कन्नड साहित्यिकांच्या लेखनकृती मराठीत अनुवादताना त्या लेखकांशी जुळलेले आत्मीय स्नेहबंध तसेच सर्जनात्मक अनुवादकार्य करताना आलेल्या भाषिक व सांस्कृतिक अडचणी आणि त्यांचे समर्पक निरसन कसे झाले याबद्दलचे अनुभवकथन..

वरणगावहून नोकरीमधून स्वेच्छानिवृत्ती घेऊन १९९१ साली पुण्यात येऊन स्थिरावत असताना एक दिवस नंदिनी आत्मसिद्ध घरी आल्या. त्यावेळी त्या ‘सकाळ’मध्ये होत्या. शाळांना सुट्टय़ा सुरू होणार होत्या. त्यामुळे शनिवार-रविवार वगळता दररोज ‘सुट्टीचं पान’ नावाची पुरवणी प्रकाशित होणार होती. त्यात दररोज एका कन्नड कवितेचा अनुवाद त्यांना हवा होता.

मी लगोलग ‘बालभारती’मध्ये अधिकारी असणाऱ्या कृ. शि. हेगडेंशी संपर्क साधला आणि त्यांच्या मदतीनं दररोज एकेक कन्नड कविता निवडून त्यांचा अनुवाद करून देऊ लागले. मॉडेल कॉलनीतच राहणाऱ्या नंदिनीताई घरी येऊन अनुवादित कविता घेऊन जात आणि दुसऱ्या दिवशी ती कविता प्रकाशित होत असे.

या कवितांमध्ये ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कवी के. व्ही. पुट्टप्पा, डॉ. द. रा. बेंद्रे, व्ही. के. गोकाक, चंद्रशेखर कंबार यांच्याही कविता होत्या. शिवाय वैदेही, चन्नवीर कणवि, एच. एस. वेंकटेशमूर्ती, पु. ति. नरसिंहाचार्य, व्ही. सीतारामय्या, जी. एस. शिवरुद्रप्पा, गोपालकृष्ण अडिग, रं. श्री. मुगळी, बेटगेरी कृष्णशर्मा, दिनकर देसाई, आनंद झुंझुरवाड यांच्या आधुनिक कविता होत्या. शिवाय कनकदास, बसवेश्वर यांच्याही रचना होत्या. काही जानपद रचना होत्या. तसंच नुकताच ज्यांना ‘मुक्तशब्द सन्मान’ देण्यात आला, त्या सिद्धलिंगय्या यांच्यासारख्या दलित लेखकाचीही रचना त्यांत होती. शिवाय कर्नाटकात ज्या रचनांना भगवद्गीतेचा मान आहे, त्या जी. बी. गुंडप्पा यांच्या ‘मंकुतिम्मन कग्ग’मधीलही काही रचना होत्या.

या सगळ्या कविता दररोज प्रकाशित होत होत्या. पंधरा-वीस कविता प्रकाशित झाल्यावर एक दिवस माझी एक साहित्यक्षेत्राशी निगडित मैत्रीण भेटली. ती म्हणाली, ‘अगं उमा, काय चालवलंयस तू हे? तू जे लिहून देत आहेस, त्या काय कविता आहेत?’ हे ऐकताच मी चमकले. गंभीर झाले. याचा अर्थ कवितांचा अनुवाद मला जमलेला दिसत नव्हता. लगोलग मी माझा कविता अनुवादित करायचा उत्साह आवरता घेतला.

पुढच्या काळात कार्नाडांचं ‘नागमंडल’मधलं एक गीत मी अनुवादित केलं. (याच गीताच्या कॉपीराइटच्या संदर्भात एक कवी कार्नाडांविरुद्ध कोर्टात गेला होता. पुढं ते प्रकरण मिटलं.) तसंच ‘तलेदंड’मधील वचनांचाही अनुवाद केला. यातील कवितांसाठी मी नम्रपणे आसावरी काकडेची मदत घेतली. पुनर्मुद्रणाच्या वेळी दोन्ही नाटकांत तशी नोंदही केली.

अलीकडच्या काळात माधव कुलकर्णी यांच्या कथा अनुवादित करीत असताना एका कथेत एक लोकगीत आणि एक शिशुनाळ शरीफ या अलीकडच्या ग्रामीण संतकवीचं पद कथेचा भाग म्हणून आलं होतं. मी त्यांचाही अनुवाद केला. कुलकर्णीनी आवर्जून फोन करून सांगितलं, ‘माझ्या मराठी मित्रांनी तुमच्या अनुवादाचा गौरवानं उल्लेख केला आहे. त्यातही विशेषकरून दोन्ही गाण्यांच्या अनुवादाचा! आणि तुम्ही तर प्रत्येक वेळी सांगता की, मी कवितेचा अनुवाद करत नाही म्हणून!’

द. रा. बेंद्रेंची जन्मशताब्दी आली. आमच्या मराठी-कन्नड स्नेहवर्धन कंेद्राच्या वतीनंही ती करायची होती. त्याच काळात वामन बेंद्रेही पुण्यात आले होते. ‘तुम्ही फक्त कारंत-भैरप्पा म्हणता! माझ्या वडिलांसाठी तुम्ही काहीच का करत नाही?’ असा त्यांनी वाद घातला. आम्ही सगळ्यांनी ठरवलं- बेंद्रेंच्या काही कविता मराठीत अनुवादित करायच्या आणि एखाद्या गायक संचाकडून त्या चाली लावून म्हणवून घ्यायच्या. त्याप्रमाणे आमच्या घरी बेंद्रेंचे सगळे काव्यसंग्रह येऊन पडले. आम्ही त्यांचं श्रवण-वाचन सुरू केलं.

