच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या दारात एक शिलालेख कोरला आहे, त्यावरून लक्षात येते. त्या शिलालेखात कोरलेले वाक्य आहे- ‘अ नेशन स्टेज अलाइव्ह व्हेन इट्स कल्चर स्टेज अलाइव्ह’. अफगाणिस्तानच्या सांस्कृतिक वारशाची माता मानल्या जाणाऱ्या सत्त्याऐंशी वर्षांच्या नांसी द्युप्रे असोत, काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयाचे संचालक असोत, गेली चाळीस वर्षे अफगाणिस्तानच्या सांस्कृतिक वारशासाठी काम करणारे सध्याच्या सरकारचे सांस्कृतिक सल्लागार असोत किंवा ऑफिसमधील अफगाण सहकारी असोत या सर्वासोबत झालेल्या अनेक चर्चातून एक वेगळाच अफगाणिस्तान नजरेसमोर उभा राहिला. आणि तो बातम्यांतून दिसणाऱ्या दहशवादाच्या छायेतील अफगाणिस्तानपेक्षा नक्कीच सकारात्मक आणि समावेशक आहे! तो आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा सगळा लेखनप्रपंच.

आनंद कानिटकर – response.lokprabha@expressindia.com