अवघ्या पावणे दोन वर्षांत १०१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने राज्य शासनाच्या नवजीवन योजनेमुळे नक्षल चळवळीला लागलेली गळती रोखण्याचे कठीण आवाहन नक्षली नेत्यांसमोर उभे ठाकले आहे. आज बहुसंख्य नक्षली नेत्यांनाही चळवळीचा विट आला असून आता चळवळीत नवचैतन्य कसेआणावे,  हा प्रश्न या नेतृत्वाला पडला आहे.

या जिल्हय़ात पाच वर्षांत १६८ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. पावणे दोन वर्षांतील ही संख्या १०१ आहे. या जिल्ह्य़ातून २०१२ मध्ये १४, २०१३ मध्ये ४८, २०१४ मध्ये ३८, तर २०१५ मध्ये ५६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला. २०१६ मध्येही हा आलेख उंचावत असून एप्रिलपर्यंत २३ नक्षलवादी शरण आले आहेत. त्यात एक विभागीय समितीचा सदस्य, १ कमांडरसह २१ नक्षली असून ११ पुरुष व १२ महिला असून दोन जोडप्यांचाही समावेश आहे. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक संदीप दिवाण रुजू झाल्यापासून अवघ्या पावणे दोन वर्षांत आत्मसमर्पितांची शंभरी गाठण्यात  पोलिस दलाला यश आले आहे. त्यात एक डिव्हीसी, ६ कमांडर, १४ उपकमांडर व ७९ सदस्य असून ५७ पुरुष व ४३ महिला व १७ जोडप्यांचाही समावेश आहे. गडचिरोली पोलिस दलाने संघभावनेने केलेल्या कामाचे हे फलित आहे, असे सांगून या यशाबद्दल पोलिस अधीक्षकांनी जिल्हा पोलिस दलाचे कौतूक केले आहे. या कार्यात अप्पर पोलिस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, प्रगय अशोक यांनीही मोलाची कामगिरी केली आहे. पोलिस मुख्यालयातील विचारपूस शाखेचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील, आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी पोलिस अधिकारी राहुल कोलते, नागरी कृती शाखेचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक विजय महाले, प्रचार शाखेचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक शहादेव पालवे, गोपनीय माहिती शाखेचे पोलिस अधिकारी संदीप मंडलीक, पोलिस उपनिरीक्षक सुनील गायकवाड, युवराज रबडे, नक्षल सेलचे सागर गवसणे आदि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा चांगला परिणाम दिसून आला.

तसेच नवनिर्मित पोलिस मदत केंद्र कोटमी येथील पोलिस उपनिरीक्षक अशोक भापकर व इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही उल्लेखनीय कामगिरी करून परिसरातील जनविश्वास संपादन केला आहे.या हद्दीतून त्यांनी २२ जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण घडवून आणले, तसेच पोलिस मदत केंद्र गट्टातील ११ जहाल नक्षली शरण आले. ताडगावचे अधिकारी परझने व त्यांचे सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ६, विशेष अभियान पथकाचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक जयंत जाधव यांच्या नेतृत्वाखालील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी चांगला जनसंपर्क करून ७ नक्षल्यांना शरण आणले. तसेच भामरागड ३, हालेवारा ४, लाहेरी ३, नारगुंडा २ व एटापल्ली, जारावंडी, कोरची, पेंढरी, पेरमिली, कसनसूर, गट्टा, सावरगाव, पोटेगाव, मालेवाडा येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे  अनेक जहाल नक्षल्यांना शरण आणून आत्मसमर्पितांची शंभरी गाठली आहे. पोलिस अधीक्षकांनी या काळात विविध नागरी कृती कार्यक्रम, आत्मसमर्पण योजनेचा प्रचार व प्रसार, नवजीवन २, प्रोजेक्ट अग्निपंख, प्रोजेक्ट भरारी, प्रोजेक्ट ज्ञानगंगा, दिवाळी व होळी या सणांना साहित्य वाटप, महाराष्ट्र दर्शन सहल, जनजागरण मेळावे, ग्रामभेटी, सामूहिक विवाह सोहळे, नक्षलविरोधी पथनाटय़, असे नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले. त्या माध्यमातून नक्षल कुटुंब भेट व विविध माध्यमातून संपर्क साधून त्यांचे मनपरिवर्तनाने आत्मसमर्पण घडवून आणले. नक्षल संघटनेतील अनेक नक्षलवादी आत्मसमर्पणाच्या मार्गावर असून लवकरच हा आलेख वाढेल, असेही पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले. आज नक्षल सदस्यांनाच चळवळ नकोशी झालेली असल्याने आत्मसमर्पणाला वेग आला असल्याचेही बोलले जात आहे.