बेंद्रेंच्या उत्तम कवितांपैकी काही लोकगीतांच्या पद्धतीच्या आहेत आणि काही आध्यात्मिक अनुभवांवर आधारलेल्या आहेत. त्यांच्या सगळय़ाच कविता अर्थाबरोबरच शब्दांशी खेळ करत लिहिल्या गेल्या आहेत. लोकगीतांच्या पद्धतीच्या कवितांमधली कन्नड शब्दांची लय पकडणं शक्य नव्हतं. अध्यात्माचा अनुभव सांगणाऱ्या कविता ऐकायला छान वाटल्या तरी त्या अनुभवाच्या मुळापर्यंत पोचणं मला शक्य नव्हतं. या चाळणीतून उरलेल्या कविता पुन्हा वाचताना लक्षात येऊ लागलं की, यातील मला ज्या कवितांचा अनुवाद करावासा वाटतोय, तो होणं शक्य नाही आणि ज्या कवितांचा अनुवाद होणं शक्य आहे, त्या तुलनेनं साध्या कविता आहेत!

याच सुमारास मराठी वाचकांमध्ये अशी एक विचारधारा सुरू झाली होती की, ‘कन्नडला इतके ज्ञानपीठ पुरस्कार मिळतात, याचाच अर्थ तिथं वशिला आहे!’ मला वाटलं, जर मी इतक्या साध्या-साध्या कवितांचे सुलभ अनुवाद केले तर मराठी वाचकांच्या या मताला खतपाणी मिळेल. म्हणून मग मी माझ्याकडून अनुवादाकरिता असमर्थता दर्शवली आणि बेंद्रेंच्या चिरंजीवांचा रोष ओढवून घेतला.

तरीही नाही नाही म्हणता माझ्या हातून ४५ ते ५० गाणी  किंवा कवितांचा अनुवाद केला गेला असला तरी अजूनही मी कवितेचा अनुवाद हा माझा प्रांत समजत नाही. जी कविता केवळ अर्थ किंवा भाव व्यक्त करते, तिचा अनुवाद करणं शक्य आहे. पण ज्या कवितेत दोन मराठी शब्दांमध्ये अव्यक्त अर्थ असतो, दोन मराठी ओळींमध्ये अर्थ असतो, अनेक संदर्भ असतात, ती कविता अनुवादित करणं मला शक्य नाही, असं माझं म्हणणं. बहुतेक अनुवादित कविता वाचतानाही मला तोच अनुभव येतो.

गेल्या शतकाच्या अखेरीस आम्हाला कर्नाटकातील एका हृद्य समारंभात हजर राहायची संधी मिळाली. आमचे कर्नाटकातील मित्र मुदेनूर संगण्णा यांच्याकडून त्यांच्या घरी होणाऱ्या दिवसभराच्या स्नेहसंमेलनाला हजर राहण्याचे निमंत्रण मिळाले. त्यांनी कळवलं होतं- ‘आपले मित्र.. सागर-हेग्गोडुचे रंगकर्मी के. व्ही. सुब्बण्णा यांना ‘मॅगेसेसे पुरस्कार’ जाहीर झाला आहे. आणि दुसरे मित्र डॉ. चंद्रशेखर कंबार यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त एकत्र जमून त्यांच्याशी गप्पा मारण्याचा कार्यक्रम करायचा आहे.’

शिवराम कारंतांच्या कादंबरीच्या ‘डोंगराएवढा’ या अनुवादामुळे संगण्णांनी आमची आवर्जून ओळख करून घेतली होती. माझ्या पीएच. डी.साठी त्यांनी आपल्या संग्रहातली अनेक पुस्तकंही मला दिली होती.

या निमंत्रणावरून आम्ही त्यांच्या गावी- बळ्ळारी जिल्हय़ातील चिगटेरी या छोटय़ाशा खेडय़ात जाऊन पोचलो. तिथं कर्नाटकातील कलेच्या सर्व क्षेत्रांतील माणसं जमली होती. त्यांच्या मोठय़ा वाडय़ातल्या वेगवेगळय़ा भागांत ते सगळे परस्परांना भेटून आपापल्या विषयांवर गप्पा मारत होते, चर्चा करत होते. कुणी पीएच. डी. करणारा विद्यार्थी आपल्या विषयावर अधिक माहिती गोळा करत होता. एका लिंगायत मठाचे मठाधीशही आले होते आणि त्यांच्याशीही सगळय़ांचा संवाद सुरू होता. एकमेकांच्या पत्त्यांची आणि टेलिफोन नंबरांची देवाणघेवाण होत होती. काही कुटुंबांनी आवर्जून आपल्या मुलांनाही आणलं होतं. त्यांच्यावरही कला आणि साहित्याचे काही ना काही संस्कार व्हावेत आणि त्यासंबंधी काहीतरी त्यांच्या कानावर पडावं, म्हणून.

संध्याकाळी एका कार्यक्रमात या स्नेहमीलन सोहळ्यासाठी मुद्दाम आलेल्या संगीत नाटकात काम करणाऱ्या गायिकेच्या गाण्याचं सादरीकरण झालं. त्यात गावकरीही सहभागी झाले होते. गावकऱ्यांच्या कानावरही जरा वेगळं काहीतरी पडावं म्हणून हा कार्यक्रम ठेवल्याचं संगण्णा सांगत होते. त्याचबरोबर गावकऱ्यांकडूनही त्यांनी एक तिथल्या लोकगीतांचा कार्यक्रम बसवला होता.

के. व्ही. सुब्बण्णा आणि कंबार दिवसभर आलेल्या- गेलेल्यांबरोबर गप्पा मारत होते. हाच तिथला मुख्य कार्यक्रम होता. काही नव्या ओळखी होत होत्या. तसेच काही जुन्या ओळखींना नवा उजाळा मिळत होता. आमचीही सुब्बण्णा आणि कंबारांशी ओळख झाली. गप्पाही झाल्या. पुढे मी कंबारांचं ‘जोकुमारस्वामी’ हे नाटकही अनुवादित केलं.

लोककलेचे गाढे अभ्यासक, नाटककार आणि साहित्यप्रेमी असलेल्या संगण्णांनी आणि त्यांच्या कुटुंबानं भरवलेलं हे साहित्य-कला-संगीत संमेलन हा एक अत्यंत अविस्मरणीय अनुभव होता, हे नक्की!

