मूकबधिर तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून न्यायालयाने अशोक सहादू निमसे (वय ५३, रा. निमगाव घाणा, नगर) याला १० वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याशिवाय अ‍ॅट्रॉसिटी कलमान्वये निमसे याला ३ वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंडाचीही शिक्षा देण्यात आली. दोन्ही शिक्षा एकत्र भोगावयाच्या आहेत. त्यामुळे दंड एकूण ७५ हजार रुपयांचा झाला आहे.
अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी या खटल्याचा निकाल शुक्रवारी दिला. खटल्यात सरकारतर्फे अ‍ॅड. संघमित्रा वडनेर-चव्हाण (औरंगाबाद) यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांनी एकूण २४ साक्षीदार तपासले. त्यामध्ये ३० वर्षांच्या अत्याचारित तरुणीची साक्ष महत्त्वाची ठरली. तिच्या हावभावांच्या साक्षीसाठी तज्ज्ञ शिक्षिकांची मदत घेण्यात आली होती. दंडातील ५० हजार रुपये अत्याचारित मुलीला तर २५ हजार रुपये कायदेविषयक साहाय्य केंद्राला देण्याचा आदेश आहे.
सरकारी वकिलांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना डिसेंबर २००९च्या सुमारास घडली असावी. अत्याचारित मूकबधिर तरुणीचे पोट वाढून ती माती खात असल्याचे तिच्या आईच्या निदर्शनास आले. तिने ही घटना पुणे येथे नोकरीला असलेल्या मुलास कळवली. त्याने व आईने तरुणीची नगरच्या डॉक्टरांकडून तपासणी केली. त्यात ती आठ महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. नंतर तिला मुंबईत नातेवाइकांकडे हलवण्यात आले. तेथे तिची ४ सप्टेंबर २०१० रोजी प्रसृती झाली. परंतु तेथील बालक केंद्राने पोलिसांकडे तक्रार झाली नसल्याने बालकास दत्तक घेण्यास नकार दिला.
त्यामुळे भावाने नगरला जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यानंतर नगर तालुका पोलीस ठाण्यात अशोक निमसेविरुद्ध गुन्हा दाखल केला. तरुणीने आईला अत्याचार करणाऱ्याचे नाव लिहून दाखवले होते. पोलिसांनी निमसे याची डीएनए तपासणी केली. तज्ज्ञांनी निमसे हेच बाळाचे वडील असल्याचा अहवाल दिला. निमसे हा एका कारखान्यात काम करतो, तसेच त्याचा दुधाचा व्यवसाय आहे. त्याची जामिनावर सुटका झाली होती. शिक्षा लागल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.