खंडकरी व बटईदार शेतकऱ्यांच्या प्रश्नी आंदोलन करणाऱ्या कॉ. राजन क्षीरसागर व कॉ. अॅड. माधुरी क्षीरसागर या दोघांना रेलरोको करण्यापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले, तर रेल्वेस्थानकावर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी भाकपचे रेलरोको आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला.
खंडकरी व बटईदार शेतकऱ्यांना दुष्काळी मदत जाहीर करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाकपचे गेल्या ३ दिवसांपासून उपोषण चालू आहे. दुष्काळी मदतीसोबत बटईदार शेतकऱ्यांना पीकविम्याचा अधिकार, आत्मा योजनेचा लाभ मिळावा आदी मागण्या आहेत. दि. २०पासून सुरू असलेल्या उपोषणाची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल न घेतल्यामुळे शनिवारी सकाळी साडेदहाला परभणी रेल्वेस्थानकावर सचखंड एक्सप्रेस अडविण्यात येणार होती. कार्यकत्रे सकाळपासूनच रेल्वेस्थानक परिसरात जमा झाले. परंतु आंदोलनाचे नेतृत्व करणारे कॉ. राजन क्षीरसागर यांना सकाळी साडेनऊच्या सुमारास शिवाजी पुतळ्याजवळ उपोषणस्थळी पोलिसांनी उचलले, तर कॉ. अॅड. माधुरी क्षीरसागर यांना गजानननगर येथील निवासस्थानी नवा मोंढा पोलिसांनी ताब्यात घेतले. कॉ. क्षीरसागर दाम्पत्यास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच कार्यकत्रे संतप्त झाले व त्यांनी रेल्वेस्थानकामध्ये घुसून पोलीस दडपशाहीविरोधात घोषणा दिल्या.
रेल्वे प्रशासनाने नांदेडकडून येणारी सचखंड एक्सप्रेस िपगळी, पुणे-अमरावती एक्सप्रेस पोखर्णी व औरंगाबादकडून येणारी पॅसेंजर सेलू रेल्वेस्थानकावर थांबवून ठेवली. दरम्यान रेल्वेस्थानकावर जवळपास शंभर कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर परभणीबाहेर थांबवलेल्या रेल्वे मार्गस्थ झाल्या. आंदोलनात अॅड. लक्ष्मण काळे, माऊली फड, गजानन देशमुख, सचिन देशपांडे, संदीप सोळुंके, गंगाधर यादव आदी सहभागी झाले होते.