संगण्णा आम्हाला त्याआधीच उडुपीत राहणाऱ्या वैदेही या कन्नड कथालेखिकेच्या भेटीसाठी घेऊन गेले होते. तेव्हा लगोलग वैदेहींनी आपल्या शिकणाऱ्या दोन मुलींना हाताशी धरून रात्रीच्या जेवणाचा बेत ठरवला. केळीच्या पानावर गरमागरम भात, तिळी-सार, फणसाचे भाजलेले पापड आणि बाळकैरीचं लोणचं असा मस्त बेत केला. केळीच्या पानावर पहिल्या वाफेचा भात घमघमणाऱ्या सारासोबत आणि फणसाच्या पापडासोबत बाळकैरीचं लोणचं चोखून खाताना खरोखरच अवर्णनीय आनंद झाला होता. माझी आधी वैदेही या व्यक्तीशी ओळख झाली, नंतर त्यांच्या साहित्याशी!

नंतर वैदेही माझ्या जवळच्या मैत्रीण बनल्या. दक्षिण कन्नड जिल्हय़ात आम्ही कधीही गेलो तरी मणिपाल येथलं वैदेहींचं घर ही आमची मुक्कामाची जागा झाली. त्याही पुण्यात आल्या की आमच्या घरी उतरू लागल्या. त्यांच्या दोन सकस कथांचे संग्रह मी मराठीत अनुवादित केले. त्यातला एक संग्रह साहित्य अकादमी विजेता होता. शिवाय त्यांनी लिहिलेलं ‘कुत्र्याच्या पिलाचं नाटक’ हे बालनाटकही मी अनुवादित केलं.

दुसऱ्या भेटीत त्यांनी मणिपाल येथील शेणॉय यांनी राजा केळकरांकडून प्रेरणा घेऊन जुन्या लाकडी वस्तूंमधून बनवलेलं अद्भुत घर दाखवलं. तसंच अलीकडे याच शेणॉय यांनी मणिपालमध्ये काही एकरवर वसवलेले कर्नाटकातील सर्व भागांतल्या संपन्न वाडय़ांचे प्रदर्शनही दाखविण्याची व्यवस्था केली.

कवयित्री वैदेहींच्या कथांमधली काव्यात्म भाषा अनुवादित करणं हे एक आव्हान होतंच; शिवाय त्या वापरत असलेली कुंदापुरी कन्नड भाषा समजावून घेऊन अनुवाद करणं हे आणखी एक आव्हान होतं. त्या जाणीवपूर्वक वापरत असलेली बायकांची भाषा हा काही माझ्या दृष्टीनं मोठा प्रश्न नव्हता.

‘पंचधारे’च्या द. पं. जोशींना कार्नाडांच्या एका भाषणाचा अनुवाद त्यांच्या एका अंकात छापायचा होता. त्याबरोबरच त्यावेळी नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘नागमंडल’ या नाटकाचा थोडा भागही त्याच अंकात प्रकाशित करायचा त्यांचा मनोदय होता. त्यादृष्टीनं त्यांचं गिरीश कार्नाडांशी बोलणं झालं होतं. मला नाटकही मिळालं. त्यातल्या एका अंकाचा अनुवाद करायचं ठरलं.

मी अनुवादाला सुरुवात करणारच होते, तेवढय़ात स्वत: कार्नाडांचं पत्र आलं. त्यात त्यांनी मी अनुवाद करत असल्याबद्दल आनंद आणि आभार व्यक्त करून पुढं लिहिलं होतं- ‘मला थोडंफार मराठी येत असल्यामुळे आपण केलेला अनुवाद मला पाठवून द्यावा. मला काही सूचना करायच्या असतील तर मी करेन..’

हा अनुभव मला सर्वस्वी नवा होता. मुळात एखाद्या लेखकानं एवढा पुढाकार घेणं आणि कार्नाडांसारख्या प्रसिद्ध व्यक्तीनं आपण होऊन पत्रव्यवहार करणं, हे दोन्हीही मला अनपेक्षित होतं. शिवाय याआधी मी अनुवादित केलेल्या शिवराम कारंत किंवा एस. एल. भैरप्पा या लेखकांना अजिबात मराठी समजत नव्हतं. त्यामुळे मनात कुठंतरी अनुवादाचं ओझंही दोघांमध्ये विभागल्यासारखं वाटलं.

त्यांनी पहिली दुरूस्ती त्यांच्या नावातच केली होती. मराठी लोकांप्रमाणे मी ‘कर्नाड’ लिहिलं होतं. त्यांनी कळवलं, ‘मी माझ्या नावाचं स्पेलिंग ‘कार्नाड’ असं करतो.’ तसंच मी कादंबरीलेखनाप्रमाणे उद्गारवाचक चिन्हांचा मुबलक प्रयोग केला होता. तीही त्यांनी खोडली होती. माझ्याकडून मी त्याचा अर्थ असा घेतला की, कदाचित ही चिन्हं वापरून मी दिग्दर्शक आणि कलाकारांच्या क्षेत्रात हस्तक्षेप करत होते!

अशा प्रकारे दोन-तीनदा देवाणघेवाण झाल्यावर खर्डा पक्का झाला. नाटकाचा एक अंक ‘पंचधारे’त प्रकाशित झाला, तरीही मी सगळ्या नाटकाचा अनुवाद पुरा केला.

हे नाटक दोन लोककथांवर आधारलेलं आहे. कुठल्याही प्रकारची वेशभूषा करून हे नाटक सादर करता येतं. राजस्थानी आणि कर्नाटकी वेषात मी या नाटकाचे प्रयोग पाहिले आहेत. जगभरच्या कुठल्याही भाषेत हे नाटक तेवढंच रंगेल, असं हे नाटक आहे.

पहिल्या अंकातील ज्योतींचे प्रसंग मला अक्षरश: रोमांचित करून गेले. जेव्हा घरातले सगळे दिवे मालवले जातात, तेव्हा त्या सगळ्या ज्योती गावाबाहेरच्या पडक्या देवळात जमून गावात घडलेल्या घटनांवर गप्पा मारतात. त्यातच एक ‘कथा’ तरुण मुलीचं रूप घेते आणि ‘गाणं’ तिच्या आकर्षक वस्त्राचं रूप घेऊन त्या देवळात येतं. ही कथा म्हणजे नाटकाचं मुख्य कथानक.

