गुन्हेगारीला कारणीभूत ठरलेली वाळूतस्करी बंद करण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी घेतला आहे. त्यांच्याच सूचनेवरून पोलीस उपअधीक्षक राकेश ओला यांनी मंगळवारी मुळा नदीपात्रात बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या वाळूतस्करांवर छापे घातले. वाळू वाहतूक करणाऱ्या १२ मोटारी, दोन दुचाकी गाडय़ा ताब्यात घेतल्या. तसेच गुन्हे दाखल केले.
महसूल खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाळूतस्कर मोठय़ा प्रमाणात हप्ते देतात. त्यामुळे कारवाई केली जात नव्हती. पण आता पोलिसांनी कारवाई करून त्यांना धक्का दिला. हप्तेखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे महसूल खात्यात खळबळ उडाली आहे. उपअधीक्षक राकेश ओला हे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असून १६ महिन्यांकरिता त्यांची नेमणूक येथे झाली आहे. त्यांचा वाळूतस्करांनी धसका घेतला आहे. यापूर्वी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांना हप्ते मिळत होते. पण ओला यांच्यामुळे आता त्यांच्यावरही संक्रांत आली आहे. त्यांनी वाळूतस्करांना तस्करी थांबवा अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशी समज दिली आहे.
मुळा नदीपात्रात डिग्रस येथे रात्रभर वाळूतस्करी चालत असल्याची गुप्त खबर ओला यांना मिळाली. त्यांनी मोठा फौजफाटा घेऊन रात्रभर छापे टाकले. त्यात १२ वाहने त्यांनी पकडली. सुमारे १ कोटी रुपयाची वाळू व वाहने छाप्यात जप्त करण्यात आली. राहुरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी चोरीचे गुन्हे नोंदविण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक विकास देवरे, उपनिरीक्षक गवांडे, बालाजी शेंगापिल्ली यांच्यासह ३० कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
गुटखा पकडला
उपअधीक्षक ओला यांनी श्रीरामपूर शहरात चोरटय़ा मार्गाने येणारा गुटखा पकडला आहे. शहरात राजरोसपणे गुटख्याची विक्री होत होती, पण कारवाई केली जात नव्हती. पण सुमारे १ लाख रुपयांचा गुटखा पकडण्यात आला. या कारवाईनंतर शहरातील गुटख्याची बेकायदा होणारी विक्री थांबली आहे. या प्रकरणी अनिल चमणलाल लोमाणी, ज्ञानेश्वर विठ्ठल तूपकरी, मंगलसिंग कपूरचंद परदेशी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे.