राज्यातील ऐंशी टक्के पोलिसांना घरकुले बांधण्यासाठी राज्य शासनाने बारा हजार कोटी रुपये खर्चाचा मास्टर प्लॅन बनवला आहे. हुडकोच्या सहकार्याने हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली असून वित्तीय विभागाकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर कामाला लगेचच सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापुरातील शाहुपुरी पोलीस ठाण्याची इमारत हेरिटेजमध्ये असल्याचे सांगितले जात होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हेरिटेजच्या यादीमध्ये या इमारतीचा उल्लेख नाही. यामुळे येथे पोलीस ठाणे बांधण्याचा प्रशासनाचा विचार असून त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण दहा टक्क्यांनी वाढवण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत असा उल्लेख करून ते म्हणाले, गुन्हेगारांना न्यायालयाकडून शिक्षा होणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास लोकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास वाढणार नाही. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल होण्यापासून ते न्यायालयीन कामकाज होईपर्यंत योग्यरीतीने काम करण्याची सूचना करण्यात आली आहे. यासाठी कोणताही गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलीस उपअधीक्षकांकडून छाननी होऊन फिर्याद नोंदवून घेतली जाणार आहे.
शहरातील प्रमुख भागामध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येणार असून त्यासाठी राज्य शासनाकडून एक कोटी व जिल्हा नियोजन मंडळाकडून एक कोटी रुपये मिळणार आहेत. त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेकडे सोपवण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे गुन्हे व गुन्हेगारांवर नजर राहणार आहे. तथापि हे काम गणपतीपूर्वी पूर्ण होण्याची शक्यता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास न लागल्याची खंत व्यक्त करून पाटील म्हणाले, आता हा तपास राज्य शासनाने सीबीआयकडे सोपवला आहे. त्यांच्याकडून फास्ट ट्रॅक पद्धतीने तपास व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सोशल मीडियावर अनुचित माहिती पोलिसांपर्यंत तातडीने पोहोचावी यासाठी एक व्हॉटसअप खाते कोल्हापूर पोलिसांकडून सुरू केली जाणार आहे. असा उल्लेख करून पाटील म्हणाले, फेसबुक, व्हॉटसअप यासारख्या सोशल मीडियावर अपप्रवृत्तींकडून चुकीची, अनुचित, गरसमज पसरवणारी माहिती दिली जाते. अशी माहिती रोखली जावी हा पोलिसांचा हेतू असतो. पण पोलिसांपर्यंत ही माहिती पोहचण्यास वेळ लागतो. अशा प्रकारची तातडीची माहिती पोलिसांना पोहोचावी यासाठी व्हॉटसअप खाते सुरू केले जाणार असून माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पोलीस उपाधिक्षक एम.एम. मकानदार उपस्थित होते.