मला या नाटकाचा लवचिक शेवट अतिशय आवडला. स्वत: लेखकानं या नाटकाला दोन शेवट दिले आहेत. नंतर मला समजलं, या नाटकाचा शेवट प्रत्येक दिग्दर्शक आपापल्या वैचारिकतेप्रमाणे करतो! बेंगळुरूच्या सुप्रसिद्ध नाटय़कर्मी बी. जयश्री स्त्रीवादी पद्धतीनं हा शेवट सादर करतात. पुन्हा एकदा मला वाटलं, कार्नाड स्वत: लेखकाबरोबरच अभिनेते आणि दिग्दर्शक असल्यामुळे त्यांना लेखकाबरोबरच इतर दोघांचं सामथ्र्यही ठाऊक असल्यामुळेच ते इतकं लवचिक नाटक लिहू शकले.

नाटकाच्या अनुवादाची प्रक्रिया संपून हे नाटक मेहता पब्लिशिंग हाऊसकडे प्रकाशनासाठी दिलं होतं. अजून हे नाटक प्रकाशित व्हायचं होतं. प्रकाशक शोधतानाही मी कार्नाडांशी संपर्क साधून होते. तेवढय़ात एक दिवस मुंबईच्या वृत्तपत्रात एक छोटी बातमी प्रसिद्ध झाली : दिलीप आणि नीना कुळकर्णी त्यांच्या संस्थेच्या वतीनं हे नाटक बसवत आहेत. रीहर्सल सुरू झाली आहे. मी गडबडले. तातडीनं कार्नाडांना पत्र लिहिलं. त्यांनी सुरुवातीला ‘असं कस झालं?’ अशा अर्थाचं पत्र पाठवलं. रीहर्सलसाठी परवानगी देताना त्यांना वाटलं होतं की माझ्याच अनुवादावर हे सुरू आहे. नंतर पुरती चौकशी केल्यावर दिलगिरी व्यक्त करून त्यांनी कळवलं की, ‘आता त्यांची रीहर्सल सुरू झाली आहे. काही करायला नको. पण पुस्तक मात्र तुमच्याच अनुवादाचं प्रकाशित होईल.’

त्याप्रमाणे पुस्तक प्रकाशित झालं. पुढच्या काळात वेगवेगळ्या संस्थांनी विविध स्पर्धासाठी हे नाटक बसवताना माझ्या अनुवादाचा उपयोग केला. मी कुळकर्णी दाम्पत्यानं बसवलेला प्रयोगही आवर्जून पाहिला. पण सुरुवातीचा ज्योतींचा अंक पाहतानाच माझी काहीशी निराशा झाली. त्या लोककथेची लवचिकता आणि गाभाच हरवला होता.

कधीतरी कार्नाड गप्पा मारताना म्हणाले होते की, ‘माझी नाटकं बघायला जाताना मला नेहमीच धडकी भरते..’ त्याचा अर्थही समजला. आपल्या मनातलं नाटक प्रत्यक्ष समोर दिसणं अशक्य असतं हेही समजलं.

याच सुमारास त्यांचंच ‘तलेदंड’ हे बसवेश्वराच्या जीवनावरचं नाटक माझ्याकडे अनुवादासाठी आलं. सुगावा प्रकाशनचे विलास आणि उषा वाघ ते प्रकाशित करणार होते. ‘जा ओलांडुनी’ची छपाई त्यांनीच करून दिली होती. शिवाय विरूपाक्ष कुलकर्णीकडून त्यांनी रावसाहेब कसब्यांच्या ‘आंबेडकरवाद-तत्त्व आणि व्यवहार’ या पुस्तकाचा अनुवाद करून घेऊन तो प्रकाशित केला होता. त्यानिमित्तानं त्यांच्याकडे बरंच जाणं-येणं होतं. जवळचा परिचय होता. याही नाटकाच्या वेळी मी खर्डा कार्नाडांकडे पाठवत होते आणि ते तो पाहून परत पाठवत होते.

या नाटकाचा अनुवाद हे एक वेगळ्या प्रकारचं आव्हान होतं. नाटक बसवेश्वरांच्या जीवनातल्या महत्त्वाच्या कालखंडावरचं होतं. बाराव्या शतकात घडत असल्यामुळे एकूणच मराठी भाषेत अनाहूतपणे शिरलेल्या इंग्लिश शब्दांपासून सावध राहणं स्वाभाविकच होतं. त्याचबरोबर बसवण्णांच्या या चळवळीनं संस्कृतला जाणीवपूर्वक विरोध करून केवळ कन्नड भाषेचा वापर केल्याचं मला ऐकून ठाऊक होतं. त्यामुळे भाषेचा जुना ‘फील’ ठेवण्यासाठी संस्कृतकडे वळायचीही सोय नव्हती. शिवाय हे ‘नाटक’ असल्यामुळे कादंबरीच्या अनुवादाच्या वेळी उपलब्ध असलेला भाषेचा ‘सैलपणा’ इथं उपलब्ध नव्हता. इथलं प्रत्येक वाक्य कुणीतरी प्रत्यक्ष बोलणं अपेक्षित असल्यामुळे वाक्यात कृत्रिमपणा टाळणंही आवश्यक होतं. ही सारी कसरत करून मी अनुवाद पुरा केला. कार्नाडांनीही तो पाहिला, तपासला आणि प्रकाशनासाठी दिला. यथावकाश त्याचं पुस्तकही आलं.

मध्यंतरीच्या काळात एक दिवस धारवाडचे कै. पंडित आवळीकर घरी आले. त्यांचा मुलगा पुण्यात असल्यामुळे त्यांचं वरचेवर पुण्यात येणं होत असल्याने वरचेवर भेटी होत गेल्या. ‘तलेदंड’चा अनुवाद प्रकाशित झाल्यावर पुढच्या भेटीत मी तो त्यांना दिला. ते कार्नाडांचेही शिक्षक असल्यामुळे त्यांनीही त्यात रस दाखवला.

आवळीकरांनी पुढच्या पुणेभेटीत मूळ नाटक आणि अनुवादाच्या संदर्भात एक विस्तृत टिपण लिहून आणलं. त्यात त्यांनी अनुवादाच्या संदर्भातले त्यांचे काही आक्षेप उदाहरणांसहित नोंदवले होते. त्यात त्यांनी प्रामुख्यानं नोंद केली होती ती मी वापरलेल्या काही शब्दांविषयी. संस्कृत आणि इंग्लिशपासून यशस्वीपणे सुटका करून घेता घेता मी मराठीत बेमालूमपणे शिरलेले आणि तीत मिसळून गेलेले उर्दू व फारसी शब्द वापरले होते; जे बाराव्या शतकात वापरात नव्हते! मूळ नाटकातही त्यातले काही शब्द वापरले होते.

पुस्तक प्रकाशित होऊन गेल्यामुळे आता काय करावं, हे मला सुचेना. मी कार्नाडांना फोन केला आणि जे घडलं होतं ते सांगितलं. सगळं ऐकून घेऊन कार्नाडांनी ते काही मनावर न घेण्याविषयी सांगितलं. का कोण जाणे, पण डॉ. आवळीकरांनी त्यांचं ते टिपण कुठंच प्रसिद्धीसाठी दिलं नाही, हे मात्र खरं!

तशी १८९९ साली प्रकाशित झालेली ‘इंदिराबायि’ ही कन्नडमधली पहिली सामाजिक कादंबरी! पण तिच्यावरील मराठी प्रभावामुळे १९१५ साली प्रकाशित झालेल्या ‘माडिदुण्णो महाराया’ या कादंबरीलाच पहिली ‘कन्नड क्लासिक’ कादंबरी मानतात. म्हणूनच नॅशनल बुक ट्रस्ट (एन. बी. टी.)नं तिचा अनुवाद करायचा घाट घातला. या अनुवादाचं काम माझ्याकडे आलं. यानिमित्तानं कन्नडमधल्या पहिल्या सामाजिक कादंबरीचा अनुवाद करण्याची दुर्मीळ संधी मला मिळाली.

कादंबरी १९१५ साली प्रकाशित झालेली; आणि मी ती अनुवादित करत होते ते २००० नंतरच्या मराठी वाचकांसाठी! सुमारे ९० वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या या कादंबरीची वैशिष्टय़े तर दिसली पाहिजेत; त्याचबरोबर आजच्या मराठी वाचकापर्यंत ही वैशिष्टय़े पोचली पाहिजेत. त्यामुळे मी कादंबरीची भाषा नेहमीचीच ठेवली. कादंबरीची रचना मात्र जुन्या कादंबरीसारखीच ठेवली. तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे संवाद नाटकातल्यासारखे ठेवले. तसंच या कादंबरीतली संस्कृती म्हैसूरजवळची जुनी आहे. त्यामुळेही काही अडचणी सामोऱ्या आल्या. अशा अडचणींचं निवारण त्याच लेखकाकडून करून घ्यायची आमची पद्धत. पण इथं लेखकाला जाऊन अनेक र्वष लोटली होती.

एकदा बोलता बोलता मी माझी ही अडचण भैरप्पांच्या कानावर घातली. त्यांनी तत्परतेनं या कादंबरीवर पीएच. डी. करणाऱ्या एच. पार्वती यांचा पत्ता मला दिला. आणि मला मार्ग मिळाला. त्यांना पत्रानं आम्ही आमच्या अडचणी विचारल्या. त्यांनाही मोठय़ा आनंदानं आणि आस्थेनं माझ्या प्रश्नांना उत्तरं दिली. तसंच या कादंबरीसाठी त्यांच्याकडून नॅशनल बुक ट्रस्टनं सविस्तर प्रस्तावनाही लिहून घेतली.

एकदा नरसिंह मळगि कन्नड नावाचे एक गृहस्थ एक हस्तलिखित घेऊन आमच्या घरी आले. ती कन्नडमध्येही प्रकाशित न झालेली कादंबरी होती. सुमारे बाराशे पानं भरतील एवढं ते बाड होतं. तेही विस्कळीत. त्यांना ते मराठीत प्रकाशित व्हावं असं वाटत होतं. आमचं काहीएक न ऐकता ते बाड ठेवून निघून गेले. विरूपाक्षांनी ते वाचलं आणि मला म्हणाले, ‘काहीही म्हण- यात काहीतरी मजा आहे!’

मळगिंना बोलावून घेऊन विरूपाक्षांनी त्यांना ते लेखन कमी करायला सांगितलं. तसं त्यांनी ते सात-आठशे पानांपर्यंत केलं आणि आणखी कमी करायची जबाबदारी आमच्यावर टाकून त्यांनी ते लेखन मराठीत न्यायचा आग्रह धरला.

त्या ‘फ्लॉरिस्टन बंगला’ नावाच्या कादंबरीतील भूत, मृत्युत्तर जीवन वगैरे प्रकरण माझ्यासारखीला पटणं कठीणच होतं. तरीही त्यात एक मजा होती! ‘मधुमती’सारखे चित्रपट बघताना जसं भुतावर विश्वास नसतानाही एक प्रकारची मजा वाटायची, तसा काहीसा अनुभव ही कलाकृती देत होती. कुणीही प्रेमात पडावं असं हे अत्यंत खोडकर आणि प्रेमळ भूत होतं. मीही त्या भुताच्या प्रेमात पडले आणि हे काम अंगावर घेतलं. सगळं लेखन दोन-सव्वादोनशे पानांत बसेल असं केलं.

ही कादंबरी शकुंतला पुंडे, सदाशिव अमरापूरकर आणि इतर कितीतरी वाचकांना आवडलीही. आमचे मित्र अनिल अवचटही म्हणाले, ‘या कादंबरीचं मनोविश्लेषणात्मक दृष्टीनंही रसग्रहण करता येईल.’ एकंदरीत या लेखनानं आम्हाला संपादन आणि अनुवाद असा दुहेरी अनुभव दिला.

द. पं. जोशींमुळे मी पूर्णचंद्र तेजस्वी यांची ‘कर्वालो’ ही कादंबरी आणि ‘गूढ माणसं’ ही दीर्घकथा ‘पंचधारे’साठी अनुवादित केली आणि माझ्या हाती एक अफलातून लेखक लागला. नंतर त्यांच्या समग्र कथांचा एक संग्रह माझ्या हाती लागला. मी त्यातल्या कथा अनुवादित करू लागले.

तेजस्वी हे कर्नाटकातील पहिले ज्ञानपीठ पुरस्कारविजेते लेखक-कवी के. व्ही. पुट्टप्पा यांचे चिरंजीव. म्हैसूरसारख्या शहरात त्यांचं बालपण गेलं होतं. तत्त्वज्ञान विषय घेऊन एम. ए.पर्यंत शिक्षण झाल्यावर प्रेमविवाह करून ते घरातल्या मतभेदांमुळे वेगळे झाले. त्यावेळच्या अनेक सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सहभाग असायचा. अखेर मूडीगेरे येथे वीस एकर जंगल विकत घेऊन त्यांनी खेडय़ात राहून आपली इस्टेट ‘डेव्हलप’ केली आणि त्या जमिनीवर ते कॉफी आणि वेलदोडे पिकवू लागले. एका शहरी माणसाला या खेडय़ात येत असलेल्या अनुभवांवर आधारित त्यांनी कथालेखन केलं.

त्यांच्या ‘चिदंबर रहस्य’ या कादंबरीला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तेव्हा मी त्यांच्यावर ‘सकाळ’च्या पुरवणीसाठी एक लेख लिहिला होता. त्याची एक प्रत तेजस्वींनाही पाठवून दिली. या कादंबरीचा मी त्याआधीच अनुवाद केला होता.

या कादंबरीत वेलदोडय़ाचं पीक हाच महत्त्वाचा विषय होता. कादंबरीत त्याच्या रोपाचं बऱ्यापैकी वर्णन असलं तरी आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी ते पाहिलेलं नव्हतं. पुण्यात एक-दोन ठिकाणी ते बघायला मिळेल असं समजलं. बरीच धावपळ केल्यावर अखेर कृषी विद्यालयात (निदान) जंगली वेलदोडा पाहायला मिळाला. भेटणाऱ्या अनेकांना मी याविषयी विचारायची. तेव्हा एका मैत्रिणीनं वेलदोडय़ाचे वेलीवर लटकलेले घोस पाहिल्याचं सांगितलं. कुणी काही, तर कुणी आणखीन काही! प्रत्यक्षात ते केळीच्या जातीचं रोप असल्याचं वर्णन कादंबरीत होतं. पण वेलदोडे नेमके कुठं लागतात याची मला उत्सुकता होती. ही सारी धडपड, तेव्हा दक्षिण भारतात फिरून आलेल्या मैत्रिणींचे अनुभव या सगळ्यावर मी एका चर्चासत्राच्या वेळी टिपण लिहून पाठवलं होतं. या चर्चासत्राच्या वेळी मी गैरहजर होते. तिथं हजर असलेल्या अशोक जैन यांनी तेव्हा ते लिहीत असलेल्या  ‘कानोकानी’ सदरामध्ये गमतीशीर पद्धतीनं त्यावर टिपण लिहिलं होतं.

त्यांची ‘कर्वालो’ ही लघुकादंबरीही भरपूर गाजली. पश्चिम घाटात क्वचित आढळणाऱ्या उडत्या सरडय़ाची कर्वालो या संशोधकानं केलेली शोधयात्रा हा या कादंबरीचा विषय आहे. तेजस्वींच्या सर्वच साहित्यात आढळणारा चिकमंगळूर भागातला संपन्न निसर्ग या कादंबरीत महत्त्वाचं पात्र म्हणून येतो.

तेजस्वींची आणखी एक कथा ‘किरिगूरीन गैय्याळीगळु’ ही कथा अनुवादित करताना मला आलेली अडचण वेगळ्या प्रकारची होती. ‘ही एक प्रखर स्त्रीवादी कथा आहे,’ असं मराठीतल्या स्त्रीवादी समाजसेविका अ‍ॅड. निशा शिवूरकर यांनी म्हटलं आहे. या कथेच्या शीर्षकातील शिवी हा अत्यावश्यक भाग होता. किरिगूर या गावातल्या स्त्रिया इतक्या सबल आहेत- आणि पुरुष व्यसनाधीन झाल्यामुळे इतके ‘निक्कम्मे’ आहेत, की बायकांवर काबू ठेवणं पुरुषांना शक्य नाही. शेजारच्या गावातले पुरुषही या स्त्रियांसमोर हतबल होतात. अशावेळी या स्त्रियांना अपमानित करण्यासाठी त्यांचा उल्लेख ‘किरिगूरच्या गय्याळी’ असा करतात. हा तपशील कथेत असल्यामुळे शीर्षकातली ती शिवी अत्यावश्यक होती. मला ‘गय्याळी’ या शिवीला पर्यायी मराठी शिवी सुचत नव्हती. अखेर दक्षिण महाराष्ट्रातल्या एका लेखकांशी बोलले. त्यांनी सांगितलं, दक्षिण महाराष्ट्रात ‘गतकाळी’ अशी बाईला शिवी दिली जाते. अखेर मी ‘किरिगूरच्या गतकाळ्या’ असं त्या कथेला नाव दिलं.

तेजस्वींचं लेखन वाचून मारुती चितमपल्ली यांनीही पत्राद्वारे संपर्क साधून म्हटलं होतं की, ‘या माणसाचा एक तर अनुभव दांडगा असला पाहिजे, नाहीतर याचा जंगलाचा भरपूर अभ्यास तरी असला पाहिजे. त्याशिवाय जंगलाच्या संदर्भात इतकं बिनचूक लेखन करता येणंच शक्य नाही.’

२००० साली आम्ही म्हैसूरला गेलो असता तेजस्वींच्या भेटीचा योग आला. तेजस्वींना प्रत्यक्ष भेटायच्या विचारानं मला तर आनंद गगनात मावेना! म्हैसूरहून चार-पाच तासांचा प्रवास करून आम्ही मूडीगेरेला पोचलो. वीस एकराच्या कॉफी आणि वेलदोडय़ाच्या इस्टेटमध्ये असलेल्या तेजस्वींच्या बंगल्यावर पोहचलो. घरात ते आणि त्यांच्या पत्नी राजेश्वरी होत्या. त्यांनी आमच्यासाठी स्वैपाक केला होता.

दिवसभर त्यांच्याशी गप्पा झाल्या. त्यांच्या वन्य-फोटोग्राफी आणि चित्रकलेविषयी आम्हाला माहीत होतं. तिथं गेल्यावर त्यांच्या सतारीच्या वेडाविषयी आणि बोटं रक्तबंबाळ होईपर्यंत ती वाजवत राहायच्या अतिरेकाविषयी राजेश्वरींकडून समजलं. आम्ही परतत असताना राजेश्वरींनी कॉफीची पूड आणि  किलोभर वेलदोडे देऊ करून विचारलं, ‘हे दिलं तर घेऊन जाल ना?’

मी म्हटलं, ‘तुमच्या शेतावर पिकलेलं जे काही असेल ते दिलं तर घेऊन जाईन!’

राजेश्वरींनी लगेच माझ्या बोलण्यावर हसत हसत दुरूस्ती केली- ‘शेत किंवा मळा म्हणायचं नाही. इस्टेट म्हणायचं! इथं काम करणाऱ्यांनाही जर शेतावर किंवा बागेत किंवा मळ्यावर कामाला चाललास का, असं विचारलं तर तो अपमान समजला जातो.’

स्वत: तेजस्वींनी अनेक इंग्लिश पुस्तकांचा अनुवाद केल्यामुळे ते म्हणाले, ‘माझं लेखन म्हणजे काही वेदवाक्य नाही. तुम्ही तेजस्वी काय म्हणतो ते मराठी वाचकांना सांगा म्हणजे झालं!’

तसंच तेव्हा त्यांचे वडील कुवेंपु यांच्या कादंबरीच्या अनुवादाचाही विषय निघाला. पण तेजस्वींनी तो खोडून काढत म्हटलं, ‘तुम्ही त्या फंदात पडू नका. ती जवळजवळ कविता आहे. नाही जमणार.’ कुवेंपुंच्या सगळ्या साहित्याचे हक्क तेजस्वींकडे असल्यामुळे मी पुन्हा तो विषय काढला नाही.

जेवणात राजेश्वरींनी ‘कायिहुळी’ नावाचा पदार्थ केला होता. कर्नाटकातली मी खात असलेली ही दुसरी ‘कायिहुळी’! याआधी भैरप्पांच्या घरीही मी ती खाल्ली होती. आणि कारंतांच्या ‘डोंगराएवढा’मध्येही ‘कायिहुळी’चं वर्णन केलेलं होतं. कारंतांची म्हणजे समुद्रकिनाऱ्यालगतच्या कर्नाटकातली ‘कायिहुळी’ सोलकढीशी साम्य सांगणारी होती (आमसोल वगळून). भैरप्पांच्या घरातली (म्हैसूरकडची) ‘कायिहुळी’ आपल्या भाज्या आणि नारळ घालून केलेल्या कायरसाशी साम्य दाखवत होती. आणि इथं डोंगराच्या वरच्या बाजूला असलेल्या मलेनाडमधल्या ‘कायिहुळी’त नारळाचा मुबलक चव होता आणि त्यात पिकलेले छोटे छोटे आंबे किंचित फोडून सोडले होते.

मी त्याने एकदम सावध झाले. एखाद्या कन्नड तोंडीलावण्याचा आपल्याकडच्या एखाद्या पदार्थाशी साम्य कल्पून अनुवादात वापर करण्यातला धोका मी प्रत्यक्षच पाहत होते.

त्या दोघांनी आणखी एक सांगितलं. त्यांच्या मुलीचे सासरचे लोक मराठी होते. त्यांना तेजस्वींच्या लेखनाविषयी कसं आणि काय सांगायचं? त्यावेळी त्यांना मी त्यांच्यावर लिहिलेला  लेख उपयोगी पडला म्हणे!

निघताना राजेश्वरी मला म्हणत होत्या, ‘मी काही दुर्मीळ वृक्षांची रोपं तयार केली आहेत. त्यातली रोपं तुम्हाला देऊ का?’

त्यांनी हे दोन-तीनदा म्हटल्यावर मी म्हटलं, ‘तुम्ही वृक्षांची रोपं द्याल. पण आम्ही फ्लॅटमध्ये राहतो. मी जमीन कुठून आणू?’

माझं उत्तर तेजस्वींना अस्वस्थ करून गेलं. आम्ही तिथून बाहेर पडेपर्यंत ते पत्नीला म्हणत होते, ‘पाहिलंस! तू रोपं देतेयस; पण त्यांच्याकडे झाडं लावायला जमीनच नाही आहे.’

बोलताना तेजस्वींना पुण्याला येण्याविषयी म्हटलं तर ते म्हणाले, ‘अय्यो! हल्ली म्हैसूरमधली गर्दी किती वाढली आहे! पुण्याला आणखी गर्दी असेल ना?’

आमची बोलतीच बंद झाली!

कर्नाटकातील मूडबिद्री येथील ‘विश्व नुडिसिरि विरासत’ पुरस्काराच्या वेळी माझ्यासोबत पुरस्कार घेणारे एक लेखक डॉ. ना. मोगसाले हे उडुपि-मंगळूरच्या मधे साधारण कटपाडी-मूडबिद्रीजवळ असलेल्या कांतावर या गावी स्थायिक झालेले आयुर्वेदिक डॉक्टर. एकदा त्यांनी पुण्यात येऊन आमची ओळख करून घेतली आणि त्यानंतर व्याख्यानासाठी आपल्या गावी बोलावले. त्यांच्या ‘उल्लंघन’ नावाच्या कादंबरीचा मी अनुवादही केला. या कादंबरीच्या अनुवादाच्या वेळी मला तिथल्या तुळू समाजात प्रचलित असलेल्या मातृसत्ताक पद्धतीशी परिचय झाला. लहानपणी बेळगावला शेजारी राहाणाऱ्या नायर या केरळी कुटुंबात ती पद्धत होती. त्या घरातली मुलं-मुली आईच्या नावाचं आद्याक्षर आपल्या नावापुढे लावायची. मी अनुवादित केलेल्या ‘उल्लंघन’ या कादंबरीत शेट्टी घराण्यातील तीन पिढय़ांची कहाणी सांगितली होती. या तीन पिढय़ांमध्ये त्या भागात होत गेलेल्या सामाजिक बदलाचा तिथल्या मातृसत्ताक पद्धत असलेल्या गावातल्या शेती हा प्रमुख व्यवसाय असलेल्या प्रतिष्ठित कुटुंबावरही काय परिणाम होतो, ते दर्शवलं होतं.

या कादंबरीचा प्रमुख विषय मातृसत्ताक पद्धत हा जरी नसला, तरीही मला त्याविषयी आकर्षण वाटलं. त्यामुळे मी मुंबईत स्थायिक झालेल्या डॉ. सुनीता शेट्टी या स्त्रीवादाचं प्रतिपादन करणाऱ्या लेखिकेशी बोलले. इतरांशीही बोलले. यानिमित्तानं माझ्यासमोर एका वेगळ्याच श्रद्धा-भक्तीचं दालन उघडलं होतं; जे मला माझ्या सगळ्या श्रद्धा-भक्तीच्या कल्पनांविषयी पुनर्विचार करायला लावत होतं.

म्हैसूरजवळच्या सुत्तूरमठात साहित्य अकादमीनं घेतलेल्या एका अनुवादाच्या कार्यशाळेत मी माधव कुलकर्णी यांची एक कथा ऐकली. नंतर त्यांचे कथासंग्रह मागवून त्यांतील निवडक कथांच्या अनुवादाचा ‘दोन म्हातारे आणि इतर कथा’ नावाचा एक मराठी संग्रहही प्रकाशित केला. या कथा म्हणजे ‘गोष्टी’ आहेत. यातली पात्रं त्या- त्या विशिष्ट समाजाचा भाग म्हणून येत असल्यामुळे आपापल्या श्रद्धा-अंधश्रद्धांसहित येतात. गदग-धारवाड-हुबळी या विशिष्ट परिसरात कथा घडत असल्यामुळे किती का कमी प्रमाणात होईना, तो परिसरही छोटय़ाशा कथेत येतो.

तसंच याच कार्यशाळेत मला फकीर महमद कटपाडी भेटले. तिथल्या वास्तव्यात त्यांच्याही फोटोग्राफीच्या नादाविषयी समजलं. माझाही तो नाद असल्यामुळे तो एक बोलायला विषय मिळाला. तेव्हा त्यांच्या मुलीचं नुकतंच लग्न झालं होतं. त्यांनी उत्साहानं त्या लग्नातले फोटो दाखवले. गप्पा मारताना त्यांच्या बोलण्यातून सतत दोन्ही समाजांतल्या साम्यस्थळांविषयी जाणवत होतं. याच भेटीत त्यांनी मला त्यांचे एक-दोन कथासंग्रह दिले होते. त्यांच्याशी गप्पा झाल्यावर मला त्या कथांविषयी उत्सुकता वाटू लागली. यातील बहुतेक कथांमध्ये त्यांनी आपल्या ‘बॅरी’ समाजातील विविध भावभावना, श्रद्धा आणि नातेसंबंध यांचे चित्रण अत्यंत संवेदनशील मनानं  केलेलं आहे. त्यातला धार्मिक तपशील वगळता ते हिंदूंसारखंच आहे. मुख्य म्हणजे त्यांनी आपल्या कथांमध्ये कुठल्याही धर्माला बदनाम किंवा अनुनय करायचा प्रयत्न करून सवंग लोकप्रियता मिळवायचा प्रयत्न केलेला नाही. त्यांनी मुसलमान समाजातील विविध स्तरांवरचे मानवी संबंध वाचकांसमोर ठेवायचा प्रयत्न केलेला आहे.

या कथा वाचतानाही मला जाणवत राहिलं की, भारतीय मुसलमान समाज हा एकजिनसी नसून तिथंही एक ‘समृद्ध अडगळ’च आहे! मी त्यांचा अनुवाद करायचं ठरवलं. अर्थात यातील अनेक धार्मिक आणि पारंपरिक संदर्भाचं मला आकलन होत नव्हतं. पण कटपाडींनी अत्यंत संयमानं माझ्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली आणि माझा ‘व्रत आणि इतर कथा’ हा कथासंग्रह तयार झाला.

कटपाडींशी बोलताना मला या ‘बॅरी’ समाजाविषयीही माहिती मिळाली. हा मुसलमान व्यापारी समाज जी भाषा बोलतो तिलाही ‘बॅरी’च म्हणतात. ही कन्नडची उपभाषा असून ते कन्नड लिपी वापरतात. त्यांच्या बोलण्यात ‘अब्बूजान’, ‘अम्मीजान’ हे शब्द नसून ‘अम्मा-आप्पा’ हे शब्द असतात. रोजाला ते ‘नोंबू’ म्हणतात. ‘नोंबू’ म्हणजे या भागात केलं जाणारं ‘अनंताचं व्रत’! हे लोक कुराणाला पाचवा वेद मानतात आणि बॅरी भाषत्ेा त्यांचं असं एक ‘रामायण’ही आहे. उत्तरेकडील मुसलमान धर्म हा आक्रमणातून आलेला असला तरी दक्षिणेकडील अरबी-मुसलमान संस्कृती महमद पैगंबराच्याही आधीपासून व्यापारामार्फत आली आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

शिवराम कारंत, भैरप्पा, सुधा मूर्ती आणि यू. आर. अनंतमूर्ती यांचं बरंच साहित्य मी अनुवादित केलेलं असलं तरी हे लेखक कुठल्या भाषेत लेखन करतात, हे समजून घेण्याच्या हव्यासापोटीच मी या आणि इतरही लेखकांचं लेखन आजवर अनुवादित करत राहिले आहे.
डॉ. उमा वि. कुलकर